सलग 31 दिवस चाललेला कोल्हापूर जिल्ह्याचा अनुकरणीय उपक्रम

सुनील स्वामी - 9881590050

लोकभाषेत प्रबोधन करणार्‍या युवा वक्त्यांची गरज : साहित्यिक उत्तम कांबळे

शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी इचलकरंजी शाखेच्या वतीने दिनांक 20 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत सलग 31 दिवसांचे कोल्हापूर जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. याचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांच्या मार्मिक व बहारदार मांडणीने संपन्न झाला.

हे प्रशिक्षण शिबीर ऑनलाईन असल्यामुळे अनेक बारकाव्यांसह प्रशिक्षणाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सहभागी सर्वांकडून करण्यात आला. यामध्ये पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या चार सत्रांमध्ये वक्तृत्वाचे विविध पैलू, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याने भाषण करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय टाळावे, वक्तृत्वाची तयारी कशी करावी, त्यासाठी माहितीचे स्रोत कोणते आहेत इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि महेंद्र नाईक, आरती नाईक व देवदत्त कुंभार यांनी सखोल मांडणी केली.

दुसर्‍या टप्प्यात 31 जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शाखांतील अनुभवी वक्त्यांनी विविध विषयांची मांडणी केली. त्याची सुरुवात सुप्रसिद्ध साहित्यिका नीलम माणगावे यांच्या ‘विवेकी दृष्टिकोनातून माझे साहित्य’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. त्यानंतर किरण गवळी(कोल्हापूर), प्रा. सुभाष कोरे (गडहिंग्लज), संजय रेंदाळकर (इचलकरंजी), प्रा. पी. डी. पाटील (गडहिंग्लज), प्रा. मनोहर दिवटे(चंदगड), तुषार चोपडे(पन्हाळा), सीमा पाटील(कोल्हापूर), जयश्री हुक्केरी (नेसरी) या वक्त्यांनी ‘अंनिस’च्या कामाच्या विविध विषयांवर मांडणी केली.

तिसर्‍या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रशिक्षणार्थी असणार्‍या अठरा तरुणांनी खूप तयारीने आपापले विषय किमान 45 मिनिटांच्या कालावधीत मांडले. यासाठी विषय निवडीपासून चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांना मेंटर देण्यात आले. मेंटर म्हणून सुनील स्वामी, संजय रेंदाळकर, सुजाता म्हेत्रे आणि कृष्णात स्वाती यांनी काम पाहिले. विषयाची तयारी करण्यासाठी माहिती मिळवणे, त्याची टिपणे तयार करणे, मुद्द्यांचा क्रम लावणे, सलग मांडणी करणे, रंजकता आणणे, योग्य-अयोग्य शब्द आणि उदाहरणे यांवर चर्चा करणे आणि अंतिम मांडणी आधी पूर्ण डेमो घेणे, त्यावर चर्चेतून सुधारणा सुचवणे, अशा पद्धतीने त्यांनी युवांची तयारी करून घेतली. यामध्ये विभावरी नकाते, सौरभ पोवार, राजवैभव शोभा रामचंद्र आणि प्रवीण आंबले यांनी छान भूमिका बजावली. यामध्ये 1 ऑगस्टपासून 18 ऑगस्ट या कालावधीत विभावरी नकाते (‘अंनिस’ची पंचसूत्री), राजवैभव शोभा रामचंद्र (सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा), यश आंबोळे (अंधश्रद्धा निर्मूलक बसवविचार), मुक्ता निशांत (स्त्रिया आणि अंधश्रद्धा), कल्याणी आक्कोळे (संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन),भास्कर सुतार (फलज्योतिष – समज आणि वास्तव), सौरभ पोवार (व्यसनमुक्ती), हर्षल जाधव (रुढी-परंपरांची कालसुसंगत चिकित्सा), राजेश नगरकर (जातपंचायत आणि कौमार्य चाचणी), प्रवीण आंबले (शहीद-ए-आझम- भगतसिंह), विनायक होगाडे (न्यूमरॉलॉजी – विज्ञानाच्या कसोटीवर), हर्षदीप देशमुख (संविधानातील कर्तव्ये), दीपाली कांबळे (स्त्रिया आणि अंधश्रद्धा), रोहित दळवी (संविधानातील कर्तव्ये), स्वाती कृष्णात (लिंगभाव समजून घेताना), रेश्मा खाडे (‘जोविनि’ – पंचसूत्री), रुचिता पाटील (व्यसनमुक्ती), प्रथमेश ढवळे (‘अंनिस’चे पर्यावरणपूरक उपक्रम) या विषयांवर मांडणी केली. या युवांमध्ये अनेकजण पहिल्यांदाच एवढी दीर्घ मांडणी करत होते, त्यांची मांडणी ऐकणं हा खूपच आनंददायी अनुभव होता, अशा प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केल्या. हा अनुभव आयुष्यभर उपयोगी ठरेल असे नवोदित वक्त्यांनी नमूद केले.

या शिबिराचा समारोप डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाने झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात गाडगेबाबांच्या नंतर खंडित झालेली प्रबोधनाची प्रक्रिया डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रवाही केली. अंधारात अडकलेल्या समाजाला प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले.’

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या खुनामागील सूत्रधार शोधण्यात अजून शासन – प्रशासनाला यश आलेले नाही. तपास पुढे सरकत नाही, याबद्दल त्यांनी दुःख आणि निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी वक्तृत्वाच्या अनेक पैलूंवर त्यांच्या खुमासदार शैलीत अनेक अनुभव सांगत तरुणांना प्रेरणा दिली. चळवळीतील वक्तृत्व हे अर्थार्जनासाठी नसून समाजबदलासाठी आहे, याचे भान नवोदित वक्त्यांनी ठेवले पाहिजे, त्यासाठी समाजाची भाषा आत्मसात केली पाहिजे, समाजाचे दुःख, त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत आणि अनुभवातून स्वतःच स्वतःच्या वाटा शोधल्या पाहिजेत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

शिबीर समारोपप्रसंगी ’अंनिस’च्या राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे, प्रधान सचिव प्रशांत पोतदार, ‘अंनिवा’च्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर, राज्य पदाधिकारी प्रकाश भोईटे यांनी युवा वक्त्यांचे कौतुक केले आणि उपयुक्त सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, प्रधान सचिव सीमा पाटील, करंबळकर गुरुजी, दिलीप कांबळे आणि विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऑनलाईन उपस्थित होते. श्रोत्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. सौरभ पोवार यांनी स्वागत व विभावरी नकाते यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण आंबले यांनी आभार मानले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]