शून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद

-

विज्ञानाचा इतिहास केवळ 500 वर्षांचा. या काळात अनेक विस्मयकारी शोधांनी मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारी बदल केले. सर आर्थर एडिंग्टन यांचं एक वचन आहे – ‘सागरात बोट उभी आहे. बोटीमध्ये तळघरात बटाट्याची पोती आहेत. त्यातील एका पोत्यातील एका बटाट्यात एक लहानशी अळी आहे. विश्वाच्या एकूण पसार्‍यात मानवाचे स्थान या बटाट्यातील अळीसारखे आहे, तरीसुद्धा एवढ्या लहानग्या मानवाने विज्ञानाची कळ वापरून केवळ अवघी पृथ्वीच नाही, तर सूर्यमाला आणि तिच्या पलिकडचे विश्वही आपल्या निरीक्षणाच्या कक्षेत आणले आहे. विज्ञानात एवढे सामर्थ्य आले कुठून? याचे उत्तर आहे, विज्ञानात वापरला जाणारा ‘नवसंशयवाद’ अर्थात ‘न्यू. स्केप्टिसिझम.’

विज्ञानाच्या इतिहासात प्रामाणिक संशयाद्वारे चिकित्सा केली जाते. ती इतरांना करू दिली जाते आणि त्यातून सत्याचे आकलन होते. संशय घेणे किंवा शंका उपस्थित करणे म्हणजे ‘शून्यवादी’ (सिनिकली) असणे नव्हे. प्रत्येक गोष्टीत सारासार विचार न करता नेहमीच शंका घेणे, याला ‘शून्यवाद’ असे नाव आहे. पायरो नावाचा ग्रीक तत्त्वज्ञ शून्यवादी होता. त्याला एकदा आपला गुरू एका डबक्यात गटांगळ्या खाताना दिसला. याला डबक्यातून बाहेर काढावे की नको, याबाबत पायरोचा काहीच निर्णय होईना. शेवटी तो तसाच पुढे निघून गेला.

याच्या दुसर्‍या टोकाचा विचार म्हणजे ‘श्रद्धावाद.’ शंकाच घ्यायची नाही, प्रश्न विचारायचा नाही; गुरू किंवा धर्मग्रंथ यांचा श्रद्धेने स्वीकार करायचा. या मार्गाने सुद्धा सत्याचा शोध घेणे अशक्य होते.

सीरियातील एका शहरात घडलेली ही घटना. अली सालर हा ‘आयसिस’ या अतिरेकी संघटनेचा कट्टर अनुयायी. लेनाअनल कासेम ही त्याची आई. आईने त्याच्याकडे आग्रह धरला, “तू ‘आयसिस’ सोड. ‘आयसिस’चे काम खर्‍या धर्माला आणि मानवतेला सोडून आहे. आपण हे शहर सोडून जाऊ या.” अली आपल्या म्होरक्या गुरूला भेटला. या गुरूने आज्ञा केली, “आईला ठार कर!” अलीने आईलाच गुरूसमोर नेऊन समक्ष गोळ्या घातल्या. हा श्रद्धामार्ग! इथे शंका नाही; चिकित्सा तर नाहीच नाही.

टोकाचा संशयवाद किंवा टोकाची श्रद्धा, यापेक्षा प्रामाणिक शंकेतून शोध घेण्यासाठी बुद्धीचा वापर म्हणजे ‘नवसंशयवाद.’ या नवसंशयवादाच्या उपयोगातून विज्ञानात असत्य बाजूला सारले जाते आणि सत्य झळाळून निघते. कधी-कधी विज्ञानाच्या क्षेत्रातही काही चलाख मंडळी आपल्याला मोठं सत्य गवसलं आहे, असा दावा करतात. त्याची मीडियामध्ये वारेमाप प्रसिद्धी करतात. यापाठीमागे प्रसिद्धी आणि आर्थिक प्राप्ती करण्याचा हव्यास असू शकतो. छद्मविज्ञानात याची विपुल उदाहरणे आढळतात. जगाची उर्जेची गरज लक्षात घेऊन पॉन्स आणि फ्लिशमन या वैज्ञानिकांनी ‘कोल्ड फ्यूजन सेल’ नावाच्या उपकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करता येईल, असा दावा केला. इतर वैज्ञानिकांनी त्यांनी केलेल्या प्रयोगाचे पुनर्परीक्षण केले असता त्यांचा दावा खोटा ठरला. विज्ञान हे अशा रीतीने अज्ञान बाजूला सारून सत्यशोधनाचा यशस्वी प्रयत्न करते. त्यामुळेच विज्ञान हे सतत प्रगत होत जाते; पण धार्मिक क्षेत्रात मात्र उलटा न्याय आढळतो.

स्वत: शंका घ्यायची नाही, इतरांनाही ती घेऊ द्यायची नाही. यामुळे धार्मिक क्षेत्रात अज्ञानाचे पीक जोमात येऊ शकते. याचबरोबर विविध तथाकथित आध्यात्मिक गुरू दुसर्‍या गुरूच्या अध्यात्माची चिकित्सा करत नाहीत. रामरहीम रामलालच्या वाटेला जात नाही; तर रामलाल आसाराम बापूच्या वाटेला जात नाही. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप;’ परिणामी तथाकथित आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्र डबक्यासारखे राहतात. स्वत:ला ‘करेक्ट’ करण्याची धार्मिक क्षेत्रात पद्धत नाही; पण विज्ञान मात्र नम्रपणे आपली चूक मान्य करते किंवा अशी चूक जे मान्य करत नाहीत, त्यांना बाजूला काढते. हेच विज्ञानाचे सामर्थ्य आहे.

डॉ. टोणगांवकर आणि खिलारे यांना आदरांजली

अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत असणार्‍या दोन दिग्गजांचे कोरोनामुळे दु:खद निधन झाले. डॉ. रवींद्र टोणगावकर व टी. बी. खिलारे हेच ते दिग्गज. डॉ. टोणगावकर हे प्रख्यात सर्जन होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे संशोधन मान्य झाले होते. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या ग्रामीण भागात त्यांनी अमूल्य अशी वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांना दिली. ते उत्तर महाराष्ट्र विभागाचे ‘अंनिस’चे उपाध्यक्ष होते. वार्तापत्राला त्यांनी आपल्या हयातीत अमूल्य अशी आर्थिक मदत मिळवून दिली; पण टोणगावकरांचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विवेकी जीवनप्रवास. आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष या आध्यात्मिक संकल्पनांवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल चिकित्सा केली आणि ते विवेकवादाचे समर्थक बनले.

टी. बी. खिलारे हे भारत सरकारच्या संरक्षण खात्यात पुणे येथे वैज्ञानिक होते. परखड विवेकवादी म्हणून त्यांची प्रतिमा होती. वार्तापत्राच्या संपादक मंडळात त्यांनी अनेक वर्षेयोगदान दिले. विवेकवादावर उत्कृष्ट लेखन केले. वयाच्या 61 व्या वर्षी कोरोनाने त्यांचा घात केला. डॉ. टोणगावकर आणि टी. बी. खिलारे यांना वार्तापत्र आणि ‘अंनिस’ परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हा सर्वांच्या सहवेदना व्यक्त करतो.