अध्यात्मातली भेसळ

अनिल चव्हाण -

आई दारात बसून मुलांची वाट पाहात होती. आदीच्या शाळेतले किरण सर खूप उत्साही! त्यांनी पोरांना सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव पाहायला नेले होते. शाळेच्या अभ्यासाबरोबर पोरांना समाजही कळला पाहिजे अशी किरण सरांची धडपड; तर शाळेचा अभ्यास बुडवायला याला काहीतरी कारण लागते; आता त्या धार्मिक मठावर पोरं न्यायची गरज काय होती?” अशी इतरांची तक्रार! त्यातच शिक्षणाधिकारी “नरो वा कुंजरोवा” प्रवृत्तीचे! त्यांनी लोकोत्सवाला शाळांनी भेट द्यावी, मदत गोळा करावी; म्हणून नोटीस काढली. पण त्यात एक वाक्य टाकले, “मदत करणे ऐच्छिक आहे!” अर्थात, मठाच्या विरोधात जाऊन ऐच्छिक स्वातंत्र्य उपभोगण्याची हिंमत शिक्षकांत असेल का? मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण खाते, हात धुवून मागे लागले की ‘ऐच्छिक’ शब्दाचा खरा अर्थ समजेल; असाच काहीसा विचार शिक्षकांनी केला; आणि मठावर पोरांसह, अभ्यास सोडून, ऐच्छिक गर्दी केली! किरण सरांच्या बरोबर कबीर, स्वरा, आदी, वीरा, वेदान्त, विराज, शंभू यांचे वर्गही सोबत होते. जाणे-येणे मोफत शिवाय तिथे महाप्रसादाची सोय, याचा फायदा झाला!

ऊन उतरले, तशी सहल परतली! पोरांची दारात एकमेकांशी आणि स्वतःशीच बडबड सुरू झाली.

“माहीत आहे काय, आम्ही सगळे ग्रह बघितले. शनि मंगल झालं तर बुध…”

“ते जुने खेडं बघितलस काय??”

“चुलीवरची भाकरी, कुंभाराचे चाक, लोहाराचा भाता आणि सुताराचा रंधा! आई तू यायला पाहिजे होतीस बघ!”

“कमान सुद्धा पर्यावरण पूरक होती!”

“स्वागत कमान होय?”

“हो हो! सिमेंटच्या कमानीला चार पानं बांधली की झाले पर्यावरण पूरक!” सईने शेरा मारला!

सई आणि सानू खास वेळ काढून उत्सव पाहायला गेल्या होत्या; त्याही नुकत्याच परतल्या होत्या.

“असं नाही म्हणता येणार बरं!” गुंड्याभाऊला टीका आवडली नाही. गुरुजींसह तो उपस्थित होता. “तुम्ही हिरवीगार शेती आणि गांडूळ खताचे ढीग पाहिले का? हे सगळे सेंद्रिय आहे! गाई, म्हशी, जुनी घरे, भांडी, किती छान होतं नाही?” स्वरा म्हणाली,

“आई पंचभौतिक म्हणजे काय ग?” आदींचा प्रश्न!

“अरे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत.” गुरुजींनी खुलासा केला. या पंचमहाभूतांची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रदूषण टाळले पाहिजे, असा संदेश या उत्सवातून दिला आहे.”

“आम्ही गायीपण पाहिल्या.” स्वरा म्हणाली.

“त्याची पिल्ले पण होती.” कबीर म्हणाला.

“त्यांना गोमाता म्हणायचे आणि पिल्लांना म्हणायचे वासरे!” विराजने सांगितले.

“भारतातल्या कितीतरी प्रजातींच्या गोमाता तिथे सांभाळल्या जातात.” इराने माहिती दिली. “वीर गाय, गुजराती कोकणी, तांबू गाय, कपिला.”

“हजारभर तरी असतील.” गुरुजी कौतुकाने म्हणाले. “हजारच्या वरच!” गुंड्याभाऊंनी दुजोरा दिला.

“एवढ्या गोमाता पाळायच्या, त्यांचे संगोपन करायचे, त्यांना वेळेवर औषधपाणी करायचे, एवढे मोठे काम आहे! त्याबद्दल मठाचे कौतुक केले पाहिजे बरं आईसाहेब!” गुरुजींचा स्वर भरून आला. गोरक्षणासाठी नुकताच त्यांनी मोर्चा काढला होता. गोहत्या करणार्‍यांना कडक शासन करावे, असे आवेशपूर्ण भाषण केले होते. शिवाय परधर्मीयांना अद्दल घडवावी, असाही सल्ला दिला होता. नेहमीप्रमाणे गुंड्याभाऊंनी त्यांची री ओढली.

“गुरुजी, आपल्या गोमातेला सांभाळणार्‍यांचा आपणच आदर केला पाहिजे. त्यांचे पाय धुऊन पाणी प्याले पाहिजे. आणि गोमातेला छळणार्‍या परधर्मीयांना फाशी दिली पाहिजे.” गुरुजी आणि गुंड्याभाऊंमध्ये गाईबद्दल कळवळा दाखवण्याची आणि परधर्मीयांना शिव्या देण्याची चढाओढ लागली. परधर्मीयांच्या विरोधात आणि गोरक्षणासाठी अजून एक मोर्चा काढण्याचा ते विचार करत होते; एवढ्यात सई ओरडली, “थांबा! टीव्हीवरच्या बातम्या बघा!” आतापर्यंत टीव्हीकडे कुणाचेच लक्ष नव्हते.

‘मठावर ५२ गायींचा मृत्यू! शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा संशय! फोटो काढणार्‍या वार्ताहराला मारहाण!’ अशी बातमी आली. बातमी ऐकताच सगळे सुन्न झाले. गाईला मारणार्‍या काल्पनिक परधर्मीयांना शिव्या देणारे गुंड्याभाऊ आणि गुरुजी तर दातखीळ बसल्यासारखे शांत झाले! त्यांना काय बोलावे कळेना!

शांततेचा भंग सानूने केला. “गुंड्याकाका, एका गाईला मारल्याचा खोटा आरोप करून मोर्चा काढताय; आता ५० च्यावर गायी मेल्या. मोर्चा झाला पाहिजे! गोमातेचे रक्षण आपण नाहीतर कोण करणार?”

वीरा म्हणाली, ‘गोमातेला शिळे अन्न घालणारे दोषी आहेत.

“त्यांना शासन झाले पाहिजे!” इराने आवाज दिला.

सगळ्याच बालचमूने घोषणा द्यायला सुरुवात केली.

“शिळे अन्न काय? अहो शिजवलेले ताजे अन्न घालणे सुद्धा चूकच आहे!” सानूने दुरुस्ती केली.

“सणासुदीला किंवा वर्ष श्राद्धाला गाईला नैवेद्याचे ताट खायला देतात. हे चूक म्हणायचे का?” कबीरचा प्रश्न आला.

“होय! चूक आहे!” सानूने उत्तर दिले.

“पण कुत्र्या-मांजरांना आपण खायला घालतोच ना?”

“हो! त्यांची आतडे शिजवलेले अन्न खाण्यासाठी तयार होऊ लागलीत असे दिसते.”

“आणि नागाला दूध पाजतात तेही चूकच आहे!! दूध हे काही नागाचे अन्न नाही!” कबीर म्हणाला.

“चिऊ-काऊला धान्य खायला घाला. शिजवलेले अन्न नको!” वेदान्त म्हणाला.

“आणि माशांचं काय? आम्ही सकाळी फिरायला गेलो तर एक जण चपातीचे तुकडे करून रंकाळा तलावात टाकत होता!”

“चपाती हे काय माशांचे अन्न आहे काय?” एक दिवस फिरायला गेलेल्या आदींनी आपले निरीक्षण नोंदवले.

“म्हणजे थोडक्यात काय! माणसाशिवाय इतर कोणतेही प्राणी, पक्षी, मासे शिजवलेले अन्न खात नाहीत. त्यांना नैसर्गिक अन्नच द्यावे!” विराने सर्वांसाठीच नियम सांगितला.

पण गोरक्षणासाठी वेळी-अवेळी गळा काढणारे गुंड्याभाऊ आणि गुरुजी यावर मौन पाळून राहिले.

शेवटी आईने शेरा मारला, “गुंड्याभाऊ गोरक्षकांचे बेगडी प्रेम लोकांच्या लक्षात येईल बरं!”

“आई गोरक्षक तर बेगडी आहेतच, पण गाई पाळणार्‍यांना गाईंचे नैसर्गिक अन्न माहीत हवे की नको? आणि हे शेतकर्‍यांना काय कपाळाचे मार्गदर्शन करणार?” सानूने भर घातली.

“मला मेलीला काय कळतेय? पण भाऊजी सरकारने अशा हौशी गोपालनासाठी गोपालन कोर्स काढला पाहिजे ना?” अस्मिताची प्रतिक्रिया.

“हो तर! काढलाच पाहिजे!” हा आवाज बाहेरून आला. दारात गवळीमामा उभे होते आणि कोर्स तयार करायला तुमच्यासारख्या तज्ज्ञ गोपालक शेतकर्‍यांची कमिटी केली पाहिजे. “अर्धा लिटर दूध जास्त द्या हो! पाहुणे आलेत ना!” आई म्हणाली आणि गुंड्याभाऊकडे वळून म्हणाली.

“पाहिलंस ना गुंडाभाऊ काही घडलेलं नसताना गोरक्षा करा म्हणून मोर्चा काढायचा आणि पन्नास गाई मेल्या तरी तोंडात गुळणी घेऊन बसायचं. बरोबर आहे का हे? यापेक्षा काहीतरी दुसरा उद्योग शोधा!”

“हो! हो! भाऊजी आम्ही तुम्हाला मदत करू बरे! ही जाहिरात पहिलीत का? सुशिक्षित तरुणांनो संन्यासी बना!” अस्मिताने हातातले वर्तमानपत्र उघडून जाहिरात वाचून दाखवली.

गुरुजी आणि गुंड्याभाऊने मोठ्या उत्साहाने वृत्तपत्र हातात घेतले. दोन मिनिटांतच त्यांचे चेहरे उत्साहित बनले; मनाशी निर्णय करून ते म्हणाले, “हो हो, छान आहे बरे!”

“ते म्हणत आहेत तरुणांनो संन्याशी बना! आपण म्हणू संन्याशांनो एजंट बना!” गुरुजी म्हणाले.

“हो, हो. आपला बंद असलेला कारखाना सुरू तरी करू या.”

“म्हणजे तो फेस पावडर, स्नो, दंतमंजन, उदबत्ती, मेणबत्ती, साबण, वॉशिंग पावडर, करताय तेच ना?” सानूने विचारले.

“हो! हो! तुम्हा सर्वांना आम्ही एजंट करू!” गुरुजी.

“तेही संन्यासी एजंट!” गुंड्याभाऊंनी स्पष्टीकरण दिले!

“संन्यासी आणि एजंट? ही तर नवीन कल्पना आहे? कसं शक्य आहे?” सईने शंका व्यक्त केली.

“त्यात काय एवढं? संन्यासी, साध्वी, आमदार- खासदार बनताहेत! मंत्री, मुख्यमंत्री बनतात. व्यापारी- उद्योगपती बनत आहेत, मग एजंट बनले म्हणून काय झालं!” वीराचा प्रश्न.

“आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहोत! भाऊ आहात का तयार?”

“होहो!”

“मग चला तर वेळ कशाला?” गुरुजी म्हणाले.

गुरुजींनी बॅग उघडली. भगवी कफनी, काखेतली झोळी, दाढी मिशा आणि जटा चिकटवलेला मास्क बाहेर आला!

“भाऊ, दोन मिनिटात तयार व्हा बरं!”

गुंड्याभाऊंनी कफनी घातली. झोळी अडकवली. तोंडाला मास्क बांधला. मास्कला खाली दाढी मिशा आणि वरती जटा होत्या. त्यामुळे गुंड्याभाऊ योगी महाराजांसारखा दिसू लागला.

“चला इथूनच सुरुवात करू!”

सर्व जण बाहेर आले! शेजारच्या घरातल्या काकूंना हाक मारली, “भिक्षा वाढा माई!”

दारात जटाधारी बुवा बघितल्याबरोबर काकू आत वळल्या. त्यांनी एक चपाती आणि भाजी आणली. गुंड्याभाऊंनी प्लास्टिकची कॅरी बॅग बाहेर काढली. भिक्षा त्यात व्यवस्थित घेतली. स्टेपलर मारला आणि झोळीत टाकली.

“भगवान आपका भला करे!”

तोंडभरून आशीर्वाद मिळाल्यावर बाई कृतकृत्य झाल्या.

पण विराने याबद्दल नापसंती व्यक्त केली तेव्हा गुंड्याभाऊंनी खुलासा केला. “संन्यासी म्हणून आपल्याला भिक्षा घेण्याचा अधिकार आहे!”

“पण एखाद्याने भिक्षा देणे नाकारले तर काय करायचे?” आदिने विचारले.

“तोही अनुभव तुम्हाला मिळेल!” गुरुजी म्हणाले.

दोन घरानंतर तो अनुभव आला.

“भिक्षा वाढा माई!”

आतून भिक्षेऐवजी आवाज आला. “येवढा धडधाकट बापय हाय आणि भिक्षा मागतोय. कायतरी काम धंदा कर!”

“बाई, आम्ही भिक्षा मागायला आलो नाही.” गुंड्याभाऊ म्हणाला.

“बाहेर तरी या! पहा आम्ही आपल्यासाठी किती वस्तू आणलेल्या आहेत. ५० रुपयांची वस्तू फक्त वीस रुपयात.” गुरुजी म्हणाले.

बाई बाहेर आल्या. “कोणकोणत्या वस्तू आहेत?” त्यांनी विचारले.

“आहेत ना! स्नो, फेस पावडर, साबण, वॉशिंग पावडर, उदबत्ती, मेणबत्ती. काय हवं ते आहे.”

“हे घ्या वीस रुपये!” बाईंनी नोट पुढे केली.

“या झोळीत हात घाला. पाहू या तुमच्या नशिबात काय आहे?” गुरुजींनी सूचना केली.

गुंड्याभाऊने झोळी पुढे केली. बाईंनी झोळीमध्ये हात घातला. इकडे तिकडे चाचपले आणि एक पाकीट बाहेर काढले. नेमकं ते चपातीचे पाकीट बाहेर आले.

“आँ, हे काय? वीस रुपयात ही शिळी चपाती? हे काय नको आम्हाला.” बाई म्हणाल्या.

“थांबा! थांबा! वहिनी थांबा! भाऊ, हा काय गोंधळ झालाय?” गुरुजींनी सावरून घेतले.

“गुरुजी, आपल्या झोळीला दोन कप्पे आहेत. साबणाचा कप्पा वेगळा! यांचा हात चपातीच्या कप्प्यात गेला.” गुंड्याभाऊने खुलासा केला.

पण तोपर्यंत बाईंनी आपल्या ओरडण्याने गल्ली गोळा केली! हातवारे करून त्या शिव्या देऊ लागल्या. “भगवे कपडे घालतात आणि याची चपाती त्याला विकता. लाज नाही वाटत?”

त्यांच्या मदतीला आसपासच्या इतर महिला धावल्या. त्यांनीही जमेल तसे तोंडसुख घेतले. आणि लवकरच त्या हातही धुऊन घेतील अशी शक्यता वाटू लागली. मास्क काढावा लागला तर मोठी आफत येईल याची गुरुजींना खात्री वाटली, तसा सर्वांनी काढता पाय घेतला.

‘युवकांनो संन्यासी बना, संन्याशांनो एजंट बना!’ ही योजना गुंडाभाऊ आणि गुरुजी यांना सध्या तरी बासनात बांधून ठेवावी लागली आहे. हे पाहून अस्मिता म्हणाली, “मला मेलीला काय कळतंय, पण भाऊजी अध्यात्मातली भेसळ प्रत्येक वेळी पचतेच असं नाही बरं!”

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]