अनिल चव्हाण -
महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागात, कोल्हापूरच्या परिसरात यल्लमादेवीचे भक्त खूप आहेत. त्यांची वैशिष्ट्यं पाहता यल्लम्मा हा एक स्वतंत्र पंथ असल्याचे दिसते. देवीला मुली सोडण्याच्या प्रथेमुळे हा पंथ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘रडार’वर आला. या सोडलेल्या मुलींना ‘जोगतीण’ म्हणतात. देवीला सोडल्यावर त्यांच्यावर कुटुंबाचा अधिकार राहत नाही. त्या जोगवा मागून जगतात. पंथाचा प्रचार आणि प्रसार करतात. गावातले धनिक त्यांचा गैरफायदा घेतात, गावगुंड त्रास देतात, समाजकंटक त्यांना वाईट मार्गाला लावतात. त्यांचे जीवन अनेक वेळा नरक बनते.
सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे जनजागृती केली, संघर्ष केला. त्यामुळे आता या प्रथेला बराचसा आळा बसला आहे. पंथाचा प्रचार मात्र पूर्वीच्याच वेगाने सुरू आहे. आता त्याचे अर्थकारणही बदलले आहे.
यल्लमा पंथाचा घेतलेला हा आढावा…
आज वड्यावर आंबील हाय,’ असं म्हणत पहाटे लवकर उठून बाया कामाला लागत. आंघोळ आवरली की, पोळ्यांसाठी डाळ शिजवून पुरण वाटत. पोळ्यांचा नैवेद्य घेऊन वड्याकाठच्या यल्लमा देवळाची वाट धरत.
बारा–एक वाजता तिथं झुंबड उडालेली असे. गर्दी एकमेकांच्या खांद्यावरून हात काढून नैवेद्य देवीपर्यंत पोचवी. त्याच हाताने परत घेई. देवळाच्या बाहेरच्या बाजूला चौंडक वाजवत बसलेल्या ‘आईला’ पाया पडून भंडार्याची चिमूट हातावर घेतली की, सुटकेचा नि:श्वास सोडून गर्दी आपापल्या घरी जाई. ‘आईला’ नैवेद्य दिल्याशिवाय काही खायचं नाही, हा रिवाज. जितीचा ओढा म्हणजे जयंती नाला. कोल्हापुरात जिथून प्रवेश करतो, तिथंच स्वच्छ आणि झुळझुळ वाहणार्या ओढ्याला लागूनच छोटेसे देऊळ.
‘करवीर महात्म्य’ ग्रंथात कोल्हापुरातल्या तीर्थस्थानांची माहिती दिली आहे. कोणत्या महिन्यात कुठे स्नान केल्यावर, किती पुण्य मिळते, याची तपशीलवार नोंद आहे. काळानुसार तळी बुजली आणि ओढ्यांचे रूपांतर गटारात झाले. जयंती नालाही त्याला अपवाद नाही.
पूर्वी पापे धुणारा नाला आता सांडपाणी, मैला आणि रसायने वाहून पंचगंगेत सोडतोय. या तीर्थात आता आंघोळच काय; पण ओढ्याकडे नुसते पाहिले तरी मळमळायला लागते.
काळाबरोबर ओढ्याचे महात्म्य वाहून गेले, तरी आईचा महिमा बदलला नाही; उलट कित्येक पट वाढला. आंबीलाची गर्दी हजारोंतून, लाखांत गेली.
“ही देवी कोपली तर बाईचा बापय करती आणि बाप्याला लुगडं नेशिवती.”
“पाळणूक केली नाही तर नायटा उठतो, महारोग होतो, किडं पडत्यात, माणूस झिजून मरतो,” अशी तिची ख्याती. त्यामुळे अकुली जोगवा म्हणत जोगतीण दारावर आली, तर “पुढे जा म्हणायची टाप नव्हती.”
भक्ती केली तर आई ‘भलं करते’ आणि नाही केली तर ‘वाटोळं,’ या दहशतीच्या जोरावर यल्लमा पंथ सीमाभागात ऐसपैस पस रला. सर्वांची आई यल्लम्मा म्हणजे यल्लु–अम्मा – सर्वांची आई. ‘ही सर्वांची आई आहे,’ असा प्रचार सुरुवातीपासूनच केला आहे.
देवालये
अनेक गावांत यल्लामाची देवळे पाहायला मिळतात. मानाचे जग सांभाळणार्या प्रमुख जोगत्यांचे घर हे ठराविक दिवशी भाविकांनी एकत्र जमण्याचे ठिकाण असते; पण सर्व देवळांची प्रत समान असत नाही. त्यांचे महत्त्व कमी–अधिक असते. कोल्हापुरातले यल्लमाचे प्रमुख स्थान ‘ओढ्यावरचे देऊळ’ मानले जाते. येथे मोठी जत्रा भरते. या भागातील मुख्य विधी इथेच होतात. त्याच्यावरचे सर्वोच्च स्थान म्हणजे सौंदत्तीचे देवालय. हे मूळ स्थान आहे. वर्षातून एकदा ‘रांडाव पौर्णिमे’ला भाविकाने सौंदत्तीला भेट दिली पाहिजे, असा दंडक आहे.
भक्तांमधील पायर्या
यल्लमाचे भक्त एकाच पातळीवर नाहीत. सर्वसामान्य भाविक, घरी यल्लमादेवीची परडी पूजतात. देवीची रोज पूजा करतात. ते संसारात राहून भक्ती करतात. वर्षातून एकदा सौंदत्तीला जाऊन परडी आणि कवड्यांची माळ बदलून आणतात. लिंब नेसून देवीचे दर्शन घेतात. मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमेला गावातल्या प्रमुखस्थानी देवीला नैवेद्य देतात. लग्न–बारसे अशा प्रसंगी जोगत्यांना बोलावून एक रात्र जागरण घालतात. इतर वेळी ते आपापला व्यवसाय सांभाळत असतात.
वरचा थर
सामान्य भाविकांच्या वरचा थर म्हणजे जोगती आणि जोगतिणी. यांची संख्या लहान गावांमध्ये एक–दोन असते, तर कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरात दीड–दोनशे. जोगत्यांना देवीच्या सेवेसाठी देवीला सोडलेले असते. ते पूर्ण वेळ देवीची सेवा आणि भक्ती करतात. जोगवा म्हणजे भीक मागून त्यावर उदरनिर्वाह करतात. जोगवा मागताना त्यांच्यासोबत देवीचा मुखवटा आणि परडी असते. ‘अकोलि जोगवा’ अशी दारात उभे राहून हाळी देतात. तांदूळ किंवा पैशांच्या स्वरूपात त्यांना जोगवा मिळतो.
झुलवा
जोगतीण ऐपत असणार्या एखाद्या गावकर्यांशी संबंध ठेवते. बर्याच वेळा त्यांच्याशी ‘झुलवा’ लावतात. ‘झुलवा’ म्हणजे एक प्रकारचे लग्न. हे लग्न बंधनकारक असत नाही. जोगतिणीला विवाहित स्त्रीप्रमाणे अधिकार प्राप्त होत नाहीत. तिला पुरुषाच्या संपत्तीत वाटा मिळत नाही. तिच्या संततीला बापाचे नाव लावता येत नाही.
पण तिला गावातल्या टग्यापासून संरक्षण मिळते.
जोगती आयुष्यभर स्त्रीवेष धारण करतो, म्हणजे साडी नेसतो. त्याचे बोलणे, चालणे बायकी असते. तोही जोगवा मागूनच आयुष्य काढतो.
चौंडकं
डब्याला हातभर दांडी जोडून तार ताणून बांधतात. बोटाने तार छेडून ‘टिंगऽ टिंगऽ’ असे सूर काढले जातात. या वाद्याला चौंडकं म्हणतात. जोगवा मागताना जोगते यल्लमाची महती सांगणारी गाणी गातात. काही वेळा पाच–सहा जोगती एकत्र येऊन ‘मेळा’ बनवतात. गाणी गाण्यासाठी त्यांच्याकडे चौंडक्याशिवाय सूरपेटी, ढोलकी आदी साधनेही असतात. मानाचा जग सांभाळणारा जोगता किंवा जोगतीण त्यांची गुरू मानली जाते.
रोजच्या जीवनात येणार्या अडचणी आणि संकटांवर उपाय विचारायला आलेल्या भाविकाला देवीचा भंडारा लावून दिलासा देणे त्यांना घरात, देवीची परडी पुजायला लावून पंथात घेणे, हे मुख्य काम जोगती करतात.
जोगती
यल्लमाला सोडलेल्या मुलीस ‘जोगतीण’ म्हणतात. मूल होत नाही, आजार बरा होत नाही, म्हैस दूध देत नाही, अंगावर नायटा उठला, केसात जट झाली, मूल अपंग निपजले, मुलीचे लग्न जुळेना, नवर्याने टाकले, अशा अडचणींवर मार्ग शोधणार्या भाविकास, देवीला मुलगा अथवा मुलगी सोडण्याचा उपाय सुचवला जातो. या उपायाचे रूपांतर लवकरच आदेशात होते. आदेश मान्य केला नाही, तर भयानक शापांची– संकटांची भीती घातली जाते. या देवस्थानच्या प्रसाराची भिस्त दहशतीवर आहे. जोगत्याचे ऐकले नाही तर देवी वाटोळे करेल, याची तिखट–मीठ लावून उदाहरणे दिली जातात. त्यामध्ये – महारोगासारखा गंभीर आजार, मुलासारख्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अपंगत्व, आर्थिक नुकसान, मानसिक संतुलन बिघडणे आदींचा समावेश असतो. अत्यंत घाणेरडे शिव्याशाप अगदी साध्या–साध्या कारणाकरिताही सहजपणे उच्चारणे, हे त्यांचे खास वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. समोरच्याचे वाईट व्हावे, अशी मनोविकृती त्यांच्यामध्ये तयार झालेली असते. देवीला सोडलेल्या मुलीचे किंवा मुलाचे देवीशी लग्न लावले जाते. इथून पुढे त्यांनी देवीच्या नावाने भीक मागून जगायचे. इतरांप्रमाणे संसार करायचा नाही. देवळांचे पुजारी, गावातील धनदांडगे, गुंड त्यांचा गैरफायदा घेतात. त्यांचे हाल कुत्रे खात नाही.
जोगत्याची परिस्थिती :
जोगत्यांची परिस्थिती नेमकी कशी आहे, ते कळावे म्हणून, एका बरे चाललेल्या जोगत्यांच्या घरी भेट दिली. आम्ही घरी पोचलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. जुन्या काळच्या एकत्र कुटुंबातील कुटुंबप्रमुख बाई कृतकृत्य होऊन निवांत बसलेली असावी, असे वातावरण वाटत होते. घराला लागूनच देवीचे मंदिर. समोर पन्नास फूट लांबीचा मंडप. एका बाजूला जोगता बसलेला, दुसर्या बाजूला दोन भटकी कुत्री अंग चाटत शांत बसलेली.
आम्ही देवीला नमस्कार केला, भंडारा कपाळाला लावला आणि कॉटवर बसलेल्या ‘आई’पासून जवळच खुर्ची ओढून तिसरीकडेच पाहत बसलो. संवाद व्यवस्थित कानावर पडत होता.
“देव तुझ्या बंधनात आहे, हे लक्षात ठेव. तुझं वाटोळं व्हायला लागलंय.”
“मी काय करावं सांग, ते नाही सांगत.”
“तेच सांगते, आत्ताचा देवाचा जागा बादीक हाय.”
‘तू देवर्षी आहीस. पर स्वतः डॉक्टर असला तरी त्याला इंजेक्शन दुसर्यानंच लावायला लागतंय, हे लक्षात ठेव. देव ठेवलाय ती जागा बादीक हाय. त्यामुळं तुझा डोळा गेला. जागा बदल.”
“होय, मी तसंच करते.”
“तू दुसर्याकडे जाऊ नको, नाहीतर ऐकतेस आणि दुसरीकडे जातेस, त्यो तिसरंच सांगतोय. थोडक्यात हाय तोवर माझं ऐकायचं.- दुसर्याकडे जायचं, त्यानं काही सांगितलं की तिसर्याकडे जायचं, असंच फिरत बसू नको. एकावरच ईस्वास ठेव.” “मनाची चाळवाचाळव करतीस. मग देव बी चाळवाचाळव करतोय. आता पुजारी पहिल्यासारखं नाहीत. खाऊ लागू आहेत. दक्षिणा दिली की नाराळ बदलत्यात.”
“आता मला कुठं जायचं नाही, तूच काय करायचं ते कर, म्हणायचं, ‘देवीला अडचणीतून बाहेर काढ.’ ती तुला काढंल. खेळ करणारी ती आहे. ती ओल्या झाडाला आग लावती. तिच्यावर इस्वास ठेव.” एक जोगती दुसर्याला सल्ला देत होता.
लुगडे नेसलेले, हातात बांगड्या, पाटल्या, गळ्यात दागिने घालून, दाढी–मिशा गुळगुळीत केलेले दोन पुरुष जोगती आपसांत बोलत होते.
एक पंचविशीतला, तर दुसर्यानं साठी गाठत आणलेली. तरुण जोगत्याच्या उजव्या डोळ्याच्या नसा दुबळ्या बनल्या आणि दिसायचं बंद झालं. आता डाव्या डोळ्यांनीही कमी दिसायला लागलं, या गोष्टीचं कारण दोघे मिळून शोधत होते आणि यल्लामाची मूर्ती कुठे ठेवली, म्हणजे पुन्हा दिसायला लागेल, यात उत्तर शोधत होते.
खोपटात मध्ये फळ्यांची भिंत उभी केली. एका भागात जेवण करायचं, दुसरा भाग म्हणजे हॉल. कॉटवर जाजम टाकून मधुआई जोगती बसलेला. त्याच्यासमोर ठेवलेल्या खुर्चीत मला जागा मिळाली. शेजारच्या खुर्चीत तो डोळ्यावर उपचार करून घ्यायला आलेला जोगती. तो मध्येच चष्मा काढायचा, त्याच्या वाढवलेल्या केसांतून हात फिरवायचा, आणि पुन्हा पदर डोक्यावर घ्यायचा. बोलणं, हालचाल, मुरकणं, सगळं बायकी.
एकाच मुद्द्याभोवती चर्चा घुटमळला लागली, तसं मी मध्ये तोंड घातलं.
“तुम्ही कोण?”
“ मी रोहित.” “रोहित आई. मी जोगती आहे.”
“राहता कुठे?”
“पलिकडच्या गल्लीत राहते.”
“तुमच्याकडेही जग आहे की मूर्ती?”
मी शेजारच्या मूर्तीकडे पाहत विचारले.
“माझ्या घरातबी मूर्ती हायकी. पहिली अशीच दगडी होती. आता मी पंचधातूची करून घेतली.”
“घरी कोण, कोण आहे?”
“मी आणि आई. आई चपात्या करायला जाते. मी जोगते आहे.”
“मूर्तीला खर्च किती आला?”
मी पुन्हा मूळ मुद्द्यावर आलो.
“आला की 95 हजार रुपय. मूर्ती देखणी हाय.”
आई हॉटेलात चपात्या करून पोट भरतीय. पोरगा जोगवा मागतोय. एका खोलीत सगळा संसार. डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायला पैसा नाही; पण देवीची मूर्ती 95 हजार रुपयांची बसवली. मेंदू आधीच अंध बनलेला. आता डोळे जाऊन हा अक्षरशः अंध होणार. तेवढ्याच आंधळेपणाने मूर्तीची जागा बदलून, आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करणार.
माझाही मेंदू बधिर व्हायला लागला. देवदासी प्रथाविरोधी चळवळ सुरू होऊन आता अर्धेशतक होईल. एवढ्या वर्षांत बदल काय झाला, याचा शोध घ्यावा म्हणून मी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष गजानन विभूतेंना घेऊन जोगत्यांना आणि भाविकांना भेट देण्याचे नियोजन केले होते, त्याची ही सुरुवात.
परडी :
गवत किंवा बांबूच्या कामट्या विणून परडी तयार केली जाते.
म्हणजे हे ज्ञान माणसांना नवीन झाले, त्या काळात ही परडी देवीला वाहिलेली दिसते. आपल्याकडील सर्वोत्तम गोष्ट राजाला, प्रमुखाला किंवा देवाला वाहण्याची प्रथा असते.
परडीची प्रथा कोकणात आदिवासींमध्येही दिसून येते. त्यांच्यामध्ये रान शिवारी, गाव शिवारी आणि घरचा देव्हारा, अशा तीन प्रकारच्या देवता असतात. घरचे देव बांबूच्या परडीत ठेवतात. गोल विणलेल्या या परडीच्या खालच्या बाजूस मजबूत कामट्यांचे चार पाय केलेले असतात. परडी जमिनीवर उभी करून त्यात तांदूळ किंवा नागली भरतात. त्यामध्ये देवांच्या मूर्ती, कुलदेवता ठेवतात. यल्लामाची परडी देव्हार्यावर उभी ठेवली जाते. त्याच्यासोबत कवड्यांची माळ अडकवलेली असते.
भंडारा
प्रत्येक देवाचा विशिष्ट अंगारा प्रसिद्ध आहे. गुलाल, बुक्का, हळद, राख यांचा वापर अंगारा म्हणून केला जातो. यल्लमादेवीचे जोगती ‘भंडारा’ म्हणजे हळद लावतात. देवीसमोर हळदीसाठी ताट वापरतात. फिरताना हातातल्या बुट्टीमध्ये किंवा गळ्यात अडकवलेल्या बटव्यामध्ये हळद ठेवतात. जोगवा वाढल्यानंतर भाविकांच्या कपाळाला भंडार्याची चिमूट लावतात. जागरण किंवा यात्रेमध्ये कपाळभर भंडारा लावला जातो. हळद औषधी आणि जंतुनाशक म्हणूनही काम करते. जोतिबा, खंडोबा अशा अजून काही दैवतांचे भक्त भंडारा वापरतात. पूर्वी या गोष्टी नैसर्गिक आणि औषधी होत्या. आता या प्रत्येकामध्ये रासायनिक पदार्थांची भेसळ झालेली असते. त्यामुळे औषधाऐवजी ते हानिकारक बनते.
जग
एका मध्यम आकाराच्या बुट्टीत छानसे कापड ठेवून देवीचा पितळी मुखवटा – ‘टाक’ – ठेवलेला असतो. तिच्या बाजूनेही असे छोटे ‘टाक’ बसवलेले असतात. ‘टाका’शेजारी पुजलेली परडी आणि कवड्यांची माळ, तर समोर हिरवा चुडा, भंडारा, पैसे हे सर्व व्यवस्थित ठेवलेले असते. असा असतो ‘जग.’ जोगत्यांच्या दृष्टीने हेच त्यांचे खरे जग असते, जीवन असते. ‘जग’ डोक्यावर घेऊन ते इकडून–तिकडे जाताना दिसतात. सवयीने त्यांना ‘जग’ म्हणजे बुट्टी हाताने धरावी लागत नाही. डोक्याने तोलत हाताच्या चिमटीत भंडारा घेऊन तो समोरच्या भाविकाच्या कपाळाला लावतात. गप्पा मारत विश्रांतीसाठी बसलेल्या वेळी जग मध्ये किंवा समोर ठेवला जातो, त्याकडे पाठ करत नाहीत. जागर घालायचा असेल, तेव्हा भाविकाच्या घरी नेऊन जग पुजला जातो. जग म्हणजे मूळ देवीच आहे, अशा भावनेने भाविक नमस्कार करत असतात.
नैवेद्य
या देवीला नैवेद्य म्हणून वरण–भात, मिक्स भाजी, मेथीची भाजी, कांदापात, लिंबू, केळी, कडबू, आंबील, घुगर्या आदींचा नैवेद्य दाखवला जातो. मिक्स भाजीमध्ये वांगी, वरणा, गाजर आदींचे तुकडे घातलेले असतात. नाचणीचे पीठ आंबवून आंबील केली जाते. यामध्ये बी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. हा नैवेद्य ‘रांडाव पौर्णिमे’ला दाखवला जातो. त्याशिवाय ‘हुंड्याच्या पौर्णिमे’ला हुंड्याची भर घातली जाते. रवा आणि बाजरीचे पीठ शिजवून त्यात साखर घालतात आणि मुटके तयार करतात. याला ‘हुंडे’ म्हणतात. पोळ्याच्या पौर्णिमेला वरील नैवेद्यात पोळ्यांची भर पडते. वर्षातून चार पौर्णिमा सण म्हणून साजर्या केल्या जातात.
देवीची कथा
भाविकांना देवाच्या माहितीबद्दल उत्सुकता असते. हा देव कुठून आला? काय करतो? त्याच्याकडे कोणत्या शक्ती आहेत? अशा अनेक शंका त्यांना पडतात. त्याचे उत्तर देवाच्या कथेत मिळते. त्यासाठी ‘पुराण’ लिहिले जाते. या क्षेत्राचे महत्त्व वाढावे, इथे जास्तीत जास्त भाविकांनी भेट द्यावी, दक्षिणा द्यावी, दानधर्म करावा, हा उद्देश ‘पुराण’ लिहिण्यामागे असतो.
कोल्हापूर क्षेत्राची माहिती ‘करवीर महात्म्य’ या ग्रंथात लिहिली आहे. हा ग्रंथ 1857 साली, म्हणजे 163 वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. त्यामध्ये जयंती नाल्याचा उल्लेख आहे.
प्रचलित कथा :
जोगती रेणुकाची कथा कथन करतात. तिचा आशय थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे: जमदग्नी ऋषी होते. त्यांना क्षत्रिय राजकन्या रेणुकेपासून परशुराम हा मुलगा झाला. जमदग्नी अत्यंत कोपिष्ट. एकदा रेणुका सरोवरात पाणी आणण्यासाठी गेली. तिथे सुंदर स्त्रियांसह विहार करणार्या चित्ररथ या गंधर्वाला पाहून तिचे मन विचलित झाले. तिची ही मानसिक अवस्था अंतर्ज्ञानी जमदग्नींनी ओळखली. आपली भार्या मनाने भ्रष्ट झाली, हे समजल्यावर ते कोपले. त्यांनी रेणुकेला शिक्षा म्हणून तिचे डोके उडवण्याचा आदेश आपल्या मोठ्या मुलाला दिला. बापाचा आदेश मोठ्या मुलाने पाळला नाही. त्याला प्राणास मुकावे लागले. अशा तर्हेने चारही मुलांनी मातेला ठार करायला नकार दिला. शेवटचा मुलगा परशुराम, त्याने मात्र बापाचा आदेश शिरसावंद्य मानला. आईचे मुंडके उडवले. तेव्हा बाप प्रसन्न झाला. त्याने मुलाला वर मागण्यास सांगितले. मुलाने आपल्या आईला व भावांना जिवंत करण्याचा वर मागितला. भाऊ जिवंत झाले; पण आईचे उडवलेले मस्तक सापडेना. त्या वेळी समोर मातंग समाजाची स्त्री दिसली. परशुरामाने तिचे मस्तक कापले आणि आईच्या धडाला जोडले. मातंग स्त्रीचे मस्तक असलेली आई जिवंत झाली. एवढ्यात आईचे म्हणजे रेणुकेचे मस्तक मिळाले. ते मातंगीच्या धडाला जोडण्यात आले. तीही जिवंत झाली. पुढे या कथेत, सहस्त्रार्जुन हा क्षत्रिय राजा आश्रमावर हल्ला करतो. ‘कामधेनु’ला पळवतो. परशुरामाला हे कळल्यावर, तो घनघोर युद्ध करून सहस्रार्जुनाला मारतो. सहस्त्रार्जुन राजाचे पुत्र बेसावध क्षणी पुन्हा आश्रमावर हल्ला करतात. जमदग्नीला ठार मारतात. परशुराम कावडीत जमदग्नीचे कलेवर आणि आई रेणुकेला घेऊन सर्वत्र फिरू लागतो. शेवटी माहूर येथे येऊन प्रेताला अग्नी देतो. रेणुका सती जाते. देवी बनते. परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करतो.
पुराणातील वानगी…
पुराणकथांना भाकडकथा समजले जाते. ‘पुराणातील वानगी पुराणात’ अशी म्हण तयार झाली आहे; पण पुराणकारांनी काल्पनिक कथा रचल्या असल्या, तरी त्यामध्ये थोडे ऐतिहासिक सत्य दडलेले असते.
कथा रोचक व्हावी म्हणून चमत्कारांची भेसळ केली जाते. समाजातील चाली–रीती बदलल्या की, कथेतही बदल केले जातात. वर्ण्य विषयाला टीकेपासून वाचवणे आणि त्याचे महत्त्व पटवणे, या दोन्ही कामांसाठी कथेत भर घातली जाते. विविध मार्गांनी अन्यायाचे समर्थन केले जाते. या दृष्टीने वरील कथा अभ्यासण्यासारखी आहे.
परशुरामाचे वडील जमदग्नी ब्राह्मण असून, आई रेणुका क्षत्रिय आहे. याचा अर्थ कथा रचली किंवा घडली. त्या काळी ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामध्ये सोयरीक होत होती. परशुरामाचा आजा ब्राह्मण होता, तर आजी क्षत्रिय होती; म्हणजे पुरुष ब्राह्मण वर्णाचा आणि स्त्री क्षत्रिय वर्णाची असे विवाह चालत होते; पण त्याकाळी क्षत्रिय व ब्राह्मणांमध्ये वर्चस्वावरून संघर्ष सुरू होता. हे पुढे परशुरामाने क्षत्रियांशी केलेला संघर्ष आणि सहस्त्रार्जुनाने जमदग्नींच्या आश्रमावर केलेला हल्ला, यावरून दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणजे क्षत्रियाला ब्राह्मणीशी संबंध वर्ज्य करण्यात आला. पुढील काळात भृगु ऋषीने ‘मनुस्मृति’ लिहून ब्राह्मण पुरुषाला ब्राह्मणी, क्षत्रिया, वैश्या आणि शूद्रीशी विवाह करण्याचा अधिकार दिला. क्रमाने कनिष्ठ समजल्या जाणार्या वर्णाला वरील वर्णातील स्त्रीशी विवाह निषिद्ध ठरवला. ‘मनुस्मृति’मध्ये तिसर्या अध्यायातील बाराव्या श्लोकांमध्ये हा नियम सांगितला आहे. “शूद्रैव भार्या शुद्रस्य सा च स्वा च त्रिशा हा स्मृते । तेच स्वा चैव राज्ञाश्च ताश्च स्वा चाग्र जन्मतः” अर्थ : शुद्राची स्त्री केवळ शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्र अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शुद्रा, वैश्या, क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारही वर्णाच्या कन्याशी विवाह करता येतो. या नियमाची सुरुवात परशुराम काळात झाली असावी. त्या नियमामुळे रेणुकेने चित्ररथाशी केलेला केवळ मानसिक व्यभिचारही जमदग्नींनी खपवून घेतला नाही. ज्याअर्थी ठार मारण्याची एवढी मोठी शिक्षा रेणुकेला दिली आहे, त्याअर्थी हा केवळ मानसिक व्यभिचार नसावा, असेही म्हणण्यास जागा आहे. एकदा मस्तक धडावेगळे केल्यानंतर पुन्हा जोडणे, ही बाब असंभव आहे. या क्रूर कृत्यातून सुटका मिळवण्यासाठी कथेमध्ये रेणुकेला पुन्हा जिवंत केल्याचे वर्णन केले असावे. रेणुकेला ठार केल्यानंतर तिच्या जागी मातंगी स्त्रीशी जमदग्नी यांचा विवाह झाला असण्याची शक्यता आहे; पण ते काहीही असले तरी त्या काळी मातंग समजला जाणारा वंश क्षत्रियांच्या बरोबरचा असा असावा. पुढच्या काळात त्यांना अतिशूद्र वर्णात ढकलण्यात आले. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. याचा अर्थ त्याने एकवीस वेळा घनघोर युद्ध केले असेल. एकदा नि: क्षत्रिय केल्यावर पृथ्वीवर पुन्हा क्षत्रिय लढण्यासाठी येतील कसे? एखादा मुलगा दहा वेळा मॅट्रिक झाला, याचा अर्थ दहा वेळा परीक्षेत बसला, असा घेतला पाहिजे.
अॅड. मालेकर यांचे पुस्तक
अॅड. प्रसन्न विश्वंभर मालेकर यांनी ‘रेणुका कथा’ पुस्तक लिहून भाविकांची देवीबाबत जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आपले श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी लोक पूर्वजांचा आधार घेतात. देवस्थानांच्या बाबतीत पूर्वज ऋषि–मुनींपर्यंत पोचवले जातात. पुराणातील ऋषींच्या कथांची मोडतोड करून त्यांना आपल्या क्षेत्रापर्यंत आणले जाते. ब्रह्मदेव, नारद मुनी, भृगु ऋषी, अगस्ति, दुर्वास मुनी, इंद्र, अश्विनीकुमार, कश्यप अशा बहुतेक पात्रांना प्रत्येक देवस्थानाच्या आसपास फिरून तप करावे लागते, शाप द्यावे लागतात, वर द्यावे लागतात. अनेक चित्र–विचित्र घटना घडवून महत्त्व निर्माण करावे लागते. आपलाच देव सत्य आहे. इथेच दक्षिणा द्या, हे ठसवण्यासाठी पुजारी विविध युक्त्या वापरतात. एकट्या अयोध्येत, रामाचा जन्म आमच्याच देवळात झालाय, असे शपथेवर सांगणारी डझनभर मंदिरे आहेत. अर्थात, धार्मिक तेढ वाढविण्यासाठी ती निरुपयोगी ठरल्याने मागे पडली. श्री रेणुका कथा सांगतानाही वरील पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
कथानक
या कथेला सृष्टीच्या निर्मितीपासून सुरुवात होते. तेजाच्या रुपात एकटेच असणारे परब्रह्म साकार बनते आणि उगवत्या सूर्यासारखी देवीची मूर्ती तयार होते. तिच्या हातात ‘महाळुंग’ नावाचे फळ, गदा आणि पानपात्र म्हणजे वाटीसारखे भांडे असते.
कथेत वर्णल्यानुसार ‘परब्रह्म म्हणजे देवी’ एकटीच असेल, तर या वस्तू हातात कशासाठी आहेत, ते समजत नाही. ती एकटीच असेल तर गदा कोणाच्या डोक्यात घालणार? ढालीवर झेलण्यासाठी तलवारीचे वार करणार कोण? पानपात्रात काय घेणार? ‘महाळुंग’ नावाचे फळ खायचे आहे की केवळ हातात धरून बसायचे आहे? ते टिकणार किती दिवस? पण असे प्रश्न लेखकाला आणि भाविकांनाही पडत नाहीत. पुढे या कथेत – अनेक ऋषिमुनी, त्यांच्या पतिव्रता पत्नी, पुत्र, गंधर्व, राक्षस, अप्सरा, अनेक राजे, यांचे वंश येऊन गेल्यावर भृगु कुळामध्ये परशुरामाचा जन्म होतो.
अशा कथांचा उपयोग जनमानसावर संस्कार करणे, हाही असतो. वरील पुस्तकात अशा संस्कारांची रेलचेल आहे.
ब्राह्मण श्रेष्ठ :
चंद्र वंशातील राजा कृतवीर्य आणि पत्नी राकावती धर्माने राज्य करत होते; पण त्यांना मूल नव्हते. म्हणून त्यांनी संकष्टी व्रत केले. राजा संकष्टीची पूजा करताना त्याला जांभई आली. त्याबद्दल त्याने गणेशाची क्षमा न मागता आणि आचमन न करता पूजा पुढे सुरू ठेवली. त्यामुळे गणेशाने राजाला ‘हस्तविहीन पुत्र होवो,’ असा शाप दिला. लगेच उ:शाप दिला. हा अर्जुन गुरूंची सेवा करू शकत नाही; पण नेत्रातल्या अश्रूंनी पाय प्रक्षाळतो. तेव्हा गुरू आशीर्वाद देतात – ‘तू ‘कार्तवीर्यार्जुन’ आजपासून ‘सहस्त्रार्जुन’ म्हणून ओळखला जाशील. तुला हजार बाहू मिळतील; पण एक लक्षात ठेव, तुझे हे बळ तोपर्यंतच राहील, जोवर तू गायी, ब्राह्मणांचा, स्त्रियांचा आदर करशील.’
(एखाद्याला हजार बाहू असू शकतील का? असतील तर गोमीच्या पायासारखे खांद्याला चिकटवावे लागतील.) राजाला मारण्यापूर्वी दुष्ट ठरवण्यासाठी, पुढे त्याचे वर्णन आहे –
‘सत्तेच्या विस्तारापायी त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. शस्त्रबळ हेच खरे; शास्त्र बळ काही कामाचे नाही,’ असे म्हणत त्यांनी ब्रह्मवृंदांची अवहेलना सुरू केली.
नदीची निर्मिती
दारात आलेल्या ऋषीला काहीही करून उत्कृष्ट अन्न दिले पाहिजे, नाहीतर तो शाप द्यायला मोकळा असतो. एकदा चंद्रावतीच्या घरी जयंती ऋषी आला. शिष्यासह आलेल्या ‘जयंती मुनींचे स्वागत करावे,’ अशी चंद्रावतीची खूप इच्छा होती; पण तिने पाहिले तर अगदी दिव्याला देखील तेल नव्हते. घरी स्वयंपाकासाठी शिधा तर नव्हताच; पण अगदी चूल पेटवायलाही कोरडी लाकडे नव्हती. अशा परिस्थितीत तिने अग्निहोत्रातला अग्नी मोठा करून त्याच्यावर तुपाचा दिवा लावला. त्या विस्तवावर सकाळचे अन्न गरम करून ऋषीला वाढले. स्वयंपाक पाहताच ऋषीला राग आला. आपल्याला शिळे अन्न वाढले, याचे वाईट वाटून तिला शाप दिला – ‘दुष्टी, तू 21 वर्षांसाठी दासी होशील.’ नंतर तिला उ:शाप मिळाला. ती दासी होऊन नंतर ‘मलाहपारी’ नदी झाली.
जोगवा मागण्याचे कारण :
जोगते मंडळी रेणुकेच्या ‘उद्धकारा’आधी ‘अक्कया जोगय्या’चा जोग घालतात. ‘जोगण बावी’ या तीर्थात स्नान करतात; मगच लिंब नेसून यल्लमाच्या दर्शनाला जातात. या मागचे कारण रेणुकेच्या कथेत सांगितले आहे. परशुरामाची कीर्ती, रेणुकेचे पातिव्रत्य आणि जमदग्नी ऋषींची तपसाधना यांनी इंद्राच्या मनाची घाबरगुंडी उडाली. त्याने दोघांच्या व्रतांचा भंग करण्याचे ठरवले आणि मदनाला पाचारण केले. त्याला रेणुकेच्या मनात शिरायला लावले आणि चित्ररथाला ‘मलापहारी’ नदीत फिरायला जाण्याची आज्ञा केली. रूपसौंदर्याने दुसरा मदन शोभणारा असा चित्ररथ गंधर्व आपल्या सगळ्या राण्या, वैभवासह मलापहारी नदीवर जलक्रीडा करण्यासाठी आला. नेहमीप्रमाणे माता रेणुका सकाळच्या प्रहरी नदीवर स्नानासाठी आली. ती पाण्यात उतरणार इतक्यात तिच्या कानी हसण्याचा आवाज आला. चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करताना स्वतःच्या राण्यांना छेडत होता. त्या लज्जायमान होऊन त्याला हसत होत्या. त्यांचा तो भोगविलास पाहून रेणुका क्षणभर स्तब्ध झाली. तोच क्षण साधून तिच्या मनात मदन शिरला आणि आकाशात वीज चमकावी, तसा रेणुकेच्या मनात विचार आला, ‘महर्षी माझ्या सोबत असते, तर मीही अशीच जलक्रीडा केली असती.’ दुसर्याच क्षणी ती सावरली. या घटनेनं आपलं काहीतरी चुकलं, याची जाणीव होऊन तिनं मनोमन क्षमा मागितली आणि घाईघाईने स्नान आटोपून वल्कलं नेसली; पण नेहमीप्रमाणं वाळूची घागर घडेना. चुंबळ करायला नाग हाताशी येईना. क्षणार्धात सिद्धिविहीन झालेली रेणुका उदास अंतःकरणाने आश्रमात पोचली. इकडे, आश्रमात पूजेची सगळी तयारी झाली होती; प्रतीक्षा होती ती फक्त रेणुकेची. आसनावर तयारीत बसलेल्या जमदग्नीच्या क्रोधाचा पारा चढत होता. रेणुकेच्या आगमनाचा भास होताच त्यांनी पाहिलं, तो रेणुकेच्या हातात घागर नाही. चेहरा पडलेला. घडला प्रकार अंतर्ज्ञानाने जाणून त्यांनी क्षणार्धात शाप दिला – ‘दुष्टे, कुष्टी हो, या आश्रमातून चालती हो.’
सिद्धयोगी
तिच्या सौंदर्यापुढे अवघ्या नभाचे तारांगण फिकं पडत होतं. त्या रेणुकेचा चेहरा अमावस्येच्या रात्रीप्रमाणे काळाठिक्कर पडला. आकाशातून कोसळलेल्या उल्केप्रमाणे रेणुका दिशाविहीन अशी फिरू लागली. तिला अन्न मिळेना, ना पाणी. घडल्या प्रकाराबद्दल स्वतःला दोष देत शेवटी ती ग्लानी येऊन पडली. त्या क्षणी तिच्या स्वप्नात दोन सिद्धयोगी आले. ते म्हणाले, “देवी जागी हो. देवी आम्ही एकनाथ आणि योगीनाथ. तू आता इथून जवळच असलेल्या आमच्या गुहेत जा. तेथे तुला आमच्या पादुका दिसतील. त्या घेऊन तू योगिनी तीर्थात स्नान कर.” रेणुका सांगितल्या दिशेने गेली. खरंच तिला एका गुहेत पादुका दिसल्या. त्या घेऊन तिने योगिनी तीर्थात स्नान केले; आणि पाहते तो काय, तिची काया अगदी पहिल्यासारखी झाली; नव्हे तर त्याहून सुंदर झाली. गिरिजा परमेश्वराचे आभार मानून, तिने सिद्धांची प्रार्थना केली. ते पुन्हा प्रकट झाले. त्यांनी रेणुकेला सांगितले, “आता तीन दिवस तू भिक्षा मागायची. मिळालेल्या भिक्षेचे पाच भाग करायचे – एक देवाचा, एक गुरूचा म्हणजे आमचा, एक गायीचा, एक अतिथीचा आणि एक तुझा. याप्रमाणे केले तर तू शापमुक्त होशील.” तसे घडले, तेव्हापासून रेणुकेच्या ‘उद्धोकारा’आधी जोगते मंडळी ‘अक्कया जोगय्या’चा जोग घालतात. योगीनाथांना बोलीभाषेत ‘जोगीनाथ’ म्हणतात. तसे योगिनी तीर्थाला ‘जोगन बाथी’ किंवा ‘जोगन बावी’ म्हणतात; तर सिद्धाची गुहा सौंदत्तीवर प्रसिद्ध आहे. अग्नीतून बाहेर पडलेली सोन्यासारखी निष्कलंक रेणुका तीन दिवस गुरूंचा आदेश पाळती झाली. शापमुक्त होऊन, चौथ्या दिवशी जमदग्नीच्या आश्रमाच्या दारी आली. तिने मंजुळ आवाजात साद घातली, “स्वामी.”
मस्तक उडवले :
रेणुकेचा आवाज ऐकून ऋषींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. वसू, विश्वासू, बृहत्भान, बृहत्कण्व ही चार मुले महर्षींच्या हाकेसरशी धावत आली. त्यांना रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा मिळाली; पण एकेक करून चौघांनी, तो आदेश मानला नाही. त्यांची जमदग्नींच्या जळजळीत कटाक्षाने राख झाली. आपल्या पुत्रांनी आपल्या आदेशाची केलेली अवहेलना पाहून त्यांनी हाक मारली, “राम राम.” भार्गव हातात परशू घेऊन उभा राहिला. त्याला मस्तक उडविण्याची आज्ञा झाली. त्याने आज्ञापालन केले.
मस्तक जोडले
त्याच्या डोळ्यांत घळाघळा अश्रू आले. जमदग्नींनी त्याला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. त्यांनी भाऊ व आई परत जिवंत व्हावी, असा वर मागितला. चारी पुत्र झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उभे राहिले; पण रेणुकेचे मस्तक दूर उडून पडले होते. तिच्या धडाला मस्तकाची गरज होती. इतक्यात, एक स्त्री समोर येऊन उभी राहिली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचे शिर उतरवले. ऋषींनी ते रेणुकेला जोडले. इतक्यात परशुराम रेणुकेचे मूळ मस्तक घेऊन आला. हे मस्तक दुसर्या स्त्रीच्या धडाला म्हणजे मातंगीला जोडण्यात आले. रेणुकेबरोबर मातंगी ही देवी बनली. (मातंगीने स्वतःच्या हातानेच शिर उतरवल्याने तिच्या खुनाचा आरोप आपोआप नाहीसा झाला.)
चौंडक्याची निर्मिती :
एके दिवशी रेणुका ‘सिद्धचला’वर परतली. तिच्या कानी आले की, बेटासुर नावाचा एक असुर इथल्या प्रजेला त्रास देतो आहे. रेणुकेने परशुरामाला बोलावले. त्याने बेटासुराचा वध केला. त्याचा उजवा हात तोडून शीर बाहेर काढली. ती त्याच्या टाळूतून ओवली आणि त्या अनोख्या वाद्याचा ‘तिंत्रुनऽ तिंत्रुनऽ’ असा आवाज करत रेणुकेपुढे आला. आईने वर दिला, रामाने बनवलेले हे वाद्य चौंडके म्हणून ओळखले जाईल. जो कोणी हा सोहळा नृत्य–नाट्ययुक्त विधीने करेल, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. या गोंधळाने माझे चैतन्य जागवले, म्हणून ‘जागरण’ असेदेखील म्हटले जाईल.
महायज्ञ :
सप्तर्षी परशुरामाला म्हणाले, “आता तू दिग्विजयी आहेस. तू एक महायज्ञ कर. माघ महिना आला. यज्ञाला सुरुवात झाली. ‘सरस्वती’किनारी राहणारे ब्राह्मण बंगाल किंवा गौड प्रांतात गेले होते. त्या वेदाधिकारी ब्राह्मणांना रामाने दक्षिणेला आणले. तेच सारस्वत ब्राह्मण. मोठा यज्ञ झाला. रेणुका आणि जमदग्नी यज्ञाचे यजमान म्हणून बसले. मातेच्या दर्शनासाठी सगळे लोक आले. यात रामाच्या भीतीने क्षात्रवृत्ती सोडून रंगारी, शिंपी किंवा असेच इतर उद्योग करणारे सगळे राजांचे परिवार आले.
परडी आणि ‘दर्शन’
या परिवारांच्या दीनवाण्या अवस्थेकडे पाहत माता उद्गारली, “हे बाळांनो, आजपासून तुम्ही स्वतंत्र आहात. पण एक लक्षात ठेवा, गर्वाने वागू नका. इतरांना कमी लेखू नका. मी ही जी, वेताची परडी तुम्हाला देते, ती नित्य सांभाळा. माझ्या दास्यत्वाचे प्रतीक म्हणून ‘चवरी’ आणि गळ्यात लाल–पांढरे मणी धारण करा. माझ्या या ‘दर्शना’ची स्मृती म्हणून या मण्याला ‘दर्शन’ म्हटले जाईल. वर्षातून किमान पाच वेळा मी ज्याप्रमाणे भिक्षा मागितली, त्याप्रमाणे भिक्षा मागत जा; ज्याने तुमचा गर्व जाईल. कपाळाला या ‘हरिद्रा सुरणा’चा लेप करा, अंगावर कडुलिंबाची वस्त्रे नेसून; वेळप्रसंगी मला भेटायला या. मी तुमची संकटे दूर करीन.
या कथेने देवीच्या वैशिष्ट्याबाबतचे कुतूहल काही प्रमाणात शमले आहे. जोगते जोगवा का मागतात? चौंडके, परडी, दर्शन निर्माण कसे झाले? ‘जोगन भावी’ पवित्र तीर्थात स्नान का करतात? इत्यादींची उत्तरे मिळतात.
पण या कथेतून यल्लमादेवीचे समोर आलेले महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे – मुले किंवा मुली देवीला सोडण्याचे कारण सापडत नाही
संघर्षाचे मुद्दे :
कथेमध्ये महत्त्वाचे तीन मुद्दे नोंदवले गेले आहेत.
1) परशुरामाची आई क्षत्रिया आहे. कथेतला संघर्ष ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असा आहे. संघर्षात ब्राह्मणांचा जय झाला असून, कथाकारांनी ब्राह्मणांची बाजू घेतली आहे.
2) कथेमध्ये ब्राह्मण विरुद्ध असुर असाही संघर्ष आहे. कथाकारांनी ब्राह्मणांची बाजू घेतली आहे.
3) केवळ मानसिक व्यभिचार घडल्याने मुलाने पित्याच्या आज्ञेने मातेला ठार मारले आहे. हे वर्णवर्चस्व आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे उघड–उघड समर्थन आहे.
कथेचे कार्य
ब्राह्मणी संस्कृती : एकूणच, पुरुषप्रधान ब्राह्मणी संस्कृतीचे संस्कार करणे. हे मुख्य कार्य कथेने साधले आहे. देवीच्या भक्तांमध्ये पूर्वाश्रमीच्या अतिशूद्रांचा भरणा आहे. त्या खालोखाल शूद्र आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णाचे प्रमाण नगण्य आहे. अतिशूद्रांच्या मुली आणि मुले देवीला सोडली जातात. ती जोगतिणी आणि जोगते बनतात. मग संस्कृतीचे वाहक बनतात. शास्त्राप्रमाणे एकेकाळी देशात यक्ष, असुर, गंधर्व, किन्नर, राक्षस, दानव, दैत्य, द्रविड इत्यादी वंशाचे लोक राहत होते. त्यांना ‘अनार्य’ म्हणतात. आर्यांचे आगमन झाल्यावर ‘आर्य’ व ‘अनार्य’ यांचा संघर्ष झाला. त्यामध्ये जिंकलेल्यांनी आपली संस्कृती इतरांवर लादली. आज सर्व वंशांची सरमिसळ झाली आहे. एखादा शुद्ध म्हणून दाखवता येत नाही.
कथेमध्ये असुर राजाला ठार मारून, त्याच्या हातातील शिरा काढून, त्याच्या कवटीमधून ओवून चौंडक तयार केल्याचे वर्णन आहे. ही असुरद्वेषाच्या क्रौर्याची परिसीमा आहे. स्वतःच्या पूर्वजांबद्दलचा इतका द्वेष गाण्यांतून सांगत राहायचे काम जोगत्यांना दिले आहे.
महामानवांचा द्वेष :
अशी क्रूरता संभाजी महाराजांच्या बाबतीतही दिसते. संस्कृत शिकले, लिहिले, बोलले, या गुन्ह्याबद्दल वैदिक संस्कृतीने मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची विटंबना केलेली दिसते. त्याउलट छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधानंतर सन्मानपूर्वक कबर बांधली. बहुजनांना राजकारणात आणून, ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करणार्या, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या महात्मा गांधींच्याबद्दलही अलिकडे बहुजनांमध्ये द्वेषाची पेरणी केली आहे.
सर्वसामान्यांची धर्माच्या, देवाच्या नावे चालणारी लुबाडणूक थांबवावी, कष्टकर्यांना दोन घास सुखाचे मिळा वेत, सामान्य जनांना खर्या अर्थाने धर्माचे ज्ञान व्हावे, समाजातील जात आणि वर्णवर्चस्व या विकृतीवर उपाय शोधावेत, म्हणून ज्यांनी जीवाचे रान केले, त्या – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याविरोधात सामान्यांमध्ये आत्यंतिक द्वेष पसरवण्यात आला. त्यातून त्यांचे खून पाडण्यात आले; तेही सामान्य तरुणांच्या हातूनच.
ब्राह्मणी कथेमध्ये वरील विचारवंतांचे स्थान असुरासारखेच राहणार आहे.
मूर्ती :
रेणुका आणि परशुरामाची कथा यल्लमादेवीवर नंतर थापलेली दिसून येते. याला देवीच्या मूर्तीवरून ही दुजोरा मिळतो. कोल्हापूरमधील जयंती ओढ्याकाठी असलेले रेणुका मंदिर हे ‘ओढ्यावरची यल्लमा’ म्हणून प्रसिद्ध आहे. गाभार्यात रेणुकामातेची अंदाजे सव्वा फूट उंचीची उभी चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीसमोरचा मंडप शके 1840 मध्ये म्हणजे 100 वर्षांपूर्वी बांधल्याचा उल्लेख भिंतीत बसवलेल्या दगडी पाटीवर आहे. बाजूला परशुराम, मातंगी व पुढे काही अंतरावर जमदग्नीचे मंदिर आहे. मूर्तीच्या पूर्वी येथे स्वयंभू स्थानांची पूजा होती. तसे स्वयंभू तांदळे आजही मातंगी, रेणुका मंदिरात आहेत. याचा उल्लेख ‘रेणुका कथा’ पुस्तकात लेखकाने केला आहे.
प्राचीनत्व
मूर्तिशास्त्रानुसार एकट्याच देवीची मूर्ती मंदिरात असेल, सोबत पतीची मूर्ती नसेल, तर ती प्राचीन काळातील; म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीच्या पूर्वी असलेल्या स्त्रीप्रधान गणराज्यातील असते. पूर्वीच्या काळी अनेक ठिकाणी स्त्री गणराज्ये असल्याचे उल्लेख ‘महाभारता’मध्येही आढळतात. स्त्री राज्यांमध्ये केवळ स्त्रियाच असत, असे नव्हे; पुरुषी होतेच, पण त्यांना महत्त्व नव्हते. संपूर्ण सत्ता स्त्रियांची असे. वंश स्त्रीवरून ठरे.
याचे अवशेष ‘महाभारता’त व ‘रामायणा’च्या कथेमध्ये आहेत. राधेय, कौंतेय, माद्रेय, गंगापुत्र असा मुलांचा उल्लेख आई वरून केला गेला आहे. स्त्री राज्यांच्या काळातील उदार, शूर, दयाळू, गणप्रमुख स्त्रियांना आदर दाखवण्यात येऊन त्यांची पूजा सुरु झाली. त्यातून देवी तयार झाल्या. त्या काळी पतीला फारसे महत्त्व नसल्याने देवीच्या शेजारी पती बसत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, या देवी आयुधे घेऊन उभ्या असतात. त्यांना चार हात असतात. पुढच्या काळात या सर्व देवीना पार्वतीची रूपे मानण्यात आली. देवीच्या मूर्ती घडवण्याच्या पूर्वी, त्या ‘तांदळा’ म्हणजे ओबडधोबड वाटोळ्या दगडाच्या रूपात होत्या. त्या काळी शिल्पकला विकसित झाली नव्हती. शिल्पकलेसाठी आवश्यक छिन्नीचा शोध लागला नव्हता. पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुष देवांना जन्माला घातले. सुरुवातीच्या काळात तेही ‘तांदळा’च्या रूपात होते. आजही म्हसोबासारखे देव, वाटोळ्या दगडाच्या स्वरूपातच दिसतात.
झाड पाल्याने अंग झाकून घेऊन,_ देवीच्या दर्शनाला जाणे, ही प्रथाही प्राचीनत्व सिद्ध करते. कपड्यांचा शोध लागण्यापूर्वी पासून ही पूजा प्रचलित असावी. प्रथा लगेच बदलत नाहीत, हे दिसून येते.
महिला पुजारी :
देवीच्या सुरुवातीच्या पुजारी महिलाच असतात. यल्लमाची पूजा करण्यासाठी त्यामुळेच पुरुषांनी आत्यंतिक भक्तीपोटी स्त्रीवेष परिधान करण्याची प्रथा सुरू झाली असावी. जोगते स्त्रीवेषातच देवीची पूजा करतात. पुरुषप्रधान संस्कृती आल्यावर पुरुषाने स्त्रियांची धार्मिक कार्यातून हकालपट्टी केली. त्यांची पुरोहितगिरी संपवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध अपवित्रतेचे शस्त्र वापरले. पुरुषांनी यांच्यावर योनिशूचितेसाठी बंधने लादल्यावर पातिव्रत्याचे अवडंबर माजवले; पण जोगतिणीला ‘अक्षय सौभाग्यवती’ म्हणून मान मिळतो. ‘रांडाव पौर्णिमे’ला ती विधवा बनली, तरी पोळ्याच्या पौर्णिमेला पुन्हा ‘सधवा’ बनते. पुढील काळात या प्रथेला पुरुषांनी शोषणाचे हत्यार बनवले.
बर्याच देवळात स्त्रीला देवी बनवण्यात आले आणि त्याच देवालयात स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात आला; पण इथे मात्र पुरुषसुद्धा स्त्री वेष धारण करूनच देवीचा भक्त बनतो.
दांडग्यांना फायदा :
समाजातील प्रत्येक प्रत्येक नियम, कायद्याचा फायदा ‘दांडगेश्वर’ घेत असतात. देवदासी प्रथेचा फायदा समाजातील धनदांडग्यांनी घेतला. त्यांना उपभोगाचे साधन बनवले. गरिबांच्या मुलींना देवदासी म्हणून सोडण्यासाठी ‘खास’ प्रयत्न केले. त्यांना वाममार्गाला लावले. त्यासाठी देवीबाबतच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतला.
मुले सोडण्याची प्रथा :
मुले-मुली सोडण्याची प्रथा इतरही देवालयांमध्ये आहे. खंडोबा आणि जोतिबाला सोडल्या जाणार्या मुलीला ‘मुरळी’, तर मुलाला ‘वाघ्या’ म्हणतात. अंबाबाईला ‘जोगवीण’, रवळनाथाला ‘भावीण’, भूतनाथाला ‘नायकीण’, महाबळेश्वरला ‘कलावंतीण’, मायव्वा आणि दुर्गव्वाला ‘जोगतीण’, द्यामव्वा, मातंगी आणि मारुतीला ‘शरणी’, मंगेशाला ‘भावीण’ अशी सोडलेल्या मुलींना नावे दिली आहेत. अलिकडे त्या सर्वांनाच ‘देवदासी’ म्हणतात.
मुली वाहण्याची प्रथा शूद्रातिशूद्र समजल्या जाणार्या जातीत आहे. महार, मांग, चांभार, कोळी, नाईक, दासर, बेडर, धनगर, कुणबी, भंडारी, तलवार, कबालीवार आदी जातींची नावे उत्तम कांबळे यांनी त्यांच्या ‘देवदासी आणि नग्नपूजा’ या पुस्तकात नोंदवली आहेत. ते पुढे म्हणतात, “आधुनिक समाजात देवदासींची प्रथा अनिष्ट मानली जात असली, तरी देवदासीला तिच्या कुटुंबामध्ये मात्र अत्यंत आदराने वागवले जाते. कुटुंबातील मुलांच्या बरोबरीने; किंबहुना त्यापेक्षा वरचे स्थान तिला असते. कुटुंबाची बहुतेक सर्व आर्थिक जबाबदारी तिच्यावर असते. त्यामुळे आई-वडील मुलांपेक्षा अधिक लाड तिचे करतात.”
देवदासीला आपल्या आई-वडिलांचे श्राद्ध घालण्याचाही मुलाप्रमाणे अधिकार आहे. प्रतिष्ठितांच्या लग्नात तिला मोठी माणसे, पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून धार्मिक विधीपर्यंत अधिकार असे. तिच्या अंत्यविधीसाठी मंदिरातील फुले, चंदन, गंध यांचा वापर केला जाई आणि मंदिरांमध्ये तिच्या नावाने एक दिवस सुतक पाळले जाई. मुला-मुलींचे देवदेवतेबरोबर लग्न झाले की, त्यांना देवीला अर्पण केले गेले, असे समजले जाते. लग्न धूमधडाक्यात होते. इतर लग्नाप्रमाणे सर्व विधी होतात. पाहुणे-रावळे नटून-थटून लग्नाला येतात.
देवीशी लग्न झाले की, ‘अंगात देवत्व येते,’ असा समज समाजाचा आणि देवदासींचा आहे. देवदासी मग भूत- भविष्यावर भाष्य करू लागते. अडचणींवर उपाय सांगू लागते. तिचा संचार सर्वत्र असल्याने आणि उघड्या डोळ्यांनी संसार पाहत असेल, तर बहुश्रुत बनते. इतर महिलांपेक्षा अधिक शहाणी बनते. तिचे मार्गदर्शन अडचणीत असणार्यांना लाभदायक ठरते.
शिक्षणाचा प्रसार झाला. ज्ञानसंवर्धनाची नवीन माध्यमे आली, तसा समाजाचा शहाणपणाचा स्तर वाढला. त्या मानाने देवदासींनी आपल्यामध्ये बदल करून घेतला नाही. त्या मागे पडल्या, कर्मकांडात अडकून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्या. पूर्वीच्या कर्मकांडातच त्यांचा वेळ जातो. त्याच आनंदात त्या मश्गुल दिसतात.
ही ब्राह्मणी देवी नव्हे
देवीच्या विविध प्रथा, परंपरा, रूढी, धार्मिक कार्यक्रम, पूजापद्धती, नैवेद्य आदींमध्ये कुठेच वैदिक विचारांचा मागमूसही लागत नाही. भक्तांमध्ये सर्व भरणा ब्राह्मणेतर बहुजनांचा आहे. ते पूर्वाश्रमीचे शूद्रातिशूद्र आहेत. वर्णव्यवस्थेत त्यांचे स्थान सर्वांत कनिष्ठ आहे. अशा वेळी त्यांच्या देवीचे नाते ब्राह्मण ऋषी, त्याची क्षत्रिय पत्नी आणि ब्राह्मण्यग्रस्त पुत्र यांच्याशी जुळत नाही. मूर्तिशास्त्रानुसार एकट्या देवीची व चतुर्भुज मूर्ती, पार्वतीचे रूप असलेल्या देवीची मानली जाते. तिचा संबंधही वैदिकांशी नाही. दैवतशास्त्रानुसार ‘तांदळा’ स्वरुपात असेल, तर तो प्राचीन काळचा छन्नी-हातोड्याचा शोध लागण्यापूर्वीचा भटक्या अवस्थेतील समाजकाळातील देव असतो; म्हणजे वैदिक संस्कृतीशी संपर्क येण्यापूर्वीची ही देवी आहे. यल्लमादेवीची पूजा जमदग्नी किंवा परशुरामाला देव मानणार्या उच्चवर्णियांमध्ये केली जात नाही.
देवीला पोळ्या, भाजी-भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये परिसरातील भाज्यांचा समावेश असतो, हे शेतकर्यालाच शक्य आहे. या पुराव्यावरून यल्लमादेवी ही वैदिक संस्कृतीमधील रेणुका-परशुराम-जमदग्नी या कुळातील देवी असू शकणार नाही. तिचे मूळ इथल्या प्राचीन संस्कृतीमध्ये शोधावे लागेल. ‘रेणुका’ ही भूदेवी असून ‘रेणु’ + (अधिक) ‘का’ म्हणजे वारूळ किंवा पृथ्वी, असाही अर्थ निघतो. तिचे नाते कृषिसंस्कृतीशी आहे. नामसाधर्म्यामुळे यल्लमा – रेणुकेला, परशुराम – जमदग्नी- रेणुकेशी जोडले गेले असेल.
पुरुषप्रधान संस्कृतीत धार्मिक विधी पुरुषाकडे घेण्यात आले, तरी त्याला यल्लमाची पूजा स्त्रीवेषात करावी लागते. यावरूनही तिचे प्राचीनत्व स्पष्ट होते. लिंबाचा पाला कमरेभोवती गुंडाळून किंवा नग्नपूजा, या बाबी ‘यातुपूजे’शी संबंधित आहेत. पुरोहितांचे कळकट उपकरणे जसे आजही टिकून आहे, तसा लिंबाचा पालाही. ही वैदिकांपूर्वीची संस्कृती आहे.
दैवते :
आपण ज्यांना आज ग्रामदैवते, लोकदैवते संबोधतो, ती कधीतरी या मातीत जन्मलेली, आपल्यासारखी रक्तामांसाची माणसे होती. ते आपले पूर्वज होते. स्वतःच्या ‘महान’ कर्तृत्वामुळे, सत्कार्यामुळे त्यांनी समाजात लौकिक मिळविला आणि ते दैवतपदाला पोचले. त्यांना देवत्व प्राप्त झाले. लोकसाहित्याच्या अभ्यासिका दुर्गा भागवत यांनी मध्य प्रदेशातील गोंड, बैगा, भारिया वगैरे जातींची छाननी केली, तेव्हा त्या-त्या जातीतील पहिले पूर्वज किंवा महापराक्रमी पूर्वज देव पदवीला पोचल्याचे दिसून आले. असे त्यांनी त्यांच्या ‘भागवत’ ग्रंथात 1975 मध्ये लिहून ठेवले आहे. हीच प्रक्रिया महाराष्ट्रातही घडली. पूर्वजांना दैवत्व प्राप्त झाले. लोक त्यांची पूजा करू लागले, आराधना करू लागले, जत्रा, यात्रा करू लागले.
देवातील वर्णव्यवस्था :
‘भगवद्गीते’च्या सतराव्या अध्यायात देव-देवतांचे वर्णन करणारा एक श्लोक आहे.
यजन्ते सात्वीका, देवान् यक्षरक्षांसि राजसा ।
प्रेतान् भूतगणाश्चाने याजन्ते तस्स माजलना: ॥
म्हणजे- सात्विक लोक देवांना पूजतात, रजोगुणी यक्ष राक्षसांना पूजतात; तर तामसी लोक भूत-प्रेतादिकांची उपासना करतात.
पुराणात व ‘भगवद्गीते’त देवांचे दोन प्रकार आहेत. सत्वगुणी आणि शूद्र.
ब्राह्मण पुजतात ते सत्वगुणी देव. आणि बहुजनांचे देव, या शूद्र देवता. या देवच नाहीत; त्या यक्ष, राक्षस, भूत, प्रेत आदी आहेत. ‘भगवद्गीते’चे मत ग्राह्य मानून बहुजनांच्या देवदेवतांना अभ्यासकांनीही शूद्र मानले व अप्रतिष्ठित केल्याचे दिसते, असे मत डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी मांडले आहे. ईश्वरी राज्य स्थापण्याच्या नावाखाली बहुजनांना गोळा करणार्या, एका आध्यात्मिक म्हणवल्या जाणार्या संस्थेने; तर बहुजनांना आपल्या दैवतापासून दूर करण्यासाठी पूजेलाही विरोध केला आहे. ते म्हणतात, “मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नका.” “तुम्हाला कुलदेवता नेमकी माहिती नसेल म्हणून, कुलदेवतेचे नाव घेण्याऐवजी ‘कुलदेवताय नमः’ असाच जप करा.” बहुजनांच्या देवतांची शूद्र देवता म्हणून त्यांनी बोळवण केली आहे.
ग्रामदेवता :
विठोबा, खंडोबा, बालाजी, अंबाबाई या पूर्वी ग्रामदेवता होत्या. त्यांचे उन्नयन करून उच्चवर्णियांनी त्यांचे रंगरूप बदलले. त्यांना आपलेसे केले. ग्रामदेवतांची, लोकदेवतांची वैशिष्ट्य म्हणजे, त्याला सर्व-जाती पंथाचे लोक एकत्र येऊन पूजतात. ग्रामदेवतांना कोंबड्या-बकर्यांचा बळी दिला जातो. हळदी-कुंकू, गंडेदोरे, नारळ वाहिले जातात. विविध अन्नपदार्थ, भाजीपाला, फुले, फळे, दूध-दही अर्पण केले जाते. त्या-त्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती, वातावरण, इतिहास, संस्कृती, परंपरा आदींमधून ग्रामदेवतांना आकार प्राप्त होतो. या देवतांचे स्वरूप वत्सल माता, शक्तिशाली संरक्षक असे असून त्या फळधारणा, सुफलीकरण याच्याशी संबंधित असतात, तेव्हा स्त्री रुपात असतात. त्यांच्या दंतकथा, आख्यायिका तयार होतात. त्यामध्ये इतिहास लपलेला असतो. त्यांचे रूपांतर लोकदैवतात होते.
लोकदैवत :
लोकदैवतांच्या पूजेला सार्वजनिक स्वरूप असते. मंदिरे सजवली जातात. महापूजा, यात्रा, उत्सव याबरोबर ‘भंडारा’ही घातला जातो. त्या-त्या लोकदैवताचा दिवस ठरलेला असतो. ‘देसी तेव्हा घेसी,’ असे दैवताचे स्वरूप असते. लोकजीवनामध्ये भयाच्या आणि अद्भुत चमत्काराच्या भावनेने, दैवताबद्दल विचार केला जातो. त्यातून उग्र आणि भयंकर रूपही निर्माण होते. या रुपाचे पुढे उन्नयन होते. ‘यल्लमा’ हे मूळ, तर रेणुका हे उन्नत रूप असावे, असे मत प्रा. डॉ. नीला जोशी यांनी मांडले आहे.
या देवतेला पुरुषाचा वाराही सोसत नाही, म्हणून पुरुष स्त्रीवेषामध्ये तिची पूजा करतात. त्यांना ‘जोगते’ म्हणतात. लोकदैवतांच्या मंदिरासमोर तीर्थकुंड असलेले पाहावयास मिळते. त्यातील जल हे पवित्र मानले जाते. मंदिरप्रवेशापूर्वी या जलाने हात-पाय स्वच्छ करण्याची प्रथा आहे. त्यामुळे व्यक्ती शुद्ध होते, अशी धारणा आहे. आषाढी कार्तिकीला पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नान करून शुद्ध झाल्यानंतर भाविक विठ्ठलदर्शनाला जातात. यल्लमादेवीच्या दर्शनापूर्वी पवित्र जलकुंडात स्नान करण्याचा रिवाज आहे. कुंकवाने मळवट भरणे, गळ्यात कवडीची माळ घालणे, पिठा-मिठाचा जोगवा मागणे, परडीची पूजा करणे आदी व्यावहारिक संकेत हे ‘यक्षिणी पूजे’चे द्योतक मानले जातात.
अंगात येणे ः
लोकदैवतांच्या बाबतीत अंगात येण्याची क्रिया घडते. त्याला ‘संचारी नाट्यविधी’ म्हणतात. या विधीयुक्त क्रियेमध्ये देवी मानवी शरीरात संचार करते, असे मानले जाते. यावेळी देह, मनाची अवस्था बदलते. देह व मनावरचे नियंत्रण हरवून बसते. अशा व्यक्तीच्या माध्यमातून भूतकालीन, भविष्यकालीन, चमत्कारिक, अद्भुत घटनांचे संदर्भ मिळवले जातात. हे फक्त उपासकांच्या बाबतीत घडते. ही बाब लोकदैवतांच्या बाबतीत दिसून येते; वैदिक देवतांच्या बाबतीत नाही. गौरी-गणपतीत महिला रात्रीच्या वेळी झिम्मा-फुगडी खेळतात. गौरीची गाणी गातात. या वेळी काही महिलांच्या अंगात येते. नवरात्रात घागरी फुंकण्याचा, सूप खेळण्याचा खेळ खेळला जातो. या वेळीही अंगात येते. नदीला नवीन पाणी येते, तेव्हा ते देवीला वाहण्यासाठी वाजत-गाजत नेले जाते. वाद्य सुरू असताना महिला अंगात घेतात. पिराच्या उत्सवात पीर अंगात येतो. काहीजणी मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा अशावेळी अंगात घेतात.
अंगात येण्यामागील सत्य :
आता विज्ञानाने सिद्ध केले आहे की, अंगात येण्याचा देवाशी, आदिशक्तीशी काहीही संबंध नाही. गरजेप्रमाणे कधीही अंगात घेणारे बहुधा नाटक करत असतात. ठराविक उत्सवप्रसंगी किंवा वाद्य वाजल्यावर अंगात येते, हे मात्र खरे, प्रामाणिक असते.
खरे, प्रामाणिक याचा अर्थही त्यांचा दैवीशक्तीशी काही संबंध नाही. अशी व्यक्ती संमोहित झाल्याप्रमाणे बेधुंद होऊन नाचत असते. ती एक मानसिक अवस्था असते. काही जोगती अंगात घेतात. समाजाला आणि त्या व्यक्तीला आपल्या अंगात देवीचा संचार झाल्यासारखे वाटते. असाच मानसिक अवस्थेचा एक प्रकार म्हणजे भूत लागणे. अशा प्रकारावर आता औषधोपचार उपलब्ध आहेत. त्याचे सोंग करून भाविकांना फसवणारे बुवा, बाबा, बाया आहेत. त्यांना प्रत्यक्षात भूत-भविष्य काही कळत नाही. गूढ शक्तीच्या आकर्षणाचा गैरफायदा असे बुवा, बाया घेतात.
‘गूढ शक्ती असते,’ या श्रद्धेला खतपाणी घालून, सत्संगाला आलेल्या साधकाला आपल्या जाळ्यात ओढायचे, त्याच्याकडून ‘अर्पण’च्या नावाखाली लुटायचे, गुरूंची कृपा होण्यासाठी सेवा करवून घ्यायची. संमोहनशास्त्राचा वापर करून त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करायचे, धार्मिक द्वेष पसरवून स्फोट घडवून आणायचे, धर्मद्रोही म्हणून खून पडायचे, असे उद्योग करणारी आध्यात्मिक संस्था तयार झालेली आहे. प्रत्यक्षात गूढ शक्ती, दैवी शक्ती, चमत्कार व अमानवी शक्ती, काळी शक्ती, वाईट शक्ती असे काहीही अस्तित्वात नाही. ही गोष्ट विज्ञानाने सिद्ध केली असून, अशी शक्ती सिद्ध करणार्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 21 लाखांचे बक्षीस ठेवले आहे.
दैवते आणि कला :
लोकसंस्कृती — धर्म, लोकमानस, लोकधारणा — यातून प्रवाहित होत असते. या प्रवाहात देव-देवतांचे उपासक, कलाकार, श्रद्धावान समाज, रंगभूमीची निर्मिती करतात. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत, गोंधळी, वाघ्या-मुरळी, दशावतारी, भंडारी, बहुरुपी, पोतराज, पांगुळ, भराडी आदींच्या सोबत यल्लमाच्या जोगत्यांचाही सहभाग आहे. लोकजागरात नृत्य, नाट्य, गायन, अभिनय यातून लोकरंजनाचेही काम केले जाते.
यल्लम्माचा जागर :
‘जागरण’ शब्दापासून ‘जागर’ शब्द तयार झाला आहे. जागरण म्हणजे स्वतः जागे राहायचे आणि देवीलाही जागे ठेवायचे. लग्न, वास्तुशांती, वाढदिवस, श्रावणातील सोमवार अशा प्रसंगी जागर घालण्याची प्रथा आहे. जागराच्या आधी लिंब नेसण्याचा कार्यक्रम होतो. जागर घालायचा आहे, त्या भाविकाच्या घरी जोगती त्याचा जग मांडतो. देवीला फुले, हार अर्पण करून पूजा करतो. समोर पाच नारळ, पाच लिंबू, आरती ठेवून जागराला सुरुवात होते. शिवाजी कोळी सांगत होते, दहा-पंधरा वर्षांपूर्वी रात्री नऊ वाजता जागर सुरू झाला की ‘फाटला सा पातुर’ (पहाटे सहापर्यंत) चालू राही. सगळी गल्ली जागराला बसायची. आता दोन तास म्हणजे लई झालं; आणि घरच्या शिवाय बाहेरचं कोण ऐकायला येत नाही. बाहेरचे भाविक केवळ नमस्कार करून परत फिरतात.
चौंडकं, टाळ, सुती या वाद्यांच्या साथीने ते जागर घालतात. सुरुवातीला ‘नमन’ झाल्यावर मुख्य कथा आणि शेवटी ‘निरोपाचे गीत’ असे त्याचे स्वरूप असते.
गृहिणी की आदिमाया?
पुराणातील रेणुकेच्या कथेमध्ये रेणुका ही घरकाम करणारी असहाय्य गृहिणी आहे. केवळ संशयावरून तिला प्राण गमवावा लागतो; पण जागरणाच्या गीतामध्ये ती ‘आदिमाया’ वर्णिली आहे. ते म्हणतात, ‘आदिमाया यल्लमा या भक्ताला सांभाळ गं.’
दास भिकाजी म्हणे देवीला । सारे जीवन वाहिले तुला ॥
तिलाच ते भद्रकाली, दुर्गामाता, अंबामाता, जगदंबा यांच्या रूपात पाहतात. पुराणातील मूळ कथेत जमदग्नी आणि परशुराम शक्तिशाली आहेत; पण जागरणाच्या गीतामध्ये यल्लमाचे चमत्कार वर्णिले आहेत. ती खडकातून पाणी काढून परशुरामाची तहान भागवते. मलपहारी नदीची निर्मिती करते. खडकावर साळी उगवण्याचा चमत्कार करते. नखाने साळी सोलून तांदूळ कांडते. बिनपाण्याने भात शिजवते. एवढेच नव्हे तर, सात दैत्यांना एकाच वेळी बांधून, भुयारात कोंडते, आदी पराक्रम तिच्या नावे आहेत. मस्तक उडवायला आलेल्या परशुरामाला, ती आई म्हणून केलेल्या मायेची, पाजलेल्या दुधाची आठवण करून देते.
परशुराम, जमदग्नीच्या पुरुषी वर्चस्वाची कथा सांगताना त्यावर साज मात्र यल्लमाच्या निरपराधित्वाचा चढवला जातो. आईला मारणार्या परशुरामाला, त्याच्या मातेबाबतच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. वाढवलेल्या कथेत माता-पित्यांना जिवंत करून परशुरामाला त्यांची सेवा करायला लावले जाते.
चौंडक आणि सुती वाजवणे या कष्टसाध्य कला आहेत. त्यांचे जतन केवळ जोगती करतात.
गीते :
काही जागरात या सात्विक गीतांची जागा सिनेगीतांच्या चालीवरील भडक गाण्यांनी घेतली आहे. नृत्याच्या नावाखाली विचित्र अंगविक्षेप आणि भक्तिगीतांच्या जागी द्वैअर्थी गाणी असतील तर अशा जागराला अजूनही बरा प्रतिसाद मिळतो. अर्ध्या रात्रीपर्यंत जागर चालतो. त्याला तरुणांची गर्दी असते.
‘यू ट्यूब’वर रेणुका- यल्लमा यांची अनेक गीते पाहायला मिळतात. त्यामध्ये यल्लमाला शरण जाताना – “यल्लमा ही आई, वडील, बहीण, भाऊ आहे. तिने वाट दाखवावी, अशी अपेक्षा केली आहे. पदराची सावली करावी, अशी अपेक्षा केली आहे. यल्लमा सौंदत्तीवर राहते. ती दिवसभर आपल्याजवळ असते; पण स्वप्नातही तीच येते. रेणुका परशुरामाला खेळवते. यल्लमा हीच शिवाची पार्वती आहे. आपण चौंडक्याच्या तालावर नाचून भक्ती करूया” आदी वर्णने आहेत. कोल्हापूर भागात तानाजी पाटील यांचा जागर बराच प्रसिद्ध पावला. भाविक हजारो रुपये खर्चून त्यांचा जागर घालतात. उंची सहा फूट, रंग गोरापान, चेहरा आकर्षक, गोड गळा आणि स्त्रीवेषात नटलेला जोगती समोर शेकडो भाविकांनी खिळवून ठेवतो. सोप्या भाषेत अनेक कवने त्यांनी स्वतः रचली आहेत.
यातुविधी :
विकासाच्या प्राथमिक अवस्थेतील मानवी समाज ‘यातुविधी’वर विश्वास ठेवतो. वैदिकांचा यज्ञ हाही यातुविधी आहे. “ठराविक आकाराच्या कुंडामध्ये विशिष्ट प्रकारे उच्चार करून, मंत्र म्हणत, विशिष्ट अन्नपदार्थ आणि प्राण्यांचे हवन केले, तर देवतेला आपली मनोकामना पूर्ण करावी लागते.” हा विश्वास यज्ञकर्त्यामध्ये होता. अवैदिकांमधील यातुविधी वेगळे आहेत. मुले होणे आणि जमिनीत धान्य उगवणे यांच्यातील साम्यावरून, बहुप्रसवा स्त्रीच्या हस्ते धान्य पेरल्यास अधिक उत्पादन मिळते, असा समज होता. पुत्रवती स्त्रीच्या हस्ते नवविवाहितेची ओटी भरणे, यामागे हाच समज आहे. पावसाळ्यात बेडूक ओरडतो, त्यावरून पाऊस यावा म्हणून बेडकाचे लग्न लावणे, असा विधी केला जातो. नुकतेच एका गावी ‘पाऊस पडावा’ म्हणून गावकर्यांनी बेडकाचे लग्न लावले. योगायोगाने मुसळधार पाऊस पडला, पूर आला. तेव्हा गावकर्यांनी बेडकाचे लग्न मोडण्याचा विधी केला.
देवीला भेटण्यासाठी ठराविक कुंडात स्नान करून, निर्वस्त्र किंवा लिंबाच्या डहाळ्या गुंडाळून जावे, ही प्रथाही अवैदिकांच्या यातुविधीचा भाग आहे.
कथेचा सामाजिक परिणाम :
वडील जमदग्नी यांच्या आदेशाने परशुरामाने आपल्या आईचे मस्तक उडवले. जमदग्नीला रेणुकेचा राग येण्याची कारणे कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळी सांगितली जातात.
एकदा रेणुका सरोवरात पाणी आणण्यासाठी गेली. तिथे सुंदर स्त्रियांसह विहार करणार्या चित्ररथ गंधर्वाला पाहून तिचे मन विचलित झाले. तिची ही मानसिक अवस्था अंतर्ज्ञानी जमदग्नीला समजली. रेणुकेचे हे वर्तन पाहून त्याला भयंकर राग आला. त्याने रेणुकेचा वध करण्याची आज्ञा आपल्या मुलांना दिली.
दुसर्या कथेत म्हटले आहे – चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करताना स्वतःच्या राण्यांना छेडत होता. त्या लज्जायमान होऊन त्याला हसत होत्या. त्यांचा तो भोगविलास पाहून रेणुका क्षणभर स्तब्ध झाली. तोच क्षण साधून तिच्या मनात मदन शिरला आणि आकाशात वीज चमकावी, तसा रेणुकेच्या मनात विचार आला, जर महर्षी माझ्यासोबत असते तर मी अशीच जलक्रीडा केली असती. दुसर्याच क्षणी ती सावरली. घडल्या घटनेत आपलं काहीतरी चुकल्याची जाणीव होऊन तिने मनोमन जमदग्नीची क्षमा मागितली…
या कथेत जमदग्नी प्रथम शाप देत. तिला सिद्ध भेटतात. तीन दिवसांनी अग्नीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखी निष्कलंक रेणुका आश्रमात येते. जमदग्नी तिला पाहून ‘मस्तक उडवण्याची’ आज्ञा मुलांना करतात; म्हणजे पाणी आणायला थोडा वेळ झाला म्हणून संशय घेतला जातो. इतरांच्या जलक्रीडा पाहून मन विचलित होते, त्यामुळे ती अपवित्र बनली, असे समजून मस्तक उडवण्याची भयानक शिक्षा दिली जाते. अशा शिक्षेचा निषेध करण्याचा विचार केला जात नाही.
विष्णूने – परशुराम अवतारात संशयावरून आईचे मस्तक उडवले, तर रामावतारात संशयावरून पत्नीला वनात सोडले. अशा कथा जनमानसावर कुसंस्कार करतात. त्या लहानपणापासून ऐकून पुरुषांना आपण कसे वागायचे आहे, याचे मार्गदर्शन मिळते; परिणामी समाजात स्त्रियांच्यावर अनेक बंधने लादली जातात. केवळ संशयावरून – नवर्याला शिक्षा करण्याचा हक्कच आहे, – असे समर्थन केले जाते. पत्नीचा खून, खुनाचा प्रयत्न, स्टोव्ह पेटवताना झालेला अपघात, छळाला कंटाळून माहेरी राहणार्या महिला, परित्यक्ता अशा महिलांच्या हृदयद्रावक कथांमागे पुरुषी संस्कार कारणीभूत असतात. सुमन ओक यांनी आपल्या पुस्तकात या कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या मते, ही कथा ब्रह्म व क्षत्र या दोन शेजारी राहणार्या जमातीमधील संघर्षाची आहे. कार्तवीर्याने वसिष्ठाची गाय चोरली. त्यामुळे तो संतप्त झाला, हे खरे वाटत नाही. क्षत्रियांनी केलेल्या ब्राह्मणांच्या गायीचा अपहार, हे स्त्रियांच्या अपहाराचे रूपक असावे.
परशुरामाचे भक्त :
परशुरामाला दैवत मानणारी क्षत्रिय कुळे हिमाचल प्रदेशात आढळतात. चांगले पीक परशुरामाला अर्पण करण्याची प्रथा तिथे आहे. मुजफ्फराबादजवळील परशुराम मंदिराच्या यात्रेत बरीच गर्दी असते. गुजरातेत भार्गव ब्राह्मण, तर कोकणात चित्पावन व सारस्वत ब्राह्मण परशुरामाने वसवल्याचे मानले जाते.
तिरूविंताकुर जिल्ह्यातील महेंद्रगिरी, ओरिसातील महेंद्र पर्वत, कृष्णा वेण्णा संगमावरील खेडगाव, कांगडामधील परशुराम मंदिर आदी स्थळे परशुरामाशी निगडित आहेत; पण त्यांचा ‘यल्लमा’ पंथाशी संबंध नाही.
कथा रचण्याचे कारण :
दैवतांचे महात्म्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कथानकाची गरज असेल, तर कथा रचण्याचे काम पुरोहित करत असतात. दैवताचे महत्त्व ठसवताना कल्पनारम्यता आणली, तरी त्या कथेचा भाग सत्य सांगून जातो.
महात्मा फुलेंनी पुराणकथांची चिकित्सा केली आहे. थोर इतिहासतज्ज्ञ डी. डी. कोसंबी यांनी ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या ग्रंथामध्ये पुराणकथांमागील इतिहास उलगडून दाखवला आहे. दोन जमातींमध्ये संघर्ष झाला की, पुरोहित त्यांच्या दैवतांच्या कथेमध्ये संघर्ष दाखवतात. संघर्षात एका समाजाची सरशी झाली की, दुसरे दैवत दुष्ट ठरते, दास, सेवक बनते, रक्षक बनते. दोन जमातीत एकी झाली, तर त्यांच्या दैवतांचे पुरोहित कथेमध्ये विवाह लावून मोकळे होतात. अशा कथा रचताना त्या कालची भौतिक साधने, हत्यारे, प्रथा, परंपरा, चाली-रीती आदींची वर्णने येतात. पुरोहित जाता-जाता स्वार्थ साधतो. बहुतेक पुराणकथांमध्ये एक गरीब ब्राह्मण असतो. त्याला छळणारे दुष्ट राक्षस असतात. ब्राह्मणाला दान दिल्यावर, दक्षिणा दिल्यावर, खूष केल्यावर देवता तुमची कामे करतात. त्रास दिल्यास देवता तुम्हाला धडा शिकवतात, अशी वर्णने येतात.
या कथांचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सत्ताधारी वर्गाची भलावण. राज्य करण्यासाठी, सत्ताधार्यांची दोन हत्यारे असतात – एक तलवार आणि दुसरे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानाचे हत्यार, त्यांची सत्ता पवित्र आहे, देवाचीच देणगी आहे, त्या विरोधात बोलणे पाप आहे, हे ठसवत असतात. रेणुकेच्या कथेत पुरुषी सत्तेला महत्त्व आहे. पितृसत्ताक पद्धत क्रूरपणे राबवणे, हा उद्देश आहे. ही पितृसत्तेच्या सुरुवातीच्या काळची कथा आहे. यल्लमाला रेणुकारुपात दाखवून ब्राह्मणी गोतावळ्यात सामील केलेले दिसते.
इतिहास
इतिहास बदलतात का?
दैवतांचा इतिहास बदलता येतो का?
तसे प्रयत्न होतात का? या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ असतील, तर यल्लमाच्या बाबतीतही तसेच झाले असण्याची शक्यता गृहीत धरता येईल. याबाबतीत कोल्हापूरचे सध्याचे उदाहरण घेता येईल. कोल्हापूरची अंबाबाईदेवी सुप्रसिद्ध आहे. तिच्या प्रथा परंपरा पाहता मूर्तीच्या हातात असलेली साधने – हत्यारे पाहता, मूर्तीवरील चिन्हे पाहता, मंदिराच्या परिसरातील देवतांच्या मूर्ती पाहता, तज्ज्ञ एक अनुमान बांधतात. ही देवी स्त्री राज्यांच्या काळातील गणप्रमुख आहे. सर्वांना सांभाळून घेणारी, शूर, शत्रूला पाणी पाजणारी, सर्वांचे रक्षण करणारी या अनुभवावरून तिला देवीचे रूप दिले गेले. पुढच्या काळात ती पार्वतीचे रूप मानली गेली. शिवगणात सामील झाली, शैव परंपरेची बनली.
तरीही अलिकडच्या 40 वर्षांत तिला विष्णुपत्नी लक्ष्मी बनवण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी नवी कथा रचण्यात आली. मूर्तीशी छेडछाड करण्यात आली. हा कावा लक्षात आल्यावर बहुजन भाविकांनी या विरोधी संघर्ष केला व डाव उधळला गेला. यावरून असे प्रयत्न होतात, हे सिद्ध होते.
अनेक जैन व बौद्ध इतिहास संशोधक – काही प्रसिद्ध देवालये आज वैदिकांची असली तरी पूर्वी जैनांची होती, बौद्धांची होती, याचे पुरावे देतात. बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्यानंतर अनेक विहारांत, महादेवाच्या पिंडी ठेवण्यात आल्याचे पुरावे देतात. दुसर्याचे दैवत बळकावण्यासाठी असे प्रयत्न होतात. तसेच दैवताचे महत्त्व वाढवून, भक्त गोळा करण्यासाठीही प्रयत्न केले जातात.
देवदासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न
देवीला सोडल्यावर देवदासीच्या हालाला पारावार राहत नाही. हे पाहून देवदासी स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू इच्छिणारे कार्यकर्ते तयार झाले.
कार्यकर्ते:
गडहिंग्लजचे विठ्ठल बन्ने, गारगोटीचे आनंद वास्कर आणि त्यांच्या पत्नी, लेखक उत्तम कांबळे, राजन गवस, बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अच्युत माने, प्रा. सुभाष जोशी, कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कम्युनिस्ट पक्षातील कॉम्रेड अनिल चव्हाण, सुमन पाटील, उमाकांत चव्हाण इत्यादी.
विठ्ठल बन्ने यांची घडण सेवादलातील. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वर्णवर्चस्वाचे अनुभव घेतले. महात्मा गांधींचा खून झाल्यावर पेढे वाटणारे संघवाले त्यांनी जवळून पाहिले. 1950 साली सेवादलाच्या शिबिरात, साने गुरुजींचे व्याख्यान त्यांनी, पायाशी बसून ऐकले. सेवादलातच एक देवऋषाचा मुलगा नास्तिक कार्यकर्ता बनला.
1971 साली ते प्राध्यापक असताना ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळ चालवत. डॉ. बाबा आढाव गडहिंग्लजमध्ये आले. चौंडक्याच्या तालावर नाचणार्या पंधरा-वीस महिला त्यांनी पाहिल्या आणि जोगतिणींची पहिली परिषद घेण्याचे ठरले. ‘गौराबाई’ ही प्रमुख संघटक, स्वागताध्यक्ष बनली आणि देवदासी मुक्ती चळवळीला गती मिळाली.
इतिहास :
यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. 1905 साली डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी मुरळी प्रथेविरोधी ब्रिटिश सरकारकडे अर्ज केला. 1910 साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रथाविरोधी चळवळ सुरू केली. 1920 साली करवीर संस्थानात राजर्षी शाहूंनी ‘अनौरस संतती आणि जोगतिणी’ यांच्यासंदर्भात कायदा केला. 1934 साली मुंबई राज्यात देवदासी संरक्षण कायदा करण्यात आला. 1936 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत देवदासींची सभा झाली.
या काळात म्हैसूर सरकारनेही कायदे केले आहेत. देवदासींना नृत्याची सक्ती रद्द करणारा कायदा त्यांनी 1893 व 1909 साली केला. 1910 साली देवदासी विधीवर बंदी घातली. 1922 साली देवदासी प्रथा उच्चाटन कायदा केला. 1983 व 1985 साली देवदासी प्रथेला बंदी घालणारा कायदा केला.
तामिळनाडूचे महात्मा फुले म्हणून प्रसिद्ध असलेले रामस्वामी नायकर यांनी देवदासी प्रथेविरोधात प्रयत्न केले. 1947 साली या विरोधी कायदा झाला.
महाराष्ट्रातील प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1987 साली राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती
स्थापण्यात आली. 2006 साली महाराष्ट्र शासनाने कायदा केला.
लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी :
या चळवळीला आमदारांचेही बळ मिळाले. त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडाम, जनता दलाचे आमदार श्रीपतराव शिंदे, शिवसेनेच्या नीलम गोर्हे, आमदार सुभाष जोशी, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार संपत बापू पवार-पाटील आदींची नावे ठळक आहेत.
नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आपल्या अधिकारांचा वापर करून देवदासीसाठी खास प्रयत्न करणारे शासकीय अधिकारीही आहेत. कर्नाटकातील पोलीस अधीक्षक रमेश व सुभाष भरणी यांनी देवदासींशी संबंध ठेवणार्या पुरुषांना शोधून, त्यांचे प्रबोधन केले आणि दोनशेच्यावर देवदासींचे विवाह लावले.
सांगलीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी लीना मेहेंदळे यांनी, जत येथे देवदासींच्या पुनर्वसनासाठी प्रशिक्षण केंद्र काढले व चालवले.
अर्थकारण :
एकेकाळी गावचे देऊळ हेच समाजाच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक उन्नतीचे केंद्र होते. देऊळ व्यवस्थित चालण्यासाठी समाज देवाला विविध गोष्टी अर्पण करत असे. त्यातून आपले भले होईल, ही श्रद्धा होती. पैसे, दागिने, प्राणी अर्पण केले जात. मुले-मुली ही कुटुंबाची संपत्ती मानली जाई. प्राण्यांप्रमाणे त्यांनाही अर्पण करून देवालये चालण्याची सोय केली जाई. देवाची सेवा करणार्या मुला-मुलींना मान होता, प्रतिष्ठा होती. शंभर वर्षांपूर्वी घरच्या गरिबीमुळे मुलीला जोगतीण बनवून संसार सावरल्याची उदाहरणे आहेत.
पुढच्या काळात गावातील प्रतिष्ठित आणि पुजार्यांनी त्याचा गैरफायदा घेतला असावा. शहरे वाढली, तसा वेश्या व्यवसाय वाढला. दलालांची नजर गावातल्या गरीब मुलींच्याकडे गेली. मुलगी देवीला सोडली की, तिच्यावरचा कुटुंबाचा अधिकार संपतो. या गोष्टीचा गैरफायदा उचलण्यासाठी गरीब घरातील मुलींना देवीला सोडायला लावले जाई. या मार्गाने मोठ्या प्रमाणात देवदासी म्हणून मुली वेश्या बनल्या.
अशा विविध कारणांनी ‘यल्लमा’ पंथ वाढत गेला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी त्यातील अनिष्ट प्रथांना काही प्रमाणात पायबंद बसला. आता भक्तीचे आधुनिकीकरण झाले आहे, लाभार्थी बदलले आहेत. घरी देवी बसवली आहे, असा भक्त वर्षातून एकदा तरी सौंदत्तीच्या डोंगरावर जातो. कोल्हापूरच्या शहरी भागातून ‘रांडाव पौर्णिमे’ला, तर ग्रामीण भागातून पोळ्यांच्या पौर्णिमेला भक्त यात्रेस जातात. कोल्हापूरमध्ये रेणुकाभक्त संघटना रजिस्टर्ड झाल्या आहेत. संघटनेचे सभासद वर्षातून एकदा एसटीने भाविकांना सौंदतीला नेतात. प्रत्येक जण पन्नास जणांना यात्रा घडवतो. काही जण एकापेक्षा जास्त गाड्यांचे प्रमुख असतात. वाहतूक व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. एसटी महामंडळाच्या शेकडो गाड्या रिझर्व्ह केल्या जातात. त्याशिवाय टेम्पो, ट्रॅक्स, दुचाकी, रिक्षा इत्यादी वेगळ्याच. काहीजण कर्नाटक एसटी आरक्षित करतात, तर काही भाविक तिकीट काढून जातात. संघटनेतर्फे यात्रेत जाण्यासाठी गाडीप्रमुखाकडे भाविक हजार रुपये जमा करतो. त्यामध्ये प्रवास खर्च, दोन-तीन दिवसांचे जेवण, नाश्ता, चहा आणि लिंब नेसण्याच्या खर्चाचा समावेश असून इतर खर्च वैयक्तिक केला जातो.
ग्रामीण भागातील वर्गणी गाववार बदलते. एक कुटुंब वर्षाला चार-पाच हजार रुपये यात्रेवर खर्च करते. रेणुकाभक्तांसाठी कोल्हापूरचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती घटप्रभा येथे ‘महाप्रसाद’ (एक वेळचे जेवण) देतात. भाविकाच्या घरी जागरण घालून व जोगवा मागून जोगतिणीचे पोट भरते. जोगवा मागण्याची गरज मात्र कमी झालेली दिसते. यात्रा घडवणारे गाडीप्रमुख भाविकांच्या पैशांवर देवीची सेवा करतात. यात्रेच्या काळात एसटीचे उत्पन्न करोडो रुपये असते. वर्षातून एकदा भाविकांना मित्र, नातेवाईकांबरोबर सहलीचा आनंद लुटता येतो. जीवनातल्या समस्या देवीच्या डोक्यावर थापून निवांत होता येते. सर्वजण एकासुरात म्हणतात, ‘उदो गं आई…’
सारांश
‘यल्लमा’ ही आदिम काळातील अनार्य देवता आहे. ती वेदपूर्व कालातील आहे. देवीच्या प्रथा-परंपरा, नैवेद्य, पूजा पद्धती, या सर्व बाबी अनार्य संस्कृतीशी जुळतात; आर्य वैदिक संस्कृतीशी जुळत नाहीत. नंतरच्या काळात यल्लमाला रेणुकेच्या पौराणिक कथेशी जोडून ब्राह्मणीकरणाचा प्रयत्न झाला आहे. तो बाजूला ठेवून तिला मूळ स्वरुपात आणावे, अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट कराव्यात. यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न नेतृत्वाने करावा.
अपेक्षा :
आता शिक्षणाचा प्रसार बर्यापैकी झाला आहे. नव्यानव्या शोधांनी मानवी क्षमता वाढत आहेत. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली ।
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. पण शिक्षण म्हणजे साक्षरता काय? त्याचे रूपांतर विद्येत करायचे, तर मती जागृत झाली पाहिजे. मती म्हणजे बुद्धी. विचार करण्याची क्षमता, चांगले-वाईट ओळखण्याची कुवत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस, विवेकवाद.
आजच्या शिक्षणाने मती जागृतीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. आपण त्या वाटेने जाणार काय? हे ठरवायला हवे. यल्लमाभक्त सूज्ञ आहेत, संघटित आहेत. त्यांना काही गोष्टी करणे शक्य आहे. जोगती – जोगतिणी यांची फॅक्टरी त्वरित बंद केली पाहिजे. आजही ती सुरू असल्याचे बोलले जाते. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. यात्रेमागील दहशत संपवून निर्भेळ आनंद शिल्लक ठेवला पाहिजे. भाविकांच्या मती जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजासाठी जत्रा, यात्रा, उत्सव, कर्मकांडे यांची गरज असते. त्यामधील अंधश्रद्धा संपवल्या, हानिकारकता नष्ट केली की, निर्भेळ आनंद मिळेल. यल्लमा म्हणजे सर्वांची आई, हे खर्या अर्थाने सत्यात उतरेल.
मग म्हणूया …
“उदो गं आई उदो उदो.” “उदो गं आई उदो उदो.”
