म.अं.नि.स.ची सर्पविषयक अंधश्रद्धा प्रबोधन मोहीम

राहूल विद्या माने -

10 ते 12 ऑगस्ट, 2021

जगभरात सापांबाबतच्या अंधश्रद्धा सर्वदूर पसरलेल्या आहेत. आपल्या देशात तर सर्पविषयक अंधश्रद्धांमुळे सापांबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्यामुळे आजही हजारो जीव जात आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सर्पविषयक अंधश्रद्धांबाबत प्रबोधन हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मोठ्या प्रमाणावर साजर्‍या होणार्‍या नागपंचमीसारख्या सणानिमित्त समाजात या अंधश्रद्धांविरोधात प्रबोधन करण्याची संधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नेहमीच साधली जाते. यावर्षीच्या कोविड परिस्थितीमुळे प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्यक्रम करणे अशक्य असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपंचमीनिमित्ताने सर्पविषयक अंधश्रद्धा निर्मूलनाची तीन दिवसीय ‘ऑनलाईन प्रबोधन मोहीम’ यावर्षी राबवली. या मोहिमेची सुरुवात पिंपरी-चिंचवड प्राणिसंग्रहालयाचे संचालक सर्पतज्ज्ञ अनिल खैरे यांच्या व्याख्यानाने 10 ऑगस्ट 2021 रोजी झाली.

दिवस पहिला ः सर्पविज्ञान आणि पर्यावरण अनिल खैरे

सुरुवातीला अनिल खैरे यांनी आपल्या व्याख्यानात, आपल्या समाजात एका बाजूला नागाला, सापाला देव मानलं जातं आणि दुसर्‍या बाजूला आपला देश शेतीप्रधान असूनही त्याला मारण्यासाठी घराच्या भिंती सुद्धा पाडल्या जातात, या मनोवृत्तीवर नेमके बोट ठेवले व सापाचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय आहे, त्याबद्दल वैज्ञानिक माहिती देत उंदरांचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करणार्‍या सापांचे अन्न साखळीतील विशेष महत्त्व अधोरेखित केले.

अनिल खैरे त्यांनी सुरुवातीला सरीसृप वर्गातील प्राणी उदा. मगर, साप, कासव, ट्यूटारा यांची उत्क्रांतीच्या इतिहासाच्या अंगाने ओळख करून दिली आणि त्यांची नैसर्गिक वैशिष्ट्ये सांगितली. वाळा, तस्कर, धामण, दिवड, वेरुळा, गवत्या, धूळनागीण, कवड्या, मांडूळ, डुरक्या घोणस, अजगर, हरणटोळ, रुका सर्प, मांजर्‍या, घोणस, फुरसे, मण्यार, पट्टेरी मण्यार, नाग या सापांच्या जातींबद्दल संक्षिप्त जीवशास्त्रीय माहिती दिली. यातील फक्त नाग, घोणस, फुरसे, मण्यार या विषारी सापांसाठीच प्रतिसर्प विष बनवण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. साप जिभेने वास घेतात, हे अर्धसत्य आहे हे सांगत सापांच्या रंगावरून ते विषारी किंवा बिनविषारी ठरत नसतात, असंही त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलं.

अनिल खैरे यांनी मॉरिशस, अँटिग्वा या बेटांवरील सापांच्या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्याचे प्रयत्न कसे चालले आहेत, याची माहिती देत काही वर्षांपूर्वी बत्तीस शिराळ्याला नागपंचमीदिवशी विविध सापांना कसे वाचवले, याच्या आठवणीही सांगितल्या. सापांच्या नैसर्गिक; तसेच आधुनिक जगातील मानवी वस्तीजवळील अधिवासाबद्दल तपशिलात माहिती दिली. सर्पदंशापासून वाचण्यासाठी उपाययोजना करण्याच्या विविध पद्धतींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचार कसा करायचा, याबद्दल माहिती दिली. ‘नागमणी’बद्दलच्या गैरसमजुती व अंधश्रद्धा त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगितल्या. फारूक गवंडी यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. धनंजय कोठावळे यांनी प्रश्नोत्तराच्या सत्राचे संयोजन केले. डॉ. अरुण बुरांडे यांनी आभार मानले.

दिवस दुसरा ः संवाद सर्पमित्रांशी भरत छेडा, निर्झरा चिठ्ठी

सर्पविषयक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघर्षात सर्पमित्रांचे योगदान खूपच मोठे आहे. नागरी वस्तीत येणारे साप पकडणे, त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, सर्पदंश झालेल्यांना उपचार देणे; त्याबरोबरच सापांबाबत प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा-कॉलेजमध्ये ठिकठिकाणी जी व्याख्याने आयोजित केली जातात, त्यात हे सर्पमित्र उत्साहाने सहभागी होत असतात. एका अर्थाने सर्पमित्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समविचारी असल्यामुळे त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागपंचमीनिमित्त आयोजित ‘सर्पविषयक ऑनलाइन प्रबोधन मोहीम’ यामध्ये दुसर्‍या दिवशी (11 ऑगस्ट) ‘संवाद सर्पमित्रां’शी या विषयावर संवादसत्र आयोजित करण्यात आले. यात सोलापूरचे सर्पमित्र भारत छेडा आणि बेळगावच्या सर्पमित्र निर्झरा चिट्टी यांनी सहभाग घेतला आणि त्यांना बोलते करण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, सर्पमित्र आणि वन्य जीव प्राणी, सूक्ष्मजीव यांचे छायाचित्रण करणारे ज्ञानेश्वर गिराम यांनी केले. हा संवाद साधताना त्यांनी सर्पमित्रांना, त्यांची सर्पमैत्रीमागील प्रेरणा, सापांविषयीचे थरारक अनुभव, त्यांचे सर्पविषयक शास्त्रीय ज्ञान, संशोधन, प्रबोधन याबाबत प्रश्न विचारत बोलते केले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील एका छोट्या खेड्यातून निर्झरा चिट्टी आलेल्या आहेत. आजवर जवळजवळ 1500 सापांना वाचवून त्यांच्या अधिवासात सोडणार्‍या निर्झरा चिट्टी यांच्या सर्पमैत्रीची सुरुवात सापांच्या शास्त्रीय अभ्यासातून झाली. रात्री-अपरात्री, राना-जंगलातून फिरताना त्यांचे बाईपण कधीच आड न आल्याचे त्यांनी आवर्जून सांगत निर्झरा चिट्टी म्हणाल्या, “साप पकडायला घरातून समर्थन होते. त्यामुळे मी धाडस करू शकले. घराच्या छपरावर चढून, विहिरीत उतरून साप पकडण्याचे अनेक थरारक प्रसंग सांगत त्यांनी बिनविषारी साप, विषारी साप याबद्दल माहिती दिली. आपण विषारी सापांना ओळखायला शिकायला पाहिजे. साप ‘डुक’ धरतो हे खोटं आहे. घरामध्ये साप येऊ नये, असं वाटत असेल तर घरात स्वच्छता ठेवावी, उंदीर होऊ देऊ नयेत.”

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेचे कार्यकर्ते असलेले भरत छेडा वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य करतात. त्यासाठी ट्रेक करणे, कार्यशाळा आयोजित करणे हे त्यांचे काम सतत चालू असते. सर्पदंश होणार्‍या व्यक्तींवर योग्य इलाज करणे, जखमी सापांची काळजी वाहणे, ही तर त्यांची नित्याचीच कामे बनली आहेत. ते म्हणाले, “लोकांच्या भीतीपोटी, हतबलतेपोटी सापाला काठीने मारले जात असताना त्याची तडफड शालेय जीवनात बघितली. ‘तो’ प्रसंग मनात घट्ट रूतला आणि सापांना वाचवायची प्रेरणा मिळाली. पुढे, केवळ साप वाचवणे एवढेच काम राहिले नाही, तर सापाचा अभ्यास करणे, संशोधन करणे, प्रजननापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनचक्राच्या नोंदी ठेवणे सुरू झाले. सोलापूर शहर-जिल्ह्यात 27 जातींचे साप आम्हाला सापडले आणि त्यात पाच विषारी होते.” डांबरात अडकलेले साप काढण्यातील थरारकता वर्णन करत त्यांनी सांगितले, “साधारणत: भारतात लाखांच्या वर मृत्यू दर वर्षी सर्पदंशामुळे होतात. त्यामुळे या विषयावर प्रत्यक्ष काम करणार्‍या लोकांनी ‘प्रोटेक्टिव्ह गियर्स’ हे वापरलेच पाहिजेत. माणसाला आणि सापाला या दोघांनाही इजा होऊ नये. बर्‍याच वेळा सापांबद्दलच्या गैरसमजुतीतून बिनविषारी साप चावला तरी हृदयविकाराचा धक्का लागून लोकांचा मृत्यू होतो. एक काळ सर्पमित्राकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जायचं. आज त्याला सन्मानानं पाहिलं जातं. “अंनिस”ने गावोगावी जाऊन लोकांच्या गैरसमजुती दूर करायला मदत केली. सापांबद्दल दूध पिण्याच्या गैरसमजुती दूर व्हायला लागल्या आहेत; पण अजून प्रयत्न व्हायला हवेत.” सर्पमित्राबद्दल ते म्हणाले, “सर्पमैत्री म्हणजे स्टंटबाजी नव्हे. लोकांना सापाला पकडायला नव्हे, तर सापाबरोबर राहायला जो शिकवितो तो सर्पमित्र.”

वंदना शिंदे यांनी नागबळीबद्दलच्या गैरसमजुती दूर करणारे गाणे गायले. सुजाता म्हेत्रे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. मधुरा सलवारू यांनी परिचय करून दिला. प्रश्नोत्तरांच्या सत्राचे संयोजन आणि आभार प्रदर्शन उदयकुमार कुर्‍हाडे यांनी केले.

दिवस तिसरा ः सर्प आणि अंधश्रद्धा दिलीप कामत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नागपंचमीनिमित्त आयोजित ‘सर्पविषयक ऑनलाइन प्रबोधन मोहिमे’त पहिले दोन दिवस सापांबाबतची वैज्ञानिक माहिती, सर्पदंशावरील उपचार, सापांच्या विषारी-बिनविषारी जाती, त्यांची शरीररचना याबाबत माहिती घेतली. पण सापासारख्या उपयुक्त असलेल्या या प्राण्याबाबतच इतक्या अंधश्रद्धा का? इतकी भीती का? सापाचे सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व काय, याचा ऊहापोह करणारे तिसरे आणि अंतिम व्याख्यान ‘सर्प आणि अंधश्रद्धा’ या विषयावर सर्पतज्ज्ञ आणि पुण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेदिलीप कामत यांचे झाले.

पुरातन काळापासून अनेक देवतांच्या गळ्यात साप असल्याचे मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सापांबद्दलच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. त्यामुळे जगभरातील संस्कृतींत साप एक पवित्र गूढतेचे प्रतीक बनले आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून सापांबाबत अनेक धार्मिक कर्मकांडे येत गेली. बत्तीस शिराळा हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, याचाच फायदा घेत वृत्तपत्रे, सिनेमा, दूरचित्रवाणी यांच्यामार्फत सापांबद्दल फार विकृत माहिती आपल्यापर्यंत येत राहिली. त्यामुळे त्यातून सापांबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा वाढतच राहिले. ते दूर करण्यासाठीच आपण ही मोहीम राबवत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानात केले. पण आज वन्यजीव कायद्यानुसार फक्त सापाच्या प्रतिमेचीच पूजा करता येते, हेही यांनी नमूद केले.

सापांबद्दल भीती असण्याचे कारण म्हणजे सर्पदंशामुळे होणारे मृत्यू. या मृत्यूच्या मागे सापाबाबतच्या अज्ञानाबरोबरच सर्पदंशावरच्या प्रतिविषाची अनुपलब्धता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. ते जर सहजपणे उपलब्ध असेल मंत्रोपचार करणार्‍या भगतांना निश्चितच आळा बसेल, असे प्रतिपादन करून ते म्हणाले, हे सर्पदंशावरील प्रतिविष ग्रामीण, आदिवासी भागात सर्वदूर उपलब्ध करून देणे हे एक मोठं काम आहे.

विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, सर्पदंश कसे टाळावेत, सर्पदंश झाल्यावर विविध चुकीचे उपाय केले जातात, त्याबद्दल माहिती देत त्यांनी योग्य उपचार कसे करावेत, हेही सांगितले. साप मारण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर ते प्रतिकार म्हणून ते माणसाला चावतात. अशी सापांबद्दलची माहिती देत त्यांनी आपल्या घरात बेडूक, उंदीर, पाल येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करावेत. भारतीय सर्पविज्ञान संस्था यात संशोधनाचे महत्त्वाचे काम करत असल्याचे सांगितले. चाकण, पुणे, पन्हाळा, ढोलघरवाडी आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांतील कार्यकर्ते, सर्पमित्र निरीक्षण, मानसिक तयारी, गतिमानता हे गुण आत्मसात करत कायदेशीर पद्धतीने साप पकडण्यासाठी प्रयत्न करीत सर्पविज्ञानाचा प्रसार आणि त्याबद्दलच्या अंधश्रद्धांचे निराकरण करण्याचे काम करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या सत्राचे सूत्रसंचालन व प्रश्नोत्तरांचे संयोजन हे मिलिंद देशमुख यांनी केले. प्रा. किरण सगर यांनी प्रास्ताविक केले. किरण जाधव यांनी परिचय करून दिला. प्रकाश घादगिने यांनी आभार मानले.महाराष्ट्रभरातील सर्पमित्र, श्रोते, कार्यकर्ते यांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा समारोप करताना फारूक गवंडी यांनी सर्पमित्रांना सरकारी ओळखपत्रे देण्याची गरज व्यक्त केली.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]