डॉ. ठकसेन गोराणे -
तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजवले,
विवेक आणि विज्ञानाचे दिले आम्हाला बळ
डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ !
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्मृती अभिवादन सभा 20 ऑगस्ट रोजी पार पडली. यामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या वैचारिक वारशाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे उपस्थित होते. ‘कोविड-19’च्या साथीमुळे ही अभिवादन सभा ‘ऑनलाईन’ घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी ‘मोकाटले मारेकरी, न्याय मागतो न्याय, दाभोलकर आणि पानसरे…’आणि इतर प्रबोधनपर गाण्यांचे विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे, विजय जाधव, अजय जाधव, योगेश कुदळे, अनन्या कांबळे, संजय रोकडे, अवधूत कांबळे, संजय बनसोडे यांनी सादरीकरण केले.
अभिवादन सभेतील त्यांच्या भाषणात ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या, डॉ. दाभोलकर हे दीपस्तंभासारखे आहेत. मी जेव्हा मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढले, तेव्हा प्रचारादरम्यान दिवसाढवळ्या समाजात झालेल्या या हत्यांचा निषेध केला होता. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात डॉ. दाभोलकर यांचा मोठा वाटा आहे. व्यक्ती जरी आपल्यातून गेली तरी तिचे विचार आपल्यातून गेलेले नसतात. त्यामुळे त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण हरतर्हेने प्रयत्न करायला पाहिजे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने आपण खडबडून जागे झालो. आपला समाज योग्य त्या वाटेवर जावा, यासाठी डॉ. दाभोलकर यांनी जीवनाचे बलिदान दिले. आपण सर्वांनी या चळवळीत हिरिरीने सहभाग घ्यायला हवा. सध्याच्या ‘कोविड-19’च्या काळात समाजाची दिशाभूल होईल, अशा अवैज्ञानिक कृती केल्या जात आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला घातक असे संदेश पसरवले जात आहेत. अवैज्ञानिक आणि चुकीची माहिती पसरवणार्यांना अटक झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करून आपण बुरसटलेल्या विचारांना त्यागले पाहिजे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या अभिवादनपर निवेदनात म्हणाले, डॉ. दाभोलकर यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. पण त्यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची दुसरी फळी प्रबोधनाचे हे कार्य अव्याहतपणे चालवीत आहे, हे दाभोलकरांनी मांडणी केलेल्या विज्ञानवादी विचारधारेचे यश आहे. दाभोलकरांचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा हा महात्मा गांधींनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणारा होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ डॉ. दाभोलकरांनी स्वतःच्या मुठीत न ठेवता ठेवता सहकार्यांच्या हातात दिली होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चळवळीची हानी झाली; परंतु त्यांचे कार्य थांबले नाही. ‘महाराष्ट्र अंनिस’चे प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवेदनाचे वाचन केले.
‘सरहदय’चे संस्थापक संजय नहार यांनीसुद्धा भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथे धर्माच्या आधारावर होणार्या हिंसेला विरोध करत आम्ही ‘वंदे मातरम्’ संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले. भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काम करायला सुरुवात केली. ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही. डॉ. दाभोलकरांचे योगदान ही या मोठ्या संघर्षाची सुरुवात होती. डॉ. दाभोलकरांचा अंत करणारे हे लोक कायद्याचा प्रचंड अभ्यास करणारे आणि त्याच वेळेस आपल्या विरोधी विचारांना संपवण्यावर ठाम आहेत. माझ्यावर सुद्धा हल्ल्याचे प्रयत्न झाले. मी पोलिसांकडे तक्रार दिली; पण मी दिलेल्या नावांपैकी एकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. सामान्य माणसे आपल्याबरोबर आहेत; परंतु धोरणं ठरवणारे आणि उच्चपदस्थ लोक आपल्याला समर्थन देत नाहीत. हल्ले होत आहेत; पण त्यामुळे आपण गप्प बसून चालणार नाही. लष्करातील आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा विवेकवादी विचारणा असलेला धोक्याकडे दुर्लक्ष करतात. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती किंवा देशापुरती नाही; तर जगभर पसरली आहे. ही लढाई अवघड आहे आणि अवघड होत जाणार आहे. विवेकवादी विचार रुजवण्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी आयुष्यभर काम केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हे काम जोमाने पुढे नेत आहेत.
या राज्यस्तरीय ऑनलाईन अभिवादन सभेत, ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आपल्या समारोपीय भाषणात म्हणाले की, …
“मित्रहो,
आपल्यासमोर कोणत्या स्वरुपाची आव्हानं आहेत, काय-काय अडथळे आहेत, याची अनुभूती आपण दोन तासांत घेत आहोत. आवाज दाबला जाणं आणि आवाज संकुचित करणं, हे आता केवळ शारीरिक पातळीवर नाही, तर ते आता माध्यमांच्या पातळीवर पण होतं किंवा होऊ शकतं, हे आपल्याला या निमित्ताने अनुभवायला मिळालं असेल.
मी सुरुवात करताना असं म्हणत होतो की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामात म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला आज सात वर्षे पूर्ण झाली. सात वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी फिरायला जाऊन, परत येताना त्यांचा खून केला गेला. त्यानंतरच्या गेल्या सात वर्षार्ंच्या वाटचालीमध्ये, त्यांचे संघटनेतील सोबती आणि सहकारी म्हणून अनेक पद्धतीच्या अनुभवांना आणि आंदोलनाला सामोरे जावे लागले. वेगवेगळ्या स्वरुपाची मानसिकता सांभाळून, सनदशीर आंदोलनं एका बाजूला चालू होती आणि त्याच वेळेला समाजामध्ये देखील दाभोलकरांच्या खुनामागे कोण आहेत आणि त्यामागे कुणाचे हात आहेत, हे आम्हाला सतत विचारत राहावं लागलं होतं आणि आजची स्थितीही सात वर्षांनंतर पण अशीच आहे की, कोण अशा स्वरुपाची मोहीम राबविण्यात यशस्वी होत आहे? डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या स्वरुपाचं काम करत होते, तो विचार घेऊन इ. स. 1989 नंतरच्या तीन ते अडीच दशकांच्या वाटचालीमध्ये एक मोठं व्यापक स्वरूप त्या कामाला प्राप्त झालं आहे. अशी एक संघटना की, जी महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि सक्रिय अशी संघटना आहे, ज्यामध्ये अठरापगड जातीचे, धर्माचे, वंशाचे, लिंग, भेद विसरून सहभागी असणारे आणि विविध आर्थिक स्तरांमधल्या सर्व प्रकारच्या शिक्षित, अशिक्षित, कष्टकरी, शहरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू असे सर्व स्तरातले लोक, कार्यकर्तेसहभागी झालेले आहेत, हे आपल्याला बघायला मिळेल. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात परिवर्तनाचे, पुरोगामी विचारांचे प्रवाह आहे, त्यासाठी काम करणार्या ज्या-ज्या स्वरुपाच्या संस्था, संघटना, राजकीय, पक्षीय काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यातले काही सहकारी आज ‘महाराष्ट्र अंनिस’ या संघटनेत सहभागी झाले आहेत, होत आहेत. आपापल्या परीने या कामांमध्ये योगदान देत आहेत. मला हे सांगताना निश्चितपणे आनंद आणि अभिमान आहे की, ‘महा. अंनिस’ ही महाराष्ट्रातील अशी एकमेव संघटना असेल की, तिचं नाव घेतल्यावर ती कुठल्या जातीशी किंवा कुठल्या धर्माशी निगडित आहे किंवा कुठल्या एका पक्षाशी जोडलेली आहे किंवा कुठल्यातरी एकाच विचारांशी जोडली आहे, असे नाही. त्यामुळे असे व्यापक परिप्रेक्ष्य असलेले संघटन 30 वर्षेसलगपणे कार्यरत राहिले, उभे राहिले. त्यामध्ये सातत्य राहिले, त्यामध्ये चिकाटी राहिली. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे की, आपला कामधंदा, नोकरी, व्यवसाय, आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यानंतर आपण अशा पद्धतीच्या सामाजिक कामांमध्ये सहभागी झाले पाहिजे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फुले पती-पत्नीने; विशेषतः महिलांचे शिक्षण सुरू केले. त्याची फळे आज आपण चाखत आहोत. त्याचपद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडला गेला.
महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून आज साडेतीनशेपेक्षा जास्त शाखांमधून काम करण्यात येत आहे. आपापल्या ठिकाणी राहून देखील कार्यकर्त्यांचा या कामामध्ये मोठा वाटा राहिला आहे आणि मला असं वाटतं की, हेच अधिष्ठान, शक्तिस्थान आणि या कामाचा हाच पाया आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर दुःखी, वेदना होऊन, अतिशय पोरकेपणाची भावना सगळ्यांमध्ये निर्माण झालेली असूनही आणि संताप, राग मनामध्ये असून देखील त्यांच्या मागे संघटना वर्धिष्णु राहिली. या वाटचालीला कारणीभूत ठरलेले हेच शक्तिस्थान आहे. मात्र ते काही सहजासहजी उभे राहिले नाही. त्याच्यामध्ये अनेकानेक अडथळे आलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही पंचवीस वर्षांच्या संघटित कामाच्या योजनांमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. असे कार्यकर्त्यांसोबत वावरताना त्यांना आणि समाजातील कार्यकर्त्यांना देखील अनेक प्रसंग आलेले आहेत की, ज्या ठिकाणी अटीतटीची वेळ होती, अतिशय टोकाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता आपल्या अस्तित्वावरच घाला होईल की काय, असे वातावरण तयार झाले होते. मात्र पुढे जाण्याची भूमिका संघटनेची राहिली आणि त्यासाठी म्हणून या स्वरुपाचा संवाद, या स्वरुपाची समजूतदारपणाची भूमिका आणि विचारांनी सोबत राहण्याची खात्री कार्यकर्त्यांकडून दाखवली गेली. मला वाटते, हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. आजही देखील अशी वेळ येऊ घातलेली आहे. आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले आहे, त्याला सामोरं जाताना शहाणपणाची गरज आपल्याला दाखवावी लागणार आहे. त्यानिमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करताना मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की, आपण जे काही आहोत, ते एका परिस्थितीचे परिपाक आहोत, हे आपण विसरता कामा नये. जगामध्ये, मानव जातीमध्ये जी काही उत्क्रांती झाली, त्या सगळ्यांमध्ये प्रत्येक टप्प्यावर जे-जे काही घडलं आहे, ते घडायला काहीतरी कारणमीमांसा आहे. त्या परिस्थितीचा तो परिणाम आहे आणि त्या परिणामांना ओळखूनच त्यासाठी आपल्या जीवनाची पूर्ण पूंजी त्याला लावण्यासाठी महान व्यक्तींनी आयुष्य खर्ची घातले. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तरी आपल्याला नक्की सांगता येईल. त्यांच्या अगोदर स्त्रियांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता का? परंतु परिस्थितीचा परिपाक म्हणून काही गोष्टी घडतात आणि महामानव, महात्मा समाजपरिवर्तनासाठी आपल्या कामात, आयुष्यात काही वेगळे प्रयत्न करत असतात, कष्ट घेत असतात. मुलींना उपयुक्त असे शिक्षण मिळालं पाहिजे. लोकसंख्येच्या 50 टक्के असणार्या सर्व महिलांना, युवतींना, कुमारिकांना, बालिकांना देखील पुरुषांच्या बरोबरीने स्थान निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी ज्या स्वरुपाचा पुढाकार आणि त्यासाठीचा वाईटपणा आणि कष्ट त्यावेळेला फुले पती-पत्नींनी घेतले. त्यामुळे समाजामध्ये काही सुयोग्य बदल झालेले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला कामाचा प्रवाह, चमत्कार, भोंदू बुवांचा भांडाफोड एवढ्यापुरता आता तीन दशकांत मर्यादित राहिला नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी समाज निर्माण करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. हेच समितीचे ध्येय ठरलेले होते. समाजात मानवता आणि माणसाला जगण्याचा आत्मसन्मान मिळवून देण्यापर्यंत प्रयत्न सुरू आहेत.
शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य आणि व्यक्तिप्रामाण्य नाकारून, पुढच्या काळात आपण समर्थपणे, संघटितपणे वाटचाल करण्याची गरज आहे, असे मला वाटते. अर्थात, एकूणच मानवजातीवर आणि त्यातल्या भारतीय मानसिकतेमध्ये तर विचारांपेक्षा व्यक्तीचा प्रभाव समाजमनावर जास्त पडत असतो आणि त्याचे फायदे आहेत, तसे तोटेही असतात. त्यामुळे यात आपण गुंतून पडलो, अडकून पडलो तर त्याच्यामुळे, त्यासाठी आवश्यक असणारे संघटनेचे अधिष्ठान धोक्यात येतं किंवा दुर्बल होतं. हे होऊ देता कामा नये.
पुढच्या काळात आपण पुरोगामींच्या सर्व प्रकारांमध्ये विचारपूर्वक काम करणार्या संस्था, संघटनांमध्ये पुरोगामी विचाराला जेवढे जास्त गांभीर्याने बघू आणि आपल्या वर्तमानामध्ये त्याबद्दलचा प्रभाव आणि परिणाम प्रत्यक्षात आणायला शिकू, तेवढं आपलं काम गुणवत्तापूर्ण व परिणामकारकपणे घडेल. आजपर्यंत आपण यामुळेच समाजामध्ये काही साध्य करू शकलो आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकर असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये 24 वर्षे संघटना वाढत होतीच आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्य होत होते.
समाजात अंधश्रद्धेचा प्रश्न आहे आणि तिचे निर्मूलन करायला पाहिजे, म्हणून त्याच्या पुढच्या टप्प्यावर आता तर आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांच्यामार्फत विचार कसा करावा आणि जीवनामध्ये आपल्या जगण्याचे आणि सभोवतालच्या परिस्थितीबद्दलचे निर्णय कसे घ्यावेत, घटनांचं विश्लेषण कसं करावं, याबद्दलचा एक विचार समाजात रुजवला. प्रत्येक व्यक्तीने आणि कुटुंबामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्यासोबतच आपल्या सर्वांचे नागरिक म्हणून त्याचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही मागील तीस वर्षे अनेक प्रयोग; आणि ते प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात केले, त्याचे चांगले परिणाम आम्हाला विद्यार्थी, संस्था, शिक्षक, प्राध्यापक या सगळ्यांमध्ये बघायला मिळाले. अशा पद्धतीने आम्ही वाटचाल करतो आहोत. त्या वाटचालीमध्ये मला वाटतं की, अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला हा प्रवास आता वैज्ञानिक दृष्टिकोन ते मानवतावाद असा सुरू झाला. मानवतावादासाठी आपण उभे राहिले पाहिजे. जगातल्या अखिल मानवाच्या अन्याय-अत्याचाराबद्दल आपण आपली सजगता ठेवली पाहिजे. आपल्या परीने त्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे, अशी भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा संघटित पद्धतीने एक वस्तुपाठ उभा करू शकलो, देऊ शकलो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समाजामध्ये अंगीकार होणे किती महत्त्वाचे आहे, याचे काही वस्तुपाठ देऊ शकलो. आज ते शासनाच्या धोरणांमध्ये, कल्याणकारी योजनांमध्ये आणि कायद्यामार्फत गतिमान झालेले आहे. दोन महत्त्वाचे कायदे या महाराष्ट्राला आपण देऊ शकलो – जादूटोणाविरोधी कायदा, जो जवळपास अठरा वर्षे पाठपुरावा करून; आणि तरीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं नेतृत्व याच्यासाठी पणाला लागलं होतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कार्यकर्ते सोबत घेऊन, जे -जे करता येईल ते सर्व केले. स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्यापर्यंत सर्व प्रकारच्या उपक्रमांमधून सरकारवर दबाव आणला आणि समाजमन घडवण्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी झालो, असे मला वाटते. कायदा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तयार करण्यामध्ये आम्ही एका टप्प्यावर असताना डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून केला गेला. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा दबाव म्हणून का होईना, महाराष्ट्रामध्ये कायदा झाला आणि नंतर तो लागू झाला.
कायदा लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक अंधश्रद्धा, अनेकविध शोषित असणार्या गोरगरीब, कष्टकरी समुदायातील दुर्गम भागातल्या लोकांना न्याय मागायला एक संधी उपलब्ध झाली. हा कायदा म्हणजे महिलांसाठी एक हत्यार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, भविष्याचा वेध घेणारा हा कायदा लागू झाला.
जातीच्या उतरंडीमध्ये, जातीअंतर्गत शोषण करणारी एक समांतर न्यायप्रक्रिया चालते. जातपंचायत, गावकी नावाने किंवा जातपंचायत या नावाने त्या चालतात. जाती-पोटजातीत होणार्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रचलित न्यायव्यस्थेकडे जाऊ द्यायचे नाही. त्या-त्या जाती-पोटजातीतील काहींनी मनमानीने अन्यायकारक न्यायनिवाडे करून जातबांधवांचे विविध प्रकारचे शोषण करणे, असा हा फंडा आहे. महाराष्ट्रामध्ये चार-पाच वर्षे त्याच्याबद्दल रान उठवून, अन्यायग्रस्त लोकांना समाजासमोर आणून, सरकारवर दबाव निर्माण केला गेला. त्यामध्ये माध्यमांचं योगदान फार मोलाचं आहे आणि त्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा पारित केला गेला. तो कायदा मला वाटते, देशासाठी आणि सर्व राज्यांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही कायदे समाजात उपयोगी ठरावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. दाभोलकरांच्या जाण्याचं दुःख आहेच; मात्र या कामातून काही उपयोगी निष्कर्ष निष्पन्न झाले. आम्ही ते निर्माण करू शकलो, याचा मला निश्चितच अभिमान आहे, आनंद आहे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले, आपापल्या परीने त्याच्यामध्ये योगदान दिले, याच्याविषयी देखील त्यांच्यासाठी माणूस म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे. पण हे सगळे होत असताना आपल्याला अजून आपण समाजात नीट कानोसा घेतला तर असे लक्षात येते की, अंधश्रद्धा निर्मूलन कामाला विरोध करणारा विचार बळकट करण्यासाठी संघटित अशा स्वरुपाच्या षड्यंत्राची रचना होते आहे. अशा प्रकारे काम करणारी एक मोठी व्यवस्था आज सक्रिय आहे. तिला समाजातल्या काही घटकांकडून पाठिंबा, पाठबळ मिळत आहे आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचेकाम संकुचित होण्याचा धोका निर्माण होतो आहे. हा धोका संजय नहार यांनी व्यक्त केला, तो या अर्थाने हे आपल्याला समजलं असेल. हे काम करण्यामध्ये जी अनुकुलता, या स्वरुपाचे अनुकूल वातावरण हवे, ते आज कसं राहणार नाही, यासाठी काम करणारे काही घटक हे जास्त सक्रिय आहेत आणि त्यांना काही पातळ्यांवर समाजाचा पाठिंबा आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यांचा, समाजामध्ये विषमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. समाजामध्ये असुरक्षितता निर्माण करण्यामध्ये काही घटनांच्या निमित्ताने ते यशस्वी झाले असले तरी मला वाटते की, भारतीय समाज हा मध्यममार्गी आहे. भारतीय समाजाला, भारतीय लोकमानसाला अशी कुठलीही टोकाची गोष्ट मान्य होणार नाही आणि ती होऊ नये, यासाठी समाजातला मोठा वर्ग आज चिंता करतोय, काळजी करतोय आणि त्यांचा उल्लेख आपल्यासोबत आपल्याशी बोलायला उपस्थित राहिलेल्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी केला. त्यासाठी त्या आपल्यासोबत यापुढच्या काळात यायला तयार आहेत, आपल्या पाठीशी उभे राहायला तयार आहेत, आपलं योगदान आपल्या परीने त्या द्यायला तयार आहेत. ही आपल्याला आश्वस्थ करणारी गोष्ट आहे. डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वात पाठपुरावा करत असताना कायद्याच्या एका निर्णयप्रक्रियेच्या टप्प्यावर आपण होतो. सगळ्यांच्या साक्षीने, सहभागाने हे काम झालं आहे. त्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व, पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील आपल्या कृती समितीने मध्ये ही भूमिका व्यक्त केली आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे श्रद्धा निर्मूलनाचं नाही, तर श्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे हे व्यक्तीच्या विरोधात काम नाही तर, ते संघटितपणे समाजाला विवेकाकडे घेऊन जाणारे काम आहे. धर्माच्या नावाने शोषण करणार्यांच्या विरोधात ते आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे हे काम आहे, याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे आणि तो आपला आनंद आणि अभिमान आपण पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न आपल्या परीने करणार आहोत आणि त्यासाठी संघटनाही आपल्या सगळ्यांच्या सहभागाने अधिक सशक्त करत-करत हे काम आपल्याला करावे लागणार आहे, असं मला वाटतं.
आज एकूण पुरोगामी परिवर्तनवादी विचारधारा आणि त्या संस्था-संघटनांच्या कामांमध्ये आपल्या लोकशाही पद्धतीचा पुरस्कार कमी दिसतो. विविध गटांत, प्रादेशिक किंवा अशा वेगवेगळ्या जातीय राजकारणात अनेकजण विभागले आहेत. आपणास यावर मात करण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्यामुळे आपण इतरांना लोकशाही व्यवस्था हे संवैधानिक मूल्य आहे, याविषयीचे मार्गदर्शन करत असू, तर आपण पुरोगामी म्हणून आपल्या कार्यपद्धतीमध्ये त्याचा अंगीकार किती आणि कसा करतो, याचा आढावा आणि मूल्यमापन करायला पाहिजे, अशा मताचा मी आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याला साठ वर्षेपूर्ण झालेली असताना; म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव सुरू असताना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांना, पुरोगामी परिवर्तनवादी संस्था, संघटना, राजकीय पक्षांमधले कार्यकर्ते, नेते, पदाधिकार्यांना आता पुन्हा आवाहन करतोय की, आपण जे काही काम महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंत केलेले आहे, याच्याबद्दलचा आढावा आपण मांडा आणि त्याच्यावर ‘क्लेम’ करा. राजकारण्यांमुळे सत्ता मिळवण्यात, मिळवल्यानंतर सत्तेत असणार्या आणि सत्तेत विरोधी पक्ष असणार्या लोकांमार्फतच समाजविकासाचे काम घडतं, असा लोकशाहीत एक समज आहे, तो दूर व्हायला मदत होईल. समाजासाठी झटणारे, समाजाच्या विविध प्रश्नांवर छोट्या-छोट्या पातळीवर राहून काम करणारे आणि आवाज उठवणारे, संघर्ष करणारे, आपले आयुष्य पणाला लावणार्या लोकांमुळे प्रश्न समोर येतात आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेता तयार होतो आणि कायदे बदलतात, धोरणं तयार होतात, योजना तयार होतात, हे आपण समाजाला शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी समाजाला, त्याच्या मागे उभे राहण्यासाठी प्रवृत्त, प्रोत्साहित केले पाहिजे, असे मला वाटते. भारतीय संविधान हे अशा स्वरुपाचा एक दस्ताऐवज आहे की, ते जगालादेखील मार्गदर्शक ठरू शकेल. हा असा एक अतिशय महत्त्वाचा लिखित ग्रंथ आहे की, ज्याच्यामुळे गेली सत्तर वर्षे हा देश एका दिशेने वाटचाल करतोय. तो भविष्यात देखील त्याच पद्धतीने वाटचाल करत राहण्यासाठी भारतीय संविधानात कालसुसंगत बदल करूनदेखील, आपण ते प्रमाण मानून तोच आपला धर्म, राष्ट्रधर्म म्हणून पुढच्या काळात वाटचाल करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. समितीने ‘संविधान बांधिलकी महोत्सवा’च्या माध्यमातून हा जागर 2007 पासून सातत्याने केलेला आहे. यानिमित्ताने संपवताना, माझा संवाद थांबवताना याबद्दल एक आवाहन करू इच्छितो की, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विचार-वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सोबत या.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे देखील पालक होते, चाहते होते, पाठीराखे होते. कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांचा खून झाला. संत बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आजच्या काळाच्या कसोटीवर नव्याने, नवीन पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ते अविरत प्रयत्न करत होते आणि त्यामुळे इथल्या धार्मिक अधिष्ठानाच्या आधारावर धर्माधिष्ठित राष्ट्रउभारणीसाठी एकत्र झालेल्या लोकांना तो धोका वाटत होता. त्यामुळे त्यांचा खून झाला. निर्भीड पत्रकार आणि आक्रमक पद्धतीने लिखाण आणि संवाद करणार्या गौरी लंकेश; त्यांचादेखील याच कारणाने खून झाला. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही, म्हणून जीवे मारून टाकण्याची कार्यपद्धती अवलंबली गेली आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणेतील लोकांनादेखील या स्वरुपाची माहिती आपण वेळोवेळी दिली आहे, समजावून सांगितली आहे. सांगून-सांगून आम्ही थकलो आणि हे लक्षात यायला त्यांना जवळपास पाच वर्षेजावी लागली. राजकीय हितसंबंध, प्रतिष्ठेचे मुद्दे, अनिच्छा या बाबी तपासात अडथळे ठरल्या. महाराष्ट्राच्या पोलिसांकडून तपास काढून नंतर केंद्रीय यंत्रणा तपासकामाला लागली. या सगळ्यांमध्ये झालेला विलंब आणि त्यामध्ये पुन्हा माणसांचा, यंत्रणेचा अभाव यामुळे या तपासाला गती आणि योग्य स्वरुपात योगदान ते देऊ शकले नाहीत, म्हणून सात वर्षांनंतर देखील यामागचे सूत्रधार कोण आहेत, हा प्रश्न आम्हाला समाजामध्ये विचारावा लागतो, देशाला, आपल्या राज्यकर्त्यांना आणि तपास यंत्रणांना विचारावा लागतो आणि त्यासाठीची एक मोहीम आता आम्ही समाजमाध्यमांवर चालवीत आहोत. मी आपल्याला आवाहन करेन की, आपणदेखील त्याला पाठिंबा द्या आणि आपण या स्वरुपाचा प्रश्न आपल्या पातळीवर सरकारला विचारा, प्रशासनाला विचारा. कर्नाटकात पोलीस, सीआयडी या सगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत. यामागे काही विचारधारा आहेत. खून घडवून आणणार्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करणार्या संघटना आहेत. त्यांचे जे नेते आहेत, त्यांना अजूनही अटक केली गेली नाही. त्यांच्या सगळ्या षड्यंत्राचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आलेला असूनदेखील त्याच्याबद्दल थेट कारवाई केली गेली नाही, त्यांच्या सगळ्या साधनांवर, मालमत्तेवर टांच आणली नाही, अशा संस्था, संघटनांवर बंदी आली नाही. मागणी करूनही अजूनही पंतप्रधानांनी याच्याबद्दल त्यांना विचारणा केली नाही. कोणत्याही स्वरुपाची हालचाल झाल्याचे आम्हाला दिसत नाही.
मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील निराश न होता, आपण आपलं म्हणणं आणि मागण्या पुढे नेतच राहणार आहोत. लोकशाहीच्या व्यवस्थेत, कार्यपद्धतीमध्ये हेच योग्य आहे. या दिशेने आपण जायला पाहिजे, ते आपण करतो, करूयात. एका बाजूला कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयीन पातळीवर लढविला जातो आहे, तर आपण माध्यमांमध्ये देखील हा प्रश्न आपण आपल्या परीने पुढच्या काळात सतत मांडू, समाजात मांडत राहू. त्यामुळे सनातनी विचारधारा, मूलतत्त्ववादी आणि देशाच्या संविधानाला आव्हान देणारी, या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेवर आणि एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या विचारसरणीची ज्या कोणत्या संघटना आहेत, त्यांच्या विरोधात त्या ठिकाणच्या प्रशासनाला जाब विचारू. प्रशासनाला समांतर अशा स्वरुपाची एक यंत्रणा उभी करण्यात येत आहे, त्यासाठी वेगवेगळी माध्यमं वापरतात. त्यासाठी तरुणांना छुप्या पद्धतीने त्यामध्ये सामील करून घेऊन त्यांना प्रशिक्षण देतात. राष्ट्रीय विचारांच्या विरोधात संघटना करतात. कुणी विरोधात बोलले तर त्यांच्यावर बदनामीचे खटले टाकणं आणि हे करूनही ते थांबले नाहीत, तर त्यांना मारून टाकण्यासाठीचे षड्यंत्र राबविण्यात येते. त्यामुळे सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संरक्षण देणार, असं सांगितलं जातं. तुमच्यावर ‘रेकी’ झाली आणि म्हणून तुम्हाला संरक्षण देतो, असं सांगितलं जातं. आम्हाला सुरक्षा देण्याऐवजी त्या-त्या प्रशासनाकडून, अशा देशाला, समाजाला धोका असणार्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्यावर कारवाई केली जात नाही, म्हणून ते मोकाट आहेत.
यानिमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो की, समाजातल्या विविध स्तरांतल्या तरुण लोकांनी पुढे यावे. जगातले एकूणच जास्त तरुण लोक भारतात आहेत, पुढेही भारतात असणार आहेत. म्हणून आवाहन करतो की, हा देश तुम्हाला चालवायचा आहे. हा समाज तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या तुमच्या भौतिक प्रगतीसोबत समाजालादेखील या पद्धतीने पुढे घेऊन जावे लागणार आहे. त्यासाठी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून सोबत या. विवेकाचा आवाज बुलंद करू या.”
या कार्याध्यक्षांच्या भाषणानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कायदा विभागाच्या सहकार्यवाह आडव्होकेट मनीषा महाजन यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास-प्रक्रियेचा आढावा घेणारी माहिती सांगितली. प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी प्रास्तविक केले केले आणि विवेकी समाज बनवण्यासाठी डॉ. दाभोलकरांनी दिलेल्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला. राज्यभर कार्यकर्त्यांनी आणि विविध सामाजिक संस्थानी प्रबोधनपर विचार रुजवण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी काय काय कार्यक्रम घेतले आहेत तसेच कोणते आगामी कार्यक्रम प्रस्तावित आहेत याचाही त्यांनी आढावा घेतला. राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी समितीतर्फे येत्या 21 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय चमत्कार सत्यशोधन दिन’ साजरा करण्याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले. याच दिवशी 25 वर्षांपूर्वी ‘गणपतीची मूर्ती दूध पिते’ अशी अफवा संपूर्ण जगभर पसरली होती. अवैज्ञानिक समजुतींवर आधारित चमत्कारांचा दावा खोडून काढण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा दिवस दरवर्षी ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे साजरा केला जातो. राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे यांनी आभार प्रदर्शन केले. अवधूत कांबळे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन गीत सादर केले.
– डॉ.ठकसेन गोराणे, राहुल माने