अॅड. देविदास वडगावकर -
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने जून २०२३ चा आपला अंक हा ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या विषयावर काढलेला आहे. एका वेगळ्या विषयावर हा अंक असल्याने तो निश्चितच वाचनीय आहे. गुणवत्ता म्हणजे काय आणि गुणवत्तेचे किती अवडंबर असावे, हा चर्चेचा विषय असू शकतो. त्याचबरोबर आज ज्याला किमान गुणवत्ता म्हणून सर्वमान्यता मिळाली आहे. ती गुणवत्ता न धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होते? याचीही चर्चा व्हायला पाहिजे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जसे आकाश खुले असते. तसेच ज्यांना ही किमान गुणवत्ता मिळालेली नाही त्यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद असतात का? होतात का? याचीही चर्चा समाजात सर्व स्तरांत व्हायला हवी. पण गुणवत्तेचे गारुड एवढे आहे की, किमान न धारण केलेल्या, नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होते? याचा विचार समाज म्हणून आपण करताना दिसत नाही.
या अंकात ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ चर्चा करत असताना मुख्यतः तथाकथित गुणवत्ता आणि तथाकथित आरक्षण याबाबत चर्चा अधिक केलेली आहे, असे माझे निरीक्षण आहे. एका मर्यादित अर्थाने म्हणजे गुणवत्ताशाहीचे अवडंबर हे आरक्षणाच्या संदर्भात किती चुकीचे आहे किंवा या अंगाने सामाजिक धारणा कशा चुकीच्या पण घट्ट बसलेल्या आहेत, त्यातून समाज जातीजातींत कसा पुन्हा विभागला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाचे तोटे या अंगाने कसे सांगितले जातात, याबाबतची चर्चा चांगल्या पद्धतीने झालेली आहे .
पण गुणवत्ताशाही एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर तिला वेगळे आयाम आहेत. मुळात गुणवत्ता कशाला म्हणावी? यापासून ते किमान गुणवत्ता नसणार्या लोकांचे काय? इथपर्यंत या चर्चेचा परीघ असू शकतो. माझ्या दृष्टीने गुणवत्ताशाहीचे अवडंबर हे एक फॅशन झालेली आहे. त्याची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. गुणवत्ता ती देखील एका विशिष्ट शाखेतील गुणवत्ता असे जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा या विषयाच्या मर्यादा आपण खूपच संकुचित करून बोलत असतो. समाजाच्या सर्व स्तरांना सामावून घेणारा विचार या चर्चेतून व्हायला हवा. किमानपक्षी ज्या लोकांना किमान गुणवत्ता मिळाली नाही ते काही मंदबुद्धीचे असतात, असे नव्हे. असे विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पतीत होतात. अर्थात, मुख्य प्रवाह म्हणजे काय? याची देखील व्याख्या कधीतरी शांतपणे करायला हवी. या मुख्य प्रवाहापासून पतित होतात म्हणजे त्यांच्या आयुष्याला कष्टकरी जीवनाची छटा मिळते. आयुष्यभर त्यांना अंगमेहनतीची कामे करावी लागतात.
पुन्हा विषय निघतो की, मग मेहनतीची कामे ही काही कमी दर्जाची कामे आहेत का? समाज त्याला कमी दर्जाची कामे समजतो, हेही खरे आहे. म्हणजे गुणवत्ता नसलेले विद्यार्थी कष्टकरी वर्गात जीवनाच्या प्रवाहात पुढे जातात आणि कष्टकरी वर्ग हा समाजाच्या एकूण रचनेत कमी दर्जाच्या, खालच्या दर्जाचा समजला जातो. त्यामुळे गुणवत्ता नसणे हे कमी दर्जाचे जीवन जगण्याची सक्ती करणारे ठरू शकते का? असाही विचार सध्या तरी होताना दिसतो. त्यामुळे गुणवत्ताशाहीचा विषय ज्यांनी किमान गुणवत्ता धारणच केलेली नाही त्यांच्यासाठी खूपच विदारक सत्य समोर घेऊन येतो आणि ज्यांच्यासाठी तथाकथित गुणवत्ता हस्तगत केलेली आहे त्यांच्यासाठी आव्हानाचे डोंगर उभे राहतात.
आज कोणत्याही क्षेत्रात गुणवत्ताधारक विद्यार्थी गेला तरी त्याला किमान पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक झालेले आहे. त्यामुळे वयाच्या तिशीपर्यंत तो जीवनात स्थिर होत नाही. मग त्यातून वैवाहिक जीवन व अन्य मार्गाचे हे अडथळे निर्माण होतात. म्हणजे गुणोत्तरशाहीच्या मार्गाने गुणवत्ता धारण केलेला विद्यार्थी देखील समाजात एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून येण्यासाठी त्याच्या वयाची तिशी ओलांडली जाते. असा गुणवत्ताधारक नागरिक मग समाजाचा किती जबाबदार नागरिक होतो? त्याच्याकडून किती जबाबदारीने राष्ट्र उभारणीचे, समाज उभारणीचे, कुटुंब उभारणीचे काम होते? गुणवत्ताशाहीत अशा विषयांची चर्चा होणे आवश्यक आहे.
मग गुणवत्ता धारण करून सुद्धा एवढे आव्हाने ज्यांच्या समोरासमोर उभी आहेत आणि गुणवत्ता धारण न करताही जीवनात आव्हाने समोर उभी आहेत. मग गुणवत्तेचे काय करायचे? त्याचे निकष काय असावेत, याचाही विचार समाजाने करायला हवा असे मला प्रकर्षाने जाणवते. आपण गुणवत्ता एका मर्यादित अर्थाने घेऊन त्याच्यावर दीर्घकाळ विविध आयामाने चर्चा करतो. पण त्याच्यातले विविध पदर चर्चेतून सुटून जातात. त्या पदरांचीही चर्चा या निमित्ताने व्हायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे.
लेखक संपर्क ः ९४२३० ७३९११