हर्षद ओक -
आपल्याला एआय वापरायचे आहे, पण ‘पॅसेंजर’ म्हणून नाही, तर ‘पायलट’ म्हणून! माहिती गोळा करणे आणि पॅटर्न शोधणे ही कामे एआयला करू द्या. पण ‘निर्णय घेण्याचे’ काम मात्र स्वतःकडे ठेवा.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ‘प्रश्न विचारणारा समाज’ घडवायचा होता. एआय आपल्याला हवी ती उत्तरे देईल, पण “योग्य प्रश्न कोणते विचारायचे?” हे शहाणपण माणसाकडेच आहे. आपल्या हातात विवेकाची ढाल आणि डोळ्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाची नजर असेल, तर या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन आपण नकीच एका प्रगत भविष्याकडे झेप घेऊ शकतो!
काही दिवसांपूर्वी पुण्यात ‘अंनिस’च्या एका कार्यक्रमात मला ‘एआय’ (AI) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. या भाषणाची तयारी करताना मला डॉ. दाभोलकरांबरोबरच्या एका जुन्या संवादाची आठवण झाली.
डॉक्टरांच्या हत्येच्या काही वर्षे आधीची गोष्ट. मी वैज्ञानिक दृष्टिकोनावर इंग्रजीत एक भाषण दिले होते. त्यांनी माझ्या भाषणाचे रेकॉर्डिंग पूर्ण पाहिले आणि म्हणाले, “हर्षद, तात्त्विक मांडणीला अजून जिवंत उदाहरणांची जोड देत जा. आपले कार्यकर्ते चमत्काराचे प्रयोग का करतात? कारण, त्यामुळे लोकांचे कुतूहल जागे होते आणि मग विचार पोहोचवणे सोपे जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगशाळेत न राहता रोजच्या जगण्याशी जोडला गेला पाहिजे.” आजच्या ‘एआय’ युगात हा सल्ला किती मोलाचा आहे!
आज आपल्या मोबाईलमध्ये आलेले एआय हे असेच एक जादुई तंत्रज्ञान आहे. पूर्वी आपण बाबा-बुवांच्या चमत्काराला भुललो, आता आपण सॉफ्टवेअरला भुलतोय. हे समजण्यासाठी आपल्याला थोडे तांत्रिक तपशिलात शिरून बघावे लागेल. मी त्या संकल्पना सोप्या करून मांडायचा प्रयत्न केला आहे.
बिबट्या आणि लहान मुलाची गोष्ट
सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. समजा, तुम्हाला तुमच्या लहान मुलाला ‘बिबट्यापासून सावध कसे राहायचे’ हे शिकवायचे आहे. याचे दोन मार्ग आहेत.
१. जुना मार्ग : तुम्ही मुलाला नियम सांगणार, “बाळा, ज्याला चार पाय, पिवळा रंग आणि काळे ठिपके असतात तो बिबट्या.” पण गवतात लपलेल्या बिबट्याचे फक्त दोन पाय दिसले तर मुलाचा गोंधळ उडेल. जुने सॉफ्टवेअर असेच नियमांवर चालत होते.
२. एआयची पद्धत : इथे आपण मुलाला नियम सांगत नाही, तर बिबट्याचे शेकडो फोटो आणि व्हिडिओ दाखवतो. त्याला ‘व्याकरण’ माहीत नसते, पण ‘पॅटर्न’ समजतो. आता गवतात फक्त शेपटीची हालचाल दिसली तरी ते पोर ओरडणार, “बिबट्या!”
खरं तर, निसर्गाने माणसाला शिकण्याची हीच पद्धत दिली आहे. लहान मूल आपली मातृभाषा कशी शिकते? त्याला आपण आधी ‘व्याकरणाची पुस्तके’ वाचायला देतो का? नाही. ते फक्त आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकते, निरीक्षण करते आणि त्यातून भाषा शिकते. एआय आता मानवी मेंदूच्या याच नैसर्गिक पद्धतीचे अनुकरण करत आहे.
लग्नातली बैठक आणि शब्दांचे नाते
एआयला माणसासारखे लिहिता-बोलता येते, पण त्याला शब्दांचा अर्थ कळत नाही. त्याला फक्त शब्दांची ‘सोबत’ कळते.
आपल्याकडच्या लग्नातल्या बैठक व्यवस्थेचे उदाहरण घ्या. तिथे कोणाला कुठे बसायचे याचे नियम नसतात, पण तरीही एक नैसर्गिक शिस्त असते. विचाराने जवळचे लोक, मित्रमंडळी किंवा गप्पा मारणार्या आयाबायांचे गट एकत्र बसतात. एआय शब्दांनाही तसेच बैठकीत बसवते. ‘राजा’च्या शेजारी ‘राणी’, तर ‘बॅट’च्या शेजारी ‘बॉल’ बसतो. त्यामुळे ‘नरेंद्र’ शब्दाच्या शेजारी अनेकदा ‘मोदी’ येतात. पण जर विषय ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ असेल, तर एआयला कळते की, या बैठकीत संदर्भ वेगळा आहे, तिथे ‘नरेंद्र’ शब्दानंतर ‘दाभोलकर’ असायला हवेत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची सत्त्वपरीक्षा : ६ मोठे धोके
हे तंत्रज्ञान प्रभावी आहे, पण ‘डिजिटल बाबा’च्या भजनी लागण्याआधी या ६ गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे :
१. नवी अंधश्रद्धा : आपल्या चळवळीचा गाभा आहे की कोणीही व्यक्ती किंवा ग्रंथ अंतिम सत्य नसतो. एआयच्या बाबतीत हे समजून घेणे गरजेचे आहे की, गणिते, कोडिंग किंवा माहितीच्या बाबतीत एआय लवकरच १०० टके अचूक होईल. पण खरा धोका ‘व्यक्तिनिष्ठ’ विषयांत आहे. मानवी नातेसंबंध, नैतिकता किंवा सामाजिक पेच यांवर ‘एकच एक’ उत्तर नसते. तिथे एआयच्या सल्ल्यावर आंधळा विश्वास ठेवणे ही नवी अंधश्रद्धा ठरेल.
२. आत्मविश्वासाने केलेली दिशाभूल : एआयला ‘सत्य’ आणि ‘असत्य’ यातील फरक कळत नाही. अनेकदा माहिती उपलब्ध नसली, तरी ‘वाक्य पूर्ण करण्यासाठी’ ते संभाव्य शब्द जोडून एक उत्तर तयार करते. हे उत्तर चुकीचे असले, तरी त्याची मांडणी इतकी व्याकरणशुद्ध आणि आत्मविश्वासाने भरलेली असते की आपली फसवणूक होते. तांत्रिक भाषेत याला ‘हॅल्युसिनेशन’ म्हणतात.
३. ब्लॅक बॉक्स : विज्ञानात ‘कार्यकारणभाव’ महत्त्वाचा असतो. पण एआयने अमुक उत्तर ‘का’ दिले, हे अनेकदा ते बनवणार्या इंजिनिअर्सनाही सांगता येत नाही. याचे कारण, एआय हे अब्जावधी गणिती दुव्यांचे एक महाकाय जाळे असते. कोणत्या शब्दाचा संबंध कशाशी लावायचा, हे एआय स्वतः ठरवते. ही आकडेमोड इतकी अवाढव्य आणि गुंतागुंतीची असते की, उत्तरामागील नकी तर्क शोधणे बर्याचवेळा माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते. यावर एकच मार्ग आहे, ‘पडताळणी.’ महत्त्वाच्या निर्णयांसाठी एआयने दिलेल्या माहितीची विश्वसनीय स्रोतांकडून पुनर्तपासणी करण्याची सवय ठेवा.
४. पूर्वग्रह : एआय माणसाने निर्माण केलेल्या पूर्वीच्या माहितीवरून शिकले आहे. त्यामुळे समाजातील धर्म भेद, जातीय भेद, जुनाट समजुती आणि पूर्वग्रह जसेच्या तसे एआयच्या उत्तरात येऊ शकतात. एआय हा समाजाचा आरसा आहे. जर तुम्ही एआयला “एका डॉक्टरचे आणि नर्सचे चित्र काढ” असे सांगितले, तर ९०% वेळा ते डॉक्टर म्हणून ‘पुरुषाचे’ आणि नर्स म्हणून ‘स्त्रीचे’ चित्र दाखवते. का? कारण इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अब्जावधी फोटोंमध्ये आणि लेखांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे. आपण भविष्यातल्या ‘समानते’च्या गप्पा मारतो, पण एआय मात्र भूतकाळातली ही ‘विषमता’ शिकून बसले आहे.
येथे अंनिसच्या कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे. जर एआय हा आरसा असेल आणि तुमच्या मनात व प्रश्नात पूर्वग्रह असतील, तर एआय ते पूर्वग्रह अधिक गडद करून तुम्हाला परत करते. आपण दुसर्यांच्या अंधश्रद्धेवर आक्षेप घेतो, पण आपल्या राजकीय, धार्मिक आणि जातीय पूर्वग्रहांच्या ‘अंधश्रद्धेचे’ काय? एआयचा वापर करून आपण स्वतःच्याच दांभिकतेवर बोट ठेवू शकतो का? “मी जो प्रश्न एआयला विचारतोय, तो सत्याच्या शोधासाठी आहे की फक्त माझ्या जुन्या मतांना पुष्टी मिळण्यासाठी?” हा प्रश्न आता एआय वापरताना स्वतःला विचारावा लागणार आहे.
५. वैचारिक कुपोषण आणि वाढती दरी : सोशल मीडिया आणि स्वस्त डेटाच्या क्रांतीने आपल्याला एक धडा शिकवला आहे. समाजातल्या एका जागृत वर्गाने याचा वापर ‘साधन’ म्हणून केला आणि ते प्रगतीपथावर गेले. पण दुर्दैवाने, समाजातील एक मोठा वर्ग या जाळ्यात नकळत अडकला आणि केवळ ‘उपभोता’ बनून राहिला. त्यांचा अमूल्य वेळ आणि पैसा स्क्रीनवर खर्ची पडला. एआयच्या युगात ही दरी अधिक रुंदावण्याचा धोका आहे. जर आपण विवेकाचा वापर केला नाही, तर ही केवळ आर्थिक नाही, तर ‘बौद्धिक विषमता’ नर्माण करणारी लाट ठरेल.
६. नुसते ‘वापरकर्ते’ की ‘जबाबदार नागरिक?’
एआयच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रुग्णाचा जीव गेला किंवा पूल पडला, तर आपण सॉफ्टवेअरला तुरुंगात टाकू शकत नाही. त्यामुळे भविष्यात ‘कष्टाचे काम’ यंत्र करेल, पण त्या कामाची ‘नैतिक जबाबदारी’ स्वीकारणे आणि ‘शहाणपणाने’ निर्णय घेणे, हे माणसाचे मुख्य काम असेल. पण इथे एक गंभीर प्रश्न उभा राहतो. एआयमुळे ज्ञानाची आणि नवनिर्मितीची अफाट ताकद आता प्रत्येकाच्या खिशात आली आहे. ही प्रचंड शक्ती पेलण्यासाठी लागणारी ‘वैचारिक प्रगल्भता’ आपल्याकडे आली आहे का?
विकासाची संधी आणि वास्तवाचा आरसा
वरचे धोके खरे असले, तरी त्यांना भिऊन कोपर्यात बसणे आपल्याला परवडणारे नाही. भारतासाठी ही विकासाची मोठी झेप घेण्याची सुवर्णसंधी आहे. पण वास्तव थोडे चिंताजनक आहे. मायक्रोसॉफ्टच्या जानेवारीत प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, प्रगत देशांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक (सिंगापूरमध्ये तर ६०%) लोक एआय वापरत आहेत. त्या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ १५.७ टके आहे. जग वेगाने पुढे जात असताना आपण मागे राहून चालणार नाही. विवेकी असणे म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे नव्हे, तर डोळसपणे त्याचा स्वीकार करणे आहे.
लाटेवर स्वार व्हा…
जेव्हा वाफेचे इंजीन आले किंवा संगणक आले, तेव्हाही “यंत्रामुळे माणसाचे काम जाईल” अशी भीती होती, पण आपण त्यातूनच प्रगती केली. आता एआयमुळे मेंदूची कष्टाची कामे यंत्राकडे जातील.
आपल्याला एआय वापरायचे आहे, पण ‘पॅसेंजर’ म्हणून नाही, तर ‘पायलट’ म्हणून! माहिती गोळा करणे आणि पॅटर्न शोधणे ही कामे एआयला करू द्या. पण ‘निर्णय घेण्याचे’ काम मात्र स्वतःकडे ठेवा.
डॉ. दाभोलकरांना ‘प्रश्न विचारणारा समाज’ घडवायचा होता. एआय आपल्याला हवी ती उत्तरे देईल, पण “योग्य प्रश्न कोणते विचारायचे?” हे शहाणपण माणसाकडेच आहे. आपल्या हातात विवेकाची ढाल आणि डोळ्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाची नजर असेल, तर या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन आपण नकीच एका प्रगत भविष्याकडे झेप घेऊ शकतो!
– हर्षद ओक, पुणे
लेखक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि अंनिस कार्यकर्ते आहेत.
(harshad+anis@HarshadOak.com)
