अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण’ व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अंनिवा -

पहिला दिवस

अंनिसच्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन.

महाराष्ट्र अंनिसच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण मोहिमे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद. 500 श्रोत्यांची उपस्थिती

कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते.

शास्त्रज्ञ डॉ.सत्यजीत रथ

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन पुणे येथील आयसर या संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजीत रथ यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

याप्रसंगी ‘फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर डॉ. रथ यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, या साथीच्या काळात लोकांच्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण होते आणि वैज्ञानिकांकडून त्या कुतुहलाचे निराकरण करताना लोक आणि वैज्ञानिक यांच्या आकलनातील तफावतीमुळे काही प्रामाणिक गैरसमज निर्माण होतात. अशा प्रामाणिक गैरसमजातून जे विज्ञान निर्माण होते, ते आंधळे विज्ञान. हे गैरसमज हळूहळू दृढ होत जातात आणि हितसंबंधी लोकांकडून वापरले जाऊ लागतात तेव्हा कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते. हे कोविड काळात घडताना दिसत आहे.

कोविडसारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर छद्म विज्ञानाच्या उगमाच्या विविध पैलूंचा ऊहापोह करून ते पुढे म्हणाले, छद्म विज्ञानातील अनेक कल्पना सर्वसामान्य लोकांनी साथीमुळे उद्भवणार्‍या भीतीपासून आपल्याला काहीतरी संरक्षण मिळावे, आधार मिळावा, यासाठी स्वीकारलेल्या दिसतात. कारण त्यात काहीतरी तार्किक वाटणारे समाधान मिळते व या साथीसारख्या भयंकारी काळात अशा स्वरुपाच्या छद्मविज्ञानी कल्पना लोकांच्या पचनी पडू लागतात आणि त्याचा गैरफायदा हितसंबंधी लोक घेतात.

समाजात छद्म विज्ञान हे काही फक्त वैद्यकीय शास्त्रातच आहे, असे नव्हे ते विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या सर्व शाखांमध्ये सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे कोविडचा विषाणू हा मोठा वैयक्तिक धोका नसून पुरेशा वैद्यकीय सुविधा नसलेल्या समाजात तो सामाजिक धोका ठरत आहे. त्यामुळेच वैद्यकीय सुविधांअभावी रुग्ण मोठ्या प्रमाणावर मरत आहेत, ही बाब समाजासाठी लांच्छनास्पद आहे.

विज्ञानाचे नाव वापरणार्‍या कोणत्याही गोष्टीबद्दल चटकन अविश्वास दाखवू नका; तसेच पटकन विश्वासही ठेवू नका. पुरावा मागा, तपासा, त्यांची शास्त्रीय कसोटीवर पारख करा, असा सल्ला डॉ. सत्यजीत रथ यांनी देत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रतिकारशक्ती, लस, आयुर्वेदिक उपचार यासंदर्भातील अनेक प्रश्नांना व्याख्यानानंतर समर्पक उत्तरे दिली.

विविध क्षेत्रातील फसव्या विज्ञानाचे विश्व वाचकांसमोर मांडण्याचे फार मोठे काम ‘अंनिस’च्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाद्वारे केले गेलेले आहे. हे काम समाजासाठी फार मोठे प्रबोधनाचे व पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरणारी बाब आहे, असे उद्गार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या विशेषांकांबद्दल बोलताना त्यांनी काढले.

व्याख्यानाच्या सुरुवातीला फसवे विज्ञानविरोधी जनजागर अभियानाची माहिती आणि डॉ. सत्यजीत रथ यांचा परिचय मुक्ता दाभोलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाला साजेसे सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध भागातून 500 च्या वर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक ऑनलाईन उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार राहुल थोरात यांनी मानले.

दुसरा दिवस

छद्मविज्ञान विज्ञानाची परिभाषा वापरते; पण वैज्ञानिक पद्धत नाही ः डॉ. शंतनु अभ्यंकर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या छद्मविज्ञानविरोधी जनजागरण मोहिमेअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या चार दिवसांच्या ‘फसवे विज्ञानविरोधी’ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी ‘छद्म वैद्यक : फसव्या उपचारांचे मायाजाल’ या विषयावर केले.

आपल्या भाषणात त्यांनी फसव्या उपचारांचे मायाजाल नेमके कसे असते, त्याच्यामागची कारणे काय आणि त्यांची विचारसरणी काय असते यांचा ऊहापोह केला. हा ऊहापोह करत असताना त्यांनी या छद्म वैद्यकाच्या फसव्या उपचारांचे नेमके उदाहरण म्हणून होमिओपॅथीत केले जाणारे उपचार घेतले. हे उदाहरण घेण्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, ते अवैज्ञानिक, विज्ञानविरोधी आणि छद्मविज्ञानी आहे. असे असूनही ते इतके वर्षे कसे टिकून आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्राची वैशिष्ट्ये व छद्मवैद्यकाची वैशिष्ट्ये याची तुलना करत होमीओपॅथीची वैशिष्ट्ये छद्मविज्ञानी कशी आहेत हे स्पष्ट केले

छद्मविज्ञानाचा पाया अतिशय कच्चा असतो. या पायाला चार प्रश्न विचारले की हा पाया कोसळून पडतो, असे सांगून ते म्हणाले, यांच्या प्रश्नांची उत्तरे बाबा वाक्यम् प्रमाणम्, मी आणि माझा पंथ श्रेष्ठ. प्रश्न विचारायची तुमची पात्रताच नाही. वैज्ञानिक पुराव्याऐवजी यांचा पुरावा, वैयक्तिक अनुभव, निरीक्षणे, गोष्टीरूप पुरावा, पेशंटची खुशीपत्रे, प्राचीन ग्रंथ, वेगवेगळे निकष यावर अवलंबून असतो. यांच्या पाठ्यपुस्तकातही प्राचीन काळापासून न केलेले बदल. ही सर्व वैशिष्ट्ये होमीओपॅथीसारख्या छद्मविज्ञानी उपचार पद्धतीमध्ये आढळून येतात.

आधुनिक विज्ञानाला बरीच माहिती नाही. पण त्याला काय माहिती नाही, हे पक्के माहीत आहे. त्यामुळे विज्ञान अचाट दावे करत नाही, असे सांगून अखेरीस ते म्हणाले, विज्ञानाला माहीत नसणारा अंधारा कोपरा कल्पनाशक्तीने नव्हे, तर ज्ञानाने उजळून टाकला पाहिजे.

व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध भागातील कार्यकर्त्यांचा व सर्वसामान्य लोकांचा खूपच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. श्रोत्यांनी आधुनिक उपचार पध्दती, आरसेनिक अल्बमच्या गोळ्या, औषधांचे साईड इफेक्ट्स याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे आपल्या मार्मिक शैलीत डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी दिली.

राजू इनामदार यांच्या प्रेरणादायी गाण्याने सांगता झाली. प्रा. प्रवीण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. निशा भोसले यांनी आभार मानले.

तिसरा दिवस

वैज्ञानिक दृष्टिकोनच छद्म विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल

डॉ. हमीद दाभोलकर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या छद्मविज्ञानविरोधी जनजागरण मोहिमेतील ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसर्‍या दिवशी झालेल्या व्याख्यानात मनोविकारतज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘फसव्या विज्ञानाला लोक का भुलतात?’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे, तसेच ते छद्म विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि सध्याच्या कोविडच्या महामारी काळात ही भीती प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून बसलेली असल्याने आज छद्म विज्ञानाच्या दाव्यांना लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहेत.

आपल्या स्वत:च्या क्षमतेने जे काही आपल्याला मिळू शकते, त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आसक्ती, आपली मुले नेहमीच सर्वांपुढे राहावीत, ही पालकांची अतिमहत्त्वाकांक्षा हे मानवी मनाचे गुणधर्मही छद्म विज्ञानाच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात, हे सांगताना त्यांनी हातावरील रेषा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची बौद्धिक क्षमता वाढविणारी ‘डेक्तोलोग्राफी’ किंवा सध्या जोरात असलेल्या ‘मिड्ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन’चे उदाहरण दिले. अनेक आजार हे दीर्घ मुदतीचे व कधीच बरे न होणारे असतात. त्यामुळे आपल्याला असे आजार झाले आहेत, हे न स्वीकारण्याची मानसिकता असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती किंवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा घेऊन चुटकीसरशी बरे करणारे हे फसवे उपचार मानवी मनाला लगेच भुलवतात, असे सांगून त्यांनी चुंबक चिकित्सा, सेरोजेम, प्राणिक हीलिंग, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर वगैरे प्रकारचे उपचार छद्मविज्ञानी असल्याचे सांगतले. हे बाजारावर अवलंबून असणारे छद्मविज्ञानाचे प्रकार असल्याने ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वाने यात सतत भरच पडत राहते व नव्या प्रकारांची निर्मिती होत राहते, असे त्यांनी प्रतिपादन केले.

धर्म आणि छद्मविज्ञान यांची अभद्र युती असल्याचे सांगून ते म्हणाले, एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, आधुनिक आहोत; पण त्याच वेळेस आम्ही आमच्या प्राचीन, मूळ संस्कृतीशी कसे जोडले गेले आहोत, हे सिद्ध करण्याच्या मानसिक गरजेतून ही युती घडून येते. याचा प्रत्यय आज आपण घेतच आहोत. डॉक्टर, अनेक वैज्ञानिक ‘गोविज्ञाना’ला बळी पडताना दिसत आहेत. हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्राचीन काळात आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होत होती, हे गणपतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते,’ या पंतप्रधानांनी केलेला दावाही या मानसिकतेतून केल्याचे दिसून येते.

छद्म विज्ञानाला बळी पडणार्‍यांची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलता येणार नाही, असे सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे,’ हे नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य उध्दृत करत ते आपल्या भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, हे वाक्य जितके अंधश्रद्धा निर्मूलनाला लागू आहे, तितकेच छद्मविज्ञानाला देखील लागू आहे. ते सामोरे ठेवतच आगामी कालखंडात छद्म विज्ञानाच्या विरोधी संघर्षाला अंनिस कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

या व्याख्यानाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या गाण्याने झाली. सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले. आभार डॉ. अशोक कदम यांनी मानले. तीन दिवसांच्या छद्म विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमालेचा समारोप अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केला.

टीम अंनिवा


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]