प्रा. दिनेश पाटील -
साधे हायस्कूल शिक्षक असणारे केळुसकर आयुष्यभर ज्ञानमार्गी राहिले. व्यावहारिक जबाबदार्या वगळता आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी व्यासंगात घालवला. केळुसकरांनी आपल्या जीवनात गौतम बुद्ध, शिवाजी महाराज आणि संत तुकारामांच्या मराठीतील पहिल्या चरित्रांबरोबरच २५ ग्रंथ लिहिले. त्यामुळेच कीरांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चरित्रकाराने ‘महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी’ अशा समर्पक शब्दांत त्यांचे मूल्यमापन केले आहे. आज आपण जेव्हा त्यांच्या समग्र लेखनातील प्रखर वैज्ञानिक दृष्टी असणारा लेखक अनुभवतो, हीच त्यांच्या संशोधन आणि लेखनाची खरी ताकद आहे, हे जाणवते.
कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा जन्म २० ऑगस्ट १८६० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील केळुस या गावी कुणबी-मराठा समाजात झाला. कृष्णरावांचे वडील सुरुवातीला नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला होते. चार वर्षांनंतर वडिलांनी मुंबईतील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर केळुसकर कुटुंबीय केळुस या मूळ गावी आले. केळुसला आल्यानंतर कृष्णरावांना एका नातेवाईकाकडे ठेवून सावंतवाडीच्या शाळेत घालण्यात आले. नातेवाईकाच्या शेजारी राहणार्या शेणवी कुटुंबाच्या घरी कृष्णराव सतत जात असत. त्या वेळचा एक प्रसंग केळुसकरांनी आपल्या आत्मचरित्रात वर्णिला आहे. केळुसकर लिहितात – ‘त्यांच्या घरी पोथ्या वाचण्याचा प्रघात असे. या पोथ्या ऐकावयास जाऊन बसण्यास मी मुळी कधी चुकवीत नसे. पोथ्यांचा चौरंग झाडून ठेवणे व दिवा लावण्याचे काम मी मोठ्या तत्परतेने करीत असे. ही माझी सेवा त्यांना फार आवडत असे. मात्र गुरुचरित्र वाचू लागले, म्हणजे मला ते ऐकावयास बसू देत नसत. कारण ते शूद्रांच्या कानी पडू नये, अशी त्यांची भोळी समजूत होती.’ वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी केळुसकरांना जातीय विषमतेचा आलेला हा पहिला अनुभव त्यांच्या भावी वाटचालीत महत्त्वाचा ठरला.
काही दिवसांनंतर वडील नोकरीनिमित्त मुंबईला परतल्यामुळे कृष्णरावांचे पुढील शिक्षण जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शिफारशीमुळे मुंबईतील इंग्रजी शाळेत मोफत झाले. शंकरशेठ यांनी मोफत शिक्षणासाठीच्या शिफारशीवेळी वर्गात पहिल्या पाच क्रमांकांत राहण्याची अट घातली होती. या इंग्रजी शाळेतील केशवराव नावाच्या ब्राह्मण शिक्षकांना कृष्णरावांच्या मोफत शिक्षणाची असूया वाटत असे. फक्त ब्राह्मणांच्या मुलांनाच मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.
एका महिन्यात आजारपणामुळे कृष्णरावांचा क्रमांक बराच खाली गेला. त्या वेळी केशवरावांनी कृष्णरावांना संपूर्ण फी न भरल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. त्या वेळचा प्रसंग सांगताना केळुसकर लिहितात – ‘दुसर्या दिवशी वडील कामावर न जाता माझ्या शाळेत आले आणि केशवरावांकडे गयावया करू लागले, तरी तो कठोर गृहस्थ बिलकुल नरम न होता उलट म्हणू लागला, ‘तुम्हा कुणबटांना कोणी सांगितले आहे इंग्रजी शिकायला? फी देण्याचे सामर्थ्य नसेल, तर याला कसलातरी धंदा शिकावयास ठेवा.’ शालेय जीवनातील हा दुसरा अनुभव मनोधैर्य खच्ची करणारा होता. परंतु केळुसकरांनी पुढील जीवनात चिकाटीने केलेला संघर्ष पाहता जातीय दुय्यमत्वाचा हा अनुभव त्यांना जातिद्वेषाऐवजी जातिभेद निर्मूलनाच्या रचनात्मक कामाकडे घेऊन गेला, असेच म्हणावे लागेल.
१८८१ मध्ये मुंबईच्या विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी इस्त्रायली शाळेमध्ये चार वर्षे शिक्षकाची नोकरी केली. १८८६ पासून केळुसकरांनी विल्सन हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून इमानदारीने नोकरी केली. गरीब, निराश्रित आणि होतकरू विद्यार्थ्यांना फी सवलत मिळविण्यासाठी केळुसकर सतत प्रयत्नशील होते. गरीब विद्यार्थ्यांच्या आर्थिक व इतर शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी श्रीमंत लोकांना भेटून विनंती करत राहणे, हा केळुसकरांचा जणू दिनक्रमच झाला होता. त्यांच्या या प्रयत्नांचा लाभ झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर हे एक होते. केळुसकरांनी इंग्लंड, जर्मनी व अमेरिका या देशांतील शिक्षण पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यांच्या या व्यासंगाचा तत्कालीन अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला होता.
ख्रिश्चन मुख्याध्यापकांचे संस्कृत शिक्षक!
केळुसकर विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते. विल्सन हायस्कूलचे ख्रिश्चन मुख्याध्यापक डॉ. मॅकनिकल यांना मराठी व संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती. तेव्हा केळुसकरांनी सुरुवातीला मॅकनिकल यांना मराठी भाषा शिकवली. त्यानंतर मॅकनिकल यांनी संस्कृतवर लक्ष केंद्रित केले. काळे नावाच्या शिक्षकांनी, ‘मॅट्रिकच्या वर्गापर्यंतचे संस्कृत शिकण्यास दोन वर्षे लागतील,’ असे मॅकनिकल यांना सांगितले. तेव्हा केळुसकरांनी त्यांना अवघ्या तीन महिन्यांत संस्कृत व्याकरण आणि बोलण्याइतपत संस्कृत शिकविले. तीन महिन्यानंतर मॅट्रिकच्या वर्गापर्यंतचे संस्कृत आपल्याला येत असल्याचे मॅकनिकल यांनी काळेंना सांगितले असता त्यांचा यावर विश्वास बसला नाही. तो एकूण कालखंड विचारात घेता केळुसकरांसारख्या ब्राह्मणेतराने संस्कृत भाषेत प्राप्त केलेली ही पारंगतता बहुजनांना आजही प्रेरणादायी ठरेल.
फुले परंपरेचे ‘बौद्धिक’ अनुयायी
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या ‘दीनबंधू’ साप्ताहिकात केळुसकर सातत्याने लेख लिहित असत. सत्यशोधक समाजाच्या सभांमध्ये केळुसकरांनी केलेल्या भाषणांचा सारांशदेखील ‘दीनबंधू’मध्ये प्रकाशित होत असे. ‘नीतिप्रसारक मंडळी’च्या साप्ताहिक सभेत केळुसकर विविध विषयांवर भाषणे करत. ‘सुबोधपत्रिका’, ‘सुबोधप्रकाश’, ‘शेतकर्यांचा कैवारी’ इत्यादी साप्ताहिकांत केळुसकरांचे विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध होत होते.
१८८७ मध्ये मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेत रावबहाद्दूर वामन आबाजी मोडक यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानावर केळुसकरांनी ‘इंदूप्रकाश’मधील लेखाद्वारे मुद्देसूद व सडेतोड टीका केली. केळुसकरांचा हा लेख प्रसिध्द झाल्यानंतर दोन दिवसांनी विनायक कोंडदेव ओक, ‘इंदूप्रकाश’चे शंकर पांडुरंग पंडित इ. मित्रमंडळी बोलत बसली असता केळुसकर तेथे गेले. तेव्हा केळुसकरांच्या ‘इंदूप्रकाश’मधील लेखाची प्रशंसा करताना शंकर पंडित म्हणाले, “मराठा असून कसे चांगले लिहितो.” केळुसकरांची ही प्रशंसा न आवडल्यामुळे विनायक ओक तोर्यात उत्तरले, “जरी हा मराठा असला तरी ब्राह्मणांशिवाय इतरांना शुद्ध मराठी लिहिता येणार नाही; धार्मिक विषय तर त्यांना समजणेच शक्य नाही.”
भारतीय ज्ञानव्यवस्थेत संस्कृत ब्राह्मणांनी भाषेद्वारे ज्ञानव्यवस्था आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे दोन-अडीच हजार वर्षे ते हिंदू समाजव्यवस्थेवर सत्ता गाजवत आले. ब्रिटिश काळात त्यांच्या या दीर्घ परंपरेला हादरे बसण्यास सुरुवात झाली. या कालखंडातील पहिल्या टप्प्यातील हा अनुभव परंपरा पाहता ब्राह्मणी अहंकार आणि तुच्छतावादाचा प्रातिनिधिक हुंकार म्हणून विचारात घ्यावा लागेल. आपल्याला मिळालेली ही वागणूक पुढे १२ वर्षांनंतर – १८९९ मध्ये – मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे निर्दोष भाषांतर करून कशी निरर्थक आहे, हे केळुसकरांनी सिद्ध केले.
बॉम्बे मिल हॅन्ड्स असोसिएशन
२३ सप्टेंबर १८८४ रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली ‘बॉम्बे मिल हॅन्ड्स असोसिएशन’ ही कामगार संघटना कामगारांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागृतीचे काम करत असे. १८८१ च्या कामगार कायद्यात दुरुस्ती करून कामगारांचे कामाचे तास सात तासांपर्यंत कमी करावेत, या मागणीसाठी ही संघटना काम करत होती. या कामगार संघटनेच्या उभारणीत केळुसकर गुरुजींचा वाटा मोठा होता. केळुसकर गुरुजी या संघटनेचे सरचिटणीस होते. महात्मा फुलेंच्या सूचनेनुसार जानेवारी १८८६ मध्ये सत्यशोधक समाजाच्या प्रचार-प्रसारासाठी वर्हाड प्रांतात जाण्यापूर्वी लोखंडेंनी ‘बॉम्बे मिल हॅन्ड्स असोसिएशन’ संघटनेची जबाबदारी विठ्ठलराव वंडेकर व केळुसकर गुरुजी यांच्यावर सोपवली होती. कामगार जागृतीसाठी संघटनेमार्फत आयोजित सभेत केळुसकर गुरुजींनी केलेले भाषण ‘दीनबंधू’च्या १५ जानेवारी १८९३ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांना जमीनदार व सावकारांच्या जाचातून सोडवून त्यांच्यात सहकाराची भावना रुजवण्यासाठी या संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. ९ डिसेंबर १८९४ रोजी संघटनेच्या बॅनरखाली ‘शेतकरी हितचिंतक मंडळीची सभा’ परिषदेचे बाळापूर येथे आयोजन करण्यात आले. नारायण मेघाजी लोखंडेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेला केळुसकर गुरुजी उपस्थित होते.
मराठा ऐक्येच्छू सभा
गंगाराम भाऊ म्हस्के यांनी १८८३ मध्ये पुणे येथे मराठ्यांच्या शिक्षणासाठी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. त्यानंतर चारच वर्षांनी मराठ्यांसह मागास जातींच्या उन्नतीसाठी केळुसकरांनी काशिनाथ कोरगावकर, डॉ. ल. ब. धारगळकर आदी मित्रांच्या सहकार्याने मे १८८७ मध्ये ‘मराठा ऐक्येच्छू सभा’ ही संस्था स्थापन केली. ही सामान्य जनतेच्या उद्धारासाठी ‘सत्यशोधक समाज’नंतर निघालेली मुंबईतील दुसरी मोठी संस्था होती. गरीब मुलांना शाळेची पुस्तके, शिष्यवृत्ती आदींच्या माध्यमातून शाळेत जाण्यासाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने जुलै १८९९ मध्ये या संस्थेने स्थापन केलेल्या ‘विद्याप्रसारक मंडळी’ या उपसंस्थेचे केळुसकर कार्यवाह होते.
मराठा प्रॉव्हिडंट फंड
आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी गोविंद दळवींनी फेब्रुवारी १८९५ मध्ये ‘मराठा प्रॉव्हिडंट फंड’ संस्थेची स्थापना केली. महाविद्यालयीन जीवनापासून दळवींचे मार्गदर्शक आणि सल्लागार असणार्या केळुसकरांनी या संस्थेचे संचालक पद भूषवले. याचबरोबर केळुसकर ‘धर्माजी रोकडे मोफत वाचनालय’, ‘नीतिप्रसारक मंडळी’, ‘सोशल सर्व्हिस लीग’, ‘आर्यन एक्सलशियर लीग’, ‘सेवासदन सोसायटी’ व ‘अहिल्याबाई मोफत सूतिकागृह’ या विविध संस्थांचे संस्थापक, मार्गदर्शक व सक्रिय कार्यकर्ते होते. यापैकी अनेक संस्थांचे नियम आणि ध्येयधोरणे केळुसकरांनी निश्चित केली.
साधे हायस्कूल शिक्षक असणारे केळुसकर आयुष्यभर ज्ञानमार्गी राहिले. व्यावहारिक जबाबदार्या वगळता आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी व्यासंगात घालवला. केळुसकरांनी आपल्या जीवनात गौतम बुद्ध, शिवाजी महाराज आणि संत तुकारामांच्या मराठीतील पहिल्या चरित्रांबरोबरच २५ ग्रंथ लिहिले. त्यामुळेच कीरांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चरित्रकाराने ‘महाराष्ट्राचा उपेक्षित वाङ्मयमहर्षी’ अशा समर्पक शब्दांत त्यांचे मूल्यमापन केले आहे. आज आपण जेव्हा त्यांच्या समग्र लेखनातील प्रखर वैज्ञानिक दृष्टी असणारा लेखक अनुभवतो, हीच त्यांच्या संशोधन आणि लेखनाची खरी ताकद आहे, हे जाणवते.
संपादक केळुसकर
लक्ष्मण पांडुरंग नागवेकरांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ मासिकाचे संपादकपद केळुसकरांनी सांभाळले. या मासिकात त्यांनी वेदांतावरील ग्रंथांची चिकित्सा करणारे अनेक लेख लिहिले. ‘जगद्वत्त’ साप्ताहिकाच्या संपादकपदी काम करताना केळुसकरांनी लहान मुलांना बोधपर गोष्टींद्वारे सदाचाराचा उपदेश करण्याच्या उद्देशाने लिहिलेली ‘नीतिबोधमाला’ ही लेखमाला पुढे पुस्तकरुपाने चार सुमनांमध्ये प्रसिद्ध झाली. जानेवारी १९२९ मध्ये केळुसकरांनी ‘गोमंतक मराठा समाजा’च्या ‘समाजसुधारक’ या मासिकाचे पहिले संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
१८९०-९१ दरम्यान केळुसकरांनी सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या विवाह संमती वय विधेयकाच्या बाजूने ‘सुबोधपत्रिके’त दोन लेख लिहिले. या लेखांमध्ये केळुसकरांच्या आरोग्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांच्या सूक्ष्म अभ्यासाची झलक पाहायला मिळाली. या लेखांबद्दल सयाजीराव महाराजांनी केळुसकरांचे कौतुक केले होते. जानेवारी-फेब्रुवारी १८९२ मध्ये केळुसकरांनी ‘सुबोधपत्रिके’त ‘आमचे सुशिक्षित लोक अल्पायुषी का होतात?’ या विषयावर तीन अभ्यासपूर्ण लेख लिहित स्वच्छता, सात्विक आहार, नियमित व्यायाम, सातत्यपूर्ण काम आणि शुद्धाचार या बाबींमुळे व्यक्तीचे आयुष्य वाढत असल्याचे प्रतिपादन केले होते. पुढे, दोन वर्षांनी १५ एप्रिल १८९४ रोजी न्यायमूर्ती रानडेंनी याच संदर्भात मुंबईच्या ग्रॅज्युएट्स असोसिएशनच्या कार्यक्रमात ‘व्हाय ग्रॅज्युएट्स डाय यंग?’ या विषयावर व्याख्यान दिले. रानडे हे भारतातील अग्रगण्य बुद्धिजीवी होते. विशेष म्हणजे ते ब्राह्मण होते. केळुसकरांनी लिहिलेल्या लेखानंतर दोन वर्षांनी रानडेंनी याच विषयावर व्याख्यान द्यावे, यातच आधुनिक भारताच्या प्रबोधन परंपरेच्या पुनर्भ्यासाची गरज लपली आहे.
‘प्रार्थना समाज’चे कार्यकर्ते मोरो विठ्ठल वाळवेकरांच्या ‘सुबोधप्रकाश’ नियतकालिकात केळुसकरांनी थॉमस पेनच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या महात्मा फुलेंवर सर्वाधिक प्रभाव असणार्या ग्रंथाचा केलेला मराठी अनुवाद क्रमश: प्रकाशित झाला. महात्मा फुलेंवर या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव होता, असे फुलेवादी परंपरा गेली ६० वर्षे आपल्याला सांगत आली. परंतु या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची ‘बुद्धी’ मात्र तिला झाली नाही. या पार्श्वभूमीवर, महात्मा फुलेंच्या १८९० मधील मृत्यूनंतर तीन वर्षांच्या आत; १८९३ पूर्वी केळुसकरांनी केलेला हा अनुवाद महत्त्वाचा होता. परंतु आपण महात्मा फुलेंच्या पलीकडची फुले परंपरा स्वीकारली नाही आणि तिच्याशी जोडून घेऊन ती उन्नत करण्याचा प्रयत्नही केला नाही, हेच केळुसकरांबाबतच्या आपल्या अज्ञानातून प्रतीत होते.
सयाजीराव आणि ग्रंथलेखक केळुसकर
१८९३ मध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायवाकड यांनी ‘द स्टोरी ऑफ नेशन’ या इंग्रजीतील इतिहासमालेचा अनुवाद करण्याचा मोठा प्रकल्प आखला. धामणस्करांनी कौतुक केल्यामुळे या प्रकल्पातील ‘फ्रान्सचा जुना इतिहास’ या पुस्तकाचे भाषांतर करण्याची संधी महाराजांनी केळुसकरांना दिली. या प्रकल्पात केळुसकरांनी केलेला ‘फ्रान्सचा जुना इतिहास’ ग्रंथाचा अनुवाद सर्वोत्तम ठरला. त्यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. केळुसकरांचा हा पहिला ग्रंथ बडोदा सरकारने प्रकाशित केला होता. अशा प्रकारे इतिहासलेखक केळुसकरांचा पाया बडोद्यातच घातला गेला.
केळुसकरांकडून महाराष्ट्राची जी लेखनसेवा झाली, ती महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी’ राज्यात आजअखेर अज्ञात कशी काय राहिली, याचेच आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर लगेचच मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा’ करण्यासाठी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना केली. या मंडळाने प्रकाशित केलेल्या विश्वकोशातही शिवाजी महाराजांचे पहिले आणि विश्वसनीय मराठी चरित्र लिहिणार्या केळुसकरांच्या संदर्भातील नोंद सोडा; केळुसकरांचा साधा उल्लेखही नाही, ही महाराष्ट्रासाठी वेदनादायी बाब आहे.
थेट संस्कृत ग्रंथांवरून अनुवाद करणारे पहिले ब्राह्मणेतर
‘सेक्रेड बुक्स ऑफ दि ईस्ट’ या इंग्रजी ग्रंथमालेत मॅक्स मुल्लरने बारा उपनिषदांचे भाषांतर प्रसिद्ध केले होते. या इंग्रजी ग्रंथांचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करण्याची सयाजीरावांची इच्छा होती. भाषांतराच्या या कामाची जाहिरात देण्यापूर्वी यापैकी एखादे काम करण्यास केळुसकर तयार आहेत का, याची चाचपणी करण्याची सूचना महाराजांनी केली. त्यानुसार विद्याधिकार्यांनी केळुसकरांना पत्र पाठविले. या पत्राला पाठविलेल्या उत्तरात केळुसकरांनी बाराही उपनिषदांचे भाषांतर करण्याची तयारी दर्शवली. तेव्हा सयाजीरावांनी बारा उपनिषदे व ‘व्याससूत्रां’वरील ‘शांकरभाष्या’चे भाषांतर करण्याची जबाबदारी केळुसकरांवर सोपवली. परंतु एका शूद्राने उपनिषदांचे भाषांतर करणे बडोद्यातील ब्राह्मण विद्वानांना आवडले नाही. त्यामुळे शंकर मोरो रानडेंनी महाराजांना भेटून, ‘मी सध्या रिकामा आहे. हे उपनिषदाचे काम मला सांगावे,’ असा आग्रह केल्यामुळे महाराजांनी उपनिषदाचे अर्धे काम त्यांना दिले; परिणामी सात उपनिषदांचे भाषांतर केळुसकरांनी केले.
केळुसकरांनी मॅक्स मुल्लरचा कोणताही आधार न घेता मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे भाषांतर केले; फक्त उपनिषदांवरील ‘शांकरभाष्या’साठी त्यांनी मॅक्स मुल्लरच्या ग्रंथाची मदत घेतली. हे भाषांतरही परीक्षण समितीने उत्कृष्ट ठरवले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत उपनिषदांचे भाषांतर करणारे केळुसकर हे पहिले ब्राह्मणेतर ठरतात. केळुसकरांचे मोल मांडताना डॉ. सदानंद मोरे लिहितात – ‘केळुसकर व शिंदे या दोन गुरुवर्यांचा विसर हे मराठ्यांच्या सांस्कृतिक अवनतीचे एक महत्त्वाचे कारण आहे. हे भाषांतर बडोद्यातील ब्राह्मणांच्या कारस्थानांना तोंड देत केले होते, असे केळुसकरांच्या चरित्रावरून दिसते.’
ब्राह्मण्याचे चटके
धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन धर्माधिकार्यांकडून ज्यांच्या ग्रंथांचा उपयोग केला जाई, अशा सेनेका आणि एपिक्टेटस या तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचा आपल्या संस्थानातील जनतेला परिचय व्हावा, या उद्देशाने सयाजीरावांनी ‘सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने’ या ग्रंथाच्या भाषांतराचे काम केळुसकरांंना दिले. ग्रंथांच्या भाषांतराचे मानधन म्हणून केळुसकरांना १००० रुपये देतानाच हे भाषांतर सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला. महाराजांच्या या आदेशानुसार केळुसकरांनी ग्रंथाचे भाषांतर वेळेत पूर्ण केले.
‘सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने’ ग्रंथाच्या भाषांतरावेळी केळुसकरांना शंकर मोरो रानडे आणि भानू गांगनाईक यांच्याकडून झालेला त्रास धक्कादायक होता. आईच्या आजारपणामुळे केळुसकरांकडून भाषांतराचे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. तेव्हा मुदतीच्या अटीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी निर्धारित सहा महिन्यांच्या वेळेत पूर्ण झालेला भाग बडोद्याच्या विद्याधिकार्यांकडे पाठवून, ‘उर्वरित भाग पूर्ण झाला असून त्याची नक्कल झाल्यावर पाठवून देतो, असा निरोप दिला. या दरम्यान विद्याधिकारी कालेलकरांच्या चुकीमुळे गांगनाईक आणि केळुसकरांमध्ये तेढ निर्माण झाली.
तेव्हा दुखावलेल्या गांगनाईकांनी केळुसकरांकडून सर्व कामे काढून घेण्याचा आणि त्यांना नवीन कामे मिळू न देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील एक उदाहरण येथे विचारात घ्यावे लागेल. परीक्षण समितीतील गांगनाईकांचे मित्र शंकर मोरो रानडे आणि आठल्ये यांनी केळुसकरांनी केलेल्या मॅक्स मुल्लरकृत उपनिषदांच्या भाषांतराविरोधात मत देऊन त्यांचे काम काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाचपैकी तीन सदस्यांचे मत बाजूने असताना ‘आपले काम काढून घेणार का,’ असा प्रश्न केळुसकरांनी विद्याधिकार्यांना विचारला. त्यावर बडोद्याच्या विद्याधिकार्यांनी स्वतःला योग्य वाटेल त्या पद्धतीने काम पूर्ण करण्याचा आदेश केळुसकरांना दिला. या आदेशाप्रमाणे अखेर केळुसकरांनी उपनिषदांच्या भाषांतराचे काम पूर्ण केले. मराठा केळुसकरांना आलेला हा अनुभव म्हणजे पुढे, बाबासाहेबांना बडोद्यात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा ‘पूर्वार्ध’ होता.
केळुसकर आणि टिळक
उपनिषदांच्या भाषांतरानंतर केळुसकरांनी भगवद्गीतेचे विवेचन करणारा ‘श्रीमद्भगवद्गीता सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक’ हा ग्रंथ लिहिला. १९०२ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ सुरुवातीला ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ मासिकातून क्रमशः प्रसिद्ध करण्यात आला होता. तोपर्यंत भगवद्गीतेचा महाराष्ट्रात तितकासा प्रसार व प्रचार झाला नसल्यामुळे ‘गीते’च्या स्पष्टीकरणार्थ व टीकात्मक असे ग्रंथ निर्माण झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर, केळुसकरांनी आपल्या ग्रंथात गीतेतील प्रत्येक श्लोकावर वामन, मुक्तेश्वर, मोरोपंत, तुकाराम व उद्धवचिद्घन यांनी केलेले पद्यमय स्पष्टीकरणाचे संकलन केले होते. त्यामुळे गीतेतील श्लोकांचे विविध व्यक्तींनी केलेले विश्लेषण समजून घेणे वाचकाला शक्य झाले. याचबरोबर केळुसकरांनी आपल्या ग्रंथामध्ये गीतेचे स्वतंत्रपणे टीकात्मक विश्लेषण केले होते. विशेष बाब म्हणजे ग्रंथाच्या अखेरीस केळुसकरांनी भगवद्गीतेच्या त्यांना उमगलेल्या रहस्याचे विवेचन केले होते. या ग्रंथात केळुसकरांच्या धर्मशास्त्र आणि वेदांतविषयक पांडित्याची प्रचीती येते. पुढे, केळुसकरांच्या ग्रंथानंतर १३ वर्षांनी- १९१५ मध्ये- टिळकांचा ‘गीतारहस्य’ ग्रंथ प्रकाशित झाला. गीतेला वेदांतातील नीतिशास्त्र मानणार्या टिळकांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथात गीतेचा नवकर्मपर व प्रवृत्तीपर अर्थ लावला आहे. टिळकांच्या ‘गीतारहस्या’चे गोडवे आजही गायले जातात. परंतु टिळकांच्या आधी १३ वर्षे केळुसकरांनी केलेले हे काम अंधारात राहण्यामध्ये केळुसकरांची जात आडवी आली असावी, असेच आज म्हणावे लागेल.
केळुसकरांच्या या ग्रंथावर अभिप्राय देताना ‘केरळ कोकीळ’कर्ते लिहितात – ‘एकंदरीत, गीतेवर आजपर्यंत मराठीत जितक्या म्हणून टीका आहेत, त्या सर्वांमध्ये ही पहिल्या प्रतीची आहे. त्यांचा हा अभिप्रायच केळुसकरांच्या कामाचे अनन्यत्व स्पष्ट करतो.’ असाच अभिप्राय ‘बोधसुधारक’ नियतकालिकाने नोंदवला आहे – ‘दुर्दैवाने, केळुसकरलिखित हा ग्रंथ महाराष्ट्राला माहीत नाही.’ यामागची कारणमीमांसा करताना धनंजय कीर लिहितात – ‘श्रीमद्भगवद्गीता या केळुसकरकृत ग्रंथाचा खप मात्र म्हणण्यासारखा झाला नाही. कारण प्रकाशक नागवेकर भंडारी, तर ग्रंथकर्ता मराठा. धर्मशास्त्राप्रमाणे त्यांना वेद व वेदांत यांच्या अध्ययनाचा अधिकार नाही. त्यामुळे तो ग्रंथ वरिष्ठ सुशिक्षित समाजाने वाचावयाचा कसा?’
ब्राह्मण लेखकांकडून फसवणूक
महाराष्ट्र ग्रंथमालेतील ‘घर आणि त्याच्या सभोवतालची जागा’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी सयाजीरावांनी गांगनाईकांवर सोपवली होती. अन्य अनेक पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाचा मराठी अनुवाद केळुसकरांनी आपले मित्र गांगनाईकांना करून दिला. पुढे, सयाजीरावांनी खरेदी केलेली एक आगबोट अलिबागच्या किनार्याला आणताना खडकाला धडकून फुटली. या संदर्भात रावबहाद्दूर जे. पी. तालचेरकरांनी इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाचा मराठी अनुवाद करण्याची आज्ञा महाराजांनी गांगनाईकांना केली. तेव्हा गांगनाईकांनी हा अनुवाद करून देण्याची विनंती पत्राद्वारे केळुसकरांना केली. परंतु हा लेख समर्पक न वाटल्यामुळे केळुसकरांनी ‘आमचे नौकायान’ या विषयावर स्वतंत्र संशोधनात्मक लेख लिहून गांगनाईकांना पाठविला. गांगनाईकांनी हा संशोधनात्मक लेख स्वतःच्या नावाने छापून महाराजांकडे पाठवला. महाराजांना हा लेख खूप आवडला. या लेखाबद्दल गांगनाईकांना पारितोषिकही देण्यात आले. याशिवाय ‘फ्रेंच पाकशास्त्र’ या विषयावरील दोन ग्रंथांच्या मराठी भाषांतरास अधिक काळ लागल्यामुळे सयाजीरावांची गांगनाईकांवर नाराजीची वेळ आली होती. परंतु पुन्हा एकदा केळुसकरांनी मदत केल्यामुळे ही वेळ टळली.
धर्मानंद कोसंबींचे ‘गुरू’
केळुसकरांचे १८९८ मध्ये प्रकाशित झालेले कोणत्याही भारतीय भाषेतील पहिले ‘बुद्धचरित्र’ वाचून धर्मानंद कोसंबी, डॉ. आनंदराव नायर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वजण बुद्धाशी जोडले गेले. केळुसकरलिखित ‘गौतमबुद्धाचे चरित्र’ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. या चरित्राबाबत ‘एवढ्या आवडीने, प्रेमाने आणि प्रचंड जीव ओतून आपण दुसरा ग्रंथ लिहिलेला नाही,’ असे स्वतः केळुसकरांनी म्हटले आहे. मराठी भाषेतील हा एक उत्कृष्ट चरित्रग्रंथ असल्याचे मत तत्कालीन अनेक तज्ज्ञांनी नोंदवले होते. बडोद्याच्या दक्षिणा प्राइज कमिटीने या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरविले होते.
धर्मानंद कोसंबींनी केळुसकरलिखित ‘बुद्धचरित्र’ डॉ. भांडारकरांना वाचून दाखविले. या ग्रंथाच्या वाचनामुळेच कोसंबी बौद्ध धम्माकडे वळले. ‘बुद्धचरित्रा’च्या वाचनाने प्रभावित झालेल्या कोसंबींनी ग्रंथाचे लेखक केळुसकरांना भेटण्याची इच्छा काशिनाथ रघुनाथ नावाच्या मित्राकडे व्यक्त केली. परंतु पुढे अनेक वर्षांनंतर आपल्या ‘निवेदन’ या आत्मवृत्तात, ‘गोविंद नारायण काणेकृत ‘जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र’ वाचून आपण तल्लीन झाल्याचे’ धर्मानंद कोसंबी नोंदवतात.
गोविंद काणेकृत ‘जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र’ हे जुलै १८७९ मध्ये लंडनहून प्रकाशित झालेल्या एडविन अर्नोल्ड यांच्या ‘लाइट ऑफ एशिया’ या पद्यमय ग्रंथाचे भाषांतर आहे. काणेंचे ‘बुद्धचरित्र’ वाचून बौद्ध धम्माचे ज्ञान संपादणे, हे आपले जीवितकार्य निश्चित केल्याचे धर्मानंद कोसंबी आपल्या आत्मवृत्तात नोंदवतात. पुढे, समग्र बौद्ध वाङ्मयाचे अवलोकन केल्यावर कोसंबींनी केळुसकरांच्या ‘बुद्धचरित्रा’विषयी मतभेद व्यक्त केले. केळुसकरांची वैज्ञानिक दृष्टी विचारात घेता हे मतभेद बौद्धिक नव्हते, तर बुद्धपरंपरा आधुनिक भारतात आपल्यापासून सुरू होते, हे ठसवण्याचा एक ‘कोता’ प्रयत्न होता, असेच आज म्हणावे लागते. याउलट, गोविंद काणे यांचे बंधू डॉ. काणे व विनायकराव ओक यांनी केळुसकरांच्या ‘बुद्धचरित्रा’ची प्रशंसा केली. एका सभेत बोलताना डॉ. आनंदराव नायर यांनी, ‘केळुसकरकृत ‘बुद्धचरित्रा’पासून आपण स्फूर्ती घेऊन बौद्ध धर्माच्या प्रचारास वाहून घेतले,’ असेे स्पष्ट केले होते.
वासुदेव बिर्जे
सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल वासुदेव लिंगोजी बिर्जे हे केळुसकरांचे जिवलग मित्र होते. शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्यासाठी संदर्भ शोधत असताना पत्नीच्या आजारपणामुळे केळुसकर आपल्या गावी गेले. याचदरम्यान स्वतःच तापाने प्रचंड आजारी पडलेल्या केळुसकरांना त्या दुखण्यातच आपला अंत होण्याची भीती वाटू लागली. तेव्हा ‘शिवचरित्रा’साठी काढलेल्या टिपा अन्य कोणाकडेही न देता त्या बिर्जेंकडेच देऊन त्यांना हा ग्रंथ पूर्ण करण्यास सांगण्याची सूचना त्यांनी आबासाहेब दळवींना केली. सुदैवाने डॉ. धुरू, डॉ. धारगळकर व डॉ. परमानंद यांच्या प्रयत्नांमुळे केळुसकर या आजारातून बरे झाले.
आजारपणापूर्वी ८० पाने तयार असणारा हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर केळुसकरांनी ‘निर्णयसागर’ छापखान्यात छापून घेतला. हा ग्रंथ त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांना अर्पण केला होता. शाहू महाराजांनी या ग्रंथाला १००० रुपये रोख देऊन ५०० प्रती विकत घेतल्या. त्याचबरोबर सयाजीराव महाराज आणि बापूसाहेब कागलकरांनी या ग्रंथाच्या प्रत्येकी २०० प्रती विकत घेतल्या. केळुसकरांनी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकरांच्या आज्ञेनुसार स्वलिखित मराठी ‘शिवचरित्रा’च्या ५०० प्रती त्यांना पाठवल्या. आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी तुकोजीराव महाराजांनी ‘शिवचरित्रा’च्या या प्रती मागवल्या होत्या. परंतु ते संस्थानाबाहेर गेल्यामुळे या प्रती बराच काळ दरबारात तशाच पडून होत्या. ज्या पेट्यांतून या प्रती पाठवण्यात आल्या, त्या पेट्या उघडल्यासुद्धा नसल्याची माहिती नंतर केळुसकरांना मिळाली. केळुसकरांचा हा अनुभव आपल्याला ‘आत्मटीके’कडे घेऊन जातो.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या शिवरायांच्या पहिल्या चरित्राचे स्वागत अशा पद्धतीने झाले. महाराष्ट्रातील ब्राह्मण इतिहासकारांनी तर या चरित्राची ‘भ्रूणहत्या’च केली. परंतु ब्राह्मणी दबावाला शरण जाऊन या ऐतिहासिक चरित्राकडे (एक-दोन अपवाद वगळता) बहुजन इतिहासकारांनीसुद्धा आजअखेर दुर्लक्ष केले. दुर्दैवाने, गेल्या ६० वर्षांत बहुजनांत एवढे लेखक-संशोधक निर्माण होऊनसुद्धा शिवरायांचे एकही अधिकृत चरित्र लिहिले गेले नाही. ही बाब गंभीर; परंतु बोध घेण्यासारखी आहे. या पार्श्वभूमीवर तर केळुसकरांचे ‘शिवचरित्रकार्य’ किती अलौकिक होते, हे लक्षात येईल.
बडोद्याचे दिवाण धामणस्कर
१९०१ ते १९०४ या कालावधीत बडोद्याचे दिवाणपद भूषवलेले धामणस्कर केळुसकरांचे खास मित्र होते. धामणस्करांनीच केळुसकरांची सयाजीरावांशी भेट घालून दिली होती. धामणस्करांनी कौतुक केल्यामुळे १८९३ मध्ये सयाजीराव महाराजांनी केळुसकरांवर ‘फ्रान्सचा जुना इतिहास’ या ग्रंथाचे भाषांतर करण्याची जबाबदारी सोपवली. धामणस्करांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केळुसकरांनी त्यांचे चरित्र लिहिण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून पूर्वायुष्याची माहिती मिळवली.
त्याआधारे लिहिलेले ८० पानांचे चरित्र धामणस्करांना बडोदा भेटीत वाचून दाखवून त्यांच्या सूचनेप्रमाणे बदल केले. त्यानंतर त्यांनी धामणस्करांचे हे आजवरचे एकमेव चरित्र १९०२ मध्ये प्रसिद्ध केले. विशेष बाब म्हणजे या चरित्राचा खर्च केळुसकरांकडून घ्यायचा नसल्यामुळे धामणस्करांनी छपाईचा खर्च परस्पर छापखान्यात पाठवून दिला. पुढे, केळुसस्करांच्या आजारपणात उपचारांसाठी धामणस्करांनी गणपतराव तिवेकरांमार्फत १०० रुपयांची मदत पाठवली. परंतु सत्यशोधकी परंपरेचा सतत गाजावाजा करणार्या महाराष्ट्राला धामणस्कर चरित्राचा शोध घ्यावासा वाटला नाही.
बडोद्याचे खासेराव जाधव
१९२१ मध्ये प्रा. ताकाखान यांनी केळुसकरलिखित ‘शिवचरित्रा’चा इंग्रजीत अनुवाद केला. या इंग्रजी अनुवादाच्या छपाईसाठी आवश्यक निधी उभारण्यात सयाजीरावांचे नातेवाईक आणि विश्वासू अधिकारी खासेराव जाधवांनी मोलाची मदत केली. मुंबई दौर्यात केळुसकरांनी खासेरावांची भेट घेतली. या भेटीत केळुसकरांनी ‘शिवचरित्रा’च्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशनातील आर्थिक अडचण खासेरावांना सांगतानाच त्यातील काही भाग वाचायला दिला. तेव्हा हा इंग्रजी अनुवाद आवडल्यामुळे या चरित्राच्या प्रकाशनासाठी आवश्यक ते सर्व आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे वचन खासेरावांनी केळुसकरांना दिले. त्याप्रमाणे आपल्या ग्वाल्हेर भेटीत खासेरावांनी ग्वाल्हेरचे महाराज आणि सरदार शितोळे यांच्याजवळ केळुसकरलिखित इंग्रजी ‘शिवचरित्रा’च्या प्रकाशनासाठी आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केली. खासेरावांच्या विनंतीवरून सरदार शितोळेंनी केळुसकरांना साडेपाच हजार रुपये कर्जाऊ दिले. खासेरावांच्या मदतीमुळेच कमी वेळात आणि कमी त्रासात शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजी भाषेत गेले. हे खासेरावांचे काम ऐतिहासिक असले तरी पुन्हा दुर्लक्षित आहे.
बाबासाहेबांचा ‘हिमालय’
आंबेडकरांच्या ‘भीमराव ते बाबासाहेब’ या प्रवासात केळुसकर आंबेडकरांमागे हिमालयाप्रमाणे उभे होते. परंतु बाबासाहेबांसंदर्भातील एकूण लिखाणात केळुसकरांना न्याय मिळालेला नाही, म्हणूनच ‘केळुसकरांचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील योगदान’ यावर स्वतंत्रपणे संशोधन होणे गरजेचे आहे. प्रमुख तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर केळुसकर बाबासाहेबांसाठी ‘निर्णायक’ ठरतात – पहिला मुद्दा म्हणजे सी. के. बोले यांच्या हस्ते केलेल्या मॅट्रिक उत्तीर्ण बाबासाहेबांच्या सत्कारावेळी केळुसकरांनी बाबासाहेबांना भेट दिलेल्या स्वलिखित ‘बुद्धचरित्रा’ने बाबासाहेबांच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुसरा मुद्दा असा की, त्याचवर्षी दामोदर यंदेंमार्फत केळुसकरांनी बाबासाहेबांना सयाजीरावांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली, जी पुढे बाबासाहेबांना कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत घेऊन गेली. यातून बाबासाहेबांमधील विद्वान नेता घडला. तिसरा मुद्दा म्हणजे १९१८ मध्ये बडोद्याहून परतलेले बाबासाहेब सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले, तेव्हा कॉलेजच्या प्राचार्यपदी बाबासाहेबांची नेमणूक व्हावी, यासाठी केळुसकरांनी तत्कालीन शिक्षणमंत्री रँग्लर र. पु. परांजपे यांची भेट घेतली. परंतु केळुसकरांच्या प्रयत्नांनंतरही आंबेडकरांना हे पद मिळाले नाही.
१९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी मुंबई प्रांतातील अस्पृश्योद्धारासाठी झटणार्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना मदतीची थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला. त्या वेळी केळुसकरांनी बाबासाहेबांना चार रुपयांची आर्थिक मदत केली होती. ही रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात १०,१११ रुपये भरते. १९३० च्या दरम्यान केळुसकर स्वतः मोठ्या आर्थिक संकटात असताना त्यांनी ही मदत केली होती, हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.
पुढे, बहुधा १९३३ मध्ये केळुसकरांच्या शेवटच्या कालखंडात बाबासाहेबांनीही केळुसकरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला होता, हेही उल्लेखनीय आहे. यासंदर्भात कीर म्हणतात – ‘बडोद्याच्या महाराजांनी गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांना काही मासिक वेतन द्यावे, असे एक विनंती पत्रक त्यांनी बडोद्याच्या महाराजांकडे सादर केले.’ बाबासाहेब आणि केळुसकरांमध्ये आंबेडकरांच्या शालेय जीवनात तयार झालेले नाते केळुसकरांच्या मृत्यूपर्यंत टिकून होते, हेच यावरून लक्षात येते. परंतु केळुसकरांच्या आत्मचरित्रात १९३२ मध्ये स्वतः केळुसकरांनी त्यांच्या आर्थिक स्थितीविषयी महाराजांना पत्र लिहून मदतीसंदर्भात विनंती केली असल्याचे दिसते. या पत्राला अनुसरून महाराजांनी एका पुस्तकाचे काम करण्याविषयी विचारणा केळुसकरांना केली होती. परंतु त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे १९३० ते केळुसकरांच्या मृत्यूपर्यंत; म्हणजे १९३४ पर्यंतच्या सर्व घटना जोडून विचारात घेता कीरांचे हे मत चुकीचे ठरते.
कारण केळुसकरांपासून हाकेच्या अंतरावर बाबासाहेब राहत होते. ते रोज केळुसकरांच्या घरासमोरून स्विमिंग टँकला पोहण्यासाठी जात असत, तरीही केळुसकरांच्या शेवटच्या आजारपणात बाबासाहेब त्यांना भेटायला गेले नाहीत. १९३४ ला केळुसकरांचा मृत्यू झाला, त्या वेळी बाहेरगावी असल्यामुळे बाबासाहेब अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नसतील, ही शक्यता गृहीत धरली तरी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट किंवा केळुसकरांवरील मृत्युलेख यापैकी कोणतीही कृती बाबासाहेबांकडून नंतर का झाली नसावी, हा एक मोठा प्रश्नच आहे. २१ मे १९४६ रोजी बाबासाहेबांच्या दिल्लीच्या पत्त्यावरून सयाजीराव महाराजांचे नातू प्रतापसिंह महाराजांना ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ला आर्थिक मदत करण्यासाठी केळुसकरांच्या नावाने एक पत्र लिहिले गेले होते. हे पत्र समग्र आंबेडकर वाङ्मयाच्या १७ व्या खंडात पान क्र. ५४६ वर आढळते, तेव्हा तर धक्काच बसतो. कारण केळुसकर गेल्यानंतर १२ वर्षांनी हे पत्र बाबासाहेबांच्या पत्त्यावरून कसे काय लिहिले जाते, हे एक कोडेच आहे. यावर अधिक संशोधन व्हायला हवे. हे सर्व तपशील मनाला चटके लावून जातात.
मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
केळुसकर गुरुजींना आयुष्याच्या शेवटच्या आठवड्यात योगायोगाने मोठा सन्मान मिळाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्यावतीने ६ ऑक्टोबर १९३४ रोजी आयोजित पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केळुसकरांची निवड करण्यात आली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर होते. केळुसकर या संमेलनास हजर असले तरी त्यांची प्रकृती क्षीण झाल्यामुळे रा. अ. गोळेंनी त्यांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले. त्यांच्या या भाषणाचे कौतुक करताना ‘केसरी’ वृत्तपत्र लिहिते – ‘प्रख्यात साहित्यसेवक श्री. कृ. अ. केळुसकर यासारखा ज्ञानतपोवृद्ध आणि वयोवृद्ध अध्यक्ष संमेलनास लाभल्याने संमेलनाचा तो एक प्रकारे गौरवच झाला. आधुनिक साहित्य सेवकांत श्री. केळुस्कर यांचा दर्जा उच्च असून त्यांचे अध्यक्षीय भाषण त्याला साजेसे झाले.’
या संमेलनानंतर अवघ्या आठवडाभरातच, १४ ऑक्टोबर १९३४ रोजी केळुसकरांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेवेळी केलेल्या शोकपर भाषणात सी. के. बोले म्हणतात, “मागासलेल्या वर्गाचे ते एक मोठे हितकर्ते होते. त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी जितके प्रयत्न केले, तितके अद्याप कुठल्याही पुढार्याने केलेले नाहीत. ते जर पुढारलेल्या समाजात जन्माला आले असते, तर त्यांचे देव्हारे माजविण्यात आले असते.” डॉ. आंबेडकरांचे सहकारी सीताराम शिवतरकर आपल्या मनोगतात म्हणतात, “मागासलेल्या लोकांपेक्षा आम्हा अस्पृश्य वर्गाची कामगिरी गुरुवर्य केळुसकरांनी जास्त केली आहे. वेळोवेळी सल्लामसलत देऊन व योग्य मार्ग दाखवून त्यांनी आमची मोठी कामगिरी केली. त्यांच्यामुळेच डॉ. आंबेडकरांसारखा एक अखिल भारतीय पुढारी अस्पृश्य वर्गाला मिळाला. केळुसकर व डॉ. आंबेडकर यांची जर ओळख झाली नसती तर डॉ. आंबेडकर साध्या नोकरीत राहिले असते.”
केळुसकर गुरुजींना कुणबी-मराठा (कोकणातील नाईक) असूनही शालेय जीवनापासून आलेले जातीय अपमानाचे अनुभव फारच वेदनादायी आहेत. केळुसकरांनी ज्ञानव्यवस्थेच्या क्षेत्रात हस्तक्षेप केला, हे जरी खरे असले तरी त्यांनी संस्कृत पारंगत होऊन हिंदू धर्मशास्त्राला हात घातल्यामुळे त्यांना शेवटपर्यंत भारतातील ब्राह्मणी ज्ञानव्यवस्थेने कसे बहिष्कृत ठेवले, याची चर्चा अगोदर झालीच आहे. बहुजनांनीही आजअखेर यापेक्षा वेगळे काही केले, असे म्हणता येत नाही. एकच दिलासादायक बाब म्हणजे बाबा भांड हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी ‘समग्र केळुसकर’ हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांचे हे काम भावी अभ्यासकांसाठी फार मोलाचे आहे. कारण यामुळे केळुसकरांचे जवळजवळ सर्व वाङ्मय संवर्धित झाले.
शूद्र म्हणून केळुसकरांना त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही ज्ञानक्षेत्रात ‘अस्पृश्य’ ठरवले. परंतु याच व्यवस्थेने त्यांचा ‘उच्चवर्णीय’ असा उल्लेख करून त्यांची एकप्रकारे नव्याने विटंबना केली. याचा संदर्भ जेम्स लेनचा ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जिजाऊंची बदनामी करणारा म्हणून चर्चेत आला. त्यावर बंदीसुद्धा घालण्यात आली. परंतु याच ग्रंथात केळुसकरांची जात बदलली आहे, हे मात्र त्या वेळी हा लढा लढवणार्या बहुजन इतिहासकारांच्या लक्षातसुद्धा आले नाही. या ग्रंथात केळुसकरांचा उल्लेख ‘डरीरीुरीं डेलळरश्र ठशषेीाशी’ असा केला आहे. ज्ञानव्यवस्थेकडून होणार्या दुहेरी शोषणाचे हे उदाहरण भारतीय समाजाच्या अभ्यासात ‘जात’ हा घटक समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित करते.
राजर्षी शाहूंचा बौद्धिक ‘आधार’
केळुसकरांच्या शिवाजी महाराजांच्या ‘शिवचरित्रा’च्या अनुषंगाने जेम्स लेनच्या वरील प्रकरणाला जोडून एक महत्त्वाचा संदर्भ समजून घेणे येथे महत्त्वाचे ठरेल. कारण आजपर्यंत हा महत्त्वाचा संदर्भ अंधारात राहिला आहे. केळुसकरांचे १९०७ चे हे ‘शिवचरित्र’ त्यांनी शाहू महाराजांना अर्पण केले होते. या ‘शिवचरित्रा’ला शाहू महाराजांनी केळुसकरांना १ हजार रुपयांची मदत करत ग्रंथाच्या ५०० प्रती विकत घेतल्या. हे राजर्षी शाहूंचे केळुसकरांवरील ऋण मोठेच होते. परंतु राजर्षी शाहूंच्या ब्राह्मण नोकरशाही विरुद्धच्या जीवघेण्या संघर्षात शाहू महाराजांना केळुसकरांच्या या ग्रंथाने पुरवलेला ‘लाखमोला’चा बौद्धिक आधार महाराष्ट्राला आजअखेर अज्ञात आहे.
शाहू महाराजांनी १२ ऑक्टोबर १९२० रोजी ‘क्षात्रजगद्गुरू’ पदाच्या निर्मितीचा जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात ‘रामदास किंवा दादोजी कोंडदेव हे श्री शिवाजी महाराजांचे गुरू होते, ही क्लृप्ती ब्राह्मणांचीच आहे. त्याबद्दल इतिहासात कोठेच सबळ पुरावा नाही,’ अशी भूमिका मांडली आहे. केळुसकरांनी १९०७ मधील त्यांच्या ‘शिवचरित्रा’त ही मांडणी पुराव्यानिशी केली होती. अशी मांडणी करणारे केळुसकर हे पहिले होते. राजर्षी शाहूंनी केळुसकरांचा हा सिद्धांत अत्यंत कल्पकतेने आपल्या महत्त्वाच्या ‘क्षात्रजगद्गुरू’ पदाच्या जाहीरनाम्यात वापरला. त्यामुळे केळुसकरांचा हा सिद्धांत सांस्कृतिक लढाईत वापरणारे शाहू महाराज हे पहिले ठरतात. हा संदर्भ भांडारकर प्रकरणातील सांस्कृतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तर फारच महत्त्वाचा ठरतो.
राजर्षी शाहूंचा हा जाहीरनामा आजही ब्राह्मणेतर चळवळ अतिशय अभिमानाने आणि क्रांतिकारक म्हणून डोक्यावर घेऊन नाचताना दिसते. परंतु या जाहीरनाम्यातील आशय तपासण्याची तसदी एकाही संशोधकाने आजवर घेतली नाही, हे विशेष. बहुजन इतिहासकारांची ही ‘उथळ’ संशोधनप्रक्रियाच केळुसकरांच्या क्रांतिकारक संशोधन-लेखनाच्या उपेक्षेचे प्रमुख कारण आहे. ‘शोषितांचा इतिहास’ हा रक्ताने लिहावा लागतो. आपल्या छोट्या-मोठ्या हितसंबंधांचा त्यात बळी जातो, म्हणूनच ही प्रक्रिया जीवघेण्या वेदना देणारी असते. शोषितांच्या शोषणमुक्तीप्रती असणार्या अभ्यासक-संशोधकांच्या इमानदारीचा येथे ‘कस’ लागतो. दुर्दैवाने, आपल्या ‘पुरोगामी’ परंपरेत झालेला संशोधकांचा ‘सुळसुळाट’ तपासला असता तत्कालिक प्रतिक्रिया आणि स्टंटबाजी याचाच अतिरेक यामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळे प्रसिद्धी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांवर मात करून ‘आत्मटीका’ करत बहुजनांची गंभीर आणि मूलभूत संशोधन परंपरा निर्माण करण्याची गरज यातून अधोरेखित होते. हा कृतिशील संकल्प ‘निष्ठेने’ खांद्यावर घेणे, हीच केळुसकर गुरुजींना खरी आदरांजली ठरेल.
(लेखक औरंगाबाद येथील महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे विश्वस्त असून महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधने प्रकाशन समितीचे सदस्य आहेत.)
लेखक संपर्क : ९६२३८ ५८१०४