सावनी गोडबोले -

विज्ञान म्हणजे खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे. अत्याधुनिक उपकरणे, आजारांसाठीची औषधे, संवादासाठीची संसाधने, हे सगळे त्या त्या क्षेत्रातील नवनवीन शोधांमुळे होऊ शकले. फार कशाला, सर्वसामान्य माणसाला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तर्कशुद्ध विचार करायची सवय लागली की मग समस्या हळूहळू सुटतात, प्रश्नांची उत्तरे आपोआप सुचू लागतात. नेमके हेच सत्य उमगले आहे जांभुळा नावाच्या अकरा वर्षांच्या दलित मुलीला, ‘विज्ञानावर बंदी घातलेले गाव’ ह्या बाल कादंबरीत. ‘ह्यातल्या जांभुळेच्या छोट्याशा गावात विज्ञान शिकण्याची सोय नाही. त्यामुळे तिला जे अनेक प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे कशी शोधायची हे तिला कळत नाही. गावातल्या समस्यांवर चित्र-विचित्र तोडगे सुचवणारा एक चमत्कारी बाबा आहे. हा बाबा कधी ‘गायी पळून जाऊ नयेत’ म्हणून गायींच्या मालकाला कोलांटी उड्या मारायला सांगतो, तर कधी ‘गाढवाचा पाय बरा व्हावा’ म्हणून त्याच्या मालकाला शीर्षासन करायला सांगतो. समस्येचे मूळ शोधायच्या फंदात पडत नाही. गुरुदक्षिणा म्हणून लाडू, पेढे, वड्या मात्र वसूल करतो. मधूनमधून चमत्कार करून म्हणजे हातचलाखीच्या जोरावर त्याने लोकांचा आपल्यावरचा विश्वास कायम राहील अशी तजवीज केली आहे. पूर्ण गावाची ह्या बाबावर नितांत श्रद्धा आहे. ‘कादंबरीतला काळ’ हा स्मार्ट फोन, वाय फाय, इंटरनेट संगणक ह्या सर्वांच्या आधीचा पण स्वातंत्र्यानंतर काही वर्षांमधला, बहुधा ऐंशीच्या दशकातला आहे. भारत सरकार ह्या गावाला विज्ञान शिक्षक पुरवायला विसरून गेले आहे.
पण एकदा त्या गावच्या शाळेत सरकार एक विज्ञान शिक्षक पाठवते. आणि विद्यार्थ्यांच्या जोडीने गावकर्यांना सुद्धा विज्ञानाची गोडी लागते. बाबांचे महत्त्व कमी होऊ लागते. मग त्या शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी चमत्कारी बाबा काय करतात आणि शेवटी जांभूळा आणि हे विज्ञानाचे सर कसे विजयी होतात त्याची ही गोष्ट.
मुलांसाठी लिहिलेली असल्यामुळे ह्याचे कथानक वेगवान, रोचक आहे. फक्त मुलांनाच सुचू शकतील असे गमती-गमतीचे प्रश्न आहेत. म्हणजे झाडाला भात खायला घातला तर झाड जाडे होईल का? आणि मेलेला उंदीर जमिनीत पेरला तर त्यातून कोंब येईल का?
पण त्याचबरोबर मुलांच्या निष्पाप, अचूक आणि निःसंकोच निरीक्षणातून आलेले विदारक प्रश्न देखील आहेत, जे प्रौढांना सुद्धा अंतर्मुख करून जातात. कातडीच्या रंगाप्रमाणे माणसाच्या ‘शी’ चा रंग बदलत नाही, काळ्या आणि गोर्या लोकांचे रक्तगट एकमेकांसारखेच असतात, सगळ्या गावाला नको असलेली घाणेरडी कामे करणारी माणसे मात्र अशुद्ध असतात… स्वच्छ अंघोळ करून सुद्धा! (दुर्दैवाने आजही अनेकांना सामाजिक समतेचे हे वास्तव पचवणे जड जाते!) चमत्कार, चेटकीण, भुते-खेते ह्यामागील विज्ञानाचे थोडक्यात स्पष्टीकरण आहे. आणि त्यातील विज्ञानाला समजून न घेतल्याने जांभुळेचा बालमित्र हा कसा जैसे थे राहतो हेही मनाला स्पर्शून जाते. इतर व्यक्तिरेखांचा प्रवास हळूहळू कसा होत जातो याचेही उत्तम चित्रण आले आहे.
गिरीश सहस्त्रबुद्धे ह्यांची रेखाचित्रे सुद्धा त्या त्या पात्राच्या मनातील भाव सुरेख दर्शवतात. काही ठिकाणी कादंबरीतील भाषा ही अकरा वर्षांच्या मुलीची न वाटता प्रौढ वाटते. काही काही ठिकाणी भाषांतर आहे हे जाणवते. पण तरीही एका विलक्षण सच्चेपणाने लिहिलेली ही बालकादंबरी मुलांनाच नव्हे, तर मोठ्यांना सुद्धा आवडेल ह्याची खात्री वाटते. सहज मनात आले, ह्या कादंबरीचे नाट्य रूपांतर केल्यास आताच्या काळातले एक उत्तम बालनाट्य होऊ शकेल. आताच्या मुलांना राक्षस, पर्या आणि राजकुमार ह्यांच्या पलीकडे सुद्धा काही ळपींशीशीींळपस दाखवल्यास त्यांना आवडेल की. किंवा ‘मकडी’ सारखी एखादी फिल्म देखील!
जाता जाता सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता, आताच्या काळावर इतिहासाची होणारी घुसखोरी पाहिली, त्यातून येणारा पोकळ अहंकार पाहिला, राजकारण्यांनी केलेले इतिहासाचे विकृतीकरण पाहिले, इतिहासाचा स्वार्थी वापर पाहिला की वाटते, विज्ञानाऐवजी ‘इतिहासा’वर बंदी असावी… सुखी होईल जग!
पुस्तक : विज्ञानावर बंदी घातलेले गाव
लेखिका : संगीता मुळे, अनुवाद : अंजली मुळे
प्रफुल्लता प्रकाशन, पुणे.
मो. ९४२१२१००११