अन्यायाविरोधात ‘तिघी’

डॉ. तृप्ती थोरात - 8999201766

8 मार्च महिला दिन विशेष

प्रत्येक देशाची जन्मकहाणी ही वेगळी असते, तसाच त्या देशाच्या जडणघडणीचा, प्रगतीचा आणि वाटचालीचा आलेखही वेगळा असतो. तो समजून घ्यायचा असेल तर त्या देशाची जुनी मूल्यव्यवस्था आणि जन्माला आलेली किंवा येऊ घातलेली नवी मूल्यव्यवस्था यांचा तौलनिक अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. कारण जुनी मूल्यव्यवस्था जर का त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला रुचेल, पचेल अशी असेल तर त्या देशाच्या इतिहासाला संघर्षाची पार्श्वभूमी असण्याचं कारणच नाही. पण जर का जुनी मूल्यव्यवस्था समाजातल्या बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ वर्गाला गैरसोयीची वाटत असेल आणि या जुन्या मूल्यव्यवस्थेमुळे दीन-दलित, कष्टकरी, श्रमजीवी आणि महिला वर्ग मुख्य प्रवाहाबाहेर फेकला जात असेल, तर ती मूल्यव्यवस्था झुगारण्यासाठी संघर्षाचा एल्गार हमखास पुकारला जातो. या संघर्षाच्या एल्गारातूनच विविध विवेकी हेतू साध्य करण्यासाठीच्या परिवर्तनवादी चळवळी उभ्या राहतात.

भारत देशाच्या संदर्भात या परिवर्तनवादी चळवळीचा परामर्ष घ्यायचा झाल्यास प्रत्येक विवेकवादी लढ्याचे, संघर्षाचे, आंदोलनाचे एकमेव अंतिम ध्येय हे शोषणविरहित अशा समताधिष्ठित समाजरचनेची निर्मिती आणि त्यातून साधणारे मानवी कल्याणच असल्याचे दिसून येते. कारण भारतातल्या विषमतेचा संबंध हा धर्मशास्त्रावर आधारित वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि लिंगभेदाशी जास्त होता. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ दहा टक्के लोकसंख्या असलेला उच्चवर्णीय समजला जाणारा वर्ग उर्वरित नव्वद टक्के लोकांचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक जीवन नियंत्रित करत होता; शिवाय या नियंत्रणाला शोषणाचा आधार होता. हे नियंत्रण झुगारून देण्यासाठी जसा संवेदनशील आणि तार्किक विचार करणारा पुरुष वर्ग परिवर्तनाच्या लढ्यात उतरला, त्याचप्रमाणे देशाच्या एकूण लोकसंख्येचा निम्मा भाग व्यापणारा; परंतु सर्वार्थाने शोषित आणि उपेक्षित असलेला महिला वर्ग देखील तुलनेने कमी का होईना, पण पूर्ण ताकदीनिशी या लढ्यात उतरला आणि या सर्वांचा परिपाक म्हणूनच आज आपण जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही गणराज्यात वावरत आहोत.

या सगळ्या गोष्टी खर्‍या असल्या, तरी आजच्या राजकीय आणि सामाजिक संक्रमणाच्या काळात इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे; म्हणजे पूर्वीची जुनी मूल्यव्यवस्था ज्यांना आस्थेची, सोयीची वाटत होती; पण जिची पाळेमुळे संवैधानिक मूल्यांनी खिळखिळी केली होती, तीच मूल्यव्यवस्था नव्याने रुजविण्यासाठी सत्ताधारी धर्मांध, शोषक प्रवृत्तीचे लोक प्रसारमाध्यमांची आणि समाजमाध्यमांची विखारी आयुधे घेऊन प्रयत्नशील झाली आहेत. एवढेच नव्हे, तर हिंसेचा वापर करून परिवर्तनवादी चळवळी आणि त्यांना जिवंत ठेवण्यासाठी लढणार्‍या नव्या पिढीतील समाजघटकांना संपवण्यासाठी कार्यरत झाली आहेत.

आजच्या घडीला परिवर्तनवादी चळवळींना जिवंत ठेवण्यासाठी धडपडणार्‍यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा ध्यासच जणू या लढवय्या महिलांनी घेतलेला आहे. परिवर्तनाची, संघर्षाची वाट कितीही काटेरी असली, तरी घटनात्मक तरतुदींचा हात हातात घेऊन या जिगरबाज तरुणी अतिशय हिमतीने धार्मिक झुंडशाहीचा, दांभिक राष्ट्रवादाचा आणि सत्तेचा वापर करून सामान्य माणसांच्या अस्तित्वाला नख लावणार्‍या शक्तींविरोधी लढत आहेत… यातली पहिली जिगरबाज तरुणी म्हणजे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष…

5 जानेवारीच्या 2020 च्या रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अचानक 50 गुंडांनी घुसून साबरमती होस्टेलसहित अन्य तीन होस्टेलवर हल्ला करीत विद्यार्थी व शिक्षकांना मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिला लक्ष्य बनविण्यात आले. आयेशी घोषच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती रक्तबंबाळ झाली. डाव्या विचारांचा पुरस्कार करणार्‍या आणि शासन धोरणांविरोधात भूमिका घेणार्‍यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. कारण जे.एन.यु. मध्ये झालेल्या हल्ल्याच्या 70 दिवस अगोदर शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या व वसतिगृहांच्या फी दरवाढीविरोधात एक आंदोलन सातत्याने चालू होते. त्या आंदोलनाची प्रमुख शिलेदार होती आयेशी घोष..

आयेशी घोष हिच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्ते सर्व विद्यार्थी लोकशाही व न्यायसंमत मार्गाने आपल्या मागण्या मांडत होते. इतकेच नव्हे, तर विद्यापीठ प्रशासनातील कुलगुरूंसहित इतर चार पदाधिकार्‍यांना पत्राद्वारे फी वाढीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी, संवाद साधण्यासाठी विनंती करीत होते.

विद्यापीठ प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या प्रश्नाला बगल दिली जावी की जेणेकरून हे आंदोलन चिघळून विद्यार्थी संघटना आक्रमक होतील व त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवणं सोपं जाईल. यासाठी एक ठराविक गट प्रयत्नशील होता. परंतु ही छुपी कुटिल नीती न्यायालयाच्या लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता हायकोर्टाने देखील या प्रकरणावरून जे.एन.यु. प्रशासनाला फटकारले होते. आंदोलन शमविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा विद्यार्थी मागे हटत नाहीत, म्हटल्यावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा केवळ विद्यार्थांच्यावर झालेला हल्ला नव्हता, तर जी शिक्षणकेंद्रं विचारकेंद्रं बनू पाहत आहेत, त्यांचं अस्तित्व संपविण्याचा हा घाट होता.

परंतु आयेशी घोषच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाचा रेटा इतका प्रभावी होता की, या हल्ल्याच्या निषेधाचे सूर देशातील नामवंत विद्यापीठे आणि शिक्षण केंद्रांमध्ये उमटले. यामध्ये उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणात तिरंगा मोर्चा काढला. कोलकत्यातील प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनीही निषेधाचे फलक झळकावत गुंडगिरीविरोधात घोषणा दिल्या. याशिवाय पॉडिचेरी युनिव्हर्सिटी, बंगळूर युनिव्हर्सिटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, चंडीगड विद्यापीठ, बंगळूर मधील राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटी; तसेच परदेशातील नामवंत अशा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये मूक मोर्चे काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

या निमित्ताने आयेशी घोषच्या रूपाने विद्यार्थी संघटनेला दिशा देणारा एक चेहरा मिळाला व विद्यार्थी संघटनांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

याच खडतर प्रवासातली आणखी एक निर्भीड वाटसरू म्हणजे स्वरा भास्कर… एकेकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या आणि 2009 सालापासून रुपेरी पडद्यावर अभिनेत्री म्हणून कार्यरत असलेल्या स्वरा भास्कर हिने सभोवतालच्या अराजक परिस्थितीला कंटाळून हे कुठंतरी थांबलंच पाहिजे, असा चंग बांधून तानाशाहीच्या विरोधात इंदोरच्या सभेत थेट बंडाचं हत्यार उचललं आणि N.R.C.- (National Register Citizen), N.P.R.-(National Population Register) आणि C.A.A.- (Citizen Amendment Act) च्या विरोधात सरकारवर हल्ला चढविला. हजारोंचा समुदाय समोर असताना, “भारत कुणाच्या बापाचा नाही आणि नागपूरमध्ये बसलेला कुणी चड्डीधारी आम्हाला नागरिकता देऊ शकत नाही. या देशाची नागरिकता आम्हाला जन्माने मिळाली आहे. तिच्यावर शंका घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. सत्ताधार्‍यांनी या देशात N.R.C. आणि N.P.R. लागू करण्याआगोदर स्वतःची नागरिकता सिद्ध करावी,” असं खुलं आव्हान सरकारला दिलं. या तीनही अन्यायकारक कायद्यांचा कृतिशील विरोध करणारा आवाज म्हणून आज स्वरा भास्कर ओळखली जात आहे.

धर्माच्या आधारावर देशाच्या विभाजनाला विरोध करणारी भूमिका ती मांडत आहे. सत्ताधार्‍यांचं व्होट बँकेचं राजकारण आणि हिंदुत्वाचा अजेंडा या दोन्ही गोष्टी हाणून पाडण्याचा प्रयत्न ती करत आहे. धर्मांध राजकारण्यांकडून आणि अंध भक्तांकडून तिला सोशल मीडियावर बोगस ट्विटर हँडलवरून अर्वाच्य भाषेत ट्रोल केलं जातंय. ती त्यांचा हाही प्रयत्न हाणून पडताना भाडोत्री अंधभक्त नेटकर्‍यांना ठासून सांगते, देश ट्विटर ट्रोलवर चालत नसतो. त्यासाठी सरकारला राज्यकारभाराची जाण असावी लागते. ती या सगळ्याला ‘लो ग्रेड इंटेलेक्चुअल फॅसिझम’ म्हणते. प्रसारमाध्यमांच्या प्रसिद्धिझोताच्या मुख्य प्रवाहातला चेहरा असलेली स्वरा भास्कर, चित्रपटासाठी मिळणार्‍या 100 कोटींच्या मार्केट व्हॅल्यूची तमा न बाळगता ऐन उमेदीच्या काळात जनसामान्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे, यापेक्षा मोठी संवेदनशीलता ती कोणती?

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या विवेकी पत्रकारितेला जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने धडपड करणारं आणि मक्तेदारीविरोधातला आवाज बनलेलं वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रातलं अतिशय गाजत असलेलं नाव म्हणजे ‘द वायर’ वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादिका आरफा खानम शेरवानी… आरफा खानम शेरवानी सध्या ‘आरफा का इंडिया’ नावाच्या कार्यक्रमाचे होस्टिंग करत आहे. ती स्वतःला ‘स्टोरी टेलर’ म्हणवते. सर्वसामान्यांच्या दुःखाच्या कहाण्या आणि खचलेल्यांना प्रेरणा देणार्‍या कहाण्या सांगण्याचा प्रयत्न ती आपल्या पत्रकारितेतून करते आहे. स्वतः अल्पसंख्याक समुदायातून आल्यामुळे समाजातल्या शेवटच्या घटकाच्या प्रश्नांची तिला चांगली जाण आहे. काबूलमधून तिने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांचे कव्हरेज केले होते. हे काम करणारी आरफा व तिचे सहकारी पहिले भारतीय क्रू ठरले. तिने तेहरानमधून इराणच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांचे कव्हरेज केले होते. इराणी समाज आणि तेथील महिलांवर तिने दोन माहितीपट बनविले आहेत. सच्चर समितीच्या अहवालावर समाजवादी दृष्टिकोनातून ‘बाटला हाउस’ च्या चकमकीचा समावेश करणारी ती पहिली टी.व्ही. पत्रकार होय.

नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकांचे ग्राउंड रिपोर्ट तिने तयार केले आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रत्येक रॉलीची परखड भाषेत समीक्षा केली.

तिने स्वतःच तमाम पत्रकारांना प्रश्न विचारला की…. जेव्हा राविश कुमार ’शाहीनबाग’ ला भेट देतात, तेव्हा लोक त्यांचं दिलखुलासपणे स्वागत करतात. पण इतर पत्रकार ज्यावेळेस ‘शाहीनबाग’ ला भेट देतात, तेव्हा तेच लोक GO BACK चे नारे का देतात ? आरफा खानम शेरवानीचा हा प्रश्न म्हणजे तळवेचाटू ’गोदी मीडिया’ला सणसणीत चपराक आहे. राजकीय संक्रमणाच्या काळात सहा वर्षांनतर का होईना; पण विवेकी भान जागृत होऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठविणार्‍या जनतेला आरफा अतिशय आश्वासक सुरात सांगते की… 1930 सालचा हिटलरचा जर्मनी आणि 2020 मधला नरेंद्र मोदींचा हिन्दुस्थान यात केवळ एकच फरक आहे तो म्हणजे… Germans’ did not protest..

राज्यघटनेचे आशयद्रव्य जपण्यासाठी, राष्ट्रातील नागरिकांचे स्वातंत्र्य, मूलभूत हक्क आणि मुक्तीभाव अबाधित राखण्यासाठी भयसूचक घंटेची तमा न बाळगता झुंडशाहीच्या विरोधात रणरागिणी होऊन उभ्या ठाकलेल्या आयेशी घोष, स्वरा भास्कर, आरफा खानम शेरवानी आणि यांच्यासारख्या परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असणार्‍या सर्वच ज्ञात – अज्ञात महिलांना सलाम करावासा वाटतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]