-

विज्ञानाचे तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान समाजापर्यंत नेणारी संघटना
पश्चिम बंगाल विज्ञान मंच या संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटून संघटनेची माहिती घेण्याची उत्सुकता ही साहजिकच होती. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहीद दिनी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करणेबाबत महत्त्वाची भूमिका यांनीच घेतली होती. पश्चिम बंगाल विज्ञान मंच ही देशातील सर्वांत मोठी विज्ञान प्रसार करणारी संघटना आहे. तसेच All India Peoples Science Network (AIPSN) ची एक सहभागी संघटना आहे. पश्चिम बंगाल विज्ञान मंचचे सहसचिव आणि AIPSN च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. अरुण बो कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या विद्यासागर कॉलेजमध्ये रसायन शास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आम्हाला कलकत्तामधील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीमध्ये भेटायला बोलावले. त्यांना यायला थोडा वेळ होता आणि ही आम्हाला संधी होती, एशियाटिक सोसायटी बघायची. ती आम्ही साधली आणि एका अप्रतिम अशा प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा ठेवा असणारी हजारो वर्षांपूर्वीची अमूल्य हस्तलिखिते, शिलालेख आणि कागदपत्रांचा खजिना पाहता आला. एशियाटिक सोसायटी ही जानेवारी १७८४ साली विल्यम जोन्स याने भारतीय प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी स्थापन केली. ही संस्था आता केंद्र सरकारच्या ताब्यात असून संस्थेच्या ग्रंथालयात जवळपास तीन लाख इतकी दुर्मीळ कागदपत्रे, पुस्तके, हस्तलिखिते इत्यादी आहेत. ही कागदपत्रे भारतीय तसेच जागतिक वेगवेगळ्या भाषेत आणि मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, कला, वास्तुकला, आयुर्वेद, इतिहास, वैद्यकशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाषा आणि साहित्य, पर्यावरण, तत्त्वज्ञान, धर्म, सामाजिक विज्ञान, प्रवास, भूगोल, लोककथा, चरित्र इ. विषयांवरही माहितीचा साठा आहे. तसेच एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयात चित्रे, हस्तलिखिते, शिल्पे, कांस्य, नाणी आणि शिलालेख यांचा मोठा संग्रह आहे. प्लास्टिक सर्जरी, पुराणात उडणारी विमाने आणि गोमूत्राने जगातील सर्व आजार बरा होण्याच्या काळामध्ये या ग्रंथालयाच्या निर्मितीबाबत इंग्रजांचे आभार जितके मानाल तितके कमीच आहे.

एशियाटिक सोसायटीची लायब्ररी व्यवस्थित बघून झाल्यानंतर प्रा. अरुण बो यांचा ते आले असल्याबाबत फोन आला आणि सोसायटीच्या एका लहानशा कॉन्फरन्स हॉलमध्ये आमची चर्चा रंगली. अरुण बो हे प्रोफेसर असल्याने आणि चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याने आम्ही त्यांना पहिला प्रश्न केला की,
पश्चिम बंगाल मधील विज्ञानवादी चळवळींचा इतिहास काय आहे?
या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रोफेसर अरुण बो म्हणाले की, १९५० ते १९७० च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये जनमानसावरील डाव्या विचारांच्या प्रभावामुळे विज्ञानवादी चळवळी जोरदार होत्या. गावोगावी छोटे छोटे सायन्स क्लब सुरू होत होते. त्यामध्ये मुख्यतः विज्ञानाचे लहान सहान प्रयोग करून विज्ञान लोकप्रिय करणार्या गोष्टी होत्या. परंतु विज्ञानाचे तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवा यासाठी सायन्स क्लबच्या खूपच मर्यादा होत्या. विज्ञान आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचा समाज त्याच्या गरजा म्हणून वापर करतोच, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर मात्र समाज दैनंदिन जीवनामध्ये करेलच याची खात्री नसते. म्हणून जानेवारी १९४८ साली पश्चिम बंगालमधील शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी बंगियो विज्ञान परिषदेची स्थापना केली आणि खर्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये या संघटनेच्या मार्फत सुरुवात झाली. सत्येंद्रनाथ बोस हे गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. पश्चिम बंगालमधील पद्मविभूषण मिळालेले आणि लंडनमधील प्रथितयश रॉयल सोसायटीचे सदस्य असलेले सत्येंद्रनाथ बोस हे एक अत्युच्च पातळीवरचे भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन सोबत मिळून बोस आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स डेव्हलप केलं होतं. या नियमानुसार जे कण वागतात त्यांना ‘बोसान’ असे आईन्स्टाईन आणि बोस यांच्या नावावरून त्या कणांचे नामकरण करण्यात आले आहे. बंगीय विज्ञान परिषदेच्या माध्यमातून ‘ज्ञान ओ विज्ञान पत्रिका’ नावाची पत्रिका त्यांनी चालवली. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बंगाली भाषेत लोकप्रिय करणे हा त्यांचा उद्देश होता. पुढे मेघनाथ साहा, प्रफुल्लचंद्र रॉय, जगदीशचंद्र बोस, इत्यादी पश्चिम बंगालमधील शास्त्रज्ञांचा खूप मोठा सहभाग वैज्ञानिक विचार पद्धती रुजवण्यामध्ये राहिला आहे. दैनंदिन घटनांचा अर्थ तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने लावण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार त्यांनी मातृभूमी भाषेत केलेला आहे. पश्चिम बंगालमधील या जीनियस असणार्या शास्त्रज्ञांनी विज्ञान लोकप्रिय करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची चळवळ केल्याने, भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा विज्ञानाची पश्चिम बंगालमधील चळवळ ही समृद्ध आहे. या सर्वांनी समाजमन वैज्ञानिक घडवण्यासाठी स्वतःची बुद्धिमत्ता आणि आयुष्य पणाला लावलेले आहे.
पश्चिम बंगाल विज्ञान मंच सारखे अनेक लहान-मोठे विज्ञान क्लब पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आले. १९८६ मध्ये या अनेक लहान मोठ्या विज्ञान चळवळी एकत्रित करून ‘पश्चिम बंगाल विज्ञान मंच’ची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे पश्चिम बंगाल विज्ञान मंचच्या स्थापनेची पार्श्वभूमी प्रा. अरुण बो यांनी आम्हाला सांगितली.

पश्चिम बंगाल विज्ञान मंच या आपल्या संघटनेबद्दल आम्हाला सांगाल का?
प्रा. अरुण बो म्हणाले की, सध्या पश्चिम बंगाल विज्ञान मंच ही भारतातील सर्वांत मोठी विज्ञान चळवळ आहे. पश्चिम बंगालमधील २२ जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार असून ३.४२ लाख इतकी सभासद संख्या आहे. या आकडेवारीबाबत मला थोडे आश्चर्य वाटल्यानंतर याबाबत त्यांना विचारले असता त्यांना मुद्दा लक्षात आला. तेव्हा ते हसत म्हणाले की, ही संख्या आमची सभासद संख्या आहे. प्रत्यक्षातली सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या इतकी नाही. साधारण ही रचना कम्युनिस्ट संघटनेसारखी आहे. संघटनेची सभासद वर्गणी विद्यार्थ्यांसाठी दोन रुपये आणि इतरांसाठी पाच रुपये आहे. ही सभासद वर्गणी जो भरेल तो आमचा सभासद होईल. यातील रकम महत्त्वाची नसून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विचार घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही पद्धत अवलंबलेली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा सभासद नोंदणीसाठी जो आग्रह असायचा तो कशासाठी? तो या ठिकाणी निश्चितच आठवला.
पश्चिम बंगाल विज्ञान मंचची उद्दिष्टे कोणती असे आम्ही विचारले असता प्रा अरुण बो म्हणाले की, उद्दिष्टे तर अनेक आहेत. परंतु या सगळ्यांचं सार म्हणून फक्त दोन उद्दिष्टे मी आपणास सांगतो. त्यातील पहिला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार करणे. आणि दुसरा आहे, विज्ञानाने निर्माण होणारे तंत्रज्ञान विकसित करून किंवा ते लोकांना विकसित करायला लावून त्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे. उदाहरणार्थ बिनधुराचा चुल्हा, गोबरगॅस इत्यादी. जेणेकरून माणसाच्या वैचारिक जडणघडणी बरोबरच त्यांच्या भौतिक गरजांबाबत त्यांना सजग करता येईल. या आमच्या उद्दिष्टांना सोबत घेऊन आम्ही विज्ञानाचे तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्हीही घेऊन घराघरात पोहचलो. लोकांच्या माध्यमातूनच आम्ही असा एक भात विकसित केलेला आहे जो अतिशय सुवासिक आणि पौष्टिक आहे. त्याचे आम्ही पेटंट देखील मिळवलेलं आहे.
संघटनेच्या स्थापनेच्या तीन वर्षांनंतरच संघटनेला भारत सरकारचा विज्ञान प्रचारासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. ज्याचा उल्लेख डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी करायचे आणि ज्या घटनेमुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बिजे रोवली गेली, ती घटना म्हणजे १९८५ साली बी. प्रेमानंद यांचा भारत विज्ञान जथा. पुढे या जथ्यामध्ये पश्चिम बंगाल विज्ञान मंचने आपले योगदानही दिलेले आहे.
अरुण बो यांच्या या संवादानंतर आम्ही त्यांच्या संघटनेच्या मुख्य कार्यालयास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आनंदाने आम्हाला कोलकात्याच्या फेमस ‘काल्या पिल्या’ टॅक्सीतून पश्चिम बंगाल विज्ञान मंचच्या कार्यालयात नेले. कोलकाता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय प्रशस्त असे त्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. तेथे चार पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. शंभरपेक्षा जास्त लोकांना कार्यक्रमासाठी बसता येईल इतका मोठा प्रशस्त हॉल आहे. चळवळीचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहचवण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु सर्वांत टिकाऊ मार्ग म्हणजे मासिके आणि पुस्तके. स्वतःचा प्रकाशन विभाग आहे. प्रकाशन विभागाकडून दीडशेपेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. दरवर्षी ते पाच लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री करीत असतात. कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर आम्हाला राज्यातील शाखांना पुस्तक विक्रीचे दिलेले टार्गेट आणि साध्य केलेले टार्गेट याचे आकडे दिसले. तसेच कार्यालयामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे बंगालीमध्ये असलेले सुंदर पोस्टर दिसले.
या कार्यालयातच आमची भेट या संघटनेचे राज्य सेक्रेटरी प्रदीप महापात्रा यांच्याशी झाली. महापात्रा सर हे शिक्षक असून गेली २५ वर्षे ते या विज्ञान संघटनेमध्ये क्रियाशील पणे काम करतात. संपूर्ण खादीचा पेहराव केलेले आणि मृदू भाषिक असलेल्या महापात्रा सरांनी आम्हाला त्यांचे संपूर्ण कार्यालय फिरून दाखवले. त्यांच्याशी गप्पा मारताना ते म्हणाले की, “आमच्या विज्ञान संघटनेने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निधनानंतर त्यांच्यावर ‘मृत्युंजोयी दाभोलकर’ या नावाने एक पुस्तिका बंगाली भाषेत काढून, संपूर्ण राज्यभर डॉ. दाभोलकरांचे विचार, संघटन, कार्य पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.”

राज्य सेक्रेटरी प्रदीप महापात्रा पुढे सांगू लागले की, आमच्या प्रकाशन विभागाकडून दोन द्विमासिके निघतात. एक सर्वांसाठी व एक खास किशारांसाठी. सर्वांसाठी निघणार्या द्विमासिकाचे नाव आहे, ‘जन विज्ञानने इस्तहार’ आणि किशोरां साठी निघणार्या मासिकाचे नाव आहे ‘जुगेर किशोर विज्ञानी’. त्याची वर्गणी अनुक्रमे रुपये १०० आणि रुपये १२५ आहे. या मासिकांची सभासद संख्या चोवीस हजार इतकी आहे.
विज्ञान प्रसाराच्या कार्यासोबत आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करता का असे आम्ही विचारल्यावर, प्रा. अरुण बो सांगू लागले की, अंधश्रद्धा या नेहमी विज्ञान विरोधीच असतात. त्यामुळे पश्चिम बंगाल विज्ञान मंचने या अंधश्रद्धां विरोधात दिलेल्या काही लढ्यांची माहिती मी तुम्हाला देतो. एक रंजक भुताच्या भांडाफोडीचा किस्सा मी तुम्हाला सांगतो…

पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यात बेगुन कोडोर रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन १९६० साली बनवले गेले आहे. १९६७ साली या रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तरने दावा केला की, एक पांढरी साडी नेसलेली स्त्री या स्टेशनवर दिसत आहे. काही दिवसांतच रेल्वेच्या वार्टर्समध्ये या स्टेशन मास्तरचा त्याच्या कुटुंबासह मृत्यू रहस्यमयरित्या झाला. आता सगळीकडे इतक्या जोरात अफवा पसरली की, या रेल्वे स्टेशनवर भुते राहतात. त्यांनी स्टेशन मास्तरचा बळी घेतला आहे. मग काय, या स्टेशनवर नोकरीसाठी कोणी कर्मचारी येईना. या स्टेशनवर उतरण्यासाठी कोणी इच्छुक नसत. या स्टेशनवरून चढण्यासाठी देखील कोणी इच्छुक नसत. अशाने हे रेल्वे स्टेशन ओस पडले. ज्या ज्या वेळी या रेल्वे स्टेशनवरून रेल्वे जात असे, त्या त्या वेळी प्रवाशांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण होत असे. अनेक जणांनी रेल्वेच्या सोबत पळत असलेल्या स्त्रियांना पाहण्याचा दावा केला. हे स्टेशन जवळ येतात सर्व प्रवासी दारे, खिडक्या बंद करत. ट्रेनचा ड्रायव्हर ट्रेनचा वेग वाढवत असे. प्रचंड भीतिदायक वातावरणामध्ये हे रेल्वे स्टेशन पार केले जात असे. ४२ वर्षांनंतर रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २००९ साली या रेल्वे स्टेशनवर गाडी थांबवण्यास सुरुवात केली. या रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबू लागली. लोक येऊ लागले, परंतु हा सर्व व्यवहार हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालत असे. संध्याकाळी पाचनंतर मात्र हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे ओस पडे. भुतांचे वास असलेले रेल्वे स्टेशन ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पश्चिम बंगाल विज्ञान मंचने २०१८ साली प्रत्यक्ष प्रयोग केला. प्रशासनाच्या मदतीने सीसीटीव्ही लावून कार्यकर्ते जाऊन संपूर्ण रात्रभर या रेल्वे स्टेशनवर राहिले आणि प्रसिद्धीमाध्यमातून लेख लिहून कुठल्याही भुताचा पुरावा नसल्याचे सिद्ध केले. भुते, आत्मा या अंधश्रद्धेला आधार नसलेबाबत आणि त्यामुळे काय नुकसान होते याबाबतचे प्रबोधन सातत्याने पश्चिम बंगाल विज्ञान मंच करीत असल्याचे प्रा. अरुण बो यांनी आम्हाला सांगितले.

कलकत्त्याच्या रहिवासी असणार्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करताना चमत्काराची अट घालण्याच्या पोपच्या भूमिकेबद्दलही आपल्या संघटनेने काही प्रतिक्रिया दिली का? असे विचारले असता प्रा. अरुण बो म्हणाले की, भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार विजेत्या, सेवाव्रती मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यासाठी दोन चमत्कार सिद्ध करण्याच्या अटी व्हॅटिकन चर्चने लावल्यानंतर ‘चांगल्या कामाच्या मूल्यमापनासाठी चमत्काराची अट कशाला?’ असा सवाल आम्ही केला होता. मदर तेरेसा यांनी भारतातील कामाची सुरुवात कलकत्त्यामध्ये ‘मिशनरी ऑफ चॅरिटी’ ही संस्था सुरू करून केले होते. त्यांचे कार्यक्षेत्र कलकत्ता हे राहिलेले होते. त्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक विज्ञानवादी चळवळींनी चमत्काराचा दावा सिद्ध करण्याच्या या प्रक्रियेला विरोध केला. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल विज्ञान मंचने देखील याबाबत भूमिका घेऊन याला विरोध केलेला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे, ‘आम्ही प्रत्यक्षात राजकारण करत नसू. परंतु मूल्य परिवर्तनाचे राजकारण निश्चितच करीत आहोत.’ समाजाचे, देशाचे अनेक प्रश्न हे थेटपणे राजकारणाशी निगडित असतात. राजकीय सत्ताधारी तुमच्या विचाराला कसा स्पेस देतात? असा काहीसा वेगळा प्रश्न आम्ही विचारला असता प्रा. अरुण बो म्हणाले की, राजकीय पातळीवरील पाठिंबा हा सुद्धा चळवळ वाढीसाठी आवश्यक असतो. पश्चिम बंगालमधील अनेक पुरोगामी चळवळींना डाव्या सत्ताधार्यांचा पाठिंबा होता. परंतु २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये विज्ञानवादी, पुरोगामी चळवळींचा स्पेस हा दिवसेंदिवस आखडतच चाललेला आहे. याबद्दलची खंत प्रा. अरुण बो व्यक्त करून परिवर्तनवादी चळवळींनी सध्याचे राजकारण समजून घेऊन त्यात परिवर्तन घडवून आणण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली.
चमत्कारांचा भांडाफोड, विज्ञान प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, पुस्तक विक्री, आकाश निरीक्षण इत्यादी कामांतून विज्ञानाचा प्रचार करणार्या या संघटनेला आम्ही त्यांची धर्माबद्दलची भूमिका काय आहे? हा मूळ प्रश्न विचारला. त्या वेळेला प्रा. अरुण बो यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक विचारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. ते त्यांच्या मार्गाने जातात, आम्ही आमच्या विज्ञानाच्या मार्गाने जातो.
सध्या आपल्या संघटनेचे कोणते काम सुरू आहे?
असे विचारले असता प्रा. अरुण बो म्हणाले की, ०७ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल विज्ञान मंच एक कॅम्पेनिंग घेत आहे. त्यामध्ये छद्म विज्ञान, विज्ञान विरोध, मिथक विरोध, भ्रामक दावे इ. बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे. हे कॅम्पेन देशभरातील हिंदी भाषिक आणि बिगर हिंदी भाषिक अशा राज्यांतून असेल. या कॅम्पेनचे घोषवाक्य असेल. ‘लोकशाहीसाठी विज्ञान-धर्मनिरपेक्षतेसाठी विज्ञान’. यामध्ये विज्ञान विरोधी, राज्यसंस्था, धर्म आणि मार्केट यांच्या अभद्र संबंधाचे जाळे उघडे पाडण्यावर भर असणार आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नवा जाहीरनामा तयार करण्याचे काम आपण करीत आहात असे समजते. याबाबत थोडक्यात माहिती द्याल का?
यावर अरुण बो सांगू लागले की, भारतीय राज्यघटनेमध्ये ५१ अ मध्ये नागरिकांचे कर्तव्य सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे कर्तव्य म्हणून सांगण्यात आलेले आहे. परंतु नागरिकांच्या कर्तव्याबरोबर राज्याचे कर्तव्य यात नमूद केलेले नाही. म्हणून ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कच्या वतीने डिसेंबर २०२४ रोजी नवीन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत. ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार अंगीकार करण्याची जशी नागरिकांची कर्तव्ये म्हणून सांगण्यात आलेली आहेत. तीच कर्तव्ये राज्यांना देखील लागू करण्यात यावी अशी आमची मुख्य मागणी असणार आहे.
पश्चिम बंगाल विज्ञान मंचच्या प्रा. अरुण बो यांच्या शेवटच्या वाक्याने आमचे मुलाखत संपली आणि ते वाक्य होते. “वैज्ञानिक विचार करणारी माणसं, ही जास्त मानवतावादी असतात!”
बंगालचा फेमस संदेशा मिठाई आणि दहीवडा याचा पाहुणचार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा निरोप घेतला.
मृत्यूंजोयी नरेंद्र दाभोलकर पुस्तिका…

पश्चिम बंगाल विज्ञान मंचने ऑगस्ट २०१८ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर बंगाली भाषेत पुस्तिका लिहून तिच्या २००० पेक्षा जास्त प्रतींचे वितरण पश्चिम बंगालमध्ये केले आहे. या पुस्तकामध्ये दाभोलकर यांच्या एका लेखाचा अनुवाद, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ध्येयधोरणाविषयक लेख, महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकरी समितीचे सदस्य आणि मानसपोचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांची मुलाखत इ. प्रसिद्ध केली आहे. तसेच बंगालीमध्ये बंगाली कवी अर्जुन आचार्य यांनी डॉ. दाभोलकर यांचेवर एक कविता केली आहे. त्याच्या शेवटच्या दोन ओळी अशा…
“हिला दिया आपने, सागर से हिमालया तक
आप तो चले गये, मगर एक नये युग की सुरुवात हो गई.”
हे सगळे ऐकत असताना मला शहीद ए आजम भगतसिंग आठवत राहिला. तो म्हणाला होता. “मरा हुआ भगतसिंग, जिंदा भगतसिंग से अधिक खतरनाक हो जायेगा! मेरा हर एक लहू का कतरा इन्कलाब लायेगा. मेरी हवा में रहेगी ख्याल की बिजली, ये मुश्त ए खाक है फानी रहे ना रहे.”