विश्वजित चौधरी - 9420383778
जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात अघोरी प्रकार नुकताच घडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबीयांचे प्रबोधन केले. त्यामुळे एका तरुणीला अंधश्रद्ध अघोरी उपचारापासून वाचवता आले आहे.
शेंगोळा येथील एका कुटुंबातील एक मुलगी ही काही शारीरिक व्याधीने ग्रस्त होती. कुटुंबातील सदस्याकडून तिच्यावर अनेक औषधोपचार करण्यात आले. पण गुण येत नाही म्हणून मुलीला बाहेरची बाधा असल्याचा सल्ला नजीकच्या नातेवाईकांनी परिवाराला दिला. या सल्ल्यानुसार मुलीच्या वडिलांनी डांभुर्णी (ता. यावल) येथील मांत्रिकास बोलावले. मांत्रिकाने मुलीच्या तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरवले. अशा प्रकारे मुलीला हीन वागणूक देऊन मुलीवर अघोरी उपचार करण्यात आले. मांत्रिकाने मुलीच्या अंगातील सहापैकी चार चुडेल काढून मुलीच्या परिवाराकडून भक्कम रक्कम उकळली.
राहिलेल्या दोन चुडेल काढण्यासाठी व पैसे घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोर्हाडे व जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांना मिळाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे यांच्या मार्गदर्शनानुसार शेंगोळा येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली व यापुढे मांत्रिकाकडून अघोरी उपचार करून न घेता वैद्यकीय उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पीडित परिवाराला मिळाले व अघोरी उपचाराला आळा बसल्यामुळे ग्रामस्थांनी अंधश्रद्धा समितीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. याकामी गावाचे पोलीस पाटील जब्बार तडवी व भीमराव दाभाडे यांनी सहकार्य केले.
यापुढे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा देऊ नका, बुवा, मांत्रिकाला बोलावू नका, पोलिसांनी मांत्रिकांविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’चे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांनी केली आहे.