राहुल थोरात -
कसबे डिग्रज (ता.मिरज) येथील बाबूजी लखनऊ उर्फ मोहंमद जावेद अमानउल्ला मतीहउल्ला या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे मागील महिन्यात तक्रार आली होती. त्याप्रमाणे तक्रारदार बिराप्पा पांडेगावकर यांना डमी गिर्हाईक बनवून त्या बुवा कडे पाठवले. त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी ९ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू पिना, उद याचा वापर करून त्याने एक होम पेटवून अघोरी पूजा केली.
याबाबत सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय चौगुले साहेब यांना अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी ही अघोरी पूजा होणार आहे याची माहिती दिली. चौगुले साहेब यांनी तातडीने याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक घाडगे साहेब यांना या अघोरी पूजेच्या ठिकाणी पाठवले. तेथे तो मांत्रिक अघोरी पूजा करताना रेडहँड सापडला. पोलिसांनी अघोरी पूजेचे सर्व साहित्य जप्त करून त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणून सकाळी त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
करणी, भानामती, काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही. करणी ही कपोलकल्पित गोष्ट आहे. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये, अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जवळच्या पोलीस स्टेशन कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.
– राहुल थोरात
