थोडी दारू घेणं चांगलं असतं?

डॉ. प्रसन्न दाभेालकर -

“सर दारू चांगली असते का?” अस्वस्थ ऋत्विकने प्रश्न केला.

देशमुख सर चमकले. त्याच्याकडे बघत त्यांनी विचारले, “ऋत्विक, काय झालं?”

ऋत्विक भराभर बोलू लागला, “सर काल आमच्या घरी मुंबईहून माझ्या वडिलांचे मित्र आले होते. ते म्हणत होते, ‘थोडी दारू घेणं चांगलं असतं,’ माझे बाबा म्हणाले, ‘मला नाही तसे वाटत.’ सर, खरं काय? थोडी दारू चांगली असते?”

आपल्या खुर्चीवर बसत सर म्हणाले, “आज ऋत्विकनं महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तो तुम्ही नीट ऐकला का? त्याने विचारले आहे, ‘थोडी दारू चांगली असते का?’ या प्रश्नातून काही सूचित होतं. कोण सांगू शकेल?”

वादपटू गार्गी म्हणाली, “याचा अर्थ असा की, जास्त दारू नक्की वाईट.”

“शाब्बास गार्गी” कौतुकाने सर म्हणाले. “जास्त दारू वाईट असते आणि दारूचे व्यसन वाईट असते यावर जगभर एकमत आहे. आज आपण ऋत्विकच्या प्रश्नावर विचारमंथन करू या. त्याआधी आपण दारूचे दुष्परिणाम थोडक्यात बघू. सांगा एकेक जण.”

“सर, दारूने लिव्हर म्हणजे यकृत खराब होते.” “उलट्या होतात, डोके दुखते.” “विषारी दारू प्यायलानं मरण येतं.” “दारू पिऊन माणसं बडबड आणि मारामार्‍या करतात.” “दारूनं मेंदू आणि आपल्या नसा खराब होतात.” “दारू पिऊन ड्रायव्हिंग केले तर शिक्षा होते.”

“छान माहिती सांगितलीत. अगदी थोडक्यात सांगायचं तर दारू किंवा तंबाखू, अफू, चरस अशा कोणत्याही पदार्थाने शरीरातील प्रत्येक पेशीवर वाईट परिणाम होऊ शकतो. माणूस व्यसन जेव्हढे जास्त करेल तेवढे त्याचे दुष्परिणाम जास्त. शिवाय या व्यसनांमुळे गंभीर असे मानसिक आजारही होऊ शकतात. किंबहुना व्यसन हाच जगातील एक मोठा मानसिक आजार आहे.”

सरांनी विचारले, “पण आजचा आपला प्रश्न आहे, थोडी दारू चांगली असते का? दारूचे चांगले गुण कुणाला माहीत आहेत?”

सारे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. शेवटी राजेश म्हणाला, “खोकल्याला ब्रँडी किंवा अशीच कुठली तरी दारू चांगली असते असं मी ऐकलं आहे.”

“दररोज थोडीशी वाईन घेतली तर हृदयाला चांगली असतं, असं मी वाचलं आहे.” अभ्यासू सुबुद्धीने सांगितले.

“झोप येण्यासाठी दारू घेतात.” “टेन्शन कमी होण्यासाठी.” “मजा म्हणून थोडी घेतात.” “काही लेखक आणि कलावंत घेतात म्हणे.” एक एक जण बोलू लागला. आम्हाला दारूबद्दल एवढी माहिती आहे हेच आम्हाला ठाऊक नव्हते.

“बरीच माहिती तुम्ही दिलीत.” असे म्हणून सर पुढे म्हणाले, “आता आपण या मुद्द्यांवर चर्चा करू या, अधिक माहिती मिळवू या. दारू जर औषध असेल तर औषधच्या दुकानात दारू मिळते का?”

“नाही, सर. दारूची दुकान वेगळी असतात.” चंचल विद्युत चटकन म्हणाला.

“बरोबर, औषधाच्या दुकानात दारू मिळत नाही, माझ्या लहानपणी काही खोकल्याच्या औषधांमध्ये आणि टॉनिक्समध्ये थोडी दारू असायची. दारू घातक असते म्हणून त्यांच्यावर बंदी आणली गेली.” सरांनी सांगितले. “मजा म्हणून कॉलेजमधील बरीच मुलं दारू घेतात. माझा दादा त्याच्या मित्राशी बोलत असताना मी ऐकलं.” सायली म्हणाली.

“दुर्दैवानं हे खरं आहे. मजा म्हणून सुरुवात केलेली गोष्ट पुढे व्यसनात केव्हा बदलते हे अनेक मुलांच्या लक्षात येत नाही.”

सरांनी पुढे विचारले, “दारू पिण्यासाठी वयाची अट आहे हे तुम्हाला माहित आहे का?” वर्ग गप्प बघून सर म्हणाले, “भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नियम आहेत. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये १८ ते २५ वर्षांपर्यंत वयाच्या माणसांना दारू प्यायला बंदी आहे. गुजरात, बिहार अशा राज्यांमध्ये तर दारूबंदी आहे. तरुण मुलांच्या मेंदूवर आणि मनावर अंमली पदार्थांचा जास्त वाईट परिणाम होतो.”

“हृदयासाठी थोडी वाईन चांगली असते असं तुमच्यापैकी कोणी ऐकलं आहे?” सरांनी विचारले.

वर्गातील काही मुलांमुलींचे हात वर झाले. “हाही एक गैरसमज आहे. हृदयालाही दारू वाईट हे आता सिद्ध झाले आहे.” मजा म्हणून, टेन्शन येते म्हणून जे दारू घेतात त्यांना तुम्ही काय सांगाल?” सरांनी वर्गाला प्रश्न केला.

“त्यांना कोण सांगायला जाणार? त्यांची मर्जी.” असीम म्हणाला.

“तुमच्यापेक्षा थोडी मोठी मुले मजा म्हणून अनेकदा दारू घ्यायला सुरुवात करतात, दारूमुळे व्यसन लागू शकते, त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो, याची त्यांना नीट कल्पनाच नसते. जेव्हा लक्षात येते तेव्हा अनेकदा नुकसान सुरू झाले असते. थोड्या प्रमाणात केलेले व्यसनही शरीराला आणि मनाला घातकच असते. वेळ बघून आपल्या मित्रांशी आपण याबाबत बोललं पहिजे.” सरांनी सांगितले.

“पण टेन्शनसाठी जे दारू घेतात त्यांचं काय? सर्वेशने विचारले.

“हे खरं आहे की, अमली पदार्थ घेतल्यावर सुरुवातीला माणसाला बरं वाटतं. टेन्शन गेल्यासारखं वाटतं. पण मला सांगा, व्यसन करून टेन्शन गेल्यासारखं वाटलं तरी टेन्शनच कारण दूर होणार आहे का? एखाद्या मुलाला अभ्यासाचे टेन्शन येतं. त्यामुळे त्यानं दारू प्यायला सुरुवात केली तर त्याचा अभ्यास चांगला होईल, का शिक्षणातलं त्याचे लक्ष उडेल? परीक्षेचं टेन्शन आलं म्हणून परीक्षाच्या आधी कोणी दारू घेऊन जातं का?” सर म्हणाले. सरांचे म्हणणे आमच्या लक्षात येत होते.

सरांनी आणखी समजावून सांगितले, “टेन्शनवर मात करण्याचा खरा मार्ग म्हणजे स्वप्रयत्नानं टेन्शनचं कारण दूर करायचं. व्यसन किंवा इतर मार्गानं टेन्शनपासून दूर पळून कदाचित तात्पुरते बरं वाटेल पण त्यामुळे परिस्थिती चिघळत जाते. तरुणांनी नीट शिकून आणि उत्तम प्रकृती ठेवून देशाला पुढं नेलं पाहिजे असं नाही का तुम्हाला वाटत?”

सर गंभीरपणे पुढे बोलू लागले, “तुमच्यापैकी अनेक जण कॉलेज शिक्षणासाठी बाहेरगावी जातील. तुम्हाला नवीन मित्र मिळतील. त्यांनी दारू पिण्याचा आग्रह केला तर तुम्ही काय करणार?”

“सर, मित्र जबरदस्ती करतात असं मी ऐकलं आहे. त्यांना नाही म्हटलं तर आपली मैत्री कशी राहील?” प्रांजलने सरळपणे विचारले.

“असाच विचार करून मित्रांच्या आग्रहाला बळी पडून अनेक मुलं पुढं व्यसनाच्या सापळ्यात अडकतात. सगळेच जरी व्यसनी झाले नाहीत तरी तरुणपणाचा बहुमूल्य काळ अशा आरोग्यविघातक गोष्टीत वाया जातो. अशा आग्रहाला आपण ठामपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे. मुळात जो आपल्याला व्यसन करण्याचा आग्रह करतो तो आपला मित्र कसा असू शकतो? असा मित्र नसलेलाच बरा.”

“सर पटतंय. पण आज समाजात दारूचं प्रस्थ वाढत चाललं आहे, असं माझे बाबा म्हणतात. मग एकट्या माणसामुळं काय होणार?” कल्पेशने काहीशा हताश सुरात विचारले.

“त्यामुळे निदान आपल्या स्वतःच्या आयुष्यात चांगला बदल घडेल. त्यामुळे आपले कुटुंबीय अधिक सुखी होतील. तुमची चांगली प्रगती होईल. तुमचे उदाहरण समोर असल्यामुळे तुमचे अनेक मित्रदेखील चांगल्या मार्गाला लागतील. कोणतीही चांगली गोष्ट कधीही वाया जात नाही.”

आता आजचा शेवटचा मुद्दा. व्यसनामुळे आपल्या समाजाचे काय नुकसान होते? सरांनी विचारले.

सर, दारूमुळे, अपघात वाढतात. भांडणे व मार्‍यामार्‍या होतात. दोन उत्तरे आली.

त्यात भर टाकीत सर म्हणाले, “बरोबर. याखेरीज कामावर परिणाम झाल्यामुळे देशाचेही नुकसान होते. कुटुंबासाठी खर्च करायचा पैसा आणि वेळ दारूत घालवल्याने घरातले स्वास्थ्य हरपते, मुलांवर वाईट परिणाम होतात. आजच्या या चर्चेतून आपण काय शिकायचे?

“सर आम्ही व्यसनापासून दूर राहू.” अनेक मुले एकदम म्हणाली.

“शाब्बास. शिक्षणानं आपल्याला समजलेल्या चांगल्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या नाहीत तर नुसत्या परीक्षेतल्या मार्कांचा काय उपयोग? दर ३१ डिसेंबरला आपल्या गावात व्यसनाच्या विरोधी काम करणार्‍या अनेक संघटना ‘दारू नको दूध प्या’ हा कार्यक्रम घेत असतात. त्याला आपण आपल्या घरच्यांबरोबर नक्की जाऊ शकतो. समाजात अनेक माणसं व्यसनाला नाही म्हणतात हे बघून आपला निर्धार वाढतो.” सरांनी शेवटचा मुद्दा मांडला.

“आम्ही नक्की जाऊ, सर.” सारा वर्ग एका आवाजात म्हणाला.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]