तिशी नंतर वार्तापत्र नव्या स्वरुपात…

राजीव देशपांडे -

वार्तापत्राच्या एप्रिलच्या अंकाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती; 23 मार्चच्या संचारबंदीनंतर अचानक टाळेबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. प्रेस, पोस्ट, वाहतूक सर्वच बंद झाले. पण वार्तापत्र विभागाने झटपट निर्णय घेत सोशल मीडियावरून अंक ई-आवृत्तीच्या स्वरुपात प्रकाशित केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील सप्टेंबरपर्यंतचे अंक ‘ई-अंक’ म्हणून सलगपणे सोशल मीडियावरून प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे गेल्या 30 वर्षांची प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अंक प्रकाशित करण्याची वार्तापत्राची परंपरा कोरोनासारखी साथही खंडित करू शकली नाही. याच काळात वार्तापत्राची वेबसाईटही (anisvarta.co.in) सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. त्याचाही वार्तापत्राच्या प्रसाराला चांगला उपयोग झाला.

ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पोचावा; तसेच युवा वर्गात डिजिटल स्वरुपात मासिक मोठ्या प्रमाणावर पोहचावे म्हणून आम्ही वार्तापत्राला 30 वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष योजना नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये वार्षिक वर्गणीत 50 टक्के सवलत देऊन ती केवळ 200 रुपये करीत आहोत. युवा वर्गासाठी डिजिटल स्वरूपात ‘ई’ अंक काढत आहोत. फक्त रुपये 50 मध्ये वर्षभर ‘ई-अंक’ मिळेल. या योजने अंतर्गत वार्तापत्राचे जास्तीत जास्त सभासद करावेत असे आवाहन वाचक, कार्यकर्त्यांना संपादक मंडळातर्फे करतो.

वार्तापत्राच्या संदर्भात या कोरोना संसर्गाच्या कालखंडात काही सकारात्मक गोष्टी घडत असताना जगभरातील एकूण परिस्थिती फारच भयावह बनत होती. अचानक लादलेल्या टाळेबंदीमुळे सामोरा आलेला स्थलांतरित कामगारांचा प्रश्न, देशातील कमकुवत आरोग्य व्यवस्था, दुबळी अर्थव्यवस्था यांचे वास्तव स्वरूप, साथीमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा फायदा उठवत आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विशिष्ट धर्माला लक्ष्य करीत धर्मविद्वेषाला खतपाणी घालणारे, अंधश्रद्धांना पाठबळ देणारे सत्ताधारी पक्षाचे राजकारण या सर्वांचा परामर्ष विज्ञान आणि विवेकाच्या सहाय्याने घेत वार्तापत्राने या कठीण कालखंडातील आपली भूमिका पार पाडली.

याच भूमिकेचा धागा पकडत या वार्षिक अंकाची रचना आम्ही केली आहे. दरवर्षीप्रमाणे कार्यकर्ता, मान्यवर, संस्थापरिचय, धर्मस्थळचिकित्सा या संदर्भात लेख आहेतच; पण त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याप्रमाणे बुवाबाजीच्या भांडाफोडीचे काम करते, त्याचप्रमाणे खोट्या बातम्यांचे खरे स्वरूप उघड करणार्‍या alt news या वेबसाईटचे प्रतिक सिन्हा आणि जमिनीवरील वास्तव आपल्या वर्तमानपत्रातून दाखवून देत प्रस्थापितांना धक्का देणार्‍या, बुंदेलखंडातील केवळ महिलांनी चालविलेल्या ‘खबर लहरीया’ या वर्तमानपत्राच्या संपादक कविता बुंदेलखंडी यांची आम्ही घेतलेली विस्तृत मुलाखत वाचकांना नक्कीच भावेल. त्याचप्रमाणे देशातील पहिल्या आदिवासी महिला कुलगुरू सोनाझरिया मिन्झ यांची मुलाखतही वाचकांना उद्बोधक ठरेल. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. शंतनु अभ्यंकर, अनिल सावंत, प. रा. आर्डे, प्रभाकर नानावटी, नरेंद्र लांजेवार यांचे विविध विषयांवरील लेख, भरत यादव यांनी अनुवादित केलेल्या कथा, लघुकथा, कविता वाचकांना आवडतील व ते या अंकाचे नक्कीच स्वागत करतील, याची खात्री वाटते.

कोरोनाच्या साथीने उद्ध्वस्त झालेले जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही, हळूहळू येत आहे; पण दुसर्‍या लाटेची शक्यता आहेच. कोरोनावरची लस दृष्टिक्षेपात जरी आली असली तरी ‘दिल्ली बहोत दूर है…’ अशीच स्थिती आहे. अशा स्थितीत वार्षिक अंक काढायचे ठरले, तेव्हा अंक कसा निघेल, प्रत्यक्ष स्थळावर जाता येणार नाही, जाहिराती मिळतील की नाही याची खूपच धाकधूक होती; पण प्रत्यक्षात चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, चित्रकार, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राशी व चळवळीशी असलेल्या बांधिलकीपायी या खडतर काळातील अडचणींवर सहज मात करता आली.

या अंकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार भ. मा. परसवाळे सरांचे आहे. त्यांना मुखपृष्ठासाठी जेव्हा विचारणा केली, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी तत्काळ होकार दिला व ‘मला काहीही मानधन नको’ असेही सांगितले. अंकातील कविता, लघुकथा भरत यादव यांनी अनुवादित केलेल्या आहेत त्या अंकात घेण्यासंबंधी त्यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर माझा बहुमान आहे.’ कुलगुरू मिन्झ, प्रतिक सिन्हा यांनी डॉ. दाभोलकरांच्या चळवळीच्या मासिकाला मुलाखत दिल्याचा आनंद व्यक्त केला. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी या कठीण काळात अतिशय मेहनतीने जाहिराती व देणग्या गोळा करून वार्तापत्राला आर्थिक आधार दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन!

या सर्व लेखक, चित्रकार, कवी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार, वार्तापत्र कार्यालय, मुद्रणालयातील कर्मचारी, वार्तापत्राचे वाचक आणि चळवळीतील कार्यकर्ते यांच्या विश्वासास अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र नक्कीच पात्र ठरेल, अशी ग्वाही संपादक मंडळातर्फे देत या सर्वांना आगामी वर्ष आनंदाचे जावो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]