मानवतावादी विज्ञाननिष्ठ : आर्डे सर

राजीव देशपांडे -

वार्षिक अंकातील मजकुराबद्दलची चर्चा, तयारी सुरू होती. आर्डे सरांचे ‘लढे विवेकवादा’चे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर होते. त्या पुस्तकाला सरांनी लिहिलेली प्रस्तावना वार्षिक अंकात घेऊयात, असे ठरत होते. तेवढ्यात सांगलीतील फसव्या विज्ञानाच्या संदर्भातले एक प्रकरण सरांकडे आले. त्या प्रकरणातून फसव्या विज्ञानातला एक नवाच प्रकार त्यांच्या लक्षात आला. मग वार्षिक अंकात लिहिण्यासाठी सरांनी आपला विषय बदलला आणि सद्यःस्थितीत उदयाला येत असलेल्या फसव्या विज्ञानाच्या या नवनवीन प्रकारांबद्दल लिहिण्याचे ठरवले आणि एक सविस्तर लेख लिहून पुराही केला. तो वार्तापत्राला पाठवला आणि पुढील चार-पाच दिवसांत – १४ ऑटोबरला – त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या पहिल्या अंकापासून ‘अंनिवा’चा आधारवड अचानक कोसळला. विद्वत्तेचे कोणतेही दर्शन नसलेली, प्रत्यक्ष जमिनीवरच्या अनुभवांवर आधारलेली सर्वसामान्य माणसाला कळेल, अशी विवेकी भाषा आणि प्रबोधनाची भूमिका मध्यवर्ती ठेवत त्यांनी गेली ३३ वर्षे ‘अंनिवा’त विपुल लेखन केले. ‘मानवतावादी विज्ञाननिष्ठा’ हा आर्डे सरांच्या एकूण लिखाणाचा गाभा होता. फसव्या विज्ञानावर लिहिणे तसे अवघड. त्यासाठी विज्ञानाचा सखोल अभ्यास हवा; तसेच सध्याच्या सामाजिक स्थितीचे विवेकी भानही. हे दोन्हीही आर्डे सरांकडे होते. त्यामुळे फसवे विज्ञान आणि धर्म, रुढी, परंपरा यांच्या जंजाळातून निखळ ‘वैज्ञानिक सत्या’ला अलगद बाजूला काढून दाखविण्याचे हे कसब आर्डे सरांनी लिहिलेल्या ‘अंनिवा’च्या आजवरच्या लेखांबरोबरच या वार्षिक अंकातील ‘नव्या गुरुबाजीचे मायाजाल’ या त्यांच्या अखेरच्या लेखातही दिसून येते. ‘अंनिवा’ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्यांची उणीव यापुढे सतत जाणवत राहील.

हा वार्षिक अंक आर्डे सरांच्या स्मृतीला अर्पण करत ‘अंनिवा’चे संपादक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समस्त कार्यकर्ते त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहेत. अंकातील एका लेखात आर्डे सरांची कन्या रुपाली हिने त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. मुक्ता दाभोलकर यांनी सरांच्या ‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकाचा परिचय वाचकांना करून दिला आहे.

गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, संत तुकाराम यांची चरित्रे मराठीत प्रथम लिहिणारे; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चरित्रकार धनंजय कीर यांनी ज्यांना महाराष्ट्राचा ‘उपेक्षित वाङ्मयमहर्षी’ म्हटले, त्या कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजींच्या जीवनचरित्राची ओळख करून देणारा लेख वाचकांना त्यांच्या संशोधनलेखनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि क्रांतिकारकत्वाची जाणीव नक्कीच करून देईल. १९ व्या शतकातील सामाजिक सुधारणांनी धर्मातील विचित्र परंपरा, रुढी, चाली-रीतींचा पुनर्विचार करण्यास कसे भाग पाडले, याचा धांडोळा घेणारा लेख प्रभाकर नानावटी यांनी लिहिला आहे. तसेच सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने सत्यशोधक केशवराव विचारे यांचा एक छोटा लेख आम्ही या अंकात देत आहोत.

ओरिसातील विवेकवादी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे कार्यकर्ते आणि या कामाला साथ देणारे काही शासकीय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष ओरिसात जाऊन गाठीभेटी घेऊन; त्याचप्रमाणे चमत्काराच्या अनेक दंतकथा ज्या जगन्नाथ पुरीच्या मंदिराबाबत सांगितल्या जातात, त्या मंदिराला भेट देऊन केलेला विस्तृत रिपोर्ताज ओरिसातील विवेकवादी चळवळीचे स्वरूप, संघर्ष व त्यांच्यापुढील आव्हाने याचे चित्र वाचकांपुढे उभे करेल आणि डॉ. दाभोलकरांनी पेरलेले हे विवेकवादी बीज कसे सर्वदूर रुजले आहे, यांची वाचकांना कल्पना देईल.

‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ या संस्थेने ‘कसोटी विवेकाची’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील प्रदर्शन मुंबईत आयोजित केले होते. त्या प्रदर्शनातील चित्रांची आणि वृत्तांताची रंगीत पाच पानी पुरवणी हे या वार्षिक अंकाचे वैशिष्ट्य आहे. वाचकांना ही पुरवणी नक्कीच भावेल.

‘बायबल तरंग- बायबलने हे जग कसे बदलले’ या परिसंवादात मांडल्या गेलेल्या अवैज्ञानिक दाव्यांना उघड करणारा अनुवादित लेख; तसेच पशुपालनातील अंधश्रद्धांच्या संदर्भातील लेख वाचकांच्या माहितीत नक्कीच भर टाकेल. ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची मुलाखत, मान्यवरांशी साधलेला संवाद, बालकथा ही वार्षिक अंकातील नेहमीची सदरे तर आहेतच; पण त्याचबरोबर या वार्षिक अंकात मुकेश माचकर यांनी हाताळलेल्या आगळ्यावेगळ्या कथाप्रकारातील ११ कथा आहेत. वाचक त्या कथांमागील ‘बोध’ नक्कीच घेतील.

कोरोनाच्या कठीण काळात ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रमाने वार्तापत्रासाठी देणग्या आणि जाहिराती गोळ्या केल्या होत्या. या वर्षीही कार्यकर्त्यांनी तेवढ्याच जिद्दीने देणग्या आणि जाहिराती संकलन करत वार्तापत्राचा वर्षभराचा आर्थिक भार सांभाळला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे संपादक मंडळातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

या अंकात लिहिणारे सर्व लेखक, चित्रकार, मान्यवरांबरोबर वार्तापत्राचे हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार, वार्तापत्र कार्यालय, मुद्रणालयातील कर्मचारी, वार्तापत्राचे वाचक आणि चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांना आगामी वर्ष आनंदाचे जावो, अशी सदिच्छा संपादक मंडळातर्फे व्यक्त करतो व ‘अंनिवा’चा हा वार्षिक अंक वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, अशी आशा व्यक्त करतो.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]