राजीव देशपांडे -

निवडणुका हा लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव आहे आणि तो साजरा करण्यासाठी सार्या देशाने त्यात सामील व्हावे असे आवाहन करत लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पुढील दोन महिने निवडणूक प्रचारात संपूर्ण देश ढवळून निघणार आहे. आता या प्रचारात गेल्या दहा वर्षांत सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या काळात बिकट झालेले कामगार-शेतकर्यांचे प्रश्न, तरुण मतदारांच्या दृष्टीने सर्वांत जिव्हाळ्याचे असलेले बेरोजगारी, शिक्षणाचे प्रश्न, प्रचंड वाढत असलेली आर्थिक-सामाजिक विषमता, मूठभर धनदांडग्यांची निर्माण होत असलेली आर्थिक मक्तेदारी, महिलांवर होत असलेले लैंगिक अत्याचार, लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला, वैज्ञानिक दृष्टिकोनावरचे हल्ले, बुवाबाजीला मिळत असलेले संरक्षण, देशाच्या संवैधानिक संस्थात्मक व्यवस्थांचा गैरवापर यावर चर्चा होणार की धर्मा धर्मात, जाती-जातीत ध्रुवीकरण होईल, तेढ, द्वेष, असहिष्णुता वाढेल अशी वक्तव्ये, धर्मांध शतींना, विभूति पूजेला बळ मिळेल अशा कृतींचा प्रचार होणार? एकदा का निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या लोकशाही प्रक्रियेला उत्सवी, कर्मकांडी स्वरूप दिले की हे सर्व मूलभूत प्रश्न बाजूलाच पडतात. पण १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करताना या सर्व गोष्टींचा विचार गंभीरपणे करणे गरजेचे आहे.
आज संविधानाची जी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलभूत मूल्ये आहेत ती प्रत्यक्षात व्यवहारात अनुभवायला येत आहेत? तसे यापूर्वीही ही संवैधानिक मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात यावीत म्हणून कामगार, शेतकरी, युवक, महिला, दलित, आदिवासी आंदोलने होत होतीच, पण त्यासाठी अवकाश होता. आज हा अवकाश उपलब्ध आहे? शेतकरी आंदोलनाचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. आजच्या सामाजिक, राजकीय व्यवहारात अवैज्ञानिक, कर्मकांडांनी, वतव्यांनी आणि बुवा, बाबांच्या अनैतिक कृत्यांनी धुमाकूळ घातला आहे. या सगळ्याला आजच्या सत्ताधार्यांकडून पाठबळ मिळत आहेत. त्याची अनेक उदाहरणे यापूर्वीच्या ‘अनिवा’च्या अंकातून दिलेली आहेत. संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार, अंगीकार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे असे सांगितले आहे. पण शैक्षणिक अभ्यासक्रमातूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर संविधान बदलण्यासाठी आम्हाला बहुमत द्या असे सत्ताधारी खासदारांकडून खुलेआम म्हटले जात आहे. या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवले कसे जाते हे महत्त्वाचे आहे. केवळ तरतुदी चांगल्या असून उपयोगाचे नाही. त्याची अंमलबजावणी विवेकी बुद्धीने होते की नाही हे महत्त्वाचे आहे. हा विचार आठवतो. आज आपण जात आणि धर्माचा वापर राजकारणासाठी कसा केला जात आहे हे अनुभवत आहोत. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्या कार्यक्रमाला धार्मिक आयोजनाऐवजी भाजप-संघाच्या राजकीय सोहळ्याचेच स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळेस ‘धर्माला विशिष्ट प्रमाणात महत्त्व आहे, पण राष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व धर्माला दिले, धर्माचा अतिरेक केला तर केवळ विनाशच होणार नाही तर देश पारतंत्र्यात जाण्याची भीती आहे’, हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला धोयाचा इशारा आठवतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एखाद्या अवतारी पुरुषांसारखे प्रसारमाध्यमे पेश करत आहेत. अशा विभूतिपूजेची परिणती अखेर हुकूमशाहीतच होईल हे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, धर्मामध्ये भती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे, मात्र राजकारणात भती हा लोकशाहीच्या अध:पतनाचा.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान त्यांनी हिंदू धर्मातील हजारो वर्षांच्या अन्यायी जातीव्यवस्थेच्या विरोधात दिलेल्या लढ्यामुळे, भारतीय संविधानाच्या निर्मितीतील त्यांच्या निर्णायक सहभागामुळे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने आधुनिक भारताच्या उभारणीत सहभागी असणार्या कोणत्याही नेत्यापेक्षा उत्तुंग बनले आहे. त्यांना आज एक विश्वमान्य विचारवंत मानले जात आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारसरणीशी पूर्णपणे विसंगतच नव्हे, तर विरोधीही असणारे राजकीय पक्षही त्यांच्याशी आपली किती बांधिलकी आहे हे सिद्ध करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रचंड पुतळे उभारणे, स्मारके उभारणे, विविध संस्था, विद्यापीठे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, जयंती उत्सव दणयात साजरे करणे, इ. त्यांचे हे प्रयत्न अर्थातच दलित मतदारांवर डोळा ठेवूनच केलेले असतात किंवा आपल्या सामाजिक समानतेच्या प्रदर्शनासाठी केलेले असतात. त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांच्या आधारे केलेल्या हिंदू समाजाच्या रोखठोक, वैज्ञानिक आणि परखड विश्लेषणाशी काही संबंध नाही. कारण हे विश्लेषण अशा पक्षांच्या मुळावरच येणारे आहे.
आज लाखो दलित तरुणांचेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक शोषणाविरोधात लढणार्या कोणत्याही तरुणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान बनले आहेत. हे तरुण साहित्य, कला, संगीत चित्रपट, नाटक आदी क्षेत्रात, देशी-विदेशी विद्यापीठातून आपल्या आंबेडकरी प्रेरणा उघडपणे मिरवत तेथील राजकारणात, अभ्यासक्रमात आपले स्थान निर्माण करत आहेत. या विशेषांकात आम्ही तरुणाईत अतिशय लोकप्रिय होत असलेल्या रॅप संगीतामधील आंबेडकरी प्रेरणेबद्दलचा लेख, तसेच चित्रपटाच्या पडद्यावर झळकलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा आणि प्रतिमा याबद्दलचा लेख देत आहोत. मराठी साहित्यात दलितेतर साहित्यिकाच्या साहित्यात आंबेडकरी प्रेरणा व प्रतिमा नेमया कशा आणि किती प्रमाणात प्रतिबिंबित झाल्या आहेत याबद्दलचा लेख देत आहोत. तसेच आजच्या लोकशाहीचे प्रतिबिंब संजीव सोनपिंपरे यांच्या चित्रकृतीत पडलेले दिसेल.