प्रा. माधव गवाणकर - 9765336408

बालमित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांनी मांजर पाळले असेल. त्या मनीची पिल्लं तर खूपच मस्त, गोजिरवाणी असतात ना? किती लवकर खेळायला, पळायला लागतात ती! काही लोकांना मांजर फार आवडतं. काय त्याचा थाट असतो! काय त्याचे लाड होतात! ‘मनी, तुला फिश फ्राय हवं ना? पापलेट आणलंय आज..’ असं मम्मीसुद्धा मनीचे लाड करताना बोलत असते. माझ्या एका मित्राने तर मांजरीचं नाव ठेवलं होतं ‘लाडकी.’
‘ती’ माऊ मात्र अगदी वेगळी होती. काळी काळीकुट्ट होती. अंधारात तर दिसायचीच नाही! काळोखात तिचे डोळे तेवढे चमकायचे. त्या काळ्या माऊला पाळायला, सांभाळायला आमच्या वाडीत कुणीच तयार नव्हतं. अगदी लहान पिल्लू होतं, तेव्हापासून ती काळी मांजर एकटीच वाढली. तिला वार्यावरच सोडलेलं होतं, तरी ती जगली. कधी कुणाशी भांडली नाही की, कधी कुणावर रागावली नाही. हिंडून-फिरून, कष्ट करून चांगली धडधाकट झाली!
दुसर्या वाडीत गेली, तरी लोक तिला घालवून द्यायचे. सकाळी तिचं तोंड पाहिलं की, दिवस वाईट जातो, असा बायकांचा गैरसमज होता. ती आपल्या दारापाशी येऊन बसली, तर काहीतरी संकट येणार, असं तरुण मुलांनासुद्धा वाटायचं. चुकीचं पढवलं, मन नको तसं घडवलं की, असंच होतं.
‘त्या’ काळ्या मांजराबद्दलच्या खोट्या-नाट्या गोष्टी वाढतच गेल्या. कुणी म्हणाले, ‘ती रात्री स्मशानाकडे जाऊन येते,’ कुणी म्हणाले, ‘तिच्या अंगावर कुणीतरी ‘स्वार’ आहे,’ म्हणजे तिच्या पाठीवर बसून भूत फिरतं. कुणी म्हणालं, ‘ती एकटक बघत असते…’ आणि वाईट नजरेतून ‘जादू’ करते. बालमित्रांनो, असं काहीही नसतं. लोकांना फक्त तसं वाटतं! कमाल म्हणजे इतर पाळीव प्राणीसुद्धा त्या काळ्या मांजरीला टाळू लागले. खुराड्यातली कोंबडीबाय पण तिच्याशी बोलायची बंद झाली. कोंबडी कोंबड्याला सांगत होती, “ती मेली आली की, माझी पिल्लं मी खुराड्यात लपवते. उगाच काहीतरी ‘जादूटोणा’ करायची आणि माझी बाळं आजारी पडायची! भानगडच नको ती.” मनी दुसरीकडे कुठे राहायला गेली, तर बरं होईल, असं प्राण्यांना वाटायचं. झाडावर बसलेल्या रंगीत मैना काळ्या मनीला बघून चटकन उडून जायच्या. खरं तर या सगळ्या गोष्टींचं त्या काळ्या मनीला खूपच वाईट वाटायचं; पण सांगणार कुणाला? जसं गरीब माणसाला वाटतं की, आपलं कुणी नाही, तसंच त्या मांजरीला वाटत होतं. बोकोबा तर म्हणाला, “मी एकवेळ निळ्या डोळ्यांच्या परदेशी ‘कॅटी’ बरोबर मैत्री करेन; पण काळी कुळकुळीत मांजर मला नजरेसमोर नको!”
मुलांनो, रंग कोणता असावा, हे आपण ठरवतो का? निसर्ग आपल्या त्वचेला रंग देतो. प्राण्यांचेही तसेच आहे. हा गोरा आणि तो काळा असा भेदभाव हवाच कशाला? बरोबर ना?
तर ती बिचारी मांजर जवळजवळ वाळीतच पडली! तिच्याशी कुणी संबंधच ठेवेना. तिचं खरं नाव होतं ‘बिलाडी.’ प्राणी ते नाव विसरून गेले. त्यांनी माणसाचं ऐकून तिचं नाव ठेवलं ‘चेटूकमाऊ.’ चेटूक करणारी, इतरांवर संकट आणणारी ती दुष्ट मांजर आहे, असं प्रत्येकाला वाटू लागलं. या चेटूकमाऊला कळेना. “माझा दोष तरी काय? कुणाचं वाईट केलं मी? धो-धो पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले नदीतले मासे मी पकडले, खाल्ले, हे खरं; पण मासे हे माझं खाणंच आहे. माणसं खात नाहीत का मासे? समुद्रातले मासे तर जाळ्यात पकडले जातात. ते चालतं का? मी मासे धरायला गेले, तर झाडावरच्या त्या बया; म्हणजे सुगरण पक्षी लगेच ओरडायला लागले, “बघा-बघा कशी मासे पकडतेय चेटूकमाऊ! आज मासे पकडतेय, उद्या आमची पिल्लं खायला उठेल!” काय तरी बाई एकेक! या चेटूकमाऊला जंगलातच हाकलून दिलं पाहिजे. रानमांजरांबरोबर राहा म्हणावं गुहेत! इथं माणसांच्या वस्तीत नकोच हे संकट! आम्ही पक्षी म्हणजे माणसाला धरून असतो आणि ही चेटकी आम्हालाच धरायची!”
मग इतर प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी एक सभाच घेतली. त्या काळ्या-काळ्या चेटूकमाऊने रानात निघून गेलेच पाहिजे, असा निर्णय परस्पर घेतला की राव! ठराव मंजूर करतात ना, तसेच काहीतरी. हा अन्यायच होता. मनीनं कुणाचंच काही वाकडं केलं नव्हतं. मग का तिनं गाव सोडून जायचं? बाकीचे कोण मोठे तिला सांगणारे? पोपट तर महालबाड होता. तो म्हणाला, “चेटूकमाऊ, तू जर रानात जाऊन राहिली नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्याविरोधात मोर्चा काढू. इतके सगळेजण अंगावर आल्यावर, ‘तू एकटी काय करणार? पाहू, तुझी जादू कशी चालते ते! ‘काळी जादू’ आहे ना तुझी? ‘जशी तू, त्याच रंगाची तुझी जादू!”
‘ती’ बिचारी बिलाडी म्हणाली, “राघू, तू तरी असं म्हणू नको रे. माझ्याकडे अशी कोणतीही विद्या नाही! मी कुणावरही मंत्र फेकत नाही. स्मशानात तरी मी रात्री कशाला जाणार? तिथे काय आहे? मला एकटीला तुम्ही घेरणार, मारणार – हे तुम्हाला शोभतं का?”…. बोलता-बोलता त्या मनीला रडू येऊ लागलं. राघू तिलाच ओरडाला. म्हणाला, “ये चेटके, थांबव तुझी नाटके! तू रडलीस, तरी संकट येईल, भूकंपसुद्धा होईल. अतिवृष्टीमुळे पूर येईल, नाहीतर चक्रीवादळाचा दणका बसेल. दोन दिवसांच्या आत ही वस्ती सोड! नाहीतर आम्ही तुला बघून घेऊ!” बापरे…! धमकीच म्हणायची ही.
वाडीत सावरी नावाची शाळकरी मुलगी राहायची. गोरी-गोरीपान, फुलासारखी छान. सावरी मनाने प्रेमळ होती. सगळ्यांशी गोड बोलायची. सावरीचं त्या चेटूकमाऊवर लक्ष होतं. तिला प्राण्यांबद्दल भारी माया! तिचे वडील सज्जनराव प्राण्यांचे डॉक्टर होते. त्यामुळे त्या कुटुंबाचा प्राण्या-पक्ष्यांशी आपोआप संबंध यायचा. सावरीला चेटूकमाऊचं दु:खी मन कळलं.
जंगलाची सवय नसताना रानात जाऊन राहावं लागणार म्हणून उदास झालेली बिलाडी चेटूकमाऊ आजारीच वाटू लागली होती. मन खिन्न असेल, निराश झालं असेल, तर शरीर लवकर आजारी पडतं!
सावरीने चक्क बिलाडीला जवळ बोलावलं. सावरी म्हणाली, “बिलाडी, ये इकडे. तुला बशीतून दूध देते. बाहेर किती गारठा आहे! तू थंडीत गारठून जाशील. ये लवकर.”
बिलाडीला फार बरं वाटलं. कुणीतरी तिला प्रेमाने बोलावत होतं. माया-ममता प्रत्येकालाच हवी असते. भांडणं, मारामार्या, राग-द्वेष यात काय आर्थ आहे? सावरीने बिलाडीला बशीभर दूध दिलं. ‘आणखी हवं का?’ विचारलं. बिलाडीनं एक पेढासुद्धा खाल्ला. सावरीच्या पप्पांनी एक डॉगी पाळला होता. बिलाडीला बघून तो रागाने गुरगुरू लागला. सावरीने त्याला समजावलं. सावरी म्हणाली, “डॉगी, तुला गुरगुर करायला काय झालं? ही बिलाडी आता आपली आहे! आपल्याकडेच राहणार आहे. मी पाळणार आहे तिला. तिचं जगात कुणी नाही. आपण तिला सहारा देऊ! तिच्याशी नीट वागत जा, कळलं ना?” मग डॉगी गप्प बसला!
सज्जनराव सावरीला म्हणाले, “साऊ, तू काळं मांजर पाळलंस, तर लोक तुला हसतील. म्हणतील, हीच सापडली का तुला?” डॉक्टर सज्जनराव मुद्दामच सावरीची ‘परीक्षा’ घेत होते. सावरी म्हणाली, “पप्पा, मांजर हे मांजर असते. आपल्याला मांजर पाळायचेच होते; मग हेच का पाळू नये? ‘चेटूकमाऊ’ म्हणून या मांजराला चिडवणं, नाकारणं किती चुकीचं आहे? चेटूक नावाचं काही असतं का कधी?” पप्पांना आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकून आनंद झाला. अशी शहाणी, गुणी मुलं-माणसंही आहेत जगात! म्हणून तर जग नीट चाललंय. शहाणपण ‘मर्यादित’ असतं; पण ते महत्त्वाचं आहे!
सावरीच्या घराच्या अंगणात आता चेटूकमाऊ आरामात राहू लागली. पण रात्री मात्र ती घराची राखण करायची. एकदा डोम्या नावाचा नाग घरात शिरायला बघत होता; पण डॉगीच्या ते लक्षात आलं नाही. बिलाडीने मात्र ‘म्यावऽ म्यावऽऽ म्यावऽऽऽ’ करत आरडाओरडा करत घर जागं केलं. त्याला पडवीतच अडवलं. मग ‘सर्पमित्र’ अनुपदादाला डॉक्टरांनी बोलावलं आणि फड्या नाग रानात नेऊन सोडला! सावरीमुळे चेटूकमाऊला मात्र जंगलात जावं लागलं नाही. तिला आधार देणारं घरदार मिळालं!
सुरुवातीला ‘काळं मांजर’ सांभाळलं म्हणून मित्र-मैत्रिणींनी सावरीला नावं ठेवली; पण हळूहळू रात्री जागून घरादारावर लक्ष ठेवणार्या ‘त्या’ बिलाडीची सगळ्यांना सवय झाली. ती चेटूक करत नाही. तिचं दर्शन अशुभ काही नाही. तसं असतं, तर डॉक्टरांसारख्या शिकलेल्या माणसानं तिला कसं जवळ केलं असतं, असंही बायकांच्या लक्षात आलं. लबाड पोपट म्हणाला, “माणसानेच त्या बिलाडीला जवळ केल्यावर आता माझं काय चालणार? तिला चांगलं छळता आलं असतं; पण राहून गेलं!…” मुलांनो, मांजर आडवं गेलं की, आपण जे काम करायला चाललोय ते होत नाही, हेसुद्धा खोटं आहे. बिलाडी सावरीकडे मजेत राहिली. तिच्याबद्दलचे गैरसमज कमी होत गेले. मस्त ना?
–प्रा. माधव गवाणकर,
वडाचा कोंड, मु.पो.ता. दापोली, जि. रत्नागिरी. 415712
संपर्क : 9765336408