डॉक्टरांच्या सहवासाने माझी जडणघडण

नरेंद्र लांजेवार - 9422180451

‘अभिव्यक्तीची क्षितिजे’ हा माझा पहिला लेखसंग्रह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते 1999 मध्ये प्रकाशित करण्यात आला. बुलढाण्याला प्रकाशन समारंभ होता. बुलढाण्याचा गर्दे हॉल तुडुंब भरला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर, सोबत विचारपीठावर संजय आवटे व ‘गझल’कार डॉ. श्रीकृष्ण राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयीन जीवनापासून आठ-दहा वर्षांत साप्ताहिक साधना व इतर मासिकांमध्ये माझे जे लेख माझे प्रकाशित झाले होते, त्या लेखांचं हे पुस्तक होतं. वयाच्या अठरा ते अठ्ठावीस या वयात मी लिहिलेले लेख यात आहेत. यामध्ये मी नागा साधूंवर लिहिलेला व ‘साधना’ने कव्हरस्टोरी म्हणून छापलेला दीर्घ लेख होता. सोबतच ‘साधना’ने छापलेली ‘सिद्धसायंन्सचा भांडाफोड’ हीसुद्धा एक कव्हरस्टोरी होती. गोरफडाची दाहकता, सैलानीतील अघोरी अंधश्रद्धा, असे काही वृत्तांत होते. हे सर्व लेख साप्ताहिक साधनातून प्रकाशित झालेले होते. प्रकाशन समारंभात डॉ. दाभोलकर पुस्तकावर व माझ्या लेखनावर भरभरून बोलले. नरेंद्र लांजेवारांच्या लेखणीमध्ये भल्या-भल्यांचे बुरखे पाडण्याची क्षमता आहे, म्हणून हा नरेंद्र मला आवडतो, असं त्यांनी जाहीर सांगितलं.

1990 पासून डॉक्टरांचा आणि माझा व्यक्तिगत संपर्क होता. बुलढाणा जिल्ह्यात ‘साधना’चे वर्गणीदार वाढवण्याचे काम मी करत होतो. एक – दोनदा त्यांनी आणि पन्नालाल सुराणा यांनी ‘साधना’ कसे वाढवता येईल, यासाठी काही जिल्हा प्रतिनिधींची बैठक पुण्यामध्ये आयोजित केली होती. ‘साधना’ हे साने गुरुजींच्या नावावर निघते. यामध्ये बालसाहित्याची काही पाने असावीत, असा आग्रह मी धरला होता. ते बर्‍याचदा म्हणायचे, ‘बघूया…’ मी बुलढाणा जिल्ह्यातून ‘साधने’ला वाचक मिळावेत, यासाठी डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये एक वाचक मेळावा घडवून आणला. त्यावेळेस ते माझ्या घरी प्रथमच मुक्कामाला थांबले…

सुरुवातीला जेव्हा एकसंध अंधश्रद्धा निर्मूलन समिती होती, त्यावेळेस पहिल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास मी नागपूरला उपस्थित होतो. त्या आठवणी त्यांना सांगितल्या. ‘अंनिस’मध्ये फूट पडल्यानंतर मी ‘अखिल भारतीयवाल्यां’पासून पासून दोन हात दूरच राहिलो.

नरेंद्र लांजेवार

मी तसं महाविद्यालयीन शिक्षणापासूनच पुरोगामी डाव्या विद्यार्थी चळवळीशी जोडून घेतले होते. मी ज्या भारत विद्यालयात काम करतो, तिथे दिवाकरभैय्या आगाशे यांच्याकडे यदुनाथ थत्ते नेहमी येत असत. थत्ते काकांनीच मला ‘साधना’शी सुरुवातीला जोडून घेतले. त्यापूर्वी आम्ही बुलढाण्यात सामाजिक कृतज्ञता निधीसाठी डॉ. श्रीराम लागू आणि दाभोलकर यांनी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक आणले होते. या नाटकाच्या तिकीटविक्रीसाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. मी विद्यार्थी चळवळीत काम करत होतो, तेव्हापासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आणि माझा परिचय होता. डॉ. दाभोलकर यांनी ‘साप्ताहिक साधना’ची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘साधना’चे वार्षिक वर्गणीदार वाढवण्यासाठी ते या भागात आले, त्या वेळेस मी माझ्या प्रगती सार्वजनिक वाचनालयात त्यांचा ‘साधना’चे संपादक म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला व त्या एका कार्यक्रमात 40 पेक्षा जास्त लोकांनी ‘साधना’ची वर्गणी भरली. त्यानंतर मी अनेकांची जिल्हाभरातून वर्गणी गोळा करून ‘साधना’कडे सातत्याने पाठवत असे.

साधारणत: दर तीन महिन्यांत डॉक्टरसाहेब विदर्भ, खानदेश, मराठवाड्यामध्ये येताना किंवा जाताना बुलढाण्यात माझ्याकडे जायचे, थांबायचे… खासगी गप्पांमध्ये ‘आता पुढचे पुस्तक कोणते,’ असे विचारायचे. ‘सातत्याने लेखन करीत राहा …आज लेखन करणारे कार्यकर्ते हवे आहेत,’ असे ते मला म्हणत. त्यांच्या हयातीत माझी अभिव्यक्तीची क्षितिजे, अभिव्यक्तीची स्पंदने, वाचू आनंदे, लहान मुलांच्या गोष्टी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या : चिंतन आणि उपाय, शिक्षणावर बोलू काही- शिक्षणावर बोलू नाही…. आदी पुस्तके प्रकाशित झाली. माझ्या काही पुस्तकांवर ‘साधना’मधून परीक्षणंसुद्धा छापून आली.

डॉक्टरसाहेब प्रत्येक भेटीत माझ्या सोबत बोलताना खंत व्यक्त करायचे की, बुलढाणा भागात आपल्याला ‘महाराष्ट्र अंनिस’चे काम सुरू करता आले पाहिजे. मी आमच्या बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयामध्ये शिक्षक, प्राध्यापकांसाठी ‘विवेक वाहिनी’चे काम डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये सुरू केले; पण पुढे ते जास्त काळ टिकले नाही. नंतर मी पुढाकार घेऊन डॉ. दाभोलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने तीन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. डॉक्टरसाहेब दोन दिवस पूर्ण वेळ हजर होते. जिल्हाभरातून 115 पेक्षा जास्त लोकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. आम्ही जिल्हा कार्यकारिणी केली. पुढे जिल्हा अध्यक्षांची बदली झाली. पुन्हा ‘महाराष्ट्र अंनिस’चे काम बंद पडले. जे कार्यकर्ते तयार झाले होते, ते अखिल भारतीय अंनिसकडे वळले, ही बाब मी डॉ. दाभोलकर यांना सांगितली. ते फक्त हसले, ‘पुढे बघू,’ म्हणाले. नंतर आमचाच वर्गमित्र हर्षवर्धन सपकाळ हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला व आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक शाळांना व जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांना ‘साधना’ची वर्गणी भरण्याची विनंती केली. ‘साधना’चे बर्‍यापैकी वर्गणीदार आपल्या निश्चित मिळतील, असे आम्हाला वाटले. हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा डॉक्टरसाहेबांना तसा शब्द दिला व काही वर्गणीदार मिळाले. पुढे ‘साधना’ने बाल दिवाळी अंक काढायचे ठरवले व त्याच्या पहिल्या बैठकीसाठी त्यांनी मला पुण्याला बोलून घेतले. हेरंब कुलकर्णी, विनोद शिरसाठ व इतर काही मोजकीच मंडळी त्या ठिकाणी होती. ‘बालसाधने’चा अंक महाराष्ट्रभर आपण पोचवू. यासाठी काय-काय करावे लागेल, याचे त्यांनी सुंदर पद्धतीने नियोजन केले होते.

मी सातत्याने परिवर्तनवादी पुरोगामी विचारांना धरून लेखन करत होतो. 2010 ला सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार त्यांनी मला बाबा आढाव, डॉ. लागू यांच्या हस्ते फुले वाड्यामध्ये दिला.

आमच्या प्रगती व्याख्यानमालेतही डॉक्टरसाहेब आले होते. ते जेव्हा-केव्हा बुलढाण्याला मुक्कामी येत, त्या वेळेस मी त्यांचे एक व्याख्यान, तर संध्याकाळी किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी एखाद्या शाळा-महाविद्यालयामध्ये एक व्याख्यान आयोजित करीत असे. त्यांचे व्याख्यान म्हणजे सुस्पष्ट विवेकी विचारांची एक मैफल असायची. ओघवत्या शैलीने विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करताना विरोध करणार्‍यांशी सुद्धा ते आदराने संवाद साधत असत व सर्व सभागृहच मंत्रमुग्ध होऊन जात असे. आपल्या मनातील अनेक प्रश्नांना त्यांच्या व्याख्यानातून उत्तर मिळत असे.

मी बाल वाचनालयाची चळवळ सुरू केली, तेव्हा ते वैज्ञानिक प्रयोग बघण्यासाठी सुद्धा ते आले होते. माझा मुलगा मकरंद पाच वर्षांचा असताना त्यांनी घरी मुक्कामी थांबून मकरंदसमोर सर्व जादूच्या प्रयोगाच्या नावाखाली समाजात चालणारे वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले. मुलाच्या निमित्ताने त्यांनी मला हे सर्व प्रयोग घरी शिकवले. डॉ. दाभोलकरांनी सातत्याने संपर्कात राहून माझ्यावर बर्‍याच कामांची जबाबदारी टाकली. यातून काही कार्यकर्ते आम्ही देऊ शकलो. बुलढाण्यात सर्वांच्या प्रयत्नाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सुरू झाले. सोबतच साहित्य चळवळीचे सुद्धा उपक्रम सुरू होते. आम्हाला कोणी वक्ता हवा असेल, तर डॉक्टरसाहेबांना फोन केला की, डॉक्टरसाहेब समोरच्या वक्त्याला हमखास सांगत, ‘तिथे नरेंद्र नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे जरूर जा…’ डॉक्टरसाहेबांमुळे राष्ट्र सेवादल व नर्मदा बचाव आंदोलनातील अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आले. कोणत्याही पुरोगामी चळवळीचे कोणतेही काम असेल तर ‘बुलढाणा येथे आपला नरेंद्र आहे,’ असं ते अनेकांना सांगत असत. त्यामुळे या सगळ्या समाजवादी- पुरोगामी चळवळींसाठी माझं घर हे हक्काचं ठिकाण कधी बनले, हे कळलेच नाही. अनेक मान्यवर डॉक्टरसाहेबांमुळे माझ्या घरी येऊन गेलेत, याचा मला आनंद वाटतो. या सर्व लोकांच्या सान्निध्यात आल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडून एक वैचारिक बैठक पक्की झाली आणि चळवळीत कोणतेही पद नसतानाही चळवळीला जी काही मदत करता येईल, ती आपण करीत राहिले पाहिजे, हा माझा स्वभाव बनला.

डॉ. दाभोलकर पायाला भिंगरी लावून चळवळीसाठी झटत राहिले. त्यांनी अनेक प्रश्नांना ऐरणीवर आणले. आपण त्यांच्या पाऊलवाटेने चालत राहिले पाहिजे, हा निर्धारच माझ्यासाठी फार मोठी प्रेरणादायी बाब आहे. डॉ. दाभोलकर गेल्यानंतर मी थोडा अधिक क्रियाशील झालो. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पुरोगामी, परिवर्तनवादी विचारमंथनाच्या कामाशी मोठ्या प्रमाणावर जळवून घेतले. डॉ. दाभोलकरांच्या सहवासाने आमच्या व्यक्तिमत्त्वावर वाचन-लेखन चिंतनाचे संस्कार झालेत, हे मात्र तितकेच खरे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]