छद्मविज्ञाना विरोधात अंनिसची भूमिका

प्रा. प. रा आर्डे -

प्रा. . रा. आर्डे

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी संपादक प्रा. .रा.आर्डे यांचा पहिला स्मृतिदिन १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आहे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समस्त कार्यकर्त्यांकडून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळाकडून विनम्र अभिवादन.

प्रा. आर्डे सरांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय छद्मविज्ञान हा होता. ‘छद्मविज्ञान’ या विषयावरील त्यांचा लेख त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ्य पुर्नप्रकाशित करीत आहोत.

संपादक

जेम्स रँडी या विवेकवादी जादूगाराचे एक प्रसिद्ध वाक्य आहे – ‘लोकांना फसायची भारी हौस असते; तेव्हा तुम्ही त्यांना खुशाल फसवा.’ विविध प्रकारच्या वस्तूंची जशी दुकानदारी, तशी ज्ञानाचीही ‘दुकानदारी’ असते. आपल्याला ज्ञान म्हणून अज्ञान विकणारे भलतेच चलाख असतात. त्यांची चलाखी सामान्य लोकांना बर्‍याच वेळा कळत नाही; पण भलेभले तथाकथित बुद्धिवंतसुद्धा त्यांच्या गळाला लागतात. फसण्याचा आणि फसवण्याचा हा खेळ जगात सर्वत्र आढळतो. कोणतंही ज्ञानाचं क्षेत्र यातून सुटलेलं नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात नकली विज्ञानाने जो धुमाकूळ घातला आहे, तो आध्यात्मिक बुवाबाजीला देखील मागे टाकणारा आहे. एकवेळ आसाराम, रामरहीम परवडले; पण विज्ञानाच्या आवरणाखाली विविध नकली साधने विकत घेणार्‍या लोकांची संख्या खोट्या आध्यात्मिकतेला फसणार्‍या लोकांपेक्षाही जास्त असते.

छद्मविज्ञान म्हणजे विज्ञानाचा आभास किंवा नक्कल. यालाच फसवे विज्ञान किंवा नकली विज्ञान असेही म्हणतात. हे छद्म विज्ञान पूर्वापार चालत आलेले आहे, ते धर्माच्या संगतीने. पुरोहितांनी जेव्हा धर्म आपल्या ताब्यात घेतला, त्यावेळी लोकांना खोट्या कर्मकांडात गुंतवण्यासाठी त्यांनी छद्म विज्ञानाचा आधार घेतला. वास्तुपूजा किंवा घराची वास्तुशांती, वास्तुशास्त्र; तसेच कडक मंगळ आणि शनीचे फसवे मायाजाल ज्यात आहे, ते ज्योतिष ही छद्म विज्ञानाची पूर्वापार चालत आलेली उदाहरणे होत.

अलिकडच्या शे-दोनशे वर्षांत विज्ञानसंस्कृती भरभराटीला आली. विज्ञानसाधने माणसांना हस्तगत झाली. वस्तुनिर्मिती, प्रवास, करमणूक ज्ञानसाधने, अशा स्वरुपात विज्ञानयुग अवतरले आणि विज्ञानाचा दरारा समाजात निर्माण झाला. हा दरारा काही चलाख मंडळींनी ओळखला आणि विज्ञानावर नकली विज्ञानाची झूल पांघरून सामान्य लोकांना त्याकडे आकर्षित केले. वजन कमी करणार्‍या फसव्या उपचारांपासून ते ‘रेकी’सारख्या सर्व रोगहारी तंत्रापर्यंत, अ‍ॅक्युपंक्चरपासून ते लाखो रुपयांची चुंबकगादी लोकांच्या माथी मारण्यापर्यंत, मिडब्रेन अ‍ॅक्टिव्ह करून मुलांना आइनस्टाइन बनवण्यापासून ते कारखान्यात पिरॅमिड ठेवून तो कारखाना ऊर्जितावस्थेला आणण्यापर्यंत नाना प्रकारच्या छद्म विज्ञानाची भुरळ समाजात पसरत चालली आहे.

छद्मविज्ञानाच्या कचाट्यातून एकही सामाजिक क्षेत्र सुटलेले नाही. सर्वांत मोठी बनवेगिरी ही आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. खरं तर शरीररचनाशास्त्र (अ‍ॅनोटॉमी) आणि शरीर क्रियाशास्त्र (फिजिऑलॉजी) यात आधुनिक विज्ञानाने मोलाची भर घातली. औषधशास्त्राच्या संशोधनातून आणि शस्त्रक्रियेच्या कौशल्यातून आधुनिक विज्ञानाने मानवाचे आरोग्य सुखकर केले आहे; पण आधुनिक विज्ञानातील संकल्पनांचा चलाखीने गैरवापर करून आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम मोठे आहेत, असे खोटेच सांगून अ‍ॅक्युपंक्चर चुंबकोपचार होमिओपॅथी, रेकी, संमोहन अशा विविध छद्मविज्ञानांचा आरोग्यक्षेत्रात मुक्त संचार चालू आहे.

छद्मविज्ञानाच्या तावडीतून राजकीय क्षेत्रही सुटलेले नाही. जो समर्थ, तोच जगण्याला लायक आहे. या उत्क्रांती तत्त्वाचा प्राणिसृष्टीतील नियम उत्क्रांत झालेल्या माणसाला लावणे अर्थातच गैर आहे; पण आम्ही जर्मन श्रेेष्ठ आणि ज्यू कनिष्ठ; त्यामुळे श्रेष्ठांनी कनिष्ठांचा नि:पात करावा, या अविचाराने हिटलरने लाखो ज्यू लोकांना ठार केले. दुसर्‍या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये बराच काळ शीतयुद्ध चालू होते. या काळात कुलजिना नावाच्या एका बाईने अतींद्रिय शक्तीने तुम्हाला दृष्टीपलिकडचे पाहता येते, असे नकली विज्ञान प्रथम रशियन सैन्यात पसरवले. ही माहिती अमेरिकन गुप्तहेरांना कळताच अशा तर्‍हेचे दूर संवेदन (ठशोींश तळशुळपस) आपल्या सैन्यालाही हवे, असे वाटून त्या वेळच्या सैन्य अधिकार्‍यांना ही बातमी दिली. या तंत्राचे प्रयोग अनेक वर्षेअमेरिकन युद्धतंत्रात चालू होते; पण ते नकली निघाले आणि लाखो डॉलर्सचा या छद्म विज्ञानापायी चुराडा झाला.

छद्मविज्ञानचा पसारा आणि त्याचे दुष्परिणाम हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’ या मी लिहिलेल्या ग्रंथात छद्मविज्ञानाचे विविध प्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम; तसेच छद्मविज्ञानाविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला संघर्ष शब्दबद्ध केला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा.

छद्मविज्ञान किंवा नकली विज्ञान रोखायचे असेल, तर यासंदर्भात प्रबोधनाची मोठी मोहीम ‘महाराष्ट्र अंनिस’ने हाती घ्यायला हवी. अध्यात्माच्या नावाखाली जी बुवाबाजी समाजात पसरली आहे, तिच्या विरोधात ‘अंनिस’ने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली प्रखर लढा सुरू केला. तो लढा आजही विविध मार्गांनी सुरू आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक अघोरी अंधश्रद्धा, धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण अशा विविध विषयांवर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांची शिबिरे घेऊन हा विषय त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत पोचविला गेला आणि अंधश्रद्धा पसरविणार्‍या बुवांच्या विरोधात आक्रमक जनजागरण झाले. खोटारडा बुवा-बाबा पकडावा कसा, याचेही प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात आले; परिणामी लोकजागृती होऊन लोक स्वत: खोटारड्या बुवांच्या विरोधात ‘अंनिस’कडे तक्रार घेऊन येऊ लागले. अशा बुवाबाजीच्या विरोधात डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विविध प्रकारच्या साहित्याची निर्मितीही केली. अशाच पद्धतीने नकली विज्ञानाच्या विरोधात ‘अंनिस’ने कृतिशील कार्यक्रम आणि सशक्त जनजागरण चालू करायला हवे.

छद्मविज्ञानाच्या विरोधात व्यापक जनजागरणासाठी खालील कार्यक्रम आयोजित करावे लागतील. ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’ या विषयावर ‘अंनिस’च्या विविध केंद्रांमध्ये आणि ते शक्य नसेल, तर मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी नजीकच्या केंद्रातील कार्यकर्त्यांना एकत्र करून शिबीर आयोजित करावे. या शिबिरात खालील विषयाची चर्चा व्हावी.

१) विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील फरक २) अनर्थकारी छद्मविज्ञान ३) छद्मविज्ञानाचा पसारा ४) छद्मविज्ञानाचे मानसशास्त्र ५) छद्मविज्ञान ओळखायचे कसे? ६) काही निवडक केस स्टडीज ७) ‘अंनिस’ने छद्मविज्ञानाविरोधात केलेला संघर्ष.

अशा संघर्षात कोणत्या पद्धतीने आक्रमक व्हायचे, याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना द्यायला हवे.

छद्मविज्ञानाचे नवनवे प्रकार भूछत्राप्रमाणे भविष्यकाळात उदयास येतील, त्याची माहिती घेऊन अशा फसव्या विज्ञानातील खोटेपणा उघड करून त्याबाबत कार्यकर्त्यांना आणि लोकांना मार्गदर्शन करणारे विविध लेख अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रसिद्ध व्हावेत. नव्या सामाजिक समस्येबरोबर नवी लुच्चेगिरीही समाजात निर्माण होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोरोनावरील नकली उपचार सांगणार्‍या अशा विविध बाबांपासून ते विद्यापीठातील काही लबाड प्राध्यापकांपर्यंत; तसेच काही डॉक्टरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत छद्मविज्ञानाचे समर्थन केले गेले. अशा छद्मविज्ञानाचा समर्थपणे प्रतिवाद करण्यासाठी व्यापक जनप्रबोधन व्हायला हवे.

सध्या आपल्या अवतीभोवती ज्या छद्मविज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार सुरू आहे, तो लक्षात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे ठरवले, याचे कौतुक व्हायला हवे. शहरा-शहरांत, गल्ली-बोळात गर्भसंस्काराचे वर्ग वाढताना दिसत आहेत. गर्भ हा पोटात असताना त्याच्यावर कसले डोंबलाचे संस्कार करता येतील; पण हे फॅड लोकांना भुलवत आहे. समाजात सध्या आणखी एक मोठी समस्या लोकांना भेडसावत आहे, ती म्हणजे लठ्ठपणा. वैद्यकशास्त्रानुसार लठ्ठपणा हा मधुमेह, हृदयविकार आणि अशाच इतर आजारांना निमंत्रण देतो; परिणामी लोक लठ्ठपणा कमी करण्याच्या पाठीमागे लागतात आणि नकली विज्ञानाला बळी पडतात. या विषयाबाबतचे प्रबोधन या अंकात उपलब्ध आहे. प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ शंतनु अभ्यंकर यांनी पर्यायी उपचारांच्या नावाखाली समाजात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेल्या छद्मविज्ञानाचा समाचार घेतला आहे.

राज्यकर्त्या मंडळींनी तर कहरच केला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे छद्मविज्ञानाच्या तद्दन भूलथापा लोकांपुढे मांडून त्यांना ‘मामा’ बनवित आहेत. अशा भूलथापांचा समाचार घ्यायलाच हवा. वरील अज्ञानमूलक पसार्‍याचे मूळ काय? तर सोप्या मार्गाने प्रश्न सोडवण्याची लोकांची मानसिकता आणि सत्य आणि असत्य यातील फरक न ओळखण्याची त्यांची आंधळी वृत्ती. विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील भेद ओळखण्यासाठी विज्ञानातील मूलभूत तत्त्वे आणि नियम सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवायला हवेत. विज्ञानातील संकल्पनांचे केवळ शाब्दिक रूप वापरून छद्मवैज्ञानिक लोकांना गंडवतात. उदा. सकारात्मक ऊर्जा. खरं तर चुंबक रक्तावर काहीही परिणाम करत नाही. त्यामुळे चुंबकाने ब्लडप्रेशर बरं करणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे; पण छद्मवैज्ञानिक काय सांगतात पाहा – रक्तात लोह असते. चुंबक त्याला आकर्षित करतो. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि ब्लडप्रेशर कमी होते. हा युक्तिवाद म्हणजे शुद्ध थाप आहे. रक्तातील आयर्न हे बंधित म्हणजे रेणुस्वरुपात असते, त्यामुळे चुंबक त्यांना ओढू शकत नाही. विज्ञानातील असे प्राथमिक स्वरुपाचे नियम आणि सत्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी साहित्य निर्माण व्हायला हवे. ‘अंनिस’ ही समाजाचा विवेक वाढवणारी जनचळवळ आहे. नवनवे अविवेकाचे झरे समाजात कधी आणि कसे निर्माण होतील, हे सांगता येत नाही. ते ज्या-ज्या वेळी निर्माण होतील, त्या-त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी हाती घेतलेली विवेकाची मशाल ‘अंनिस’ने तेवत ठेवायला हवी.

. रा. आर्डे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]