म.अं.नि.स.ची फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहिम

-

दि. 27जुलै, 2021 पुष्प पहिले

फलज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही!

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आणि डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे

पंचांग हे आकाशातील ग्रहगोलांचे वेळापत्रक असून त्याआधारे भाकीत वर्तवणार्‍या फलज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही, असे मत ‘पंचांग’कर्तेदा. कृ. सोमण आणि विज्ञान अभ्यासक डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी मांडले. सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फलज्योतिषविरोधी प्रबोधन मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना आयोजित परिसंवादात त्यांनी हे मत व्यक्त केले.

अलिकडेच ‘इग्नू’ने ‘फलज्योतिष’ हा विषय विद्यापीठात शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सध्या प्रबोधन मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत तीनदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यातील प्रथम पुष्प मंगळवारी (दि. 27 जुलै) सायंकाळी 6 वाजता गुंफले. सुप्रसिद्ध ‘पंचांग’कर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण (मुंबई) व विज्ञान अभ्यासक डॉ. विश्वास सहस्रबुद्धे (पुणे) यांनी ‘फलज्योतिष व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समाजमनावरील परिणाम’ या विषयावर आपली मते मांडली.

दा. कृ. सोमण यांनी पुढे सांगितले की, “पंचांग आणि फलज्योतिष एकच आहे, असा लोकांचा समज आहे; परंतु प्रत्यक्षात दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आकाशातील तारे, ग्रह यांचे स्थान, आकार, गती, ऊर्जा व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’त केला जातो.” तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे होत, असे सांगून दा.कृ. सोमण यांनी पंचांगकर्ता हा खगोलतज्ज्ञ असावा लागतो, असे सांगितले. तसेच पंचांग म्हणजे केवळ आकाशाचा नकाशा आणि ग्रहगोलांचे वेळापत्रक असते, असे प्रतिपादन केले. माणूस जन्मतो, त्यावेळच्या आकाशातील ग्रहांची स्थिती म्हणजेच कुंडली. त्यात ग्रह, राशी, नक्षत्र, स्थान यांचा समावेश असतो. मात्र या राशींना मानवी स्वभाव जोडले जातात, हे हास्यास्पद आहे. ग्रहांचे मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाहीत, हे स्पष्ट करताना सोमण यांनी आग्रह, दुराग्रह, पूर्वग्रह, अनुग्रह हे मनातील ग्रह सर्वांत वाईट आहेत; आकाशातील ग्रह नव्हे, असे मिश्किलपणे व परखडपणे सांगितले. दोन ग्रहांची युती जेव्हा घडते, तेव्हा काहीतरी भयंकर विनाशकारी घटना घडतात. या अंधश्रध्देपोटी अनेकांनी जीव गमावला आहे. ग्रहांना घाबरण्याऐवजी निर्भय व्हा, असे त्यांनी सांगितले. 2020 आणि 2021 ची ग्रहस्थिती पाच वर्षांपूर्वी माहीत होती. परंतु त्यावेळी कोरोना येणार आहे, असे भविष्य जगातील एकाही ज्योतिषाने वर्तवले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. विश्वास सहस्रबुद्धे यांनी ‘इग्नू’व्यतिरिक्त फलज्योतिष हा विषय देशात आणखी कुठे शिकवला जातोय, याचा ऊहापोह केला. तसेच या अभ्यासक्रमाची व्याप्ती व स्वरूप स्पष्ट केले. फलज्योतिष हे वैज्ञानिकतेच्या कोणत्याच निकषात बसत नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले. निरीक्षण, समान निरीक्षणे, त्याआधारे उपपत्ती, पुराव्यांच्या आधारे कार्यकारणभाव मांडणे, फॉर्म्युला तयार करणे व त्याआधारे भाकीत करणे, ही वैज्ञानिक पद्धती आहे. निरपेक्षता, तटस्थता, चिकित्सा, पूर्वग्रह नसणे या पूर्वअटी आहेत. आपले मुद्दे नम्रपणे मांडणे, बदलत्या निष्कर्षांचा स्वीकार करणे व शोधक दृष्टी जोपासणे, या गोष्टी वैज्ञानिक दृष्टीसाठी आवश्यक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्तेप्रा. प. रा.आर्डे यांनी वक्त्यांना विविध प्रश्न विचारून पंचांग आणि विज्ञान यात फलज्योतिष कुठे बसते, यावरील त्यांची मते जाणून घेतली.

या कार्यक्रमाची सुरुवात त्रिशला शहा व आशा धनाले यांच्या सुस्वर प्रबोधन गीतगायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघेश साळुंखे यांनी केले. राहुल थोरात यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे वाचन केले. त्याला वक्त्यांनी उत्तरे दिली. शशिकांत सुतार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एन. डी. पिसे यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रकाश शिंदे, विटा

दि. 30जुलै, 2021 पुष्प दुसरे

ज्योतिषी खगोलशास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना वापरून अवैज्ञानिक दावे करतात प्रा. प्रकाश पारखे

राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानमालेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्ह्याने आयोजित ऑनलाइन व्याख्यान 30 जुलै रोजी झाले. या व्याख्यानमालेत ‘अंनिस’चा फलज्योतिषाला विरोध का?’ या विषयाची मांडणी जोगेश्वरी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता, खगोल अभ्यासक व ‘अंनिस’ कार्यकर्ते प्रा. प्रकाश पारखे यांनी केली. फलज्योतिषामध्ये व्यक्तिगत अनुभव, एखादा किस्सा, एखादी आठवण, खगोलशास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना वापरून अवैज्ञानिक दावे केले जातात. कोणत्याही विज्ञान शाखेत अवलंब केल्या जाणार्‍या निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, वारंवार प्रचिती, सिद्धता या टप्प्यांवर फलज्योतिष टिकत नाही, म्हणून ते विज्ञान नाही. भारतीय प्राचीन ज्योतिषाच्या सहाय्याने कालगणना, ग्रहांची गती, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांचा अभ्यास करणे समजू शकते. परंतु अवकाशात घडणार्‍या खगोलीय घटना माणसाच्या दैनंदिन जगण्यावर परिणाम करतात. याचा अभ्यास करण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) पदवी कोर्स सुरू करण्याला ‘अंनिस’चा विरोध आहे. अशी भूमिका पारखे यांनी व्याख्यानात मांडली. प्रास्ताविक मोहन भोईर यांनी केले. वक्त्यांची ओळख चंद्रहास पाटील (पेण) यांनी करून दिली. संकल्प गायकवाड (पेण) यांनी श्रोत्यांकडून आलेले प्रश्न विचारले. मीना मोरे यांनी आभार मानले. श्रीनिवास गडकरी यांनी सूत्रसंचालन करून ‘आकाशातील ग्रह-तार्‍यांस कशास द्यावी किंमत?’ ही व्याख्यान विषयास अनुसरून स्वरचित कविता सादर केली. मोहन भोईर, पेण, रायगड

दि. 1ऑगस्ट, 2021पुष्प तिसरे

विद्यापीठात ज्योतिष शिकवणे देशासाठी शरमेची बाब – खगोलशास्त्रज्ञ डॉ. आशिष महाबळ

नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन सोहळा

‘नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांका’चा ऑनलाईन प्रकाशन सोहळा रविवारी (1 ऑगस्ट) पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या हस्ते आणि कॅलिफोर्निया येथील खगोलशास्त्रज्ञ डॉ. आशिष महाबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

अरविंद गुप्ता म्हणाले, “अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने सांगितले होते की, कोणत्याही पुराव्याशिवाय विश्वास ठेवू नका. धर्मग्रंथांत एखादी गोष्ट सांगितली म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, तुमचे वरिष्ठ सांगत असतील म्हणून विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीला वास्तविकतेवर तपासून पाहा. जर पुरावा असेल आणि सार्वजनिक हिताची गोष्ट असेल तर ती मान्य करा. केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यापीठांवर दबाव आणला होता. त्यावेळी पद्मविभूषण जयंत नारळीकर यांनी याचा जबरदस्त विरोध केला होता.”

डॉ. आशिष महाबळ म्हणाले की, “पूर्वीच्या काळी असा समज असायचा की, नक्षत्र दिसल्यामुळे पाऊस पडायचा आणि हाच समज कायमस्वरुपी ठरला. पंधराव्या शतकापर्यंत ज्योतिष आणि खगोलशास्त्र हे एकच होते. विज्ञानात जे बदल होतात, तसे ज्योतिषात होत नाहीत. विज्ञानातील सिद्धांत प्रयोगांनी लागू होतात की नाही, हे महत्त्वाचे आहे आणि ज्योतिषात असं होताना दिसत नाही. पत्रिका मांडताना खगोलीय स्थानांचा वापर केला जातो; ज्योतिषात खगोलीय अंतरांचा वापर केला जात नाही. ज्योतिषाचे दावे आकडेवारीसह दिले जात नाहीत. मंगळ ग्रहाबद्दल अलिकडच्या काळात होत असलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी सांगितले. अलिकडे अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने झशीीर्शींशीरपलश ही बग्गी उतरवली गेली. यावरून असे सिद्ध होते की, आपण पृथ्वीवर बसून मंगळावरील वादळांचा अभ्यास करू शकतो. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाची सुद्धा भरभराट झाली आहे, त्याप्रमाणे ज्योतिषाची प्रगती झाली नाही.”

“ज्योतिषाचा अभ्यासक्रम हा वस्तुनिष्ठ तथ्यांवर आधारित असायला हवा. एकमेकांच्या विरोधातील सिद्धांत सुद्धा माहीत असायला पाहिजेत. ज्योतिषाच्या अभ्यासक्रमात प्रायोगिक परीक्षा असाव्यात. अशा प्रकारचा अभ्यासक्रम जर सरकारच्या अनुदानातून चालू होणार असेल, तर यासारखी खेदाची गोष्ट नाही. ज्योतिषाला याआधी अनेक आव्हाने दिली गेली आहेत. सोळाव्या शतकात दुर्बिणीचा शोध लागला. पण त्यानंतर सव्वाशे वर्षांनी भारतात जंतर-मंतर सुरू झाले. ज्योतिष वापरून कोणत्याही व्यावसायिक कंपनीला पैसे कमावता आल्याचे पुरावे नाहीत,” असे महाबळ यांनी सांगितले.

शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सुरुवातीला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करणारा पोवाडा गायला. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. ‘अंनिवा’चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. संदेश घोलप यांनी आभार मानले.

राहुल माने, पुणे


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]