एक संवाद तुको बादशहांसोबत…

नरेंद्र लांजेवार - 9422180451

संत तुकाराम महाराज जयंती निमित्त मुक्त संवाद..

विश्वकवी, मानवतावादी संत आणि विद्रोही व्यक्तिमत्त्वाचा धनी म्हणजे आमचा तुकोबा! धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक डोळस भक्त! आपले स्वतःचे सर्वस्व तर पणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा आव्हानवीर योद्धा! प्रतिभावंत, भक्त आणि योद्धा या तिन्ही भूमिकांचा एकत्र मिलाफ झालेला महापुरुष म्हणजे कवी तुकाराम, संत तुकाराम आणि विद्रोही तुकाराम!

आमचा कूळपुरुष तुकोबा… कधीतरी शाळेमध्ये असताना –

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे करू।

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।

शब्दें वाटू धन जनलोकां॥

हा अभंग वाचला आणि मग लक्षात आलं की, हा तुकाराम म्हणजे आपला कुळपुरुष.. तुकाराम बुवांची गाथा वाचू लागलो, तसतसं मला जाणवू लागलं की, तुकारामांचा प्रत्येक अभंग माझ्याशी संवाद साधतोय…मग ‘तुकोबा’ हा माझा जवळचा ‘तुक्या’ केव्हा झाला ते कळलंच नाही. तुकारामांचे कवित्व, संतत्व आणि विद्रोहीपण समजून घेण्यासाठी संपूर्ण ‘तुकाराम’ वाचून काढला…

“बा तुकोबाराया, आज तुमच्या जयंतीदिनी तुमच्याशी संवाद साधताना खरोखरच आनंद वाटतो. तुमच्या ‘अभंगवाणी’ची जनमानसांमध्ये सुभाषिते झाली आहेत. तुम्ही बोलत होता ती ‘वेदवाणी’ नव्हती; ती ‘जनवाणी’ होती… जनांच्या मनामध्ये ईश्वरभक्तीबद्दल जी ओढ आणि अध्यात्माच्या नावावर जी दांभिक भक्ती सुरू होती, त्यावर चारशे वर्षांपूर्वी तुम्ही लेखणीने जे कोरडे ओढलेत, हे काम खरोखरच फक्त तुम्हीच आणि तुम्हीच करू शकलात. सतराव्या शतकाच्या आरंभीच तुमचा जन्म एका चांगल्या सधन कुटुंबात झाला. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीने ओढवलेले दारिद्य्र तुम्ही अनुभवले… उणेपुरे चाळीस-एकेचाळीस वर्षांचे तुम्हाला आयुष्य लाभलं… तुमच्या ‘अभंगवाणी’ने तुम्ही अजरामर झालात. तुमच्या ‘अभंगवाणी’तील एक-एक सुभाषित जनमानसांच्या हृदयावर कोरून ठेवले.

तुकोबाराया, तुमची सुभाषितं साध्याभोळ्या, कष्टकरी माणसापासून विद्वानांपर्यंत सर्वांच्या मुखी वसली आहेत. खरंतर तुमच्या रचनेला केवळ चमकदार विचार नव्हे, तर तिला चिरंतन सत्याचे अधिष्ठान लाभले आहे. चिरंतन सत्य तुमच्या विचारांतून जनमानसाच्या मुखी वसले आहे. उदा…

1. सुख पाहतां जवापाडे। दुःख पर्वताएवढे॥

2. ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती ॥

3. असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।

4. आली सिंहस्थ पर्वणी। न्हाव्याभटां झाली धणी।

5. नाही निर्मळ जीवन। काय करील साबण़?

6. तुझे आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलासी॥

7. साधूसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा॥

8. बोलाचीच कढी, बोलाचाचि भात। जेऊनिया तृप्त कोण झाला?

9. कोणी वंदा कोणी निंदा। आमुचा स्वहिताचा धंदा॥

10. बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥

11. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥

12. भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

…अशा एकापेक्षा एक चांगल्या सुभाषितांमधून मराठी भाषेच्या श्रीमंतीला तुम्ही देहूकर वाण्याने केवढा प्रचंड हातभार लावला आहे, हे पाहिल्यावर मन विस्मित होते. सर्वांच्या चित्तवृत्तीवर सखोल परिणाम करू शकणारी समर्थ व सर्वस्पर्शी तुमची ‘अभंगवाणी’ असल्यामुळे ‘मराठीचा महाकवी’ हे बिरुद फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच शोभून दिसते. मराठीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळा म्हणजे तुमची काव्यप्रतिभा होय, म्हणूनच तुकोबाराया तुम्ही आमचे कुळपुरुष आहात.

तुकोबाराया तुमची ‘अभंगवाणी’ ध्येयवादातून साकारली आहे, समाजाची बांधिलकी तिने पत्करली आहे. प्रबोधन हाच तिचा प्रधान हेतू राहिला आहे, म्हणून जनमानसामध्ये तुमची वाणी तरली. तिला मिटवण्यासाठी अनेक मंबाजी पुढे आलेत, त्यांनी तुमची हस्तलिखिते ‘इंद्रायणी’त बुडवली, तरीही ती नष्ट न होता लोकांच्या मनामनांत, अंतःकरणात कोरलेली असल्यामुळे लोकमानसानेच ती तारली.

प्रबोधनाच्या चळवळीत काम करणार्‍यांना; त्यातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणार्‍यांना तुम्ही आमचे मार्गदर्शक मित्रच वाटता. कारण तुम्ही लिहून ठेवलेल्या विचारांवरच आम्ही प्रबोधनाचा वसा पुढे चालू ठेवला आहे.

तुम्ही अनेक ढोंगी, साधू, अंधश्रद्धा यांवर फार प्रखर भाष्य केलं आहे, म्हणून तुमचे शब्द उसने घेऊन आम्ही सातत्याने ठिकठिकाणी बोलत असतो. तुम्ही जे सत्य चारशे वर्षांपूर्वी मांडले आहे, तेच पुन्हा-पुन्हा मांडण्याचे काम आम्ही करीत आहोत. तसा आमचा कोणत्याही देवा-धर्माला विरोध नसतो, आमच्या संविधानानेही प्रत्येकाला आपल्या देवा-धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे; पण देवा-धर्माच्या नावावर शोषण होणार्‍या प्रत्येक अंधश्रद्धेला आम्ही मूठमाती देऊ इच्छितो.

तुकोबाराया तुमच्या खास पठडीतला अभंग म्हणजे –

आली सिंहस्थ पर्वणी।

न्हाव्याभटां झाली वाणी ।

अंतरी पापाच्या कोडी।

वरिवरि बोडी डोई दाढी॥

आतल्या पापांच्या राशी जोपर्यंत नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत तीर्थस्थानी जाऊन मुंडन करून घेण्याने काय साधणार आहे? ते बोडून काढले तेवढेच निघाले. मनाच्या स्वच्छतेचे काय? असे भेदक सवाल तुम्ही धर्ममार्तंडांना विचारत. निरुत्तर करणारे असे प्रश्न विचारून तुम्ही समाजाला खडसावून त्याची निर्भत्सना करून त्यांना गदागदा हलवून समाजाला विवेकी भान देण्याचं महान कार्य तुम्ही केलंत. यात्रा-जत्रा, जप-जाप्य यांना तसा फारसा अर्थ नाही; पण आंतरिक भक्तीचा उमाळा असेल तर तीर्थयात्रेचीही काहीच आवश्यकता नाही. तुकोबा, आमच्यासारख्या विवेकी माणसांनी आज हे सांगितले की, आम्ही धर्मबुडवे ठरतो; पण चहूबाजूंनी विरोध होत असतानाही तुम्ही विवेकी विचारांची पेरणी करीत गेलात…

ऐसे कैसे झाले भोंदू?

कर्म करुनि म्हणती साधू ॥

अंगा लावूनिया राख।

डोळे झाकूनी करिती पाप॥

दावुनि वैराग्याची कळा।

भोगी विषयाचा सोहळा ॥

तुका म्हणे सांगो किती।

जळो तयांची संगती॥

ज्यांची संगती जळो असे आपण म्हणालात, तेच साधू, बुवा, साध्वी आज आमच्या लोकसभेत मंत्रिमंडळात जाऊन बसल्या आहेत.

तुकोबा, चारशे वर्षांत खूप काही बदल झालेत. चारशे वर्षांपूर्वी समाजाला न पेलवणारा विचार तुम्ही मांडला, त्यासाठी आग्रह धरला, जनचळवळ उभी केली, लोकांचे प्रबोधन केले, लोकांना विवेकी बनविले. तुमच्या विचारांमुळे धर्ममहंतांच्या सत्ताकेंद्रांना हादरा बसला. त्याचेच फळ म्हणून की काय तुम्हाला आम्ही सदेह वैकुंठाला (!) पाठविले. रंगपंचमीच्या खेळात चेहर्‍यांना वेगवेगळे रंग लावून आलेल्या खोट्या भक्तांनी तुम्हाला सदेह वैकुंठाला पाठवले. पुढे अनेक शतकांचा अंधार पार करून ‘सबको सन्मती दे भगवान,’ म्हणणारा एक युगपुरुष आला, ज्याने तुमचे अभंग गुजरातीत अनुवादित केले होते, त्यालाही आम्ही गोळ्या मारल्या… हा सिलसिला कालपरवापर्यंत चालू आहे. समाजात विवेकी विचार मांडणार्‍यांची आम्ही हत्याच करतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी अशा व्यक्तींचे विचार संपत नाहीत, म्हणून माणसंच आम्ही संपवितो.

तुकोबा बादशहा तुम्ही म्हणाला होतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।’ खरंच, अजूनही तुम्ही व्यक्त केलेली ती युध्दाची काळरात्र संपलेली नाही. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे। वनचरे…’ ही शिकवण अजून आम्हाला अंगीकारता आली नाही. तरी तुकोबा, जोपर्यंत चंद्र-तारे या भूतलावर आहेत, तोपर्यंत तुमची ‘अभंगवाणी’ जनमानसामध्ये पिढ्यान्पिढ्या आत्मबळ देण्याचे कार्य करीत राहील. हे महासत्य सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही, हे मात्र खरं.

बा तुकोबा, असे अधून-मधून भेटत चला… तुम्ही भेटला की आम्हाला विवेकी भान मिळते. आजच्या संवेदनाहीन समकालीन परिस्थितीत वैचारिक बळ मिळते, धीर मिळतो, आधार मिळतो. म्हणून तुकोबा, तुम्ही आम्हाला हवेच आहात…

तुमचा चाहता…”

-नरेंद्र लांजेवार, बुलडाणा

संपर्क 9422180451


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]