मला आवडलेले दहा अभिनव चमत्कार

प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे - 9969473702

आदिम काळापासून मानवी मनाला चमत्कार भुरळ घालतात. त्यामुळे माणसं सहज बुवाबाजीची शिकार होतात. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणरायाला दूध पाजण्याचा असा चमत्कार घडला नाही; प्रत्यक्षात हितसंबंधी लोकांनी नियोजनबध्द पद्धतीने घडवून आणला. तो दिवस गेल्या 25 वर्षांपासून ‘महाराष्ट्र अंनिस’ व इतरही पुरोगामी विचारांच्या संघटना ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून साजरा करतात. यावर्षी या घटनेला 25 वर्षेपूर्ण झाली, म्हणून ‘महाराष्ट्र अंनिस’ने पूर्ण एक महिना म्हणजे 20 ऑगस्ट (शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा करण्यात येणारा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’) ते 21 सप्टेंबर (‘चमत्कार सत्यशोधन दिन’) पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची ऑनलाईन व्याख्याने, चमत्कार सादरीकरण स्पर्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार, प्रबोधनाबाबत रोज दोन पोस्टर प्रदर्शित करून त्याचा प्रचार व प्रसार व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे करण्यात आला. यानिमित्ताने घेतलेल्या चमत्कार सादरीकरणाच्या स्पर्धेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. त्यासाठी स्पर्धकांनी चमत्कारांचे व्हिडिओ बनवून समितीकडे पाठविण्यात आले होते. या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आली.

1) या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतून 10 स्पर्धकांनी 106 प्रयोग सादर करून तीन विविध गटांत सहभाग नोंदविला. गट कार्यकर्ता, कार्यकर्ता कुटुंब व खुला गट. 2) काही चमत्कार पूर्णपणे अभिनव पद्धतीने सादर करण्यात आलेे होते. 3) काही चमत्कारांची पुनरावृत्ती झालेली आढळली. 4) काही कार्यकर्त्यांनी दोन-तीन प्रकारचे चमत्कार सादर केले होते. 5) सादरीकरण चांगले असूनही काही प्रयोगांमध्ये सादरीकरण, वेळेचे, मर्यादांचे भान राहिले नाही. त्यामुळे ते मागे पडले. 6) काहींनी बाबा, बुवा, माताजी, फकीर यांचा पेहराव करून नाट्यपूर्ण पद्धतीने प्रयोगांचे सादरीकरण केले होते. 7) काहींनी बुवा-बाबांची पोलिसी पेहरावात भांडाफोड करण्याचे प्रात्यक्षिक देखील सादर केले होते. 8) काहींना प्रयोगाकरिता प्राथमिक तयारी करण्यात अपयश आलेले होते. 9) काहींनी मात्र विद्यार्थी जसे प्रयोग सादर करतात, तसे चक्क विज्ञानाचे प्रयोग सादर केलेे होते. 10) काही कुटुंबांतील व्यक्तींचे सादरीकरणाचे व्यवस्थित रेकॉर्ड न झाल्यामुळे कुठे आवाजाची कमी, तर कुठे अधुरे रेकॉर्डिंग दिसून आले. 11) काही जणांना व्हिडिओ ‘अंनिस’च्या साईटवर ‘अपलोड’ होण्यास अडचणी आल्या. 12) काहींनी यापूर्वी कधीही न पाहिलेले असे अभिनव प्रयोग सादर केलेले होते. 13) सर्व बाल कलाकारांनी; प्रामुख्याने मुलींचा सहभाग असलेले प्रयोग फारच छान व भविष्यात चळवळीला आशादायी, असे चित्र जाणवले. 14) काही प्रयोग हे कोरोना महामारीनिमित्ताने पसरवण्यात येणार्‍या छद्मविज्ञानातील भोंदूगिरीवर प्रकाश टाकणारे होते. 15) काहींनी चक्क डिजिटल तंत्रज्ञान, अघोरी प्रकार व अतींद्रिय शक्तींद्वारे चालणारी बुवाबाजी प्रयोगाद्वारे मांडलेली आढळली.

या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून माझ्या सोबत डॉ. अनमोल कोठाडिया, कोल्हापूर (चित्रपट समीक्षक, फिल्म क्युरेटर, चित्रपट-शिक्षक, कार्यकर्ता, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट ज्युरी व रिसोर्स व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत.) हे होते. त्यांच्या तज्ज्ञतेचा खूप फायदा झाला. एकूण सादर झालेल्या प्रयोगांपैकी 90 प्रयोगांचे परीक्षण व निरीक्षण खालील वैशिष्ट्यांच्या आधारे करण्यात आले. (1) प्रास्ताविक-प्रयोगांची मांडणी – 10 गुण (2) प्राथमिक तयारी – 10 (3) वेशभूषा व चेहर्‍यावरील हावभाव – 10 (4) सादरीकरणातील धीटपणा व सफाई – 20 (5) शास्त्रीय कारणमीमांसा – 20 (6) शेवटचा संदेश – 10 (7) वेळेचे नियोजन – 10 (8) सादरीकरण करणार्‍या व्यक्तीचे वय – 5 (9) सादरीकरणातील नाविन्य व अनुभव – 5. अशा कसोट्यांतून ते उतरले ते बक्षीसपात्र ठरले.

आज आपण काही असे प्रयोग पाहणार आहोत, जे वरील कसोट्यांमध्ये उतरले नसतीलही; मात्र ते अभिनव (नाविन्यपूर्ण) होते व त्यातून काहीतरी वेगळे तत्त्व कार्यकर्त्यांना सापडण्यास मदत होईल, अशा 10 अभिनव चमत्कारांची माहिती मी सादर करीत आहे. त्यांना आपण ‘इन्नोव्हेटिव्ह टॉप टेन’ म्हणूया.

1) ‘सॅनिटायझरची नवी ओळख व त्यातून बुवाबाजी’ असा आगळा-वेगळा प्रयोग सादर केला होता, दोघे बहीण-भाऊ अनुष्का व आविष्कार निंबाळकर, ठाणे यांनी. ते असे म्हणतात की, कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपणा सर्वांना परिचित झालेले सॅनिटायझर यापुढे केवळ निर्जंतुकीकरणासाठीच नव्हे, तर उघड-उघड बुवाबाजी करण्यासाठी वापरण्याचा धोका आहे. त्यांनी सॅनिटायझरला हिमालयातील ‘कपिला गाईचे तूप’ संबोधून एका वाटीत घेतले व त्याची बोटाने चवही घेऊन दाखवली. नंतर ते पेटविले; परंतु त्याची निळसर ज्योत मात्र अजिबात दिसत नव्हती. अशा ‘अदृश्य’ ज्योतीवर त्यांनी त्यांच्या ‘दिव्यशक्ती’ने कागद व गवताची चूड पेटवून दाखविली. प्रयोग पूर्णपणे वेगळा होता. दोघा बहीण-भावांनी इंग्लिश व मराठी संभाषणाद्वारे सादर केला होता. वय खूपच लहान असूनही सुरक्षिततेच्या टिप्सही त्यांनी सॅनिटायझरबाबत नमूद केल्या.

2) सोलापूरच्या विनायक माळी यांनी आपल्या सहकार्‍याच्या मदतीने 20 किलो लाकडी कोळसा पेटवून त्या धगधगत्या लालबुंद निखार्‍यांवरून चक्क ते व त्यांच्या साथीदारांनी चालण्याचा प्रयोग सादर केलेला होता. प्रयोगात वेळेची मर्यादा पाळली गेली नाही, तरीसुद्धा अग्नीवर चालण्यासाठी आवश्यक असलेल्या काही प्राथमिक बाबी सांगताना त्यांनी नमूद केले होते की, आगीच्या दोन्ही बाजूला एक तर माती ओली करून ठेवणे आवश्यक असते किंवा गोणपटाच्या घड्या पाण्याने भिजवून ठेवणे गरजेचे असते. खरे म्हणजे यात्रा, जत्रा, उरूस वगैरेंमध्ये अशा प्रकारचे विधी एक धार्मिक रीतिरिवाज म्हणून करतात. तेथे कोळसे पेटवतात (पूर्णपणे), त्यावर चालण्यापूर्वी खडे मीठ (बाजारी मीठ) शिंपडले जाते. त्याचे कारण मिठाने आगीची दाहकता कमी होते व तडतड आवाजाने गरम राख उडून जाते किंवा सुपाने हवा मारून गरम निखार्‍यांवरील राख उडविली जाते. त्यामुळे पाय पोळण्याची शक्यता कमी होते. पायाला ओली माती लावणे, पायावर शरीर शुद्धीकरणाच्या नावाखाली पाणी ओतणे या सर्व क्रियांद्वारे आगीची दाहकता कमी करून तीन सेकंदात अग्नी पार केल्यास भाजण्याची शक्यता फारच कमी होते. कोळसे पेटवताना पेट्रोल, डिझेल वापरू नये. कारण ते जास्त ज्वालाग्राही असते. त्या ठिकाणी रॉकेलच वापरावे. अतिलहान मुलांना अग्नीवरून चालण्यासाठी आवाहन करू नये. कारण त्यांच्या पायाची त्वचा जास्त नाजूक असते.

3) नांदेडचे सम्राट हाटकर यांनी चक्क पाण्यावर वीट कशी तरंगू शकते, याचा एक अभिनव प्रयोग सादर करून रामायणातील ‘रामसेतू’ उभारण्यातील ‘जय श्रीराम’ दगडावर लिहून दगड तरंगले होते. या कथेतील फोलपणा उघडा पाडला. या पाण्यावर तरंगणार्‍या विटेचे रहस्य सांगताना ते म्हणतात, “ही वीट सेल्युलर लाईटवेट काँक्रीट + सिमेंट + दगडी कोळसा + पाणी यांच्या मिश्रणातून बनवतात, त्यावेळी त्याच्या आतमध्ये हवा सोडली जाते. त्या हवेचे ‘बबल्स’ विटेमध्ये ‘ट्रॅप’ होतात, म्हणजे अडकतात. त्यामुळे विटेचे वजन कमी भरते. अशी वीट आकारमानाने जरी मोठी असली, तरी वजनाने कमी भरते. त्यामुळे पाण्यात टाकताच तिच्या आकारमानानुसार जास्त पाणी बाजूला सारले जाते. त्या पाण्याचे वजन विटेच्या वजनापेक्षा जास्त भरते. त्यामुळे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार वीट पाण्यावर तरंगते. त्यात कोणतीही दैवी शक्ती वगैरे नसते.

याबाबत पौराणिक कथेतील फोलपणा स्पष्ट करताना ते म्हणाले की, जेव्हा केव्हा पृथ्वीवर ज्वालामुखी उसळतो, तेव्हा भूपृष्ठाखालील अग्निरस (लाव्हा रस) सोबत काही अग्निजन्य खडक बाहेर पडतात. त्यात हवा अडकून पडते. पुढे ते थंड झाले की, ते सच्छिद्र बनतात. त्यामुळे असे दगड पाण्यावर तरंगतात. त्यावर कुणाचे नाव लिहिले काय आणि नाही लिहिले, तरी ते आपल्या गुणधर्मानुसार तरंगणारच. यांना शास्त्रीय भाषेत ‘प्युमिस’ (pumise) असे संबोधतात. पुरातत्त्व खात्यामध्ये असे दगड आपणास बघायला मिळू शकतात.

4) चाकण, जि. पुणे येथील अतुल सवाखंडे यांनी खूपच नाविन्यपूर्णरित्या प्रयोग सादर केलेला होता. कोकणातील भगत, मांत्रिक, तांत्रिक या प्रकारे कोंबडी संमोहित करण्याचा प्रयोग करून चेटूक, भूतबाधा, जारण-मारण, काळी जादू वगैरे दूर करण्याच्या नावाखाली चक्क लोकांना फसवतात व कोंबडी स्वत:कडे रात्रीच्या पार्टीकरिता ठेवून घेतात. अशा रीतीने सामान्य माणसांचे शोषण केले जाते. कोंबडी कशी संमोहित करायची, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी ते जी कृती करतात, त्याबाबत निवेदन करताना त्यांनी असे विषद केले की, सुरुवातीला कोंबडीचे दोन्ही पाय घट्ट धरून तिला धरणीवर आडवी करायची आणि मग तिचे डोळे झाकतील या पद्धतीने तिच्या मानेवर हलकासा दाब द्यावयाचा आणि दोन्ही पायांवर थोडा जास्त दाबून धरायचे. अवघ्या 15 ते 20 सेकंदांत कोंबडी निपचित पडते. कारण तिला असे वाटते की, आपल्या अंगावर काहीतरी वजनी वस्तू पडलेली आहे. त्यामुळे ती शांतचित्त पडून राहते. मग आपण कितीही थाळ्या, टाळ्या वाजवल्या तरी ती उठत नाही. तिला स्पर्श करूनच उठवावे लागते. यात अजून ‘अ‍ॅनिमल मॅग्नेटिझम’ (प्राणी चुंबकत्व) हे एक नैसर्गिक तत्त्व दडलेले असते, असे म्हटले जाते. ते पूर्णपणे खोटे आहे, हे लक्षात ठेवावे.

5) पोटातून मूतखड्याचे खडे काढण्याचा थोडा आगळा-वेगळा प्रयोग सादर करण्यात आला. खेड (जि. रत्नागिरी) येथील नियती सचिन गोवळकर या मुलीने या प्रयोगाबाबत अधिक स्पष्टीकरण देताना असे म्हटले होते की, काही बाबा, बुवा, जंगली जडी-बुटी देणारे हकीम, युनानी, आयुर्वेद वगैरेंच्या नावाखाली बुवाबाजी करणारे लोक, बिनटाक्याचे ऑपरेशन करणारे फकीर व बंगाली बाबा या तर्‍हेने पोटातून पत्री काढण्याचे प्रयोग करून कसे फसवतात, याचा प्रयोग सादर केला. त्यामध्ये तिने काही गारगोटीचे धुऊन, स्वच्छ केलेले खडे तोंडात अगोदरच लपवून ठेवून केवळ पोटाजवळ तोंडाने खडे ओढण्याचे नाटक करून फसवले जाते व ते तोंडाने दोन-तीन खडे काढून दाखवतात. यातील विशेष कला म्हणजे तोंडात शिताफीने खडे लपवून तुम्हाला संभाषण सहजपणे व सफाईदार करता येणे महत्त्वाचे, नाही तर ते खडे पोटात जाण्याची किंवा बोलताना पडण्याची शक्यताच जास्त.

6) हातावर प्रत्यक्ष येशूचा क्रूस (cross) अतींद्रिय शक्तीने उभा करण्याचा एक नवीन, जरा हटके प्रयोग सादर केला होता कल्याण, जि. ठाणे येथील सर्पतज्ज्ञ दत्ता बोंबे यांनी. साध्या टाचणीने (पिनेने) लाकडी क्रॉस हातावरील त्वचेत खुपसून तो नाट्यमयरित्या त्यांनी आत्मीक शक्तीने उभा केल्याचे छान नाटक केले. हा प्रयोग जेव्हा एका ख्रिश्चन फादरसमोरही त्यांनी सादर केला होता, तेव्हा खरोखरच अतींद्रिय शक्ती काही व्यक्तींकडे असते, असे त्यांना वाटले होते, अशी त्यांनी अप्रत्यक्ष कबुली दिल्याचे बोंबे सरांनी सांगितले. येथून-तेथून सब घोडे बारा टक्केच!

7) ‘पंचगव्या’च्या प्रयोगाद्वारे निर्वात हवेची पोकळी व केशाकर्षण या भौतिक तत्त्वाचा आधार घेऊन बुवाबाजी कशी चालते, त्याचे प्रात्यक्षिक सादर केले होते, औरंगाबादच्या प्रज्ञा रंगनाथ खरात (छोटी मुलगी) हिने. सांगली-मिरजेच्या आशा धनाले यांनी तर चक्क ‘पंचगव्या’ऐवजी (गायीच्या शेण) म्हशीचे शेण घेऊन हाच प्रयोग सादर केलेला होता व कडीचा मोठा तांब्या चक्क दगडी पाटावर शेणाने लिंपून चिकटवला होता. त्याची शास्त्रीय कारणमीमांसा करताना पाटा व भांडे यामधील हवेचे बाष्पीभवन कसे होते व ती बाहेर कशी पडते, हे समजावून सांगितले. त्यामध्ये निर्वात पोकळी निर्माण होऊन हवेचा दाब खालून वर असतो, या तत्त्वाचा फायदा होतो व केशाकर्षण तत्त्वाने तांब्या पाट्याला (दगडी पाटा) चिकटतो, यात दैवी सामर्थ्य वगैरे काहीही नसते.

8) रायगड जिल्ह्यातील मोहन भोईर यांनी चक्क बाबांच्या पेहरावात गाय, गोबर व गोमूत्राची (जी-3 फॉर्म्युला) हवा काढली. कोरोना विषाणूमुळे शरीरात घुसलेल्या आजारासाठी काही तथाकथित लोक गोमूत्राची मात्रा लागू पडते, असा छद्मविज्ञानी कावा प्रसारित करताना शरीर शुद्धीकरणासाठी गोमूत्र वापरून पाण्यात ‘बिटॅनिन’ (आयोडिनयुक्त द्रावण) टाकून बाधित पाणी शुद्ध करून दाखवतात. या प्रयोगाचे स्पष्टीकरण देताना मोहन भोईर गोमूत्राचे ‘मार्केटिंग’ कसे केले जाते व त्यातून फुकट मिळणारे गोमूत्र 260 ते 300 रुपये लिटरने कसे विकतात, हेही नमूद केले. त्यांनी प्रयोग करताना दोन प्लास्टिक ग्लासात शुद्ध पाणी घेतले व त्यात चार-दोन थेंब ‘बिटॅनिन’चे (कोविड आयोडिन, जे जखमेवर लावतात) ते टाकले आणि नंतर एका ग्लासात गोमूत्राचे चार-दोन थेंब टाकून ते द्रव्य रंगहीन केले आणि दुसर्‍या ग्लासात चक्क स्वमूत्र (इतर कोणत्याही प्राण्याचे, मनुष्याचे देखील चालू शकते) टाकून त्याचप्रमाणे पाणी रंगहीन झाल्याचे दाखवले. त्याचे अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, यात साधी ‘विरंजना’ची क्रिया घडली. प्रत्येक प्रकारच्या मूत्रामध्ये ‘थायोसल्फेट’ असते (Na2S2O3) त्यात जर ‘बिटॅनिन’ (जे द्रव्य I3- आयोडीनचे तीन अणू असलेले) टाकल्यानंतर रंगहीन ‘सोडियम आयोडाईट’ तयार होते. पाण्याचे शुद्धीकरण वगैरे काही होत नाही. त्यामुळे अशा रीतीने गोमूत्र पिऊन शरीर शुद्ध होत नाही आणि कोरोना विषाणूदेखील मरू शकत नाही. ही चक्क छद्मविज्ञानी बुवाबाजी आहे.

9) कल्याण येथील एक कार्यकर्त्या कल्पना बोंबे यांनी रासायनिक पदार्थाच्या वापराने अतींद्रिय शक्तीचा दावा करून पाणी कसे नष्ट करता येते, त्याचे प्रात्यक्षिक सादर केले होते. या प्रयोगात ते सुरुवातीला एक रिकामा प्लास्टिक ग्लास उलटा करून दाखवतात, नंतर त्यात पाणी भरतात आणि अवघ्या तीन-चार सेकंदांत ग्लास उलटा करून पाणी पूर्णपणे नष्ट झालेले दाखवतात. या बुवाबाजीचे स्पष्टीकरण करताना कल्पना बोंबे मॅडम असे नमूद करतात की, जो ग्लास रिकामा म्हणून उपडा करून दाखवला, तो रिकामा नव्हता, त्याच्या तळाशी अगोदरच ‘स्लॅश पावडर’ (water jelly powder) गम टाकून चिकटवून ठेवलेली होती. त्यावर ग्लासात पाणी टाकताच रासायनिक अभिक्रिया होऊन ‘स्लॅश पावडर’ 500 पट जास्त पदार्थ जेली स्वरुपात खारासारखा तयार झाला व तो पदार्थ ग्लासच्या आतमध्ये चिकटला. ग्लास उलटा केला तरी तो सहज बाहेर पडत नाही. त्यामुळे पाणी गायब झाल्याचा भास होतो. वास्तवात हीच पावडर बाजारात मिळणार्‍या लहान बाळांच्या ‘डायपर’मध्ये कापडी घडीत बंद करून ठेवलेली असते. जेव्हा लहान बाळ लघवी करते, तेव्हा त्या द्रव्याचे क्षणार्धात घनीकरण होते. त्यामुळे मूत्रामुळे अंडर गारमेंट ओलसर होत नाहीत. अशी ही बुवाबाजी अतींद्रिय शक्तीच्या नावापुढे येऊ शकेल.

10) डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे नोटा व पुस्तके खालून हस्तस्पर्श न करता नेत्रशक्तीने कशा तर्‍हेने उचलली जातात, याचा एक प्रयोग बुलढाण्याचे नरेंद्र लांजेवार यांनी सादर करून कार्यकर्त्यांना एक वेगळाच अनुभव तंत्रज्ञानाच्या उपयोगितेचा दिला. यातील डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रथम नोटा/पुस्तके वरून हातातून खाली सोडतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर तोच व्हिडिओ ‘रिव्हर्स’ फिरवून चमत्कार घडल्याचे दाखविले आहे. यात तंत्रज्ञानाची किमया आहे, एवढेच. याच तर्‍हेचा गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध कार्य करणारा व चढावावर गाडी (कार) कशी चढते, याचा एक प्रयोग डॉ. सुषमा खुर्दे (औरंगाबाद) यांनी Anti-gravitational Force कशी काम करते ते दाखविले होते.

अंनिसच्या चमत्कार सादरीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर

गणेश दुग्धप्राशन चमत्काराला या वर्षी 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पर्दाफाश करणार्‍या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडिओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.

या स्पर्धेसाठी कार्यकर्ता, कार्यकर्त्याचे कुटुंबीय सदस्य आणि इतर असे तीन गट करण्यात आले होते. कार्यकर्ता गटास अपेक्षित प्रतिसाद होताच; पण खर्‍या अर्थाने आश्वासक वाटला तो कार्यकर्त्याचे कुटुंबीय सदस्य हा गट. विशेषतः यातील तरुण पिढीही कार्यकर्त्याच्या विचारकक्षेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजून, रुजवून घेत आहे, हे महत्त्वाचे वाटते. या गटात विशेषतः शाळकरी मुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास कौतुकास्पद वाटला.

अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत एकूण 90 व्हिडिओज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आले होते.

ऑनलाईन चमत्कार सादरीकरण राज्यस्तरीय स्पर्धा 2020निकाल पुढीलप्रमाणे

( स्पर्धकाचे नाव / पत्ता / प्रयोगाचे नाव )

1- कार्यकर्त्याचे कुटुंबीय गट :

प्रथम – आनंदी जाधव (इ. 4 थी) (नाशिक) -प्रश्नचिन्हाची करामत गुरुत्व मध्याच्या साह्याने

द्वितीय- अमूर चैताली शिंदे, ठाणे (इ. 8 वी) – पेटता कापूर खाणे.

तृतीय- तन्वी सुषमा परेश (धुळे)- काळी बाहुली नाचविणे- भुताचा खेळ संपविणे

उत्तेजनार्थ- सई भोसले (सोलापूर)- मंत्राने अग्नि पेटविणे

उत्तेजनार्थ- विश्वा शेलार (भिवंडी) – रिकाम्या हातातून नोटा काढणे

2- ‘अंनिसकार्यकर्ता गट :

प्रथम- अतुल सवाखंडे (चाकण ) – कोंबडी संमोहित करणे

द्वितीय- चंद्रकांत शिंदे (सांगली)- साखळीत रिंग अडकवून बाहेर काढणे

तृतीय- भास्कर सदाकळे (तासगाव)- रिकाम्या हातातून कुंकू काढणे

उत्तेजनार्थ- किशोर पाटील (टिटवाळा) – कमंडलूमधून गंगा काढणे-

उत्तेजनार्थ- दत्ता बोंबे (कल्याण) – अतींद्रिय शक्तीने क्रूस उभा करणे-

उत्तेजनार्थ -आशा धनाले (मिरज)- पंचगव्याची पॉवर-

3- इतर खुला गट

उत्तेजनार्थ- तेजस्विनी योगेश (नाशिक)- हळदीचे कुंकू करणे

उत्तेजनार्थ- धनराज रघुनाथ (चंद्रपूर)- काडेपेटीच्या काड्यांची निर्मिती

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रपट नाट्य परीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, कोल्हापूर व ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्तेप्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी काम पाहिले, तर स्पर्धेचे संयोजन राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, सुरेखा भापकर, डॉ. ठकसेन गोराणे, श्रेयस भारूले, अवधूत कांबळे यांनी केले.


खालील कार्यकर्त्यांनी बुवाबाबांचा सर्वधर्मीय पेहराव करून चमत्कार सादर केले, त्यांचे विशेष आभार.

1)सचिन लकडे (लातूर) 2) नरेंद्र लांजेवार (बुलढाणा) 3) रुपेश वानखेडे (यवतमाळ) 4) जादूगार हांडे (रायगड) 5) डॉ. संजय तिडके (अकोला) 6) प्रकाश घादगिने (लातूर) 7) मंजूश्री पोफटे (उत्तर नागपूर) 8) कीर्तिवर्धन तायडे (नंदुरबार) 9) मोहन भोईर (रायगड) 10) तेजस्वी योगेश्वर (नाशिक) 11) भास्कर सदाकळे (सांगली) 12) उल्हास गोसावी (मुंबई).


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]