उफराटा न्याय

अरुणा सबाणे - 9970095562

कृषिशास्त्राची एम. एस्सी.ची पदवी हातात घेऊन आणि मनभर स्वप्न बाळगून राजाभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणातून बाहेर पडला. सुरुवातीला निवडक ठिकाणी, मोठ्या शहरातल्या जागेवरच तो मुलाखतीसाठी अर्ज करू लागला. आता रोज वर्तमानपत्र घ्यायचे, त्यातल्या जाहिराती बघायच्या आणि त्या-त्या ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे, असा उद्यापासून त्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी तो अगदी सज्ज होता. त्याच्याजवळ असलेले तीन-चारही ड्रेस त्याने स्वच्छ धुऊन प्रेस करून ठेवले होते. हातावरच्या घड्याळात नीट सेल आहेत की नाही, हे बघून ठेवले. एक छोटी फाईल, कोरे कागद, रुमाल, छोटा कंगवाही घेतला. मुलाखत द्यायला जाताना आधी केसांवरून नीट कंगवा फिरवायचा, इन नीट आहे की नाही, बघायचं आणि आत्मविश्वासानं आत जात आपली फाईल मुलाखत घेणार्‍याच्या पुढ्यात ठेवायची, हे त्यानं मनोमन कितीदा म्हटलं असेल. बर्‍याचदा तिथे आधीच सिलेक्शन झालेलं आहे, हे त्याच्या लक्षात येत होतं. नोकरीसाठी आपला चॉईस नाही, हे लवकरच लक्षात आल्यामुळे जिथे म्हणून जागा आहे, तिथे तो ‘अप्लाय’ करायला लागला. हळूहळू ‘अिश्रिू, अिश्रिू; र्लीीं पेीं ीशश्रिू’चा अनुभव आल्यावर दिसेल, तिथले थरपींशव वाचत होता आणि मुलाखतीसाठी जात होता. हळूहळू महिने आणि महिन्याचं गणित वर्षाला व्हायला लागलं. आता तर दोन वर्षं झालीत. दोन वर्षांपासून राजाभाऊ अर्ज करीत होता, मुलाखतीला जात होता. एका जागेसाठी दोन-चारशेच्या वर आलेले उमेदवार बघून कधी- कधी माघारीही वळत होता. हळूहळू त्याच्या डोळ्यातले स्वप्न डोळ्यातच मिटले. आता तो मुलाखतीलाही कंटाळला. अर्ज करण्याचा तर त्याला कंटाळाच यायला लागला. त्याला कळून चुकलं, आपल्या हातातल्या प्रथम श्रेणीच्या डिग्रीला काहीच महत्त्व नाही. 10-20 लाख रुपये डोनेशन देण्याची तयारी असेल आणि एखाद्या मोठ्या माणसाची शिफारस असेल तरच मुलाखतीला जाण्याचं ‘नाटक’ करण्यात फायदा; नाहीतर उगाच हा ‘फार्स’ नकोच. आपल्याला या ‘व्यवहारी’ जगाचं हे साधं गणित उमजायला आयुष्यातली दोन वर्षं घालवावी लागली, याचं मात्र त्याला नक्कीच वाईट वाटलं.

हळूहळू त्यानं आपल्या मनाला सावरलं, इथलं कटुसत्य त्यानं आपल्या मनाला पटवून दिलं. स्वत:च्या मर्यादा ओळखल्या. आपल्याजवळ डोनेशन द्यायला पैसाही नाही आणि मोठ्या माणसाची शिफारसही. त्यानं या शहरातलं आपलं वास्तव्य आवरतं घेतलं. कृषिशास्त्राची पदवी घेतलीच आहे, तर त्याचा फायदा आपण आपल्याच घरच्या शेतीसाठी करावा, असा विचार त्यानं पक्का केला. नाहीतरी घरच्या 7 एकर जमिनीमध्ये आपले वडील त्याच्या जुन्याच परंपरागत पद्धतीने शेती करतात. त्यामुळं कधीच फारसं उत्पन्न होत नाही. आता आपण स्वत: शेतीत खूप मेहनत करू आणि नवनवीन प्रयोगसुद्धा; म्हणजे आपोआपच आपल्या परिस्थितीत सुधारणा होईल, काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. आता आपण शेतीकडंच लक्ष द्यायचं. खूप कष्ट करायचं, खूप पिकवायचं आणि विवेकला मात्र खूप शिकवायचं, असा मनाशी पक्का निश्चय करून आणि शहरातला आपला गाशा गुंडाळून तो गावात दाखल झाला.

अचानक आलेल्या राजाभाऊला बघून दाजींना जरा आश्चर्यच वाटलं आणि मनात उमटलेलं आश्चर्य आतच दडवण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी राजाभाऊला सरळच विचारलं,

“बाप्पा, असा अचानकच कसा आला गा? आन संगती सामान आनलेलं दिसते. काहून गा?”

“काही नाही दाजी मी शहर सोडून आलो. ती खोली सोडून आलो.”

“काहून गा? काय झालं? भांडला-बिंडलास का घरमालकासंग?”

“नाही हो दाआजी मी कशाला उगाच कुणासोबत भांडू? पण आता शहरात राहण्यात अर्थ नाही. उगाच खर्च मात्र वाढतो. दर महिन्याला तुम्हालाही मला पैसे पाठविण्याची काळजी मात्र असते.”

“अगा तं कितीक दिस राह्यन अशी चिंता? आता 6-7 सालापासून पाठोतच हाय ना? हाडाचे काड करून शिकोलच ना तुले? आन तू असा मंधातूनच वापस काहून आला? मी त तुह्यावाल्या नोकरीची बातमी आयकाले कानात जीव आनून वाट पायतो हाय.”

“दाआजी, तुम्ही हाडाची काडं करून मला शिकविता, याची जाणीव ठेवूनच मी शिकलो. शिकताना उगाच खर्च कधी केला नाही की कशाचे शौक कधी केले नाहीत. आपण बरं नि आपला अभ्यास बरा. चांगले गुण मिळालेत तर चांगली नोकरी लागेल, आणि नोकरी लागली की तुम्ही केलेल्या कष्टाचे पांग मी फेडील, अशीच आशा ठेवली मी सतत. माझ्या प्रयत्नांना यश येऊन मी एम. एस्सी. चांगला प्रथम श्रेणीत पास झालो. गेल्या दोन वर्षांपासून सतत नोकरीसाठी वणवणतो आहे. पण दाआजी काय फायदा? जिथे जा, तिथे उमेदवार आधीच पक्का झालेला असतो. 10-15 लाख रुपये नसेल ना दाआजी आपल्या खिशात, तर तुमच्या मेरिटला कोणीच विचारीत नाही. आजच्या काळात शिक्षणसंस्थेत नुसता भ्रष्टाचार माजलाय. ‘पैसा फेको और नोकरी लो’ अशी म्हणच पडलीय नवीन. आपल्या जवळ आहे एवढा पैसा? मग कशाला आणखी ते अर्ज करण्यासाठी कागद विकत घेण्यात, पोस्टानं ते पाठविण्यात आणि मुलाखतीसाठी जाण्यात पैसा वाया घालवायचा? दाआजी, आता मी नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाकला. आता तुम्ही आराम करायचा आणि मी शेतात काम करायचं. बस, मी ठरवूनच टाकलंय. आता मी शेतीच करणार बाबा. सात एकर जमीन आहे आपली. आपण चांगली नवीन पद्धतीनं ती केली ना तर तिथेच आपण सोनं पिकवू, सोनं.”

“पाय बापा तुले काय पटते ते. पन म्या त तुले शिकोता-शिकोता तू साहेब झाल्याचंच सपन पायलं हुतं. एवढा तुले शिकोला तो का पुन्हा असा या मातीतच हात भरवाले का? आरे, तुनं शिकावं, चांगली नोकरी करावी, तुनं सायेब व्हावं, अन् आमच्या कष्टाचे पांग फेडावे बस येवढीच आमची विच्छा होती. तुही माय त कहीची डोयात जीव आनून तुया नोकरीच्या बातमीची वाट पाहत होती.”

“मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे दाआजी. पण माझा तरी काही उपाय आहे का त्यावर? नोकरी लागणं आपल्या हातात नाही. दाआजी आईला मी सांगतो समजवून, “आईऽऽ ए आईऽऽऽ.”

राजाभाऊची आई तर दारात बसून केव्हाची बाप-लेकाच्या गोष्टी ऐकतच होती. एकीकडं, तिला आपला लेक असा नोकरी लागल्याचा सांगावा न आणता शेती करायला आल्याचं बघून दु:खही होत होतं; तर दुसरीकडे लहानपणापासून शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर राहिलेला लेक कायम आता आपल्याच जवळ राहायला आला, याचा आनंदही होताच. तेव्हापासून गुपचूप बसून बाप-लेकाच्या गोष्टी ऐकत बसलेली आई पोरानं आवाज दिल्याबरोबर खुशीत येऊन म्हणाली,

“येरे बाबा राजाभाऊ. ये हातपाय धू. न्हानीत पानी हाय. पोरगं घरी आलं तं यायन देल्ली त्याच्यामागं कटकट लावून.”

“कटकट कशाची आई? दाआजींनी त्यांचं मत सांगितलं. तू तुझं सांग. तू खूष आहेस ना मी वापस आल्यामुळे.”

“खूष नाही होनार तं काय काप्पा. 6-7 वर्सानं माहा लेकरू घराले वापस आलं. नाय तं बस वर्षातून 1 महिन्यासाठी येना जाय असंच होतं. त्या शयरात धड खावालं मिळत नाय न काहीच नाय. फक्त येवढंच वाटतं, का तुह्यासारख्या इथले वरस शयरात रायनार्‍या मानसाकडून आता शेतात राबनं होईल का? लय कष्ट पडते रे शेतीत. सोपं काम नाही थे.”

“अगं आई, तू बघ तर, दोन वर्षांत मी आपली शेती कशी सुधरवून टाकतो. आता तुम्ही दोघांनीही आराम करायचा आणि मी शेतीत काम करायचं. विवेकला मात्र आपण खूप शिकवायचं. त्याला चांगला मोठ्ठा साहेब करू, डॉक्टर करू. तो हुशार आहे. त्याला जेवढं शिकायचं तेवढं शिकवू काय?”

“पाय बापा. तू शिकून शायना झालेला मानूस. तुले काय पटते ते पाहा. मात्र बापाची नाराजी उगंच घेऊच नका म्हंजे झालं, जा हातपाय धुऊन ये. गरम-गरम भाकरी टाकतो. जेवा दोघंबी बाप-लेक.”

आल्या-आल्या राजाभाऊनं वडिलांकडून शेतीची सध्याची परिस्थिती समजून घेतली. कुणाकुणाचं कर्ज आहे, हातउसनं किती आहे, बँकेचं किती आहे, सगळी माहिती काढली. अल्पभूधारकाच्या स्कीमची माहिती गोळा करणं सुरू केलं. त्यानं आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या सात एकराच्या तुकड्यावर केंद्रित केलं. अनेकदा त्यानं ऐकलं होतं, कॉलेजच्या शेतकी पुस्तकातूनही वाचलं होतं. 2 एकरात लाखांचं उत्पन्न, 8 एकरात लाखोंची मिरची. अशीच स्वप्न आता तोही बघायला लागला. काहीही करून आपणही आता ओलिताची शेती करावी इकडं त्याचं डोळं लागलं होतं. कोरडवाहूमध्ये कितीही खतं टाकलीत, कितीही मेहनत घेतली तरी निसर्गावरच अवलंबून राहावं लागतं, हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं आता त्यानं बँकेतून कर्ज घेऊन शेतीत ओलित आणण्याचं ठरविलं.

सर्वप्रथम त्यानं बँकेचं कर्ज घेऊन वावरात विहीर खोदली. विहिरीवर पंप बसविला. पाईपमधून धो-धो पडणार्‍या धारेकडे बघून त्याला कोण आनंद व्हायचा! त्याचा उत्साह वाढला. शेतात तो खूप राबायचा. काळ्या मातीकडे बघताना त्याला आनंद व्हायचा. ऊन असो की पाऊस; शेत बरं नि आपण बरं. पाच वर्षांत ढोरासारखी मेहनत करूनही पैसा बचत पडत नव्हता. कर्ज फेडण्यातच आलेल्या पिकाचा पैसा जायचा. दोनाची चार वर्षं झाली, तरी त्याच्या मनासारखी शेती होतच नव्हती. तो, त्याचे दाआजी, आई राब-राब राबायची. पण दिवसेंदिवस परिस्थिती साधारण होण्याऐवजी ती खालावतच जायची. यावर्षी घेतलेलं कर्ज पुढच्या हंगामावर फेडण्याच्या आशेनं तिघंही राबायची. दरवेळी आता खूप पिकेल म्हणून आशा धरून बसायची. पण ऐनवेळेवर कधी पाऊस जास्त झाला म्हणून, तर कधी पाऊस कमी झाला म्हणून; कधी रोग आला म्हणून, कधी रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला म्हणून; काही ना काही कारणाने शेती घाट्यातच राहायची. जेमतेम आलेलं पीक परत हातउसनं घेतलेलं पैसे आणि थोडंफार सरकारी कर्जाचे हप्ते देण्यातच जायचं. परत वर्षभराचा खर्च, विवेकच्या शिक्षणाचा खर्च आणि नव्यानं शेतीला लागणारं बी-बियाणं याची चिंता राजाभाऊला जाळतच राहायची. या विचित्र चक्रातून कसं बाहेर पडायचं, त्याला समजतच नव्हतं. शेतीत कितीही मेहनत घेतली तरी चार पैसे साठणं तर दूरच; पण बँकेचं कर्जही निल होतंय की नाही, याची सतत काळजी त्याला टोचायला लागली. यावर्षी तर त्याने कंबरच कसली होती. नुकतीच ज्वारीची कापणी झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या विवेकनेही त्याला जमेल तशी मदत केली होती. सगळ्यांनी मिळून रात्रीचा दिवस केला होता. ज्वारी पेरण्यापूर्वी तोंडात माती जाईपर्यंत त्यानं मशागत केली होती, खत दिलं होतं. पेरणीपूर्वी आणि नंतरही काशीकरच्या दुकानातून उधार आणून रासायनिक खताचा फवारा मारला होता. (काशीकरला राजाभाऊबद्दल आस्था होती. ते त्याला खाली हाताने परत कधीच पाठवीत नसत. त्याच्या डोळ्यात तरळणारं शेतीचं स्वप्न बघूनच काशीकर सतत त्याला मदतीचा हात देत होते.) वावरात ज्वारी उभी राहिल्यावर तर त्याचा पाय कसा म्हणून घरी थांबत नव्हता. पाखरांना उडविण्यासाठी दिवसच काय; पण रात्रीही खांबासारखा तो वावरातच उभा राहिला. जनावरं पिकाची नासाडी करतील म्हणून रात्ररात्र जागरण केलं.

आणि पीक काढणं, मोडणं, थ्रेशरमध्ये लावणं सगळे सोपस्कार पार पडून एकदाची ज्वारी घरात आली; तेव्हा ‘त्या’ भरल्या राशीकडे बघून त्या सार्‍यांना श्रम सफल झाल्यासारखं वाटलं. सहा-सात महिने ते तिघेही नुसते राबले होते. कधी निवांतपणी बसून भाकर खाल्ली नाही, सण सुद्धा वर्षभरात धड केला नाही.

ऐन मोसमात मोटर जळली, तेव्हा त्यानं कर्जाऊ पैसे घेऊन मोटर दुरुस्त केली होती. अनेकदा वीज आपला लपंडाव खेळायची. मिरचीचं पाणी द्यायच्या मोसमात तर नेहमी वीज गायब असायची. एकदाची गेली की चार-चार, पाच-पाच दिवस तिचा पत्ताच नसे. आलीच तर एक-दोन तासापुरती. एकदा दिवसभर वीज गायब, रात्री मात्र सुरू. मग काय, राजाभाऊ हातातलं काम सोडून पाणी द्यायला मोटरवर पळायचा.

अशा अनेक अडचणींना तोंड देत-देत त्यानं यावर्षीचं पीक घेतलं होतं. यावर्षीची ज्वारीही छान पिवळीधम्म होती. मोत्यासारखा दाणा होता. खळ्यात पडलेल्या त्या ज्वारीकडे बघून राजाभाऊला प्रसन्न वाटत होतं. दाआजींची पण नजर आता तृप्त झाली होती. राजाभाऊ मनाशीच ज्वारीच्या भावाचे आणि असणार्‍या खर्चाचे आराखडे बांधीत होता. त्याच्या हिशोबाप्रमाणे सगळ्यांचे पैसे देऊन घरातही चार पैसे राहणार होते. आईला यावर्षी चांगली 2-3 पातळं घेणार होता. दांड केलेलं आणि तीन ठिकाणी ठिगळं लावलेलं पातळ घातलेली आई त्याला बघवत नव्हती. दाआजींना तो दवाखान्यात नेणार होता. अनेक दिवसांपासून त्यांचा न बसणारा खोकलाही आता राजाभाऊला काळजीचा वाटू लागला. कदाचित ब्राँकॉयटीस आहे की काय, असं त्याला वाटायला लागलं होतं. चांगल्याशा डॉक्टरकडून तो दाआजींना तपासून घेणार होता. त्यांचं औषधपाणी करणार होता. वावराची पण आणखी चांगली मशागत करायची होती. मध्ये-मध्ये पडलेल्या खड्ड्यात माती भरायची होती, शेणखत टाकायचं होतं. राजाभाऊच्या मनात सारखा हिशोबच सुरू होता. तो सारखी स्वप्नं बघत होता.

या स्वप्नातच त्यानं बैलबंडीत ज्वारीची पोती भरली. सकाळी-सकाळी न्याहारी करून दोन भाकरी सोबत घेऊन त्यानं आपली बैलजोडी जुंपली आणि तो पुलगावला ज्वारी विकायला निघाला.

ऊन फार होऊ नये म्हणून तो लवकरच निघाला होता. सोमवारी पुलगावचा मोठ्ठा बाजार असतो. दलालही भेटायला हवा. दलालांना पटवता-पटवताच त्याचा अर्धा जीव मेटाकुटीस यायचा. या दलालांची जात मोठी चिवट. पाघळता पाघळणार नाही. आपल्या किमतीवर अडून बसणारी. मरमरेस्तोवर राबायचं आणि विकायला गेलं की अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी किमतीनं आपला माल विकावा लागतो, याची जाणीव आतापर्यंत राजाभाऊला होऊन चुकली होती. याहीवेळी तसंच झालं. धन्नू दलाल ज्वारीची किंमत 2000 रुपये पोतं सांगत होता.

“तुम हमारा हरदमका गिर्‍हाईक है, इसलिये बोरेके पिछे 100 रुपये ज्यादा दे देंगे चल, पटता है तो बोल, नहीं तो जादा टाईम नहीं अपने पास,”असं म्हणून तो दुसर्‍या शेतकर्‍याकडे वळलाही.

थोड्या वेळानं दुसरा व्यापारी आला. तोही जवळपास हीच किंमत सांगत होता. 3-4 व्यापार्‍यांनी हीच किंमत सांगितल्यावर राजाभाऊला खात्री पटली, यापेक्षा जास्त किंमत मिळणार नाही.

‘सगळीकडं खरं तर जो माल तयार करतो, तो स्वत: आपल्या मालाची किंमत ठरवीत असतो. मग आम्ही आमच्या मालाची किंमत का ठरवू नये? आम्ही शेतकरी ज्वारी पिकवितो, कापूस पिकवितो, गहू पिकवितो. त्याच्यासाठी दिवसरात्र राबतो. त्याच्यावर खर्च करतो आणि ज्यांना मातीचा स्पर्शही माहीत नाही, असे लोक आमच्या पिकाची किंमत ठरवणार? का? असं का? आमच्या मालाची किंमत ठरविणारे हे उपटसुंभ कोण? यांनी आमच्या मालाचा दर ठरवायचा आणि आम्ही…! आम्हाला परवडो वा न परवडो तो त्यांना द्यायचा. आमच्या जवळून घेतलेल्या मालावर मात्र हेच व्यापारी स्वत:चा चार पटीनं फायदा करून घेणार का? असं का? का नाही आमच्या मालाची किंमत आम्ही ठरवायची?’

त्याच्या मनात विचारांचं हे काहूर माजलं असताना एक शेतकरी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,

“राजाभाऊ, सध्या 3000 चा भाव हाय जोंधळ्याले. मले वाटते का बरा हाय. पुढे आखीन उतरण का काय सांगता येत न्हाय. देऊन टाकावं.”

“नाही रे. आणखी कसा उतरेल? मला तर हाच भाव खूप कमी वाटतो. दुकानात 50-60 रुपये किलोच्या खाली नाही.”

“पाहा गड्या, मी आपला अनुभवानं सांगतो. चारी बाजूला शेतकरी आपआपला माल घेऊन उतरले की मंग आखीनच कमी होत असते रेट कवा भी आनं दुकानातली चिल्लरची गोष्टच न्यारी हाय. इथं दलाल भाव ठरवते.”

“हो. असंही होऊ शकेल. नाही काय?”

राजाभाऊला माहीत होतं, नडलेला शेतकरी काय नाही करणार? उद्या भाव आणखीच कमी झाला तर काय करता? त्यानं धन्नू दलालाला आपला माल दिला आणि हाती आलेला पैसा घेऊन माघारी वळला. माल उतरवण्या-चढविण्याची हमाली, तोलण्याची तोलाई वगैरे काटछाट होऊन मिळालेल्या नोटा प्रथम त्याने मोजल्या. त्या खिशात ठेवल्या. आळोखे-पिळोखे देऊन आता सर्वप्रथम एखाद्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन इडली-सांबार खायचं ठरविलं. खूप दिवसात त्याच्या जिभेला हॉटेलच्या पदार्थांची चव लागलीच नव्हती. त्यानं बैलबंडी एका झाडाखाली सोडून ठेवली. सोबत आणलेला चारा बैलांना टाकला आणि तो रस्त्याला लागला.

थोड्याच अंतरावर ‘आर्वीवाला’ रेस्टॉरंटमध्ये तो गेला आणि एका टेबलाशी बसला. वेटर आल्या-आल्या त्याला एक प्लेट इडली-सांबारची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत काही उद्योग नव्हता म्हणून इकडं-तिकडं बघत बसला. बघता-बघता त्याची नजर समोरच्या बोर्डवर पडली. सांबारवडा दर 30 रु., मसाला डोसा 50 रु., इडली 20 रु. हातात घेतलेला पाण्याचा ग्लास त्यानं घटाघटा संपविला. इडली-सांबार एवढ्याशा दोन इडल्या 20 रु. चिमूटभर तांदळात होणारी इडली 20 रु. आणि आम्हा शेतकर्‍याचं एवढं मोठं पोतं फक्त 3000 रु. त. काय हा न्याय?

वेटरनं इडली आणली, म्हणून त्यानं ती खाल्ली; पण आता खाण्यावरची इच्छा त्याची उडाली होती. त्याला आता गरम इडली-सांबारची चवही कडू-कडू वाटत होती. एकदाची कशी तरी इडली संपवली, पैसे दिले आणि तिथून तो बाहेर पडला. कशाला आपण उगाच जिभेचे चोचले करायला गेलो, असा पश्चात्ताप आता त्याला होत होता. हॉटेलात 20 रुपये उगाच घालवल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करीत होती. आता त्यानं आपला मोर्चा पातळाच्या दुकानाकडे वळविला. आईसाठी दोन लुगडी घ्यायचं त्यानं ठरविलं. दुकानदारानं पातळं दाखविली. भाव सांगितला. राजाभाऊ कमी-जास्त करू बघत होता. पण दुकानदारानं ‘फिक्स्ड रेट’कडे अंगुलिनिर्देश करून राजाभाऊला गप बसविले. दुकानदारानं सांगितलेल्या रेटमध्येच त्याला पातळं घ्यावी लागली. दाआजींसाठी छत्री घ्यायला तो छत्रीच्या दुकानात गेला. तिथेही त्याला दुकानदारानं सांगितलेलीच किंमत मोजावी लागली. तांदळाचं पोतंही 4000 म्हणजे 4000 रुपयांतच घ्यावं लागलं. सगळ्यांना आपल्या वस्तूची किंमत सांगण्याचा हक्क होता; फक्त शेतकर्‍यालाच तेवढा नाही.

सुन्न मनाने तो घरी वापस आला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. त्याचं सगळं प्लॅनिंगच बिघडलं होतं. अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव त्याला ज्वारीचा मिळाला होता. दुसर्‍या दिवशी गावातली सगळी देणी त्यानं निस्तरली. दुकानाची उधारी दिली. तो परत हिशोब करू लागला. राहिलेल्या पैशातून पुन्हा बी-बियाणांसाठी पैसे ठेवावे. बँकेचा हप्ता पुढल्या वर्षी द्यावा, यावर्षी तर शेतीवरच पैसा गुंतवावा. वर्षभर खायला ज्वारी ठेवलीच आहे. थोडीशी सोबतीला तूरही आहे. यावर्षी वावराची चांगली मशागत केली तर पुढच्या वर्षी दामदुप्पट पिकेल आणि मग एकदम बँकेची किस्त भरता येईल. मागच्या वर्षीच्या राहिलेल्या किस्तीची त्याला आठवण झाली. गावातली लोकांची देणी चुकती करून तो घरी वापस आला तर बँकेचं पत्र हातात पडलं –

‘दोन वर्षांपासून तुम्ही विहिरीसाठी घेतलेले लोनचे हप्ते भरलेले नाहीत. 15 दिवसांच्या आत जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर जप्ती येईल.’

पत्र वाचताच राजाभाऊचं धाबंच दणाणलं. त्याला घाम फुटला. तो विचारात पडला. काय करावं? यावर्षी वावरात शेणखत टाकलं नाही तर जमीन निकस होणार. पुढच्या वर्षी पीक कमी येणार. लोकांचं हातउसनं तो नुकताच देऊन चुकला होता. काय करावं, काय नाही.

परत कुणाला हात उसने पैसे मागावेत की कर्जाऊ घ्यावे? पण सावकाराकडून घेतलेले कर्ज शेतकर्‍याला परवडणारं नसतं. दरवर्षी कोणीच हातउसने पैसे कसे देतील? काय करावं… काय करावं… विचारा-विचारात 10-12 दिवस उलटलेत. आजची 16 तारीख. 20 तारखेपर्यंत पैसे भरायलाच हवे होते. 2 वर्षं आपण बँकेचा हप्ता भरणं टाळलं, तेच चुकलं. थोडं-थोडं देत राहिलो असतो तर आता असं जड गेलं नसतं. काय करावं… काय.. 20 तारखेला फक्त दोन दिवस राहिलेत. ती टळली तर…

विचार करून-करून त्याचं डोकं शिणलं. शेवटी त्यानं काहीतरी निर्णय घेतला आणि झोपी गेला. सकाळी लवकर उठून त्यानं आईला आवाज दिला, “आई, दोन भाकरी जरा लवकर टाकशील. सोमवार बाजारात जाऊन वर्षभरासाठी ठेवलेली ज्वारी विकून टाकतो. आलेल्या पैशात थोडीफार हातउसन्याची भर टाकून बँकेचा हप्ता भरून टाकू.”

“आरं पन मग वर्सभर आपन का खावाचं?”

“30-35 रुपये किलोची ज्वारी दर आठवड्यात विकत आणून खाऊ ना आई. या जगाचा न्यायच उफराटा आहे त्याला तू आणि मी तरी काय करणार…?”

अरुणा सबाणे,

ए-506, गणेश गौरी अपार्टमेंट, गुमास्ता ले आऊट, कोतवालनगर, नागपूर-15

लेखिका संपर्क ः 99700 95562


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]