टोळधाडीचे संकट

अंनिवा -

‘कोविड – 19’ ची साथ, अम्फान, निसर्ग चक्रीवादळे यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येथील शेतकर्‍यांना आणखी एका नैसर्गिक संकटाला गेल्या डिसेंबरपासून तोंड देण्याची पाळी आली आहे. हे संकट आहे ‘टोळधाडी’चे. तसे पाहिले तर टोळधाडी भारतीय शेतकर्‍याला नवीन नाहीत. पूर्व आफ्रिकेतून पाकिस्तानात आणि तेथून दरवर्षी या टोळधाडी राजस्थान, गुजरातेत येत असतात. पण 2019 पासून खूप मोठ्या प्रमाणावर येणार्‍या या टोळधाडींनी शेतकर्‍याला जेरीला आणले आहे. या टोळधाडीचे एकच लक्ष्य असते त्यांच्या रस्त्यातल्या दिसणार्‍या हिरवाईवर तुटून पडायचे, ती पार साफ करून टाकायची. असे हे लाखो एकरांवरील पिके साफ करणारे हे टोळ असतात तरी कसे?

किडे आणि नाकतोडे ज्या कीटक कुटुंबातील आहेत, जवळपास त्याच कुटुंबातील हे टोळ आहेत. हे वाळवंटी प्रदेशात असतात; पण यांच्यात आणि किडे, नाकतोडे यांच्यात फरक असा असतो. ते जरी एकत्रित असले तरी पावसाची कमतरता असताना त्यांची वाढ एकाकीपणे होते; पण पाऊस झाला, हवेत आर्द्रता वाढू लागली, हिरवळ उगवू लागली की, या टोळात बदल होऊ लागतो आणि त्याचे रूपांतर कळपात होऊ लागते. ते झुंडीच्या अवस्थेत प्रवेश करतात. या अवस्थेत त्यांचे स्वरूप, सवयी, वागणूक सारेच बदलून जाते, जे शेतकर्‍याच्या विध्वंसाला कारणीभूत ठरते. त्याची भूक वाढते, खाण्यात विविधता येते, वेग वाढतो; एवढेच नव्हे, तर त्यांच्या मेंदूचा आकारही मोठा होतो. जगात टोळाच्या 10 प्रजाती सक्रिय आहेत, त्यापैकी चार जाती वेळोवेळी भारतात सक्रिय असल्याचे दिसले आहे. सर्वांत धोकादायक वाळवंटी टोळ आहेत, जे आताच्या या टोळधाडीत सक्रिय होते. वयात आलेल्या टोळांचा वेग तासाला 12 ते 16 किलोमीटर असतो. एका दिवसात या झुंडी 200 किलोमीटर अंतर पार करतात. काही झुंडीतील टोळांची संख्या एका चौरस किलोमीटरमध्ये 1 कोटी 50 लाख इतकी असू शकते.

या टोळधाडीचा धोका किती? – आपल्या मार्गात येणार्‍या प्रत्येक झाडाची, पिकाची सफाई ही झुंड करते. त्यामुळे या टोळधाडीचा अन्नसुरक्षेसाठी मोठा धोका आहे. वयात आलेल्या टोळाचे वजन 2 ग्रॅम असते. तो टोळ रोज आपल्या वजनाइतके धान्य फस्त करतो, म्हणजे एका चौरस किलोमीटर भागात पसरलेली एक झुंड 35 हजार लोकांच्या खाण्याइतक्या धान्याला आणि पिकांना नष्ट करते. यावरून आपल्याला कल्पना येईल की या टोळधाडी किती नुकसानकारक आहेत. म्हणूनच इतर कोणत्याही जातीच्या प्राण्यांपेक्षा या प्रकारच्या टोळांच्या जाती जगभरच्या आर्थिक स्थितीवर प्रचंड प्रभाव टाकतात, असे म्हटले जाते.

इतिहास ः आज जी भारतात टोळधाड आली आहे, ती गेल्या 27 वर्षांतील सर्वांत मोठी आहे. पण ही काही आजचीच घटना आहे, असे नाही. अशा टोळधाडी मानवी इतिहासात हजारो वर्षांपासून सातत्याने होत आलेल्या आहेत. अगदी प्राचीन असलेल्या इजिप्तच्या थडग्यांवर टोळधाडीची चित्रे आहेत. बायबल, कुराण यातही टोळधाडीची नोंद आहे. त्यावरून त्या काळातही हे हल्ले होत असलेले दिसून येते. म्हणजेच ही समस्या खूपच जुनी आहे.

कारणे ः आज ज्या टोळधाडींची आपण गोष्ट करत आहोत, त्याची कारणे अप्रत्यक्षपणे हवामानबदलाच्या प्रश्नाशी संबंधित आहेत. हवामानबदलामुळे भारतीय समुद्र गरम होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण अतोनात वाढत आहे. पूर्व आफ्रिकेत म्हणजे केनिया, युगांडा, इथिओपिया, सोमालिया येथे डिसेंबर 2019 ला मुसळधार पाऊस झाला, प्रचंड पूर आले. अशी परिस्थिती टोळवृद्धीसाठी आणि झुंड अवस्थेत रुपांतरित होण्यासाठी आदर्शच; परिणामी फेब्रुवारी 2020 मध्ये टोळधाडीने दणका दिला तो पूर्व आफ्रिकेला. मग त्या झुंडीचा प्रवास इराण, पाकिस्तान असा होत मेमध्ये भारताच्या दिशेने होऊ लागला. त्यात बंगालमधील चक्रीवादळाच्या वार्‍यांनी या झुंडीला भारताकडे ढकलले. सामान्यत: झुंडीचा हा मार्ग नव्हता; पण चक्रीवादळाच्या वार्‍यांनी त्यांना भारताकडे ढकलले. त्याचा परिणाम मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथे दिसून आला.

उपाय ः सामान्यतः आज या टोळधाडीवर सातत्याने वापरला जाणारा उपाय म्हणजे हेलिकॉप्टरमधून रासायनिक फवारणी करणे व टोळधाडीवर नियंत्रण मिळविणे; पण या रासायनीक फवारणीचे पर्यावरणीय; तसेच लोकांवर आणि त्यांच्या अन्नावरील परिणाम धोकादायकच. पर्यावरणपूरक रसायनांचा परिणाम फारसा उपयुक्त होऊ शकला नाही. मोठ्या आवाजामुळे हे टोळ पळून जात. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी लाउडस्पीकर लावत कर्णकर्कश आवाजाचा वापर करत झुंडीला पळवून लावायचा प्रयत्न केला. पाकिस्तानमध्ये तेथील प्रशासनाने एक आगळाच मार्ग अवलंबला. रात्री हे टोळ हवेत उडत नाहीत, त्यावेळेस जाळी लावून शेतकर्‍यांना या झुंडीतील टोळांना पकडण्यास सांगितले व त्यांनी पकडून आणलेल्या टोळाचे वजन करून त्याप्रमाणे त्यांना पैसे दिले. शेतकर्‍यानी हजारो टोळ पकडले प्रशासनाला विकले. प्रशासनाने त्या टोळाचा वापर कोंबड्यांना खाद्य म्हणून केला.

अर्थात, हे सर्व उपाय प्रासंगिक आहेत. खरे आव्हान आहे ते हवामानबदलाचे. गेल्या तीन दशकांतील 1993 नंतर प्रथमच एवढा मोठा दणका टोळधाडीने दिलेला आहे. आजही याचा धोका संपलेला नाही. शेतकर्‍यांच्या; पर्यायाने आपणा सर्वांच्या डोक्यावर हे अस्मानी संकट घोंगावत आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा, याचा गांभीर्याने विचार करणे भाग आहे.

(ध्रुव राठी यांचा 13 मे चा कार्यक्रम, ‘डाऊन टू अर्थ’ या मासिकातील लेखांच्या आधारे)