सत्यशोधक केशवराव विचारे

छायाताई पोवार - 9850928612

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगांव या गावांनी विधवा प्रथेविरुद्ध सर्वप्रथम ठराव मंजूर केले. या गावांना कमलताई विचारे यांनी त्यांचे सासरे सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या नावाने प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रेरणा पुरस्कार अंनिसच्या वतीने दिले.

सत्यशोधक केशवराव विचारेंचा संक्षिप्त परिचय

गुरुवर्य केशवराव विचारे यांचा जन्म 29 जुलै 1889 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अडूर गावी झाला. प्राथमिक शिक्षण अडूर येथेच झाले. वयाच्या 12 व्या वर्षी ते एकटेच मुंबईस गेले. दिवसा नोकरी आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी, मराठी, गुजराती या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. मिरज येथे स्टेशन मास्तर म्हणून नोकरीस लागले. सन 1910 मध्ये लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

मिरज येथे नोकरी करीत असतानाच केशवराव विचारे यांचा छत्रपती शाहू महाराजांशी संबंध आला. पुढे त्यांची बदली सातारा रोड (पाडळी, ता. कोरेगाव) येथे झाली. या स्टेशनसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या स्टेशन मास्तरची आवश्यकता होती. गुरुवर्य विचारे छत्रपती शाहू महाराजांचे फार विश्वासातले सल्लागार होते. महाराजांची मुंबईला जाणारी रेल्वे सातारा रोड येथे थांबली की, स्टेशन मास्तर असलेले विचारे गुरुजी महाराजांच्या स्पेशल डब्यामध्ये जात. तेथे त्यांची खलबते चालत, विचारविनिमय होई, धोरण ठरे.

मे 1916 मध्ये केशवराव विचारे व जोत्याजीराव फाळके शाहू महाराजांना भेटावयास गेले. तेथे भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, दासराम यांच्याशी त्यांचा परिचय झाला. एक आठवड्याने ‘सत्यशोधक जलसा’ काढण्याचा विचार घेऊनच ते पाडळीला परत आले. केशवराव विचारे यांनी कथानक लिहून दिले आणि जोत्याजीराव फाळके यांचा सत्यशोधक जलसा तयार झाला. ‘सत्यशोधक जलशां’नी केवळ सातारा, कोल्हापूरच नव्हे, तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा भागात हजारोंनी कार्यक्रम केले.

विचारे गुरुजी रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेडेगावात लहानाचे मोठे झाले. ते सुरुवातीस धार्मिक विचारांचे होते. भास्करराव जाधव यांचे अस्पृश्यता निवारणाचे व्याख्यान उधळून लावण्याकरिता म्हणून ते गेले होते; पण त्यांचे व्याख्यान ऐकून व धार्मिक ग्रंथातील अस्पृश्यतेविरुद्धचे आधार ऐकल्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते ‘सत्यशोधक’ बनले.

बदलत्या काळाला अनुसरून सत्यशोधक समाजाचे कार्य वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सत्यशोधक समाजाचे कार्य करणारी नवी यंत्रणा उभी केली. अडाणी व मागास अशा बहुजन समाजातील इच्छुक व उत्सुक व्यक्तींची शिबिरे घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले, कार्यकर्ते तयार केले. अडाण्यातील अडाणी माणसाला ते स्वत: शिकवून तीन महिन्यांत शहाणा करीत व वक्ता बनवीत. असे शेकडो लोक त्यांनी शहाणे केले व सत्यशोधक समाजाच्या कामाला लावले. म्हणून सर्वजण त्यांना ‘गुरुजी’ म्हणू लागले.

इ. स. 1919 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ सत्यशोधक चळवळीचे काम करण्याचा निर्धार विचारे गुरुजींनी केला. हे वृत्त छत्रपती शाहू महाराजांना समजताच त्यांनी केशवरावांना कोल्हापुरास बोलावून घेतले. ‘मानधन सुरू करतो,’ असे सांगताच गुरुजींनी नम्रपणे नकार दिला. ‘मला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी मागेन,’ असे उत्तर दिले. यानंतर महाराजांनी पंचगंगेच्या काठी दहा एकर शेतीची जमीन देऊ केली होती; मात्र गुरुजींनी नम्रपणे ती नाकारली.

विचारे गुरुजींनी इ. स. 1927 मध्ये सत्यशोधक विचारांचे ‘पोस्टल क्लासेस’ सुरू केले. इ. स. 1933 मध्ये त्यांचे ‘करस्पाँडन्स विद्यार्थी संघा’त आणि इ. स. 1942 मध्ये ‘सत्यशोधक विद्यार्थी संघा’त रूपांतर केले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासवर्ग चालवून ‘सत्यशोधकी प्रचारक’, ‘जलसा’कार, शाहीर, कीर्तनकार आणि वक्ते तयार केले. या सत्यशोधक अभ्यास वर्गात कालबाह्य चाली-रीती, परंपरा, रुढी यांची माहिती देऊन त्यांना विरोध करण्याची आवश्यकता सांगितली जाई. प्रतिपाद्य विषय समजावून सांगण्यासाठी संतांचे अभंग, कबीराचे दोहे, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यातील संदर्भ दिले जात. तसेच काही गोष्टी व दृष्टांतांची योजना केली जाई. या वर्गासाठी 18 विषयांसंबंधी मूलभूत ज्ञान देणारा अभ्यासक्रम स्वत: केशवरावांनी तयार केला होता. इ. स. 1939 ते 1956 या काळात विचारे गुरुजींनी महाराष्ट्रभर शेकडो शिबिरे घेतली. ‘सत्यशोधक विद्यार्थी संघा’च्या कार्यकर्त्यांची शाहिरी कलापथके तयार करण्यात आली. ‘लोकरंजनातून लोकशिक्षण’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.

कोल्हापुरातील बागल मंत्रिमंडळाने विचारे गुरुजींना शिबीर घेण्यास बोलविले. त्यासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान दिले. नोव्हेंबर 1947 मध्ये विचारे गुरुजींनी पन्हाळा येथे दोन महिने अभ्यास शिबीर घेतले. या वेळी 350 च्या वर कार्यकर्तेसहभागी झाले होते. हे शिबीर खूपच गाजले.

कोल्हापुरात रामराव कदम सराफ यांच्या वाड्यात महिलांसाठी 45 दिवसांचा बौद्धिक वर्ग चालविला होता. त्यासाठी बहुजन समाजातील 40 महिला हजर होत्या. अगदी गरीब वस्तीतील मजूर, दगड फोडणारे वडार यांसारख्या वर्गातील महिलांना त्यांनी ‘बोलके प्रचारक’ बनविले. गंगावेश पटांगणातील एका जाहीर सभेत वडार समाजातील दोन महिला ‘समाजसुधारणा’ या विषयावर बोलीभाषेत, ओघवत्या शैलीत प्रभावीपणे निर्भयपणे बोलल्या. (सेवा दि. 11.12.1948)

विचारे गुरुजींनी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वज्ञानात सहकाराचाही समावेश केला. शेती व इतर उद्योगधंदे पूर्णपणे सहकारी तत्त्वावर चालविले, तर फायदेशीर होऊ शकतात, हा विचार बहुजन समाजात रुजविण्यासाठी त्यांनी अशा स्वरुपाचा प्रकल्प स्वत: राबविला. इ. स. 1934 मध्ये त्यांनी जांभूळवाडी येथे कृषी-औद्योगिक वसाहतीची योजना अमलात आणली. त्यासाठी स्वत: खरेदी केलेली 47 एकर जमीन दिली. या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या जातीची कुटुंबे एकत्र राहत. आधुनिक शेतीला जोडून शिवणकाम, दोरखंड विणणे, दुग्ध व्यवसाय, कातडी कमाविणे, कातडी वस्तू तयार करणे. कोंबड्या पाळणे, बी-बियाणे तयार करणे इत्यादी व्यवसाय एकत्रित केले जात. हा प्रकल्प 1945 पर्यंत सुरू होता.

सहकाराच्या प्रचारासाठी त्यांनी गावोगाव शिबिरे घेतली. ‘सातारा जिल्हा शेतकरी संघा’ची स्थापना केली. केशवरावांचे सहकारातील कार्य पाहून त्यावेळचे मुंबई सरकारचे अर्थमंत्री ना. वैकुंठलाल मेहता यांनी त्यांना ‘सहकारी संस्थेचे काम करा, त्यासाठी मोटार व एक हजार रुपये पगार देतो,’ असे सुचविले; पण गुरुजींनी ‘मोटार व भारी पगाराने आपण गरीब वर्गापासून दूर जाऊ,’ असे सांगून नकार दिला.

ते सातारा जिल्हा बोर्डात 12 वर्षेलोकनियुक्त प्रतिनिधी होते. इ. स. 1921 ते इ. स. 1923 या काळात सातारा स्कूल बोर्डचे ते अध्यक्ष होते. इ. स. 1947 मध्ये कोल्हापूरचे डायरेक्टर ऑफ रूलर डेव्हलपमेंट आणि सहकार खात्याचे रजिस्ट्रार म्हणून नेमले.

इ. स. 1940 मध्ये केशवराव विचारे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले. इ.स. 1950 पासून सत्यशोधक समाजाचे महाअध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत; म्हणजे 1957 पर्यंत त्यांनी महाअध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.

विचारे गुरुजी बोलल्याप्रमाणे कृती करणारे, ‘आधी केले; मग सांगितले’ या विचाराचे नेते होते. आपल्या व्याख्यानांतून ते ‘धार्मिक विधी करू नका’, ‘विवाह साध्या पद्धतीने करा’, ‘आंतरजातीय विवाह करा’, ‘जातीयता पाळू नका’ इत्यादी गोष्टी सांगत. त्यांचे स्वत:चे आचरण त्याप्रमाणे असे. त्यांनी जातिभेद कधीच पाळला नाही. स्वत:च्या मुलीचा आंतरजातीय विवाह स्वत: लावून दिला. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांना बहुमोल साथ दिली. केशवरावांचे संपूर्ण कुटुंब ‘सत्यशोधक समाजा’मध्ये सामील झाले होते. त्यांच्या कार्याचे मोल सांगताना भाई माधवराव बागल म्हणतात-

“निव्वळ ब्राह्मण्यवादी आघात, धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे आणि सामाजिक विषमता नाहीशी करणे, एवढीच मर्यादा त्यांनी आपल्या कार्याला व ध्येयाला आखून घेतली नाही, तर आधुनिक काळाला अनुसरून सत्यशोधक समाजाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केशवराव विचारे यांनी सर्व गुलामगिरी झुगारून मानवतावादाचा स्वीकार केला. हा प्रचार करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही म्हणून त्यांनी स्वत:च्या खेड्यात हे विचार जिवंत ठेवणारा खेडूत निवडून त्याला वक्ता बनविला. बुद्ध भिक्षुप्रमाणे प्रचारक निर्माण केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सत्यशोधक समाजाचे सभासद पुढेही चालतील, तर निधर्मी राजवट पक्की करण्याचे पवित्र कार्य ते करू शकतील.”

लेखक संपर्क ः 98509 28612


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]