अच्युत गोडबोले -

नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीविषयी मी ऐकून होतो, पण जेव्हा दाभोलकरांची मी व्याख्याने ऐकली, त्यावेळी मी त्या सर्व चळवळीकडे आकर्षित झालो. याची दोन महत्त्वाची कारणे होती, एक – दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची मांडणी, त्या चळवळीतील सगळा विज्ञानवाद, विवेकवाद. तो मला आकर्षून गेला. माझे लहानपणापासूनचे views होते, लहानपणी मी खूप देवभक्त होतो. माझ्या ‘मुसाफिर’ या आत्मचरित्रात म्हटलेले आहे. पण नंतर मी विज्ञानवादाकडे वळलो. आता मी आईनस्टाईन जसा निसर्गाला देव मानायचा तसा मी निसर्गाला देव मानतो, माणुसकीला धर्म मानतो. म्हणजे कुठल्या तरी देवळात देवासमोर तासभर उभे राहून, नंतर पैसे दान करण्यापेक्षा त्या वेळेत मी कोणाला तरी गणित शिकवीन आणि त्या पैशात गरिबाला औषधं घेऊन देईन. मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे लवकर जा, असे माझे सरळ म्हणणे असते. तर त्या विचारांशी जुळणारे हे views मला वाटले. दाभोलकर कधी उघडपणे देवा-धर्मावर टीका करताना दिसले नाहीत. मी त्यांची भाषणे ऐकली. इतकी सुंदर आहेत ती! म्हणजे देवाबद्दलचे विवेचन दाभोलकरांनी केलेले आहे ते अप्रतिम आहे. दोन-तीन तर्हेने विवेचन केलेलं आहे. देव आहेच की नाही? असलाच तर तो पूर्ण नियंत्रक आहे का? तो जर सगळ्यांचे चांगले करतो तर आपल्याला एवढ्या वाईट गोष्टी कशा काय दिसतात? याचे त्यांनी सखोल विवेचन केले आहे. तसेच मला त्यांचे ज्योतिषावरचे व्याख्यान प्रचंड आवडलं. विवेकानंदांचा ज्योतिषावर मुळीच विश्वास नव्हता. नरेंद्र दाभोलकरांचे मोठे बंधू दत्तप्रसाद यांचे विवेकानंदांवर सुपर्ब भाषण आहे. पण आपल्यात जे पसरवले जाते- विवेकानंद हे भगवी वस्त्रे घातलेले धर्मप्रचारक होते. मात्र तसे नसून ते खूप विवेकवादी, विज्ञानवादी पण होते आणि ते धर्मांध नव्हते. हा दत्तप्रसाद दाभोलकरांनी मांडलेला विवेकानंद आहे तो मला पुन्हा नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारात दिसला. हे पहिल्यांदा वैचारिक नातं जुळलं, त्यानंतर मग आमच्या गाठीभेटी झाल्या. मला नरेंद्र दाभोलकरांमध्ये अतिशय सच्चा माणूस दिसला. साधा राहणारा, उत्तम डॉक्टर, दर क्षणा-क्षणाला चळवळ जगत असलेला माणूस दिसला. म्हणजे ९ ते ५ मी आपले भाषण देऊन आलो, आता माझे आयुष्य वेगळे असं नाही. हा रात्रंदिवस चळवळ जगला मनुष्य! प्रत्येक क्षण हा चळवळ जगला. मला त्यांनी दोन-तीन वेळेस त्यांच्या मुख्य कार्यक्रमाला बोलवलं होते. एकदा इस्लामपूरला, नंतर एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनला गेलो होतो. माझ्याहस्ते पारितोषिकं दिली होती. त्यांना माझ्याविषयी खूप प्रेम होतं. म्हणजे मी जी ‘थैमान चंगळवादाचे’ ही पुस्तिका काढली, ती केवळ दाभोलकरांमुळेच काढली. (मिलिंद देशमुख- त्याच्या रॉयल्टीचा चेक अजून पण आम्हाला येतो.) चंगळवादाचा, अंधश्रद्धेचा, वातावरण बदलाचा आणि एकंदरीतच आपल्या जीवनशैलीचा संबंध बाहेर यावा असे दाभोलकरांना वाटायचं. त्यामुळे त्या पुस्तिकेचे प्रकाशनही दाभोलकरांनीच केलं.
एक गंमत सांगतो. सांताक्रूझला आमचे स्नेही आहेत, त्या स्नेह्यांकडे जेवायला त्यांना घेऊन गेलो. ते अगदी फ्रेन्डली असायचे. म्हणाले, “चल अच्युत.” वाटेत झाडाची फांदी पडलेली दिसली. हा माणूस पटकन गाडीतून उतरला आणि झाडाची फांदी बाजूला केली. म्हणजे तिथल्या तिथे पटकन गोष्टी करणे, साधे राहणं. त्यांनी कधी अमुक अमुकच पाहिजे अशा कुठल्याच अटी घातल्या नाहीत. दाभोलकरांइतका साधा मनुष्य मी कधी बघितला नाही. त्यांच्या भाषणाच्या वेळी झालेल्या घोषणा, त्यांच्यावर झालेले हल्ले, वाद मी प्रत्यक्ष बघितले, त्या वेळीही ते शांतपणे तर्कशुद्ध उत्तरे देत असत. या सगळ्या कार्यक्रमात ते उत्साही दिसायचे. संघटना बांधण्याचे कौशल्य, स्वच्छ कारभार करण्याचे गुण त्यांच्यापाशी होते.
एका बाबतीत मी त्यांना नेहमी सांगत असे की, तुम्ही सामाजिक विषमतेविषयी नेहमी बोलता किंवा बाबा कसे फसवतात याच्याविषयी बोलता, पण आपल्या इथे मोठी आर्थिक विषमता आहे. त्याविषयी देखील तुम्ही तेवढीच मोठी चळवळ उभी केली पाहिजे. मी माझ्या अनर्थ पुस्तकात त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ साली दाभोलकर असते तर त्यांना ते पुस्तक प्रचंड आवडलं असतं. मला अजूनही असं वाटतं की आर्थिक विषमतेविरुद्ध चळवळ उभी केली पाहिजे होती. हे मी सकारात्मकपणे बोलत आहे. पण त्यांनी बुवाबाजी विरुद्ध केलेलं काम जबरदस्त होतं. मला वाटतं, ती काळाची गरज होती. आपला समाज प्रचंड अंधश्रद्धेच्या मागे लागलेला आहे. मोठमोठ्या राजकारण्यापासून ते खेडुतांपर्यंतचे लोक बाबा-बुवाच्या मागे जातात. पैसा खर्च करतात, वेळ खर्च करतात आणि चुकीचे निर्णय घेतात. आपल्याला शेकडो दाभोलकरांची गरज आहे. मुक्ता-हमीद आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते अंनिसची चळवळ पुढे नेत आहेत, हे बघून खूप बरं वाटतं आहे.
दाभोलकरांच्या खुन्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. वेगवेगळी सरकारं आणि गेली. एकाच सरकारमुळे झाले असंही नाही. हे प्रकरण पुढे जावं आणि खुन्यांना शिक्षा व्हावी पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अंनिस पुढे जाणे आणि लोकांमधील अंधश्रद्धा कमी होणे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. नरेंद्र दाभोलकर माझा जवळचा मित्र, त्याचा इतका वाईटपणे शेवट व्हावा! त्यानंतर मला किमान पाच रात्र झोप आली नाही. मी फार अस्वस्थ होतो.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनमध्ये सभा होती. त्या सभेत गिरीश कुलकर्णी होता, अतुल पेठे होता, अनेक पुरोगामी लोकं होती, मी पण त्या सभेला हजर होतो. मोर्चा काढला होता. निगर्वी, नि:स्वार्थी, पूर्ण विज्ञानवादी, कायम लोकांच्या हिताचा प्रयत्न करणारा असा माणूस दुर्मीळच आहे.
– अच्युत गोडबोले