वादविवादाच्या भोवर्‍यात डार्विनवाद व मानवी स्वभाव

प्रभाकर नानावटी -

डार्विनवादाचे विश्लेषण करणार्‍यांचे स्थूलमानाने चार गट पाडता येतात : एक गट उघडउघड उत्क्रांतिवादाला विरोध करणारा; दुसरा गट ‘मनप्रथम’ व डार्विनवादाविषयी द्विधा मनःस्थितीत असलेला; तिसरा गट डार्विनवादाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारा व भौतिकवादाचा पुरस्कार करणारा व शेवटचा उत्क्रांतिवादी मनोवैज्ञानिकांचा. यांतील पहिल्या गटाबद्दल न लिहिलेले बरे. दुसरा गट डार्विनवादाचा मर्यादित स्वीकार करत असतो, परंतु कुठली तरी अज्ञात शक्ती जगरहाटीचे नियंत्रण करत आहे, यावर विश्वास ठेवत असतो. मानवी शरीरात आत्मा नावाचा प्रकार असून भौतिकाच्या संज्ञेतून त्याची व्याख्या करता येत नाही, असे या गटाला वाटते.

डार्विनच्या सिद्धांताचा नैसर्गिक निवडीचा भाग हा त्या सिद्धांताचा मूळ गाभा आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एकूणच या सिद्धांताबद्दलचे वाद अजून संपलेले नाहीत. डार्विनचा सिद्धांत ख्रिश्चनांच्या सर्व पारंपरिक श्रद्धांना धक्का देत होता, हे मात्र निर्विवाद आहे. व्हिक्टोरिया राणीच्या काळातील अभिजनवर्ग जनसामान्यांना ‘माणूस’ असे मानण्यास तयार नव्हता. त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांमधून उत्क्रांत झाला किंवा सृष्टीचे व्यवहार ईश्वराच्या इशार्‍याशिवाय चालू शकतात, ही कल्पनाच त्यांना अस्वस्थ करत होती. विशेष म्हणजे त्या काळातील बहुतेक वैज्ञानिक ख्रिश्चन धर्मोपासक, विशेषकरून धर्मोपदेश करणारे पाद्री होते. उघड आव्हान-प्रतिआव्हानाचा सुरुवातीचा काळ ओसरल्यानंतर लोक थंड डोक्याने विचार करू लागले. खालच्या स्तरातील प्राण्यांपासून माणूस उत्क्रांत होऊ शकतो, याला हळूहळू का होईना, मान्यता मिळू लागली. पण हे सुद्धा ईश्वराच्या इच्छेनुसारच घडत असते अशी पुस्ती त्यांनी जोडली. आत्मा देवाची देणगी आहे, देह नश्वर आहे. पुण्य केल्यामुळे स्वर्गप्राप्ती, पापकर्मामुळे नरक निश्चित इ.इ. सनातनी श्रद्धा तशाच राहिल्या व अजूनही आहेत. बायबलमध्येसुद्धा शरीर व शरीराभोवतीचे सर्व भौतिक व्यवहार मानवी वंशाला भ्रष्ट करणारे आहेत असा उल्लेख आहे, असे सांगण्यात धन्यता मानली जात आहे. हे शरीर किडे मुंग्यांपासून वा माकड-चिंपांझीपासून उत्क्रांत झालेले असल्यास बिथरण्यासारखे काही नाही, असे त्यांना वाटत आहे.

डार्विनवादाने उपस्थित केलेल्या इतर अनेक किरकोळ प्रश्नांव्यतिरिक्त दोन प्रश्न महत्त्वाचे वाटतात. एक, डेनेटने प्रश्नांकित केल्याप्रमाणे डार्विनवाद हे वैश्विक आम्ल आहे हे मान्य असल्यास आपण कोण, सृष्टीत नेमके काय आहे, ते कसे घडले, त्यांचे अंतर्गत तणाव इत्यादी प्रश्नांचा संदर्भ वैश्विक आम्लाशी जोडता येईल का? दोन, मानववंशाचे मूळ काय आहे याच्याही पलीकडे जाऊन मानवी स्वभावाचे बारकावे समजून घेण्यासाठी डार्विनच्या सिद्धांताचा वापर करता येईल का?

पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात पुनरुत्पादन, संततीत वाढ, अस्तित्वासाठी लढाई, त्यासाठी कराव्या लागणार्‍या करामती, जैवविविधता, आनुवंशिकता इत्यादी गोष्टींचा विचार करता येईल. जेव्हा संततीत मर्यादेबाहेर वाढ होऊन सजीव जास्तीत जास्त जागा अडवू पाहतो व/वा जास्त ऊर्जास्रोतांची मागणी करू लागतो, तेव्हा नैसर्गिक निवडीचा नियम लागू होतो. त्यामुळे निवडक संततीलाच पुनरुत्पादनाची मुभा मिळते व दुर्बल जीव नाहीसे होत जातात. यात अतिक्षुल्लक वाटणार्‍या जीवजंतूंपासून सुरुवात होऊन स्तर बदलत बदलत वरच्या स्तरावरील अत्यंत गुंतागुंतीच्या प्राण्यापर्यंतचा सहभाग आहे. हे असे का घडते याचे स्पष्टीकरण नाही. असे काही व्हावे म्हणून कुणीही इच्छा प्रदर्शित करत नाही. हे सर्व भौतिक प्रक्रियेचा भाग असून त्यात विशेष काही नाही. सजीवोत्पत्तीच्या कल्पनेसाठी बगळे, कासव, पक्षी, माकड, चिंपांझी इत्यादींचा अभ्यास पुरेसा आहे. देवदूत, आकाशातल्या पर्‍या, ईश्वर, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, आत्मा, मोक्ष, साक्षात्कार, पुनर्जन्म, अमरत्व इत्यादी कुठल्याही गोष्टींची गरज भासणार नाही. त्यामुळे बुद्धीच्या आवाक्यातील कुठल्याही प्रांताला या वैश्विक आम्लाचा संदर्भ लावता येईल, असे अनेक आधुनिक वैज्ञानिकांना वाटत आहे. वर्तमानाच्या संदर्भापुरताच विचार करत असल्यास जीवजंतू, इतर प्राणी व माणूस या सर्वांची उत्पत्ती, पुनरुत्पादन, अस्तित्व, वाढ इत्यादी बाबतीतच नव्हे, तर मानवी व्यवहाराच्या सामाजिक व बौद्धिक जगाच्या बाबतीतही या सिद्धांताची व्याप्ती वाढवता येईल, असा आत्मविश्वास काही जीवशास्त्रज्ञ बाळगून आहेत. काही वैज्ञानिक मात्र वर्तमानकाळातील समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी डार्विनवादाचा कितपत उपयोग होईल याबद्दल साशंक आहेत. मुळातच हे दोन्ही प्रश्न सजीवांची उत्पत्ती व मानवी स्वभाव हे सर्वस्वी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांची सरमिसळ करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांना वाटते.

डार्विनवादाचे विश्लेषण करणार्‍यांचे स्थूलमानाने चार गट पाडता येतात : एक गट उघडउघड उत्क्रांतिवादाला विरोध करणारा; दुसरा गट ‘मन-प्रथम’ व डार्विनवादाविषयी द्विधा मनःस्थितीत असलेला; तिसरा गट डार्विनवादाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारा व भौतिकवादाचा पुरस्कार करणारा व शेवटचा उत्क्रांतिवादी मनोवैज्ञानिकांचा. यांतील पहिल्या गटाबद्दल न लिहिलेले बरे. दुसरा गट डार्विनवादाचा मर्यादित स्वीकार करत असतो, परंतु कुठली तरी अज्ञात शक्ती जगरहाटीचे नियंत्रण करत आहे, यावर विश्वास ठेवत असतो. मानवी शरीरात आत्मा नावाचा प्रकार असून भौतिकाच्या संज्ञेतून त्याची व्याख्या करता येत नाही, असे या गटाला वाटते.

यानंतरचा गट पूर्णपणे भौतिकवादाच्या अभ्यासकांचा आहे. यांना ‘मन-प्रथम’ बद्दल आस्था नाही. सर्व काही भौतिकातूनच येते यावर त्यांचा विश्वास आहे. भौतिकशास्त्राचे नियम व नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जगाच्या उत्पत्तीचे रहस्य भेदू शकतात, मानवी स्वभावाचे मूळ कुठे आहे हेही त्यातून कळू शकते, असा त्यांचा दावा आहे. या गटाच्या मते, आपण उत्क्रांत होत होत या अवस्थेपर्यंत पोचलेलो असून उत्क्रांतीच्या उगमाच्या अभ्यासातून आपल्या हाती काही लागणार नाही. कारण माणसाचे मन जन्माच्या वेळी कोर्‍या पाटीसारखे असते व भोवतालची परिस्थिती त्याला शिकवून माणूस म्हणून घडवते. मानवी स्वभावाचा अभ्यास करताना माणूस हा एकक म्हणून न घेता समाज वा मानवी समूह यांना एकक समजून अभ्यास केल्यास स्वभावातील कंगोरे समजतील, असा त्यांचा समाजशास्त्रज्ञांसारखा दावा आहे.

चौथा गट मात्र केवळ भौतिकावस्थेत समाधान न मानता मानवी स्वभाव व डार्विनवाद यांचा घनिष्ठ संबंध असून याचा अभ्यास करण्यासाठी ‘सामाजिक जीवशास्त्र उत्क्रांती मनोविज्ञान’ या नवीन विद्याशाखेलाच जन्म दिला आहे. या अभ्यासकांच्या मते, मानवी स्वभावाचा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचे मूळ शोधून काढल्यास, मानवी गुणविशेष, त्यांच्यातील चढउतार, माणसांच्या भावना, उद्वेग व एकंदर त्यांच्या स्वभावप्रकृतीत डोकावून पाहता येईल. भोवतालची परिस्थिती, वातावरणातील बदल इत्यादींचे मानवी स्वभावावर कसे परिणाम होतात, हाही अभ्यासाचा विषय होऊ शकेल. यांच्या मते, माणूस म्हणजे जनुकयंत्र (वा जनुक वाहक!) असून जनुकामुळेच माणूस घडत असतो. अशा प्रकारे कोर्‍या पाटीची वृत्ती विरुद्ध जनुक यंत्रवृत्ती असाही वादाचा एक मुद्दा चर्चेत आहे.

माणसाच्या मानसिकतेवर डार्विनवादाची छाप कुठपर्यंत पडली आहे, हाही वादाचा मुद्दा आहे. काहींच्या मते, आपण जरी उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला आलो असलो, तरी आता उत्क्रांती अंतिम टप्प्यावर आहे. आपण उत्क्रांतीमुळे नव्हे, तर आपल्या संस्कृतीमुळे प्रगती करत आहोत, त्यामुळे डार्विनवादाच्या ओझ्याची आपल्याला गरज नाही. मानवी प्रगती समजून घेण्यासाठी डार्विनवादाची पार्श्वभूमी आहे हे मान्य; पण आता त्याचे प्रयोजन नाही. मानवी स्वभाव हा समाजातील अनेक घटकांचा परिपाक असतो. हेच घटक स्वभाव घडवत असतात. पालकांचे आपल्या पाल्यावरील प्रेम, लैंगिकतेच्या संदर्भात मत्सर, आक्रमकता अशा उत्कट भावनांचा उद्रेक हेसुद्धा मानवी स्वभावाचा स्थायीभाव नसून ते संस्कृतीतूनच उद्भवतात. या तर्कानुसार मन ही निष्क्रिय वस्तू असून माणसाच्या वाढीबरोबरच स्थानिक संस्कृती मनावर सातत्याने आघात करत असते. मनच स्थानिक संस्कृतीतील किती गोष्टी सामावून घ्याव्यात, कुठल्या घेऊ नयेत, याची मर्यादा ठरवते. वर्तणूक हासुद्धा मानसिक व्यवहार असून ज्या गोष्टीमुळे लाभ होतो त्या गोष्टी मन स्वीकारते व ज्यामुळे तोटा होतो त्यांना टाळते. मन म्हणजे मातीचा गोळा; कुणीही यावे व काहीही घडवावे.

मानवी स्वभावास भौतिकताच कारणीभूत असल्यास आपल्याला ज्ञात असलेले जग कुठल्याही जाणीवपूर्वक उद्देशाने किंवा उद्देशपूर्तीसाठी घडलेले नाही. आणि अशा जगातील जीवोत्पत्ती पूर्णपणे निर्जीव वस्तूंपासूनच झाली हे मान्य करावे लागेल. मन व शरीराविषयी भाष्य करताना मन हा भौतिक शरीराचा गुणविशेष असून ते त्याच मुशीतून तयार झालेले आहे व मनाचे म्हणून काही वैशिष्ट्य नाही, हेही मान्य करावे लागेल. पारंपरिक विचार करणार्‍यांना या गोष्टी कदाचित मान्य होण्यासारख्या नाहीत. माणसातील विवेक व जाणीव या गोष्टी भौतिकतेच्या आधारे स्पष्ट करता येत नाहीत, असे काही विरोधकांना वाटते.

अशा प्रकारची विधाने व दावे अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत स्वीकारार्ह वाटत होते. अलीकडील काही वर्षांत या दाव्यांतील फोलपणा जाणवू लागला. सामाजिक जीवशास्त्राचे अभ्यासक कोर्‍या पाटीच्या सिद्धांतावर आक्षेप घेऊ लागले. खरे पाहता सामाजिक जीवशास्त्राची कल्पना, अंधूकशी का होईना, खुद्द डार्विनलासुद्धा होती. अस्तित्वाच्या लढाईत निवडीला वाव असतो. त्यासाठी अनेक पर्याय असतात. पर्यायाच्या निवडीवर व निवडीनुसार अस्तित्वाचे व पुनरुत्पादनाचे प्रश्न सुटण्याची शक्यता असते. पर्याय हे भोवतालची परिस्थिती, शारीरिक कौशल्य व माणसाची अंगभूत बुद्धिमत्ता यांवर अवलंबून असतात. परंतु अनेक वेळा पर्यायांची निवड भावनेच्या भरातच केली जाते. भावनेतूनच आवडनिवड ठरते व याच भावनेच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यातील पिढीजात गुण प्रकर्षाने जाणवतात. वेगवेगळ्या भावना, शारीरिक क्षमता, भौगोलिक परिस्थिती इत्यादींमुळे वेगवेगळ्या प्रकारांनी पुनरुत्पादनाची क्षमता उत्क्रांत होत असते.

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून भावनांचा विचार करता येईल असे उत्क्रांती मनोवैज्ञानिकांना वाटते. ज्या प्रकारे एखाद्या प्राण्याची चोच किंवा मान ‘अशीच का?’ याचा अभ्यास होऊ शकतो त्याच प्रकारे प्राण्यांच्या वर्तनविशेषावर भाष्य करता येते. एखादा प्राणी जरुरीपेक्षा इतरांना जास्त मदत करत असल्यास, सहकार्य दाखवत असल्यास, जास्त औदार्य दाखवत असल्यास, तो तसे का करत आहे याचा शोध घेणे शक्य आहे. या प्रकारच्या ‘उदात्त’ गुणांमुळे त्याच्या अस्तित्वात वा संततीच्या वाढीत गुणात्मक/संख्यात्मक फरक पडू शकतो का, याचा विचार करणे शक्य आहे. प्राण्यांच्या भावना, त्यांच्या सवयी, त्यांचा कल या गोष्टी मनोव्यापाराशी निगडित असून प्राणी तसे का वागतात हा संशोधनाचा विषय आहे.

जनुकांच्या शोधामुळे या प्रकारच्या संशोधनाला उत्तेजन मिळू लागले. जनुकांच्या रचनेतील बारीकसारीक तपशिलात शिरता आल्यामुळे आनुवंशिकता म्हणजे नेमके काय याची कल्पना येऊ लागली. जनुकांचे अस्तित्व व त्यांची वाढ यांनासुद्धा उत्क्रांतिवाद लागू करता आल्यामुळे त्याविषयीचे अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटू लागले. त्यामुळे मानवी जीवनातील संस्कृतीच्या वरचष्म्याला धका बसला. मुळातच मानवी स्वभाव हा विषय पहिल्यापासूनच अभ्यासकांशी लपंडाव खेळत आहे. हा विषय पुन्ह:पुन्हा डोके वर काढत आहे. मानवी स्वभावात मूलभूत व अतिमहत्त्वाचे असे मानलेले उपकाराची भावना, लाज, गर्व, आदर, सूड, प्रेम, आपुलकी इत्यादी गुणविशेष आपण माणसात नैसर्गिकपणे असतातच असे गृहीत धरतो. त्यात वेगळे काही असू शकते असे कधीच वाटत नाही. जीवनातील सर्व व्यवहार, व तेही जगभर, याच सरधोपट मार्गानेच व्हायला हवेत असा खरे पाहता कुठलाही दबाव नाही. तरीसुद्धा जगभरातील सर्व मानवी गटांत थोड्याफार फरकाने हे गुणविशेष आढळतात. उत्क्रांती मनोवैज्ञानिकांना जगभरातील सर्व मानवी समूहांना बांधून ठेवू शकणार्‍या या गुणवैशिष्ट्याबद्दल पहिल्यापासून फार कुतूहल वाटत आले आहे. यांतील प्रत्येक गुणविशेष उत्क्रांतीला साहाय्यभूत ठरला असून त्यावर जास्त संशोधनाची गरज आहे, असे या वैज्ञानिकांना वाटते.

जनुकांच्या अभ्यासातून जमातीजमातींतील फरक स्पष्ट करता येणे शक्य नाही, हेही तितकेच खरे. डार्विनवाद्यांच्या मते, जगभरातील विविध संस्कृतींमधील भोवतालच्या परिस्थितीला मानवी स्वभावाने दिलेला प्रतिसाद कारणीभूत आहे. त्यामुळे मानवी स्वभावात स्वार्थ, अपराधीपणा इत्यादींसारखे काही मूलभूत गुणविशेष आढळतात, तर काही गुणविशेष त्या त्या जमातीची वैशिष्ट्ये ठरतात. भोवतालच्या परिस्थितीचा मानवी स्वभावावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो हे उत्क्रांती मनोवैज्ञानिकांना शंभर टके मान्य आहे. कारण मुळात जनुकेसुद्धा भोवतालच्या वेगवेगळ्या परिस्थितीतून अनुकूल काय व प्रतिकूल काय ह्याच्या शोधात असतात. उत्क्रांतीच्या संदर्भात अनेक वाद-प्रतिवादाचे मुद्दे आहेत हे मान्य करायला हवे. फक्त वादाचे मुद्दे असणे म्हणजेच सिद्धांत सिद्ध झाला/होत आहे असेही नाही. परंतु मानवी स्वभावाला जास्त खोलात जाऊन समजून घेण्यासाठी या युक्तिवादावर जास्त बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.

संदर्भ : Human Nature after Darwin by Janet Radcliffe Richards

क्रमशः

लेखक संपर्क : ९५०३३३४८९५


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]