ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
विवाहप्रसंगी म्हटल्या जाणार्या मंगलाष्टकात नद्यांची यादी देणारा ‘गंगा सिंधु सरस्वती च यमुना’ हा श्लोक म्हटला जातो. या यादीमध्ये ‘चर्मण्वती’ या नावाच्या नदीचा उल्लेख आला आहे. भारतीय संस्कृतिकोशात चर्मण्वती या नदीची माहिती वाचता येते. ही उत्तर भारतातील सर्वांत प्राचीन नदी असून हिचा प्रवास मार्ग सुमारे ६५० मैलांचा आहे. हिला चर्मण्वती असे नाव मिळाले, त्यामागची कथा अशी –
रंतिदेव नावाचा एक राजा होता. त्याने या नदीच्या काठी इतके अगणित यज्ञ केले की त्यात हनन झालेल्या पशूंच्या चर्माचे डोंगर उभे झाले. रंतिदेवाच्या यज्ञांमुळे विंध्याचलाएवढा चर्माचा पर्वत निर्माण झाला. पुढे त्यावर पाऊस पडल्यानंतर त्यातून जो रक्ताचा प्रवाह सुरू झाला, त्याचीच चर्मण्वती नदी बनली. आज आपण या नदीला ‘चंबळ’ नावाने ओळखतो.
ही पौराणिक कथा यज्ञामध्ये होणार्या प्रचंड प्रमाणातील पशुहत्येकडे निर्देश करते. यज्ञामध्ये एवढी प्रचंड पशुहत्या होत होती आणि तिचे समर्थन केले जात होते. मनुस्मृती तर म्हणते की यज्ञामध्ये केली जाणारी पशुहत्या ही हिंसा नसून अहिंसाच आहे. एखादे धार्मिक कर्मकांड कसे अत्यंत हानिकारक व घृणास्पद रूप धारण करू शकते याचे यज्ञसंस्था हे एक उदाहरण आहे. यज्ञसंस्था ही एक अत्यंत प्राचीन धर्मसंस्था आहे.
‘यज्ञ संस्कृती की अज्ञ संस्कृती’ या लेखात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी यज्ञ संस्थेचा इतिहास थोडक्या शब्दात सांगितला आहे तो असा –
निसर्गाच्या लीला भयचकित नजरेने बघणार्या आदिम अवस्थेतील माणसाने या विश्वामध्ये एक ‘यातू’ शक्ती भरून राहिली आहे असे मानले. या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी करावयाची कर्मकांडे म्हणजे यातू क्रिया. अमुक केले की तमुक फळ असे अर्थ आदिम अवस्थेतल्या माणसाने या कर्मकांडांना जोडले. यज्ञ हे यातीलच एक. स्वर्ग, पुत्र, पशू, आरोग्य, ऐश्वर्य, पापनाश इ. इष्ट फलांच्या प्राप्तीसाठी अग्नी, इंद्र आदी देवतांना उद्देशून अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्याचे धार्मिक कर्मकांड स्थूल मानाने यज्ञाचे स्वरूप. एके काळी यज्ञप्रसंगी होणारी पशूंची हिंसा व अन्य ओंगळ प्रकार आता कालौघात बंद झाले, मात्र अशा यज्ञ संस्कृतीमागे उभी असलेली उच्चवर्णीय मानसिकता कायमच राहिली. विषमतेची परंपरा कायम होण्यासाठी यज्ञयागादी रूढींची मदत झाली. हा इतिहास आहे. यज्ञ ही नेहमीच उच्चवर्णीयांची धर्मसंस्था राहिली.
द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ ही गीतेची भूमिका, यज्ञरूपी नावा फुटक्या असल्याचा मुंडकोपनिषदाचा निर्वाळा, अश्वमेधासारख्या यज्ञापेक्षा मानसिक उपासनेचे मोल मोठे असल्याचे आरण्यकांचे व ब्राह्मण ग्रंथांचे सांगणे आणि चार्वाक, बौद्ध आणि जैन मतांचे यज्ञसंस्थेवरील आक्षेप, या सगळ्यामुळे खरेतर यज्ञ काय आहे आणि आत नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अवैदिक दर्शन म्हणून त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले तरी वैदिक परंपरेत येणार्या उपनिषदांची यज्ञविरोधी भूमिका तशी डावलता येणार नाही. यज्ञाचे फळ मोक्षाएवढे शाश्वत नसल्याचे सांगून उपनिषदांनी यज्ञाला विरोध केला आहे.
आजच्या आधुनिक कालखंडात देखील केरळसारख्या प्रगत राज्यात पुत्रकामेष्टी यज्ञ साजरा केला जातो. नागपुरात अश्वमेध यज्ञ साजरा केला जातो. कुठे विश्वशांती यज्ञ साजरा केला जातो. त्यावर लक्षावधी रुपयांचा खर्च केला जातो. याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनाने सविस्तर चर्चा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या लेखात केली आहे. अशा या यज्ञयागादी कर्मकांडाबद्दल वारकरी संतांची भूमिका काय आहे?
पारंपरिक समजुतीप्रमाणे यज्ञ का करायचा? फल प्राप्तीसाठी. कोणाला इथेच फळ हवे असते. कोणाला स्वर्गात. यासाठी पुण्य संपादन करण्यासाठी यज्ञाचा खटाटोप. या स्वर्ग-नरकाची प्राप्ती कशी होते. पुण्य संपादले की स्वर्ग, पाप केले की नरक. या स्वर्गाची बाकी एक गंमत आहे. इथे पृथ्वीवर स्त्रीपासून दूर रहा, स्त्री नरकाचे द्वार. तर तिथे गेल्यावर स्वर्गात अप्सरा तुमचे पाय चेपणार!
ज्ञानेश्वर माउलींची यज्ञ, पाप, पुण्य यांची संकल्पना इतकी तकलादू नाही. माउलींची दृष्टी किती सूक्ष्म आणि किती स्वतंत्र आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हा आम्हा सर्वांनाच वेगळा विचार करायला लावणारे! माउली म्हणतात –
एर्हवीं तरी नरकीचें दु:ख |
पावोनि स्वर्गा नाम कीं सुख |
वांचूनि नित्यानंद गा निर्दोष |
तें स्वरूप माझें ॥
मज येता पैं सुभटा |
या द्विविधा गा अव्हांटा |
स्वर्गु नरकु या वाटा |
चोरांचिया ॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे |
पापात्मकें पापें नरका जाइजे |
मग मातें जेणें पाविजे |
तें शुद्ध पुण्य ॥
आणि मज चिमाजीं असतां |
जेणें मी दूरी होय पांडुसुता |
तें पुण्य ऐसें म्हणतां |
जीभ न तुटे काई ॥
स्वर्गाचे स्वरूप कसे आहे? नरकाचे स्वरूप कसे आहे? स्वर्ग-नरकाच्या वाटा चोरांच्या कशा? पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? या सर्वांचे एक वेगळे चिंतन माउली या ठिकाणी मांडतात. त्याचा थोडा विचार करायला हवा.
प्रत्येक माणसाला जीवनात प्रत्येक वेळी कशाची अपेक्षा असते? सुखाची! तुम्हाला ज्ञान हवे काय? काहीजण म्हणतील, नको. तुम्हाला देव हवा काय? काहीजण म्हणतील, नको. तुकोबांना लोकांनी दिलेले उत्तर प्रसिद्ध आहे. तुकोबा “देव घ्या कोणी, देव घ्या कोणी |” असे घरोघरी विनंती करू लागले, तर लोकांनी उत्तर दिले –
देव नलगे देव नलगे |
सांठवणिचे रुधले जागे ॥
देव नको, देव नको! कारण साठवण्याच्या सगळ्या जागा आधीच भरल्या आहेत.
पण ‘सुख नको’ असे कोणी म्हणत नाही. सुख प्रत्येकाला हवे. पण सुख कशात आहे, याचे ज्ञान नाही. सुख मिळविण्याचा मार्ग काय, याचे ज्ञान नाही. आईला वाटते, मूल झाले की सुख मिळेल. बापाला वाटते, मुलगा झाला की सुखी होईन. मुलगा झाला. सुख मिळाले का? पुढे तो शिकायला हवा. पुढे त्याला नोकरी मिळायला हवी. पुढे त्याला चांगली बायको मिळायला हवी. ही मागण्यांची साखळी कधीही पूर्ण होत नाही. आज ज्यात सुख वाटते ती गोष्ट प्राप्त झाली की त्यात सुख वाटत नाही. पुढची मागणी पुढे येते.
अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर ‘मागण्या’ अगणित आहेत. पण मागण्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सर्व मागण्यांची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. माणसाला विचारलं की, अशी कोणतीही एक वस्तू सांग जी मिळाल्यावर तू पूर्ण सुखी होशील. सांगता येत नाही. या जीवनात सुखाची मागणी पूर्ण होत नाही म्हणून स्वर्गाची कल्पना पुढे आली. इथे भोगायला मिळत नाहीत ती सुखे स्वर्गात मिळतात. याउलट नरक. अत्यंत यातनामय जीवन तिथे. माउली म्हणतात –
एर्हवी तरी नरकांचे दु:ख |
पावोनि स्वर्गा नाम कीं सुख ॥
नरकाचं दु:ख पाहून स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. पण खरे सुख स्वर्गात तरी आहे काय? पुढे ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
मज येता पैं सुभटा |
या द्विविधा गा अव्हांटा |
स्वर्गु नरकु या वाटा |
चोरांचिया ॥
अर्जुना (सुभटा), माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणार्या स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत. स्वर्गाची प्राप्ती म्हणजे परम सुखाची प्राप्ती असा आपला गैरसमज असतो. समजा, आपल्याला ताजमहाल पाहायचा आहे, तर कन्याकुमारीला जाऊन चालेल काय? ताजमहाल उत्तरेला आग्रा इथे. तर आपण चाललो दक्षिणेला कन्याकुमारीकडे. पहिली गोष्ट म्हणजे सुख कुठे याचा पत्ताच चुकला.
काहींना वाटते की देवाची प्राप्तीही स्वर्गात होईल. देव एकदा सापडला की परमानंद मिळालाच. पण आपला पत्ता चुकलेला आहे. देव स्वर्गात असता, तर
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा |
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥
असे म्हणावेच लागले नसते.
मग देवाला जाणण्याची वाट कोणती? स्वर्ग, नरक या चोरांच्या आडवाटा आहेत असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. आपल्याला शॉर्टकटचे फार आकर्षण असते. ‘झटपट इंग्लिश’ पासून ‘लॉटरी लागली की एकदम श्रीमंती’, ‘अभ्यास न करता कॉपी करून पास’, ‘व्रतवैकल्य करून एकदम भाग्योदय’ हे सगळे शॉर्टकट. या चोरांच्या वाटा असे माउली म्हणतात.
आडवाटांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्या रानात कुठे हरवतील हे सांगता येत नाही. बहुतेक वेळा सुखापेक्षा संकटाचीच प्राप्ती. स्वर्गसुखासाठी केले जाणारे सर्वकाही ईश्वराच्या जवळ नव्हे, तर दूर घेऊन जाते. अशा चोरांच्या आडवाटांपासून दूर रहा, असे माउली निक्षून सांगतात.