मुले सोडण्याच्या अंधश्रद्धेमुळे

महेंद्रकुमार मुधोळकर - 9881520002

महाराष्ट्रात आज देखील अंधश्रद्धेपोटी मुले देवाला सोडली जातात. आश्रमात राहणार्‍या या मुलांचे लैंगिक शोषण झाले तर आश्रम चालक मौन बाळगतात. बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा भागातील वेगवेगळ्या आश्रमांमधून 12मुलांची सुटका करण्यात आली. त्याचा बीड येथील पत्रकार महेंद्र मुधोळकर यांनी घेतलेला आढावा

शहीद नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या विचारांची आजही समाजाला किती गरज आहे, याची प्रचिती देणार्‍या घटना दररोज पुरोगामी महाराष्ट्रात उघड होताहेत. त्यात बीडच्या महानुभाव पंथाच्या नावे चालविल्या जाणार्‍या मठांमध्ये होरपळणार्‍या कोवळ्या मुलांच्या ताज्या प्रकरणाने नवी भर पडली आहे. कुणी आई-बाप आपला दुर्धर आजार बरा व्हावा म्हणून, कुणी आई-बाप आपल्याला मुलगा व्हावा म्हणून, कुणी गरिबी दूर होऊन संपत्ती मिळावी, कुणी आपल्यामागे लागलेला शाप मिटावा म्हणून; तर कुणी मुलीच होत असल्याने मुलगा हवा म्हणून स्वत:ची लेकरे महानुभाव पंथाच्या या मठामध्ये आणून देवाला सोडतात आणि त्या कोवळ्या मुलांचे तिथे शारीरिक व मानसिक शोषण होते, ही गोष्ट पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारीच आहे. महानुभाव पंथाचे तत्त्वचिंतक श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रगत विचारांची माती केल्याचे मठातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने अधोरेखित केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी जोडपे. त्यांना लागोपाठ दोन मुलीच झाल्या. तिसरा तरी मुलगा व्हावा म्हणून या जोडप्याने बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा घाटात असलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या मंदिरात पोईच्या देवाला एक नवस बोलला. या पोईच्या देवाची वेगळीच आख्यायिका आहे; पण महानुभाव पंथाचे अनुयायी या देवाला खूप मानतात. ‘तुला स्वत:ची पोरगी सोडतो, मुलगा होऊ दे,’ असा तो नवस. बोलल्याप्रमाणे या जोडप्याने आपली सहा महिन्यांची चिमुकली मुलगी या देवाला आणून सोडलीही. या देवाला आणि श्री चक्रधर स्वामींच्या मंदिराला चिकटून या पंथातील अनेक ‘स्वयंघोषित’ मठाधिपती असलेल्या महाराजांनी चार-चार, पाच-पाच खोल्या बांधून आपापले मठ थाटले आहेत. अशी सोडलेली मुले अशाच मठात हे मठाधीश घेऊन सांभाळतात. ती सहा महिन्यांची मुलगीही यातील एका मठात वाढत होती. अधून-मधून आई-वडील यायचे आणि विचारपूस करून जायचे. या मुलीला सोडल्यानंतर त्यांना मुलगा झाल्याने त्यांचा या देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला. आता ती मुलगी चौदा वर्षांची आहे. ती लहानपणापासून मठातच वाढली. या मठात अनेक भक्त येऊन राहत असतात. लॉकडाऊनच्या काळात असाच सोलापूरचाच एक चाळीस वर्षीय विवाहित प्रौढ भक्त या मठात आला आणि त्याची नजर या चौदावर्षीय मुलीवर पडली. त्याने तिचे अपहरण केले आणि शोषणही.

मठाधिपतींनी यावर मौन धारण केले. परंतु याची कुणकुण त्या मुलीच्या आई-वडिलांना लागली. मुलीचे तोंड पाहायला अध्ये-मध्ये येणारे आई-वडील बीडमध्ये आले. त्यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्या मुलीच्या अपहरणाची केस दाखल केली. पोलिसांत केस दाखल केल्याचे समजताच ‘त्या’ भक्ताने मुलीला एका रात्री मठाजवळ सोडले आणि पसार झाला. मुलगी परत आली, तरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कायदेशीर सोपस्कर पार पाडताना आधी तिची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्या मुलीला बाल न्यायालयापुढे नेले आणि तिच्या पूर्वेतिहासासकट या मठांमध्ये अशीच सोडलेली अनेक मुले असल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी चक्रे फिरविली. पोलिसांनी मठ गाठून तेथील सर्व मुले ताब्यात घेतली. तिच्यासकट 12 अल्पवयीन मुले त्या मठांमध्ये आढळून आली, ज्यात पाच मुली आणि सात मुले होती. बाल न्यायालयाच्या सहकार्याने पोलिसांनी मठाधिपतींसकट त्या सर्व मुला-मुलींच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावून घेतले, तेव्हा अनेक बाबी समोर आल्या. यातील अनेक पालकांनी स्वेच्छेने आपली मुले त्या देवाला सोडली होती. एखादा अपवाद वगळता सार्‍यांची कारणे ही अंधश्रध्देच्या मुळाला खतपाणी घालणारीच निघाली. कुणाला चार-पाच मुली झालेल्या. त्याने मुलगा झाला तर एक मुलगी सोडतो, असे आश्वासन दिले होते; तर कुणाला तरी गंभीर आजारांपासून सुटका व्हावी म्हणून मूल देवाला सोडायचे होते. कुणाला साडेसातीपासून सुटका होण्यासाठी, तर कुणाला गरिबी दूर होण्यासाठी मूल देवाला सोडायचे होते. बारापैकी फक्त एक मूल असे होते की, पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केलेल्या महिलेने पहिल्या पतीचे मूल या मठात आणून सोडले होते. बाकी सारी मुले निव्वळ अंधश्रध्देतूनच या मठांमध्ये आणण्यात आली होती.

आपल्याकडे आजही देवाला गायी, कटाळ्या, हल्या सोडला जातो, तशाच पध्दतीने मुरळी, वाघ्या, देवदासी म्हणून बायामाणसे सुध्दा देवाला सोडतात; पण अशाच पध्दतीने मुले सोडतात, हे एकूणच धक्कादायक वाटते. श्री चक्रधर स्वामींनी जाती-पातींना विरोध केला होता. अठरापगड जातींच्या 33 कोटी देवांना नाकारून ‘एकेश्वरवाद’ समाजात रुजविला होता. इतकेच काय, तर ‘तुम्ही संसार करून झाल्यावरही सर्वसंगपरित्याग करून विरक्त होऊन धर्मकार्य करू शकता,’ हा आधुनिक विचार भारतीय समाजात पेरून नवविचारांची पेरणी केली होती. मुले देवाला सोडतात हे जितके धक्कादायक आहे, तितकेच माणुसकीलाही काळीमा फासणारेही. बालपणाचे वय हे न कळण्याचे आहे. या वयात माणूस सदसद्विवेकबुध्दीने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. या वयात या मुलांची अशी मठात राहण्याची खरोखर इच्छा तरी असते का? त्यांच्या सुरक्षिततेची तिथे काय हमी असते? त्यांचे शोषण झाले तर त्यावर न्याय तरी होतो का? खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर ही वेळ आणणे, हे आधुनिक विचाराधारा माणणार्‍या 21 व्या शतकात न शोभणारेच ना; पण अंधश्रद्धा आजही लोकांच्या मेंदूमध्ये इतक्या घट्टपणे घुसून बसल्या आहेत की, तिथे विवेक आपोआप गहाण पडतो. याचेच हे उदाहरण होय.

अनाथ मुलांचा सांभाळ ही चांगली बाब आहे; पण तीही कायद्याच्या अधीन राहून व्हायला हवी. बालगृह चालू करण्याचे काही शासकीय नियम आहेत. हे नियम अशा धार्मिक संस्थांना माहीत नाहीत का? ते कायदेशीर करण्याची त्यांना गरज का वाटत नाही, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुन्हा एकदा यासाठी की, याच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणार्‍या पांचाळेश्वर येथील कृष्णराज बाबाला आपल्याच मठातील सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक झाली होती. विशेष म्हणजे या अत्याचाराचा त्या मुलीला एवढा मोठा धक्का बसला होता की, आजतागायत ती मुलगी मुकी आहे. या घटनेला पाच वर्षेझाली. त्यानंतर आता ही मांजरसुंबा येथील मठाची घटना. या दोन्ही घटना मठांमध्ये असलेली मुले सुरक्षित नाहीत, हेच ठळकपणे अधोरेखित करतात. कारण या प्रकरणातही सांभाळ करणार्‍या मठाधिपतींनी अपहरण होताच फिर्याद द्यायची तसदी सुध्दा घेतली नव्हती; उलट मुलगी पळून गेल्याचे त्यांना दु:ख होते. ही बाबही तितकीच गंभीर आहे. सहा महिन्यांचा पोटचा गोळा या देवाला सोडताना पाझर न फुटलेल्या आई-बापालाच कसा पाझर फुटला? आणि त्यांनी सोलापूरहून बीडमध्ये येऊन याबाबत फिर्याद दिली, हेच मोठे नवल म्हणावे लागेल.

मठामध्ये 12मुले आढळली होती, 11पालकांच्या ताब्यात दिली

तत्त्वशील कांबळे, सदस्य बालकल्याण समिती

बीडच्या या मठांमध्ये एकूण बारा मुले आढळून आली होती, ज्यात सात मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे. ही सर्व मुले अल्पवयीन होती. एकाचे वय 3 वर्षे, तिघांचे 6, एकाचे 5, एकाचे 8, एकाचे 11, एकाचे 13, तर एकाचे 15 वर्षेआहे. हे सोडून ती मुलगी चौदा वर्षांची होती. एका भक्ताने अल्पवयीन मुलीवरील केलेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यावर आम्ही इतर मुलांनाही पोलिसांकरवी ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. एका पालकाने मुलाला सांभाळू शकत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याची रवानगी मात्र शासकीय बालगृहात करण्यात आली आहे.


‘पोक्सो’ कायदा (POCSO ACT) म्हणजेच ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012’ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे. या कायद्यानुसार तयार करण्यात आलेले नियम सुद्धा नोव्हेंबर 2012 मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत. ‘पोक्सो’ हे ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस’चे लघुरूप आहे. भारतात जगातील सर्वांत जास्त बालके राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील बालकांची संख्या 47.2 कोटी आहे. त्यात मुलींची संख्या 22.5 कोटी आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम 21 नुसार भारताने बालकांच्या संरक्षणाची खात्री दिलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्क जाहीरनाम्यावर सुद्धा भारताने 11 डिसेंबर 1992 रोजी स्वाक्षरी केलेली आहे. भारतातील बालकांवरील लैंगिक अत्याचारविरोधी कायदे देशाच्या बालक संरक्षण धोरणाचा भाग म्हणून अधिनियमित करण्यात आले होते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण बालकांपैकी 24 टक्के बालकांवर लैंगिक अत्याचार होतात. यातील निम्मे अत्याचार बालकांच्या विश्वासातील प्रौढ व्यक्तींनी केलेले असतात. त्यामुळे एक स्वतंत्र कायदा करण्याची गरज भासत होती. हा कायदा लिंग-उदासीन आहे. तो मुलगे आणि मुली दोघांनाही लागू होतो. ‘पोर्नोग्राफी’च्या संदर्भात बालकांचा समावेश असलेली ‘पोर्नोग्राफी’ पाहणे किंवा जवळ बाळगणे हा सुद्धा या कायद्यान्वये गुन्हा ठरवण्यात आला आहे. बालकांच्या लैंगिक छळात सामील होणे हा सुद्धा या कायद्यानुसार गुन्हा आहे. केवळ अत्याचार करणाराच नव्हे, तर अत्याचाराची माहिती असूनही तक्रार दाखल न करणारी व्यक्तीसुद्धा या कायद्याद्वारे गुन्हेगार मानण्यात आलेली आहे. भारतातील खटला चालवण्याची थकवणारी प्रक्रिया मुलांसाठी लक्षणीयरीत्या सुलभ करण्याच्या दृष्टीने या कायद्याद्वारे प्रक्रियेत अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी

* पीडित बालकाचे/बालिकेचे नाव उघड केले जात नाही.

* तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस पीडित व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात; शक्यतो महिला पोलीस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात.

* सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.

* न्यायालयात खटला दाखल केल्यावर ‘इन कॅमेरा’ साक्ष नोंदवली जाते.

* कोणत्याही कारणासाठी कोणत्याही बालकाला रात्री पोलीस ठाण्यात थांबवून घेतले जात नाही.

* जर पीडित व्यक्ती बालिका असेल तर स्त्री डॉक्टरांकडूनच वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते.

* पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा बालकाचा विश्वास असलेल्या प्रौढाच्या उपस्थितीत केली जाते.

संदर्भ : विकिपीडिया


शोषणमुक्त व स्वच्छंदी बालपण हा मुलांचा हक्क

मनीषा तोकले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, बीड

बीडच्या मठात उघडकीस आलेली ही घटना गंभीर आहे. अशी शेकडो मुले-मुली देशभरातील विविध संप्रदायांच्या विविध मठांमध्ये असण्याची शक्यता आहे. यातील अनेक मुले अशाच शोषणाचे बळी ठरत असतील. एकूणच, या सार्‍यांच्या वेदना आणि आवाज आता तरी सरकार, प्रशासन आणि बालकांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या हृदयाला या निमित्ताने भिडायला हवा. बीडच्या या घटनेने ऐरणीवर आलेल्या या प्रकरणातून बोध घेऊन ‘शोषणमुक्त व स्वच्छंदी बालपण’ ही विशेष मोहीम राबविण्याची नितांत गरज वाटते. धर्म आणि संप्रदायांच्या विचारांचे अनुकरण हे ज्याचे-त्याचे स्वातंत्र्य आहे; पण संप्रदाय आणि धर्मालाही कोवळे बालपण करपवण्याचा आणि जाळण्याचा काहीही अधिकार नाही. ही बाब या क्षेत्रात काम करणार्‍यांना धर्म व पंथांच्या अनुयायांना आणि कायदा राबविणार्‍यांच्या वेळीच लक्षात यायला हवी; नाही तर अशी प्रकरणे घडतच राहतील.


आरोपीला अटक केली असून सध्या न्यायालयीन कोठडीत

पोलीस निरीक्षक सुजित बडे

या प्रकरणातील आरोपीला आम्ही अटक केली. तो आरोपीही सोलापूरचाच आहे. अटकेनंतर त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात नेले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपी विरुध्द भा. दं. वि. कलम 363, 366 अ, 376 आणि ‘पॉक्सो’ कलम 1,2,3 अशी कलमे लावण्यात आली असल्याची माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.