अंनिवा -

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर कारवाईचा प्रस्ताव

त्वचा जळजळणे, उंची वाढणे, केसांची वाढ होणे यासह शरीरसंबंधाबाबत दावे करणार्‍या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता 50 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) या कायद्यांतर्गत बदल करण्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने प्रस्तावित केले आहे.

औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) 1954 च्या कायद्यामध्ये जवळपास 54 आजार नमूद केले असून यासंबंधी आक्षेपार्ह जाहिरात केल्यास शिक्षा होईल असे नमूद केले आहे. मात्र यात शिक्षेचे स्वरूप दिलेले नाही.

दिवसेंदिवस विविध आजारांवरील औषधांच्या आकर्षक जाहिराती दाखवत फसवणूक करण्याचे किंवा याला बळी पडण्याचे प्रकार घडत आहेत. तेव्हा याला चाप लावण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने हातचलाखी सुरू केल्या आहेत. यासाठी मसुदा प्रस्तावित केला असून सूचना आणि हरकतींसाठी खुला केला आहे.

आक्षेपार्ह जाहिराती प्रदर्शित केल्या कारणास्तव पहिल्यांदा दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षा तसेच दहा लाख रुपयांचा दंड होईल. वारंवार दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षा आणि 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल, असे या मसुद्यात नमूद केले आहे.

कायद्यातील नवीन बदल : जुन्या कायद्यात नमूद असलेल्या आजारांच्या यादीमध्येही काही बदल केलेले आहे. त्वचा उजळणे, एड्स, केसांचा रंग बदलणे, केसांची वाढ होणे, हत्तीरोग, अनुवंशिक आजार, मेंदूची शक्ती वाढविणे, उंची वाढविणे, समागमामध्ये अधिक आनंद मिळवून देरे, मानसिक आजारातून बरे करणे, मूत्रपिंडातील खडे आदींचा नव्याने समावेश केला आहे.


बोटांवरील रेषांवरून विद्यार्थ्यांचा बुध्दयांक ओळखण्याची ‘टूम’

भारतीय मानसशास्त्रज्ञ संस्थेने (आयपीएस) अवैज्ञानिक ठरवलेली ‘डर्म्याटोग्लाफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स’ चाचणी (डीएमआयटी) दहिसर पूर्व येथील ‘लिटिल लर्नर्स अ‍ॅकॅडमी’ या शाळेत दरवर्षी बिनदिक्कतपणे घेतली जात आहे. वयाची धड तीन वर्षेही पूर्ण न केलेल्या मुलांचा बुध्दयांक आणि करिअर कल ओळखण्याचा प्रकार या शाळेत होतो. त्यासाठी पालकांकडून 600 रुपये शुल्कही वसूल केले जात आहे.

बोटांवर असलेल्या रेषांचा. संबंध थेट मेंदूशी असतो. या रेषांवरून बालकाची कौशल्ये वाचता येतात. या संकल्पनेवर ‘डीएमआयटी’ आधारित आहे. यात प्ले ग्रुपला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ठसे घेतले जातात. त्याची छापील अहवाल पुस्तिका दिली जाते. यात दिलेला मजकूर वैज्ञानिक संशोधनावर आधारित असल्याचा दावा अवास्तव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या डाव्या आणि उजव्या मेंदूमध्ये कोणते गुण किती प्रमाणात आहे, हे टक्केवारीमध्ये सांगण्यात आले आहे.

शास्त्रीय आधार नसलेली चाचणी

* ‘डीएमआयटी’मधून येणारे निष्कर्ष योग्य असतात याला भारतीय मानसशास्त्र संस्थेने मान्यता दिलेली नाही, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे ही चाचणी करायची की नाही, याचा विचार पालकांनी करावा’ असे मानसशास्त्रज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.

* ‘डीमआयटी’ अवैज्ञानिक व बेकायदा आहे. पूर्व प्राथमिक शाळेत अशा प्रकारच्या चाचण्यांची गरज नाही. नववी, दहावीला गेल्यावर मानसशास्त्रज्ञांकडे जाऊन अभियोग्यता चाचणी करावी. चाचणी करणार्‍या शाळेबाबत ‘आयपीएस’ संस्थेच्या मानसशास्त्रज्ञांना पत्र लिहिणार असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले.


पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात महायज्ञाद्वारे विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार

‘द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी’ अशी ओळख सांगणार्‍या पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात व्यवस्थापन, विधी आणि इतर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविले जातात. मात्र सध्या अभ्यासासह विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार बिंबवले जात आहेत. ‘तरुणांच्या पुनरुज्जीवना’साठी दहा दिवसांचा ‘अति रूद्र महायज्ञ’ करण्यात येत असून त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन आणि वातावरणाचे शुद्धिकरण घडून विद्यार्थ्यांभोवती दैवी शक्तीचे सुरक्षा कवच तयार होईल, असा दावा संस्थेने केला आहे.

शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम असावेत का यावरून अनेक नामांकित संस्थांमध्ये वाद सुरू असताना विद्यार्थी धार्मिक व्हावेत, यासाठी संस्थेने महायज्ञ सुरू केला आहे. रोजच्या तासिकांच्या वेळात सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा सोहळा संस्थेत सुरू आहे.

“सर्वांना शिवाची शक्ती मिळावी, दैवी शक्तीचे सुरक्षा कवच तयार व्हावे. तरुणांचे पुनरुज्जीवन व्हावे, विद्यार्थ्यांना वैदिक संस्कृतीची वैज्ञानिक ओळख व्हावी. वातावरण आनंदी व्हावे. यज्ञाद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जावे आणि त्या आधारे वातावरण शुद्ध व्हावे. जेणेकरून मानवतेचे कल्याण होईल,” असे या यज्ञामागील उद्दिष्ट असल्याचे संस्थेने पत्रकाद्वारे नमूद केले.

संस्था काय म्हणते?

शिक्षणसंस्थेत धार्मिक गोष्टी का असाव्यात? श्रद्धा किंवा धर्म ही वैयक्तिक बाब नाही का, असे विचारले असता ‘सध्याच्या काळात फक्त विज्ञान माहीत असून चालणारे नाही. वैदिकशास्त्राचे ज्ञानही आवश्यक आहे. अतिरूद्राचे खूप फायदे आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा खूप फायदा होतो. विशेषत: या यज्ञातून बाहेर येणार्‍या धुरामुळे परिसर शुद्ध होतो. सकारात्मक ऊर्जा पसरते. हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.’ असे उत्तर मिळाले.

होतेय काय?

राज्यातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनाची लगबग सुरू आहे. असे असताना पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी संस्थेला दैवी शक्तीचे संरक्षण मिळावे यासाठी यज्ञसोहळा यशस्वी करण्यात गुंतले आहेत. चर्‍होली येथील शिक्षण संकुलाच्या मैदानावर मंत्रघोष घुमला आहे. दहा दिवस संस्थेच्या आवारात हा महायज्ञ झाला.

विद्यार्थी धार्मिक व्हायला हवेत’

शिक्षण संस्थेने महायज्ञ आयोजित करण्याचे कारण काय, असे विचारले असता संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी सांगितले, “संस्थेच्या परिसराबरोबरच पुणे शहरात वातावरणाचे शुद्धिकरण व्हावे. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वैदिक ज्ञानाचा मेळ घालता यावा. चांगले संस्कार व्हावेत. आताची पिढी ही आधुनिकीकरणामुळे धार्मिकतेकडे वळत नाही. मात्र धार्मिकतेची जोड आवश्यक असते. त्यामुळे प्रत्यक्ष सर्व पाहून विद्यार्थ्यांना धार्मिक आणि वैदिक गोष्टींचे महत्त्व कळावे यासाठी हा महायज्ञ करण्यात येत आहे.