बालसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘आबाची गोष्ट’

नरेंद्र लांजेवार -

2020 या वर्षीचा बालसाहित्य अकादमी पुरस्कार श्री.आबा गोविंद महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या पुस्तकाला मिळाला आणि खानदेशाच्या मातीचा, अहिराणी बोलीचा व सातत्यपूर्ण बालसाहित्य लेखनाचा सन्मान झाला आहे. संपूर्ण बालसाहित्याच्या क्षेत्रातून योग्य व्यक्तीची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये सालदाराच्या घरात जन्मलेल्या आबा गोविंद महाजन यांनी शिक्षक, नायब तहसीलदार ते तहसीलदार पदापर्यंत मजल मारली. त्यांनी बालसाहित्यात राज्य पुरस्काराची हॅट्ट्रिक केल्यानंतर ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहावर बालसाहित्यातील साहित्य अकादमीची मोहोर उमटली.

श्री. आबा गोविंद महाजन यांचे अंनिस वार्तापत्राच्या वतीने अभिनंदन केल्यावर ते आपल्या जडणघडणीबद्दल भरभरून बोलत होते…ते म्हणाले, “शिक्षक असताना साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा लळा लागल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याचे ठरविले. वेगळ्या प्रयोगाची दखल निश्चितच घेतली जाईल, असे मला वाटायचे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणार्‍या जिद्दी मुलांच्या या कथासंग्रहाची दखल साहित्य अकादमीने घेतल्याने मनस्वी समाधान वाटल्याचे आबा महाजन यांनी सांगितले. एरंडोलमध्ये सालदाराच्या कुटुंबात माझा जन्म झाला. ‘आबांची गोष्ट’ या संग्रहातील सतरापैकी निम्म्या कथा एरंडोलच्या वातावरणातील खानदेशी बोलीत आहेत. प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. नोकरी लवकर मिळण्यासाठी मी डी.एड. केले. जामनेर व एरंडेल तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. तेथे साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा लळा लागला. स्वतः मुलांसाठी लिहावे असे वाटे लागले. तेथूनच बालसाहित्याचा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला.”

“1994 मध्ये माझी पहिली कविता ‘किशोर’ मासिकात प्रसिद्ध झाली. 2001 मध्ये ‘गमतीच्या राज्यात’ हे माझे पहिले पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झाला. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. राज्य शासनाचा बालसाहित्य विभागाचा तीनवेळा पुरस्कार माझ्या तीन कवितासंग्रहांना मिळाला. मी 2010 मध्ये नायब तहसीलदार झालो, तोपर्यंत पारंपरिक साचेबंद पद्धतीने बालसाहित्य लिहित होतो. बालसाहित्यामध्ये प्रयोग करणे आवश्यक असल्याचे मत मला वाटू लागले. तोच तो प्रकार मुले वाचत नाहीत, म्हणून मी विविधांगी प्रयोग करायला सुरुवात केली. ‘मन्हा मामानंगावले जाऊ’ या पुस्तकात अहिराणी मराठी अशा द्विभाषिक प्रयोग केला. याही पुस्तकाला राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला. ‘मन्हा गावले..’ अहिराणी बोलीतील पुस्तक प्रकाशित झाले. ‘आबाची गोष्ट’ हा कथासंग्रह प्रमाणभाषेतील असला तरी खानदेशी बोलीतील शब्द त्यात पेरले आहेत, मुलं सहज वाचतील, अशा कथा या संग्रहात आहेत. हा कथासंग्रह वाचल्यानंतर नंतर अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या,” असे मत पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना आबा महाजन यांनी ‘महाराष्ट्र अंनिस वार्तापत्रा’जवळ व्यक्त केले.

श्री. आबा गोविंद महाजन हे बालसाहित्यातील सर्व वाङ्मय प्रकार हाताळणारे व्यक्तिमत्त्व आहे. अतिशय गरिबीतून, कष्टातून, ग्रामीण भागातून आलेल्या या मुलाने शिक्षणाच्या भरवशावर तहसीलदारपर्यंतची आपली मजल गाठली आहे. तहसीलदार होण्यापूर्वी ते खानदेशमध्ये शिक्षक होते. शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यातूनच साहित्यवाचन आणि लेखनाचा छंद त्यांनी जोपासला. त्यांना स्वत:ला बालसाहित्य लेखनाची नेमकी नस गवसली. त्यातच त्यांनी अनुभवलेल्या बालपणातील कडू-गोड आठवणी आणि अनुभवसाठा याव्दारे ते बालसाहित्य लेखनात व्यक्त होत गेले.ग्रामीण भागातील वास्तव आणि विपरीत परिस्थितीला सातत्याने तोंड देत राहिल्याने ती परिस्थिती इतरांसाठी प्रेरक बनू शकते, या अनुषंगाने त्यांनी बरेच बाल-कुमार कथा आणि काव्यलेखन केले आहे. त्यांचे साहित्य आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठामध्ये आणि आठवी सुलभ भारती, चौथी बालभारती या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाले आहे.

साने गुरुजींच्या बालसाहित्याशी नातं सांगत-सांगत त्यांनी ‘गमतीच्या राज्यात’, ‘रिमझिम गाणी’, ‘लई मज्जा रे’, ‘बिस्कीटचा बंगला…’ इत्यादी त्यांचे कवितासंग्रह आणि ‘मौजमजा’ हा शिशुगीत संग्रह प्रकाशित आहे. ‘चिऊचा मोबाईल’ आणि ‘वाघोबाची गांधीगिरी’ हे दोन बालविनोद कवितासंग्रह प्रकाशित आहेत. चार ओळींचा द्विभाषिक बालकविता संग्रह असा आगळावेगळा प्रयोग गमतीदार खेळांचा खजिना आणि किशोर-कुमारांसाठी कवितासंग्रह आपल्याला बघायला मिळतो. अहिराणी बोली भाषेतील ‘मन्हा मामाच्या गावले जाऊ’, ‘मन्हा गावले’ आदी त्यांचे बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांची ‘ठोंब्या’ ही बालकादंबरी बालसाहित्यात विशेष भावली आहे. त्यांचा ‘शेखचिल्लीची फुल-टू-धमाल’, ‘बाबाची गोष्ट’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या काही पोस्टर कवितासुद्धा प्रकाशित केल्या आहेत. त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि ग्रंथालयांमध्ये बघावयास मिळतात. यामध्ये शाळा, आपले घर, शिक्षक, शेतकरी राजा, ग्रंथ महिमा यांचा समावेश होतो. त्यांनी ‘ऑपरेशन भोंदू बाबा’ हे बालनाट्य त्यांनी आकाशवाणी जळगाव केंद्र यासाठी लिहिले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पुस्तकं संपादित केली आहेत. त्यामध्ये मैत्री लांजेवार, डॉ. संगीता म्हसकर, कविता महाजन, संगीता माळी, डॉ. किसन पाटील, जगदीश पाटील अशा अनेकांनी योगदान दिले आहे. त्यांच्या बर्‍याच कविता अहिराणी भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. अहिराणी ही जळगाव, खानदेशमध्ये बोलली जाणारी बोलीभाषा आहे. या भाषेत प्रचंड गोडवा आहे. साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, निसर्गकवी ना. धों. महानोर, विंदा, पाडगावकर यांच्या जातकुळीशी नाते सांगणारी बालकविता आबा महाजन यांनी पुढे नेली आहे. महाराष्ट्र शासनाचे तीनवेळा राज्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य परिषद, बापूसाहेब ठाकरे बालवाङ्मय पुरस्कार, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य पुरस्कार, पृथ्वीराज तौर उत्कृष्ट मातोश्री पुरस्कार, शशिकला आगाशे स्मृती पुरस्कार आदींनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

खानदेशमधील एरंडोल या गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरी पाच एकर कोरडवाहू जमीन. वडील दुसर्‍याच्या शेतात सालदार. काबाडकष्ट करून आयुष्य गेलं. बालपणीच आई वारली. आत्या, मावशा, काकूंनी त्यांचा सांभाळ केला. सुटीमध्ये काम शोधणे, कधी ढोरामागे जाणे, भाजीपाला विकणे, बोरं विकणे असे करीत-करीत कसेबसे शिक्षण पूर्ण केले. इतर मोठे श्रीमंत शेतकरी मालक, ‘शिकून काय तू मामलेदार होणार आहेस? ढोरं ओढ …’ असं जेव्हा बोलत, त्यावेळेस आबा महाजन यांचे मन दुखायचे.

वाचनाशिवाय पर्याय नाही. आपण वाचत, अभ्यास करत राहिले पाहिजे, शिकत राहिले पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन बारावीनंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. 2009 मध्ये महाराष्ट्र एमपीएससीमार्फत ते तहसीलदार बनले. सालदाराचा मुलगा ते तहसीलदार हा प्रवास त्यांना खूप अनुभवांची शिदोरी घेऊन गेला. याच अनुभवांच्या पेरणीवर त्यांनी ‘आबांची गोष्ट’ लिहिली आहे. हे पुस्तक पुण्याच्या दिलीपराज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात स्वानुभवावर आधारित सत्य अशा 17 गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. आपल्याला जीवनात जे काही आपण अनुभव आपण घेतलेले आहेत, जे मनाला भावले आहेत, ते त्यांनी लिहून काढले आहेत. या पुस्तकाची पाठराखण बालसाहित्यिक डॉ. रणजित शिंदे यांनी केलेली आहे.

‘आबाची गोष्ट’ या पुस्तकात शाळकरी मुलांच्या भावविश्वाचा कथा आहेत. संस्कार व बोधकथा असे त्यांचे स्वरूप आहे. ग्रामीण, निमशहरी अशा या कथांचा चित्रणप्रदेश आहे. प्रतिकूल अवस्थेत धडपडणार्‍या, परिस्थितीशी दोन हात करणार्‍या, प्रामाणिक, जिद्दी मुलांच्या या संघर्षकहाण्या आहेत. या मुलांच्या जोडीला पालकांचे एक जग त्यांच्या भल्या-बुर्‍यासह या कथांमध्ये चित्रित झाले आहे. किशोरवयीन मुलांच्या चित्रणात प्रेरक दृष्टी आहे, सामाजिक सहिष्णुता, समता, सत्य, सचोटी, चांगुलपणा या तत्त्वांचा आविष्कार करणारी दृष्टी या गोष्टींमध्ये आहे.

शिक्षकी पेशात लेखक राहिल्यामुळे सानेगुरुजींच्या शाश्वत मूल्यांची पेरणी करणार्‍या गोष्टी आणि स्वतः बालसाहित्यात विविधांगी प्रयोग करून स्वतःची विकसित करत गेलेली बालसाहित्याची लेखनशैली, यामुळे आबा गोविंद महाजन यांचे बालसाहित्य बालकांनाच आवडते असे नव्हे, तर शिक्षकांनाही, पालकांनाही ते मनापासून भावते. त्यांचा ठोंब्या हा बालनायक बालवाचकांना विशेष भावतो.

‘आबाची गोष्ट’ या कथेमध्ये स्वतः आबा गोविंद महाजन यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगितल्या आहेत. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तक विकत घ्यायला पैसे नसताना शेतातील बोरे विकून त्यातून आलेल्या पैशांतून आबांनी पुस्तक विकत घेतले. दिवस-रात्र वाचून काढले, परीक्षा दिली तरी परीक्षेत यश आले नाही. मग त्यांच्या गोरे गुरुजींनी धीर आणि आधार दिला. “पुढच्या परीक्षांमध्ये यश मिळव, चांगला अभ्यास कर…” हा त्यांना सल्ला दिला. आबांचे पुढे अभ्यासाशी अधिक घट्ट नाते जोडून आले. शिक्षकी पेशा स्वीकारल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला आणि पहिल्याच प्रयत्नात ते तहसीलदार म्हणून नियुक्त झाले. आपण घेतलेल्या कष्टाची परतफेड झाल्याचा आनंद त्यांना झाला. ही सत्यघटनाच त्यांनी ‘आबाची गोष्ट’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त शीर्षक कथेमध्ये सांगितली आहे. हे पुस्तक दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची आतील व मुखपृष्ठावरील रेखाचित्रे सरदार जाधव यांनी अतिशय कल्पक रेखाटली आहेत. हा कथासंग्रह त्यांनी आपल्या आई-वडिलांना, भाऊ-बहीण आणि आत्याला समर्पित केला आहे. ‘गारपीट’ या गोष्टीत शेतकरी व गाय-वासरू गारपिटीमध्ये मृत्यू पावतात, ही हृदयद्रावक कथा वाचकांना भावविभोर करते. ‘रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा’, ‘मराठी सहावा मॅट्रिक’, ‘मला शिकायचं’, ‘बोलका वर्ग’, ‘कष्टाळू चोर’, ‘गुरं-ढोरं आणि पुस्तक’, ‘दोस्ती राम-रहीम’ची आदी सर्वच कथांमधून आबा महाजन बालवाचकांमध्ये बंधुभावाची पेरणी करीत असतात. बालवाचकांची नेमकी नस आणि बालसाहित्य लेखनाची भाषाशैली त्यांना गवसल्यामुळे त्यांचे बालसाहित्य बालकांच्या आणि पालकांच्या पसंतीस उतरले आहे. श्री. आबा गोविंद महाजन नावाच्या या कष्टकरी व्यक्तिमत्त्वाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्यातील बालसाहित्य लेखनातील प्रयोगशीलता अशीच विकसित होत जावो, यासाठी त्यांना मनापासून सदिच्छा…!

पुस्तकाचे नाव : आबांची गोष्ट
लेखक : आबा गोविंद महाजन (संपर्क 9423492088)
प्रकाशक : दिलीपराव प्रकाशन, पुणे
पाने – 104 किंमत – 100 रु.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]