डॉ. प्रदीप पाटील - 9890844468
गणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो. जन्मलेले मानवी बाळ दूध पिते – आईचे; पण त्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो, किती काळजी घ्यावी लागते. चमचा–वाटी घेऊन बाळाला दूध पाजताना घशात अडकून काही त्रास तर होणार नाही ना, याची मातेस सुरुवातीस चिंता वाटते; पण इथे पाहावे ते आक्रितच! जगभरातले गणपती घशात न अडकता, ठसका न लागता दूध चमचा–वाटीतून पित होते, जे मी डोळ्याने पाहत होतो. पाहत होतो, 21 सप्टेंबर 1995 ला की, लोक दूध आणायला सैरावैरा पळत होते. भक्तांची पळापळ चालू होती. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भुकेल्या गरिबांची पोरं ‘दूध–दूध’ म्हणून आक्रोशत असताना भक्त मात्र मूर्तींना दूध पाजवित सुटले होते.
21सप्टेंबर 1995 : मु. पो. सांगली
भारताच्या इतिहासातला एक काळाकुट्ट दिवस!
‘सांगली अंनिस’ला फोन आल्यावर मी प्रथम माधवनगरला गेलो. तेथे मालाणींच्या घरात अफाट गर्दी. मागील दाराने गेलो आणि मालाणींना म्हणालो, ‘गणपती बोटाने उचलून वर धरतो. तुम्ही दूध पाजा.’ तसे ते खवळले. पाच-सहा इंचांची पितळी मूर्ती दुधाचे आवरण अंगाभोवती लपेटून दुधास पायाजवळ ढकलताना स्पष्ट दिसत होते; पण श्रद्धेवर शंका घेणे म्हणजे ‘पाप’ होय. अनेक घरांत जाऊन मी हे समजावले की, यामागे भौतिक विज्ञानाचे नियम आहेत. कोणतीही मूर्ती; अगदी वाघाची-माकडाची सुद्धा दूध पिते. ‘कॅपिलरी अॅट्रॅक्शन’, ‘सरफेस टेंशन’ असे पदार्थ विज्ञानाचे नियम मी सांगू लागलो की, लोक म्हणत, ‘ही निश्चितच चमत्कारिक दैवी शक्ती आहे.’ आंधळ्या भाव-भक्तीचा उद्रेक वैज्ञानिक वृत्तीचा नाश करतो. ‘नेचर’ मासिकाने म्हटले, ‘धर्माने विज्ञानाचे डोके फोडलेय.’
पंचवीस वर्षांपूर्वीचा हा पहिला वणवा होता – चमत्काराचा; पण तो भारतापुरता नव्हता. टोरंटोच्या मंदिरात, न्यूयॉर्क शहरातील घरांत, कॅनडा-नेपाळ-अरबस्तान असे सगळीकडे हा दुग्धप्राशनाचा ‘चमत्कार’ पेटला. इंग्लंडमध्ये एका दुकानातून 25 हजार पिंप दूध विकले गेले. माणसं अशी पिसाटलेली का होती? या प्रश्नाचे उत्तर अंधश्रद्धा एवढेच नाही.
सांगलीत 22 सप्टेंबर 1995 ला दुपारी 1 वाजता आम्ही स्टेशन चौकात सर्व मूर्तींना दूध पाजायचा कार्यक्रम राबविला होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेना, विहिंप, भाजप आदी अनेक धर्मसंघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्तेजमा झाले आणि कार्यक्रम उधळायचा प्रयत्न केला; मात्र ‘अंनिस’ने तो हाणून पाडला. राजकीय पक्षांना या चमत्काराचे समर्थन का करावेसे वाटले होते? गणपतीला दूध पाजण्याचा चमत्कार हा एका मोठ्या राजकीय खेळीचा भाग होता. देवादिकांच्या आणि धर्माच्या भक्तीचा ठेका घेण्यामागे सत्तेची हाव होती. सामान्य माणसाच्या धार्मिक भावनांची ती एक प्रकारे चाचणीच होती आणि या चाचणीतून भारतीय जनतेचे देवभोळेपण ठसठशीतपणे समोर आले. बाबरी मशीद पाडून यश मिळालेल्या, धर्माच्या नावाने व्यापार करणार्या राजकीय पक्षांना सामान्य माणसांत वेगवेगळ्या अंगाने धर्म भिनवायचा होता. ‘चमत्कार दिन’ ही लिटमस टेस्ट ठरली. कारण आज भारताच्या सत्तेत विराजमान होण्याची बीजं या पक्षांनी त्या काळी अनेक प्रकारांनी पेरली होती, रुजवली होती. पुन्हा 11 वर्षांनी म्हणजे 20-21 ऑगस्ट 2006 मध्ये पुन्हा याच चमत्काराची तालीम झाली. यावेळी गणेशाबरोबर शिव आणि दुर्गेच्या मूर्तीही आणल्या गेल्या.
राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकांच्या अंधश्रद्धेचा वापर कसा करता येईल, हे गणदुग्धप्राशनाने दाखवून दिले आणि त्या राजकीय पक्षांची वाट सोपी केली.
पण आपण जर देवभोळेपणाचा फायदा घेणार्यांवरच नुसते आरोप करीत राहू, तर तो आपला वेडेपणा ठरेल, खरे दुखणे दुर्लक्षित करू. भोळेपणा किंवा ‘गलीनिलीटी’ ही मानवात खरे तर का असते किंवा येते, याचा विचार व्हायला हवा.
आज या घटनेचा विचार करताना वाटतेय की, चमत्कारावर जास्त त्यावेळी मंथन झाले; चमत्कार करणार्यांवर नाही. चमत्कार घडतात आणि माणसांचे जथ्थे त्यामागे धावतात. यामागे जथ्थाभ्रम हे कारण असते. जेव्हा भावनांची तीव्रता वाढविली जाते किंवा वाढते, तेव्हा भ्रम पैदा होतात. चमत्कार घडतात. यावर श्रद्धा ठेवणारी माणसे अशा वेळी जास्त संमोहित होतात. आपले भक्तिस्थळ किंवा देव/व्यक्ती यांनी चमत्कार करावेत, अशी अपेक्षा बाळगणार्यांचा एक समूह असतो. तो अशा वेळी सहजपणे उन्मादावस्थेत जातो. मानवी शक्तीपलिकडे अमानवी शक्ती अस्तित्वात असते, असे मनात घट्ट रुजलेल्या समूहाला चमत्कार घडला की, शिक्कामोर्तबाचे बेभान वारे अंगात शिरते. याचा अर्थ विशिष्ट विचारधारेचे समूह एकत्र येऊन एक विचारधारा स्वीकारतात, तेव्हा तो ‘समूहविचार’ किंवा ‘ग्रुपथिंक’ बनतो आणि हा विचार जेव्हा अविवेकी बनतो, तेव्हा चमत्काराचा उदय होतो. चमत्कारास बळी पडणारा समूह हा टोळीवर्तनावर शिक्कामोर्तब करतो. यास ‘मेंढर टोळी’ म्हणतात. मेंढरं जशी वळवू, तशी तिकडं धावत सुटतात, तसे घडते. मानवी श्रद्धांनी या तपासणीस नकार दिल्यावर, हेच घडते. विशिष्ट समजुतींच्या या आधुनिक काळातल्या टोळ्या जेव्हा त्या समजुती घट्ट धरून ठेवतात, तेव्हा चमत्कार सत्य आहेत, असे घोषित करतात. यामागे भोळेपणा आहे. भोळेपणा याचा अर्थ सामाजिक बुद्धिमत्तेचा, हुशारीचा अभाव. देव, दैव, श्रद्धा, भाव, भक्ती अशा अनेक धार्मिक संकल्पना या हुशारीच्या अभावातून स्वीकारल्या जातात. हा अभाव सामूहिक बनला की, माणसे ‘मेंढर टोळी’चे कृत्य करीत राहतात.
भोळेपणा सर्व क्षेत्रात दिसतो; पण धार्मिक क्षेत्रातल्या भोळेपणात ताठरपणा असतो. भोळेपणा आपल्यात आणि आपल्या समूहात आहे, हेच नाकारले जाते; किंबहुना या भोळेपणास श्रद्धा-भाव-भक्ती असे उदात्तीकरणाचे लेबल लावले जाते. मूर्तींमध्ये आणि आकाशात देव शोधणे हा या भोळेपणाचा भक्तिमय आविष्कार असतो. भक्ती आणि चिकित्सा ही दोन विरुद्ध टोके आहेत आणि चिकित्सा विज्ञानाचा पाया आहे, म्हणूनच चमत्कारामागे विज्ञान आहे, हे स्वीकारण्यास ही ताठर भक्ती जी भोळेपणातून निर्माण होते, ती नकार देते. तत्त्वज्ञानातलं एक तत्त्व आहे. ज्यास ‘ऑक्कॅमस् रेझर’ म्हणतात. याचे सूत्र आहे, अवास्तव आणि अविवेकी कारणे यांना पुसून टाकणे, म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधताना ते पुराव्यासह सहज सोपे, कमीत कमी गुंतागुंतीचे असेल, तर ते स्वीकारून इतर सर्व कारणे दूर सारणे. या ‘ऑक्कॅम रेझर’चा पराभव म्हणजे चमत्कार! ‘मास हिस्टेरिया’ किंवा समूह उन्माद हे गणपती दुग्धप्राशन चमत्कारामागील कारण म्हणून कमी संभवते. कारण ‘मास सायकोजेनिक इलनेस’ असे ज्याला म्हटले जाते, तो समूह उन्माद मानसिक विकृतीच्या गटात मोडतो, ज्यात शारीरिक लक्षणेही दिसतात.
भोळेपणा हा जात्याच नसतो, म्हणूनच मानवी संस्कृतीतल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रात डोकावल्यास सर्वत्र समान भोळेपणा आढळत नाही. धार्मिक क्षेत्रात तो सर्वाधिक आढळतो. कारण धार्मिकपणा ही संस्कारित क्रिया असते, ती योजनापूर्वक असते आणि तिला सामूहिक आधार सहज उपलब्ध होतो. याचा अर्थ संस्कारांतून भोळेपणाची निर्मिती होते. मानसविज्ञान असे मानते की, माणूस हा चिकित्सक प्राणी आहे. जगण्यासाठी तो जे फायद्याचे असेल, त्याकडे वळतो; प्रसंगी आपली पूर्वीची समजूतही त्यासाठी त्यागतो. ज्यास डार्विन ‘नीट्च’ म्हणतो, म्हणजे ‘चौकशा’ करणारी वृत्ती ही मानवात जात्याच असल्याने सर्व प्राण्यांत तो वरचढ ठरला; पण हीच वृत्ती बालपणातच मारून टाकली की, भोळेपणाचा विकार रुजत जातो, भ्रामक कल्पना स्वीकारल्या जातात. विश्व, जन्म-मृत्यू, उत्पत्ती अशासारख्या प्रश्नांची उत्तरे चुटकीसरशी सोडवून टाकण्याचा दावा ‘देव’ ही संकल्पना वापरून केला जातो. त्यामुळे या प्रश्नांची चौकशी करण्याचा मार्ग खुंटवला जातो. हा धर्माचा सर्वांत मोठा गुन्हा आहे. कारण मानसिक गुलामगिरीची शोषणव्यवस्था त्यातून उभारते, ज्याचे हस्तक बनतात भटजी, गुरव, महाराज, गुरू, मुल्ला, मौलवी आणि फादर.
चमत्कारास अशी भोळी बनविलेली जमात बळी पडते, म्हणजे मानवनिर्मित विचारदोष ही चमत्काराच्या वणव्याची ठिणगी बनते. इतिहासात सर्व धर्मांत असे वणवे पेटलेले दिसतील; पण नंतर ते अस्तास गेले. गणपती दुग्धप्राशनाचेही हेच घडते आहे. 2006, 2008 आणि अगदी अलिकडे 2016 मध्ये असाच गणदुग्धप्राशनाचा प्रयत्न झाला. पण 1995 इतका वणवा पेटला नाही. कारण 1995 वेळच्या भोळेपणाला तेव्हा विज्ञानाने सांगितले की, हा चमत्कार कसा नाहीय आणि 2016 मध्ये तर वणवा तर सोडाच; पेटण्यापूर्वीच चमत्कार विझला.
भोळेपणाचा एक राजकीय प्रयोग ‘फेकन्यूज’ वापरून 2014 मध्येही झाला; पण तो 2019 मध्ये मागे पडला. याचा अर्थ मानवी मेंदू चिकित्सेस स्वीकारतो. ती त्याची नैसर्गिक ऊर्मी आहे. आपल्या चळवळीने त्यास कसे फुलावायचे हे ध्यानात घेतले, तर विवेकी समाजाचा उदय दूर नाही… डॉक्टर.