के. डी. खुर्द : पर्यावरणपूरक उपक्रमांचे अग्रदूत

अनिल चव्हाण -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. डी. खुर्द अर्थात काशिनाथ दत्तात्रय खुर्द यांचे नुकतेच दिनांक १९ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९३४ रोजी मलकापूर, ता. शाहूवाडी येथे झाला.

ते सुरुवातीला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीवर रुजू झाले आणि पुढे शिक्षण विस्तार अधिकारी बनले. शाळा तपासणी हे त्यांचे प्रमुख काम; त्यामुळे शाळेत आणि गावात त्यांना खूप मान असे! शाळा तपासायची म्हणजे मुलांनी पाढे पाठ केले का? त्यांना लेखन वाचन येते का? हे तपासून शिक्षकांना सूचना द्यायच्या; शेरा मारायचा, हे आपल्याला ठाऊक आहे. पण हे शाळा तपासणी अधिकारी वेगळेच होते! ते वर्गात बसलेल्या मुलांची माहिती घेत. कोणत्या थरातून मुले आली आहेत, त्यांचे आईबाप काय करतात, ती कशी जगतात? याची माहिती घेत! त्यातून त्यांच्या लक्षात येत असे की, यातील काही मुले पालावर राहतात, काही झोपडीत राहात आहेत, काही समाजात दलित म्हणून मानली जाणारी आहेत! खुर्द शिक्षकांना सूचना देत, ‘ह्या मुलांनी काही शिकावे वा न शिकावे; पण त्यांना शाळेची गोडी लावणे हे तुमचे काम! एकदा शाळेची गोडी लागली की पुढे त्यांचे शिक्षण सुरू होईल!’

त्यानंतर ते माहिती घेत. या शाळेत डोक्यात जटा आलेल्या मुली कोण आहेत?

त्या काळी खेड्यापाड्यांतून मुलींच्या केसात जटा होण्याचे प्रमाण मोठे होते. त्या विरोधात जटा निर्मूलनाचा उपक्रम गडहिंग्लजमध्ये विठ्ठल बन्ने यांनी सुरू केला होता. त्याला कोल्हापूर शहरातून सुमन पाटील, सुशीला यादव, उमा पानसरे, अनिल चव्हाण, उमाकांत चव्हाण, श्रीकांत साळुंखे, बी. एल. बर्गे अशा कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला होता. कोल्हापुरातील अरगडे डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये जटा निर्मूलन करत.

केसात जट आली की त्या मुलीच्या घरी देवदासी- जोगतिणी फेर्‍या मारत . त्या मुलीला देवीला सोडले जाई! पुढे तिचे आयुष्य म्हणजे नरक यातना! तिला इतरांप्रमाणे लग्न करून संसार करता येत नसे! आयुष्यभर देवीची सेवा करायची! ‘अकुंदी जोगवा’ म्हणत भीक मागायची आणि गावातील धनदांडग्यांची किंवा गुंडांची शिकार व्हायचे.

शाळा तपासणी अधिकारी असलेले के. डी. खुर्द, त्यांचे सहकारी चौगुले, एस. एस. वाघ ही मंडळी शाळांमधून जाऊन डोक्यात जट आलेल्या मुलींचे जटा निर्मूलन करत असत. केसात जट होऊ नये म्हणून त्यांनी एक नामी उपाय शोधला. तो म्हणजे मुलींचा बॉबकट करणे. मुलींचे केस मानेपर्यंत कापत. त्यामुळे केसात गुंता होण्याचा आणि जटा होण्याचा प्रकार थांबला.

के. डी. खुर्द सेवानिवृत्त झाले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरच्या शाखेकडे आकर्षित झाले. १९९२ साली कोल्हापुरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरची स्थापना झाली होती. त्यामध्ये विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर हे अध्यक्ष आणि मी (अनिल चव्हाण-त्या शाळेतील शिक्षक), सचिव म्हणून काम पाहात होतो. शाळेतील शिक्षक हेच आमचे कार्यकर्ते! पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जिल्ह्यात वाढले. के.डी. खुर्द या कामात सहभागी झाल्यावर वर्षभरातच त्यांची निवड उपाध्यक्ष म्हणून झाली. या काळात कोल्हापुरात ‘निर्माल्य टाकू नका’ अशी मोहीम सुरू झाली.

कोल्हापूर हे तळ्यांचे शहर होते. पण लोकसंख्या वाढली तशी तळी मुजवून त्यावरती इमारती बांधण्यात आल्या. कोल्हापुरात रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव आणि शहराच्या एका कडेला असलेला कळंबा गावचा कळंबा तलाव, एवढेच तलाव शिल्लक राहिले. १९९० नंतर या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात वस्ती वाढू लागली. या भागातले सांडपाणी तलावात येऊ लागले, तलावाचे प्रदूषण वाढू लागले. तलावात केंदाळ नावाची वनस्पती वाढली. कोल्हापूरकर जागे झाले, त्यांनी प्रदूषणाची कारणे शोधली. एक होते सांडपाणी, दुसरे पाण्यात टाकला जाणारा कचरा आणि तिसरे सण-समारंभात तयार झालेले देवाचे निर्माल्य. गौरी-गणपतीचे निर्माल्य पाण्यात टाकले जाई! त्याने पाण्याचा पृष्ठभाग निर्माल्याखाली झाकला जाई. चार दिवसांनी निर्माल्य कुजून परिसरात घाण वास सुटत असे.

अंनिसने ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका’ अशी मोहीम घेण्याचा ठराव केला. शाळांना आवाहन केले. तेव्हा अनेक शाळांनी ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका, पाणी प्रदूषण टाळा’ अशा घोषणा देत प्रचार फेर्‍या काढल्या.

रंकाळा तलाव आणि पंचगंगेच्या काठी निर्माल्याचे ढीग लागले. रंकाळ्याच्या काठावर असलेल्या राजे संभाजी तरुण मंडळाने, पाण्याची काहील ठेवून निर्माल्य विसर्जित करण्याची सोय केली. यामध्ये दोन-चार लोक गणेशमूर्ती विसर्जित करू लागले. विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कळंबा तलावाच्या काठावर निर्माल्य पाण्यात टाकू नका, अशी प्रचार फेरी काढली. त्यामध्ये गावचे सरपंच, पंच, नागरिक आणि त्या परिसरातील शिवशक्ती हायस्कूल आणि कळंबा गर्ल हायस्कूल सामील झाले. याचे पुढारीपण कळंब्याचे सरपंच महादेव खानविलकर यांनी केले. याचा परिणाम म्हणून कळंबा तलावाच्या काठी निर्माल्याबरोबर ५०० गणेशमूर्तीही पाण्यातून बाहेर ठेवण्यात आल्या. याचे श्रेय कळंबा गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींना आहे. कळंब्याच्या काठी मिळालेले यश पाहिल्यावर पुढच्या वर्षी पंचगंगेच्या काठी निर्माल्याबरोबर विसर्जित मूर्ती दान करा ही मोहीम राबवण्यात आली. शाळांनी प्रचार फेर्‍या काढल्या, शिक्षणाधिकारी महापालिका आयुक्त, महापौर इत्यादींनी पत्रके काढली. या सर्वांचा सहभाग घेण्यासाठी के. डी. खुर्द यांनी खूप प्रयत्न केले.

२००० सालाच्या सुमारास ईश्वराचे राज्य आणू म्हणणार्‍या भोंदू धर्मांध संघटनेने या उपक्रमांना विरोध सुरू केला. पहिल्या वर्षी ३००० मूर्तिदान मिळाल्या होत्या. त्यांची संख्या एकदम दीडशेवर आली. या धार्मिक दहशतीला तोंड देऊन कार्यकर्ते पंचगंगेच्या काठावर मूर्तिदान चळवळ शांतपणे राबवू लागले. त्याचे नेतृत्व के. डी. खुर्द यांच्याकडे असे.

पुढे ही चळवळ शासनमान्य झाली मगच अंनिसने त्यातून अंग काढून घेतले. याबरोबरच कोल्हापुरात ‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा’, ‘फटाके नको पुस्तके घ्या!’, ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, शेणी दान करा’ अशा मोहिमा प्रबोधनाच्या पातळीवर राबवण्यात आल्या. काही शाळांनी त्या प्रत्यक्षातही राबवल्या. वृत्तपत्रांमध्ये विविध सदरे असतात त्यापैकी एक वाचकांचे पत्रव्यवहार. वा. प. ला संपादकीयच्या महत्त्वाच्या पानावर जागा दिलेली असते. पण हे सदर दुर्लक्षित आहे.

के. डी. खुर्द आणि आपले पुरोगामी चिंतन या सदरामधून मांडले. विषय निवडल्यानंतर ते पत्र लिहीत आणि कुटुंबीय, कार्यकर्ते आणि कधी पानसरे, दाभोळकर अशा नेत्यांना सुद्धा वाचून दाखवत! त्यात चार-पाच वेळा सुधारणा करत. मगच ते वृत्तपत्राकडे पोचवले जाई.

नावातील वेगळेपणामुळे ते सर्वांच्या लक्षात राहतात असे ते स्वतः सांगत. के.डी. खुर्द प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असले तरी ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले होते. अनेक वर्षे पक्षाच्या शहर कौन्सिलवर त्यांची निवड होत होती. पण ते कॉम्रेड म्हणून प्रसिद्ध झाले नाहीत. कारण पक्षाकडे येण्यापूर्वीच ते त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले होते.

दाभोळकर आणि पानसरे या दोघांशीही त्यांचा निकटचा संबंध होता. दोघांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर वसत असे. संघटना आणि समाजातील घडामोडींविषयी त्यांची नेहमी चर्चा चाले. १९८८ साली आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला गेला. १९९९ साली अंबाबाई मंदिराच्या गाभारात महिलांना प्रवेशासाठी साखळी उपोषण केले. शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशासाठी आंदोलनात सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना अटक झाली होती. १९९८ मध्ये फादर ऑगस्ट टीम या ख्रिस्ती धर्मगुरूच्या ‘आंधळे पाहू लागतील लंगडे धावू लागतील’ या दाव्याच्या विरोधात निदर्शने केली.‘नाणीज’च्या नरेंद्र महाराज विरोधातल्या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांना ‘नरेंद्र लीलामृत’ मधून केलेले अवैज्ञानिक दावे सिद्ध करण्याचे आव्हान दिले.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणार्‍या जोडप्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत केली. “शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे”, असे मानून परिवर्तनाच्या सर्व कामात विद्यार्थी, शिक्षक आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांना जोडून घेऊन काम करत राहिले. ‘सावित्रीबाईंचा संघर्ष’ ही पुस्तिका लिहिली. तसेच ‘जादूटोणाविरोधी कायदा आहे तरी काय?’ या पुस्तकाचे संपादन केले. ‘विसर्जित गणपती दान करा’ हा उपक्रम कसा राबवावा याबाबतची एक मार्गदर्शक पुस्तिका लिहिली.

२०११ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. लहान-थोर दोघांशी त्यांची मैत्री जुळत असे. प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक नियोजन करून करण्यावर त्यांचा भर असे. मीटिंगमध्ये किंवा अधिकार्‍यांना भेटायला गेल्यावर ते कोणतीही अनावश्यक चर्चा करत नसत. ते अत्यंत कुटुंबवत्सल होते. कुटुंबातील प्रत्येक घटकाला ते समजून घेत आणि चर्चेसाठी लोकशाही पद्धत वापरत. असेच संबंध त्यांचे कार्यकर्त्यांशी सुद्धा होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यांच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत!

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]