-
विवाहासारख्या जीवनातील शुभकार्यानंतर अनेकांनी कोठे जाऊ नये, कोठे जावे, याची परिसीमा ठरवलेली असते; परंतु या परंपरेला फाटा देत पाच दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या दांपत्याने अमावस्येदिवशी येथील लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करून एक अनोखा उपक्रम राबवला. इचलकरंजी येथील कर सल्लागार व अंनिसचे कार्यकर्ते संजय कोले यांच्या मुलाच्या विवाहाप्रीत्यर्थ हा उपक्रम झाला.
कोले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कोणतेही शुभ अथवा अशुभ ते मानत नाहीत. सर्वसाधारणपणे विवाहानंतर नवदांपत्यांना विशिष्ट ठिकाणी जाऊ नये, अशी समाजात रूढी गेली अनेक वर्षे आहे. स्मशानभूमीसारख्या मार्गावरही नवदांपत्यांना अनेक कुटुंबीय पाठवत नाहीत; विशेषत: अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो आणि या दिवशीही नवदांपत्यांना कोठेही बाहेर पाठवले जात नाही. मात्र कोले यांनी या विवाहाप्रीत्यर्थ अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.