प्लेगच्या साथीमध्ये शाहू महाराजांनी केलेले कार्य आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक

डॉ. विलास पोवार - 9850928612

शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन 1900 आलेल्या प्लेगच्या साथीवर अनेक शास्रीय उपाययोजना केल्या होत्या. यामध्ये महाराजांनी अगदी दंडापासून ते जप्तीसारख्या कडक कारवाईचे आदेश काढून उपाययोजना राबवल्याचा इतिहास कोरोनाच्या निमित्ताने 120 वर्षांनी पुन्हा चर्चेत आला आहे. प्लेगसारख्या अकल्पित आणि अचानक उद्भवलेल्या आजाराने लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यात त्याकाळी समाजावर अंधश्रद्धांचा पगडा होता. साहजिकच हा आजार म्हणजे देवीचा कोप आहे असा लोकांचा समज होता.प्लेगचा संसर्ग रोखण्यासाठी या आजारासंबधी अनेक गैरसमज काढून टाकणं गरजेचं होतं आणि म्हणूनच शाहूंनी आजारावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन केले, आपले प्रशासन जलद गतीने चालवले. भीती आणि अनिश्चिततेचं सावट घेऊन आलेल्या प्लेगच्या साथीत शाहूंनी जनतेला दिलासा दिला. इतकंच नाही तर त्यांनी केलेल्या उपाययोजना कोल्हापूर संस्थानातले मृत्यू कमी करण्यात यशस्वी ठरल्या होत्या. रयतेचा राजा म्हणून ओळख मिळवलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगची साथ रोखण्यासाठी ज्या पध्दतीने प्रशासन राबवलं त्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा असा आहे.

आज कोरोनाच्या साथीने जगभर थैमान घातले आहे. प्रत्येक देशामध्ये हजारो लोक याला बळी पडत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. पण शंभर वर्षांपूर्वी जगभरात प्लेगाच्या साथीनेही थैमान घातले होते. त्यालाही असंख्य लोक बळी पडले. त्या काळात प्लेग, कॉलरा, पटकी, हिवताप हे रोग सतत या ना त्या देशात मोठ्या प्रमाणात वाढत असत. हजारो लोक त्याला बळी पडत. पण या रोगाचा प्रचार होण्यास अनुकूल अवसर मिळतो ते लोकांच्या अडाणीपणामुळे. रुढी, लोकभ्रम, दैववाद, अंधश्रध्दा यात अडकलेला माणूस बाहेरच पडू शकत नाही.

प्लेगच्या साथीची सुरुवात उंदीर मरून पडल्यामुळे होते. पण उंदिर हे गणपतीचे वाहन, त्याला कसे मारावे, म्हणून लोक घराबाहेर पडत नसत व सारे प्लेगला बळी पडत. घर निर्जंतुक करायलाही त्यांचा विरोध असे. अशी मानसिकता असणार्‍या समाजामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्लेगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना केली व साथीवर यशस्वीरित्या मात केली, याचा आढावा प्रस्तुत लेखामध्ये घेतलेला आहे…

छत्रपती शाहू महाराज 1894 मध्ये गादीवर आले व लगेचच दोन वर्षांत 1896 साली मुंबई इलाख्यात प्लेगाची लागण फार मोठ्या प्रमाणात झाली. प्लेग हळूहळू पुणे, भिवंडी, कराची, गुजरात या भागातही पसरला. कोल्हापूर संस्थानच्या आसपासही प्लेग वाढत होता. पण या साथीपासून छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थान वाचविले. मुंबईत प्लेग आल्याबरोबर शाहू महाराज सावध झाले. आपल्या संस्थानात प्लेग येऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच खबरदारी घेतली.

कोणत्याही साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लोकांची मानसिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे, म्हणून लोकप्रबोधनाचा मार्ग शाहू महाराजांनी अवलंबिला. रोगाबद्दल पूर्ण माहिती, रोग होण्याची कारणे व प्रतिबंधक उपाय याबद्दलची माहिती सर्व जनतेला मिळावी म्हणून शाहू महाराजांनी आज्ञापत्रे काढली. संस्थानातील शिक्षकांनी, ग्राम अधिकारी व इतर खात्याच्या अधिकार्‍यांनी प्लेग साथीसंबंधीची आज्ञापत्रे लोकांना सांगावयाची, समजून घ्यावयाची व धाक घालवयाचा, असा मार्ग शाहू महाराजांनी अवलंबिला. निरनिराळ्या खात्याच्या प्रचारकांनी व्याख्याने दिली. साथीचे स्वरूप व प्रतिबंधात्मक उपाय लोकांना समजावून दिले. प्लेगच्या साथीबद्दल शास्त्रशुध्द माहिती देणारी हजारो पत्रके संस्थानने विकत घेऊन लोकांमध्ये वाटली व लोकप्रबोधनाची ही मोहीम यशस्वी ठरली. या प्रबोधनाच्या कार्याबरोबरच घराघरांत असणारी अडगळ काढून टाकणे, घरात सर्वत्र हवा खेळती कशी राहील व जास्त सूर्यप्रकाश कसा येईल असे पाहणे, उंदरांची बिळे मुजविणे, उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे असा घराच्या स्वच्छतेच्या कार्यासही प्रारंभ केला.

शाहू महाराजांनी गॅझेटमध्ये वेळोवेळी जाहीरनामे काढून लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येणार नाहीत की, ज्यामुळे साथीचा फैलाव होईल, याची खबरदारी घेतली. संस्थानातील सगळ्या यात्रा बंद केल्या. त्याचप्रमाणे कोल्हापुरातून यात्रेसाठी म्हणून जाणार्‍या लोकांच्यावर बंधन घातले. उदाहरणार्थ मक्केस जाणारे यात्रेकरू, पंढरपूरला जाणारे वारकरी, सिंहस्थ पर्वणीला जाणारे यात्रेकरू, सौंदत्ती येथील यल्लम्माला जाणारे यात्रेकरू यांच्यावर प्रतिबंध घातला. त्यामुळे 1896 ला मुंबईत पसरलेला प्लेग हळूहळू 1897-98 च्या दरम्यान कोल्हापुरात पसरू लागला. हे पाहून कोल्हापुरात प्रवेश करणार्‍या मुख्य रस्त्यावर क्वारंटाईनची केंद्रे स्थापन केली. शिरोळ पेठा येथील रेल्वे स्टेशन, मौजे किणी पेठा आळते या ठिकाणी प्रथम क्वारंटाईन सेंटर्स उभी केली व हळूहळू सर्व संस्थानभर वाढविली. दररोज रेल्वेने जे उतारू कोल्हापूर शहरात येत असत, त्यांची वैद्यकीय तपासणी होत असे. वैद्यकीय तपासणीशिवाय उतारूंना नगरप्रवेश बंद केला. रेल्वे स्टेशनजवळच तपासणीसाठी एक मोठे केंद्र उघडले. तपासणी चुकवणार्‍या फसव्या व चुकार लोकांची नावे सांगणार्‍यास पाच ते पंधरा रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचा प्रघात सुरू केला. त्यामुळे अनेक चुकार व फसवे लोक सापडले व इतरांना चांगला धडा मिळाला.

इतके उपाय करूनसुध्दा गडहिंग्लज, शिरोळ पेठ्यातील 18 गावे प्लेगाने पछाडली. घरातील रोगी हॉस्पिटलमध्ये घालविल्यानंतर घरातील लोकांना तेथून हलवून घर निर्जंतुक करण्यात येई, म्हणून शाहू महाराजांनी अनेक ठिकाणी प्लेग प्रतिबंधक हॉस्पिटल्स सुरू केली. लोकांच्या व अधिकार्‍यांच्या सहकार्याशिवाय प्लेगग्रस्त रोगी घरातून बाहेर काढणे अशक्य होई. पण शाहू महाराजांना असे दिसून आले की, गावातील लोक व दरबारचे अधिकारी सुध्दा दरबारचे हुकूम पाळण्यास चालढकल करीत आणि म्हणून साथ आटोक्यात येण्याऐवजी फैलावत चालली, म्हणून महाराजांनी आदेश काढला की, ‘प्लेगासंबंधात काढलेले हुकूम काटेकोरपणे पाळले नाहीत व त्यांची अंमलबजावणी केली नाही, तर कोणतीही सबब न ऐकता ग्राम अधिकार्‍याची वतने काढून घेतली जातील.’ ही राजाज्ञा होती. पण ‘आमची वतने परंपरागत आहेत,’ असे म्हणून काहींनी दरबारचा हुकूम दुर्लक्षित केला. हे महाराजांना कळताच तीन अधिकार्‍यांची वतने जप्त केली व त्यानंतर हुकुमाची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागली. प्लेगचे रोगी दवाखान्यात पाठविले जाऊ लागले. घरे निर्जंतुक करण्यात येऊ लागली व घरातील लोकांना अन्यत्र हलविण्यात येऊ लागले.

प्लेगाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या गावांतील लोकांना गावच्या बाहेर किंवा मळ्यात वस्ती करण्यास भाग पाडले. गावाच्या बाहेर माळरानावर झोपड्या बांधून झोपडीत राहावे, असा आदेश दिला. अनेक गरीब लोकांना झोपड्या बांधण्याचे साहित्य दरबारने मोफत पुरविले. थोड्याशा ऐपतदार लोकांना अल्प मोबदल्यात दिले. शिरोळ व गडहिंग्लज पेठ्यातील जी 18 गावे प्लेगग्रस्त झाली होती, तेथील सर्व लोकांनी रानामळ्यात झोपड्या बांधून गावाबाहेर वस्ती केली. नवीन वस्त्या व गावातील मोकळी घरे यावर पहारा ठेवण्यासाठी व चोर्‍या-मार्‍या या प्रकारांना आळा बसण्यासाठी पुरेसे पहारेकरी नेमले.

कोल्हापूर शहरातही हळूहळू प्लेग वाढू लागला. छत्रपतींच्या निवासस्थानी जुना राजवाडा व नवा राजवाडा येथेही प्लेगाचे उंदिर पडले. अशावेळी शाहू महाराज पन्हाळ्यास राहू लागले. त्यापूर्वी महाराजांनी कोटीतीर्थ येथे मोठे प्लेगनिवास केंद्र उभे केले होते व त्यातील रोग्यांची ते दररोज पाहणी करत. शहरातील लोकांना माळरानावर वस्ती करण्यास पाठविले. महाराज प्लेगमधून लोकांचा बचाव करण्यासाठी खूपच प्रयत्न करत होते. सन 1899 ला प्लेगने कहर उडविला असताना कोल्हापूरमधील शिवाजी क्लबच्या काही तरुणांनी बंद घरामध्ये घरफोडी केली. दरोडखोरांचा कसून तपास करण्यात आला. तेव्हा दामू जोशी, रामा कुलकर्णी, वामन आपटे, मुनी करंदीकर, अनंत भागवत, दत्तू प्रसादे, दामू सोनार यांच्यावर घरफोडीचा खटला भरण्यात आला. (कृ. गो. सूर्यवंशी – राजर्षी शाहूराजा व माणूस पृ. 129). शाहू महाराज पन्हाळा येथे राहत असले तरी अधूनमधून कोल्हापुरात येत, हॉस्पिटलची पाहणी करत. प्लेग छावणीसाठी आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका, आया व इतर कर्मचारी वर्ग इत्यादींची नियुक्ती स्वत: शाहू महाराजांनी केली.

प्लेगकाळात कोल्हापूर संस्थानच्या बाहेर इतरत्र व्यापार्‍यांनी धान्याचे भाव वाढविले. पण महाराजांनी मात्र कोल्हापूर संस्थानात व्यापार्‍यांवर चोख निर्बंध घालून धान्याचे भाव स्थिर राखले, भाववाढ होऊ दिली नाही. कोल्हापूर संस्थान त्या वेळी प्लेग आणि दुष्काळ या दोन अस्मानी संकटांनी ग्रासलेले होते. शेतकर्‍यांची स्थिती अत्यंत वाईट बनली होती. प्लेग काळात महाराजांनी शेतकर्‍यांना ‘तगाई’ मंजूर करून शेतीची मशागत करण्यास उत्तेजन दिले. गोरगरीब जनतेसाठी कोल्हापूर संस्थानात स्वस्त धान्य दुकाने उघडली. प्लेगामुळे एखाद्या घरातील कर्ता पुरुष बळी पडळा असेल, तर त्याच्या निराधार विधवेस व लहान मुलांसाठी सरकारातून पोटगी मिळण्याची तरतूद केली (निवडक आदेश पान क्रमांक 34). अनाथालय उघडून अपंग, आंधळे-पांगळे, अनाथ यांची सोय केली. प्लेग व दुष्काळी स्थितीमुळे अनेक लोक बेकार झाले होते. अशा बेकार व गरीब लोकांसाठी मोफत अन्नाची सोय महाराजांनी केली की, जे आज महाराष्ट्र शासन ‘शिवभोजन’ थाळीच्या स्वरुपात करत आहे.

मुंबई इलाख्यात दुष्काळाने, प्लेगाने अनेक भूकबळी घेतले. मुंबई इलाख्यात तर प्लेगाने मृत्यूचीच राजवट सुरू केली होती. करवीर संस्थानात मात्र प्लेगाला अटकाव करण्यात आला. प्लेगबळी नाममात्र पडले. प्लेग साथीच्या काळात प्रत्येक आठवड्यात रोज किती लोक प्लेगाने ग्रासले किंवा बरे झाले, याचा अहवाल करवीर गॅझेटमध्ये प्रसिध्द झाल्याचा दिसतो. त्याचप्रमाणे अनेक लोक जेव्हा गावाबाहेर किंवा शहराबाहेर राहावयास गेले, त्यांनी त्यांचे दागदागिने किंवा इतर मौल्यावान चीजवस्तू कोल्हापूरच्या जमादार खात्यात किंवा स्थानिक अधिकार्‍याकडे सुरक्षित ठेवून पावती घ्यावी, असे आदेश काढल्याचे दिसून येतात.

भास्करराव जाधव यांना 4 सप्टेंबर 1899 पासून प्लेग आयुक्त म्हणून नेमण्यात आले व 1 जानेवारी 1900 पासून त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीचा राज्य कारभारात योग्य उपयोग करण्यास महाराज कधीच चुकत नसत. दुष्काळ व प्लेगच्या काळात अधिकार्‍यांना निर्णय त्वरित देता यावेत, म्हणून त्यांनी पन्हाळा येथील राजवाडा, कोल्हापूरचा राजवाडा; तसेच ब्रिटिश राजप्रतिनिधीचे कार्यालय दूरध्वनीने जोडले होते. त्यामुळे प्लेगच्या बाबतीतील अडीअडचणी व गार्‍हाण्यांचा झटपट निर्णय करून घेण्याची सोय झाली.

समाजातील रुढी, खोट्या समजुती यामुळे कोणी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यायला तयार नसे. महाराजांनी आदेश काढले. प्लेगची लागण होऊ नये प्रतिबंधात्मक उपाय, लस टोचून घेणारास सूट (प्लेग ठराव क्रमांक 334)

दिवान प्ले. . 83/ 19/9/07प्लेगच्या प्रतिबंधात लस टोचून घेणे आवश्यक आहे. सबब, लस घेणारे नोकरास चार दिवस नोकरी माफ करावी व नवीन नेमले जाणारे इसमास लस घेतल्याशिवाय नोकरीवर घेऊ नये व कैदी लोकास, जे लस टोचून घेतील त्यास शिक्षेची माफी देणेची, ती एक वर्ष अगर त्याहून जास्त मुदतीचे असतील त्यास दोन महिन्यांची माफी घ्यावीत. एक वर्षाहून कमी मुदतीच्यास एक वर्षास दोन महिने याप्रमाणे माफी देण्यात यावी.

सही/-

शाहू छत्रपती

राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश

भाग 1ला पृ. – 45

लस टोचून घेण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी होते. लस टोचून घेण्याकडे लोकांचा कल नव्हता. महाराजांनी लोकांना लस टोचून घ्यायला नियुक्त केले. संस्थानाच्या लस नोकरांना टोचून घेण्यासाठी तीन दिवसांची खास रजा देण्यात आली. श्रमाचे काम करणार्‍या कामगारांना प्रत्येकी आठ आण्यांचे बक्षीस देण्यात आले, जे संस्थानचे नोकर नव्हते, त्यांना टोचून घेण्याबद्दल प्रत्येकी चार आण्यांचे बक्षीस देण्यात आले. इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी घरातल्या सर्व नोकरांसकट महाराजांनी स्वत:ला टोचून घेतले.

शाहू महाराजांनी 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानचा कारभार पाहावयास सुरुवात केली. त्या काळी सामाजिक व राजकीय परिस्थिती अनुकूल नव्हती आणि आर्थिक परिस्थिती तर फारच प्रतिकूल होती. कारभारात महाराजांनी लक्ष घालावयास सुरुवात केली होती. तोच दुष्काळ, प्लेग यांची चाहूल लागली. अवघ्या बावीस वर्षांच्या वयात त्यांनी ज्या पध्दतीने दुष्काळासह प्लेगच्या साथीसोबत झुंज दिली, ती पाहिली म्हणजे खरोखर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

‘त्या’ भयंकर प्लेगच्या दिवसांत महाराजांनी स्वस्त धान्याची दुकाने उघडली, अनाथालये सुध्दा उघडली. लोकांमध्ये निर्माण झालेली बेकारी निवारण्यासाठी जेथे पाण्याचा पुरवठा होता, तेथे सरकारी कामे सुरू करून बेकारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना ‘तगाई’ मंजूर केली. खेड्यापाड्यात स्वच्छता राखली. पिण्याचे पाणी दूषित होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली. लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी सरकारी खर्चाने फुकट औषधोपचार केले. त्या काळात यात्रा स्थगित केल्या. प्लेगची बातमी देणार्‍यांना बक्षिसे देण्यात आली. प्लेगपीडित लोकांच्या निरीक्षणासाठी छावण्या काढण्यात आल्या. दुर्बल आणि गरीब जनतेला अन्न मोफत पुरवण्यात आले. आपल्या प्रजाजनांना प्लेगच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी महाराजांनी जे अविरत प्रयत्न केले, त्याबद्दल ब्रिटिश अधिकार्‍यांनीही महाराजांचे अभिनंदन केलेले दिसते.

125 वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली, त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज नुकतेच राज्यावर आले होते. त्या काळी आजच्या हजारपट लोक अंधश्रधाळू होते. 95 टकक्यांच्या वरती निरक्षरता होती. अशा काळात शाहू महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने प्लेग या साथीवर मात केली. आजच्याप्रमाणे टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, विझवा, गायीचे शेण खा, मूत प्या, यज्ञ करा किंवा ‘गो कोरोना’ ओरडत प्रदर्शन करा, असे उपाय योजलेले दिसत नाहीत. त्यांनी बाहेरून येणार्‍यांना तीन दिवस क्वारंटाईन केले, घरे आणि वाडे सोडून जनतेला माळावर राहण्याची सोय केली. दुर्बलांना झोपड्यांसाठी अनुदान दिले. परिस्थितीचा गैरफायदा घेणार्‍या व्यापार्‍यांवर वचक ठेवून भाव वाढू दिले नाहीत. या काळात रोज मजुरीवर जगणार्‍यांसाठी काम उपलब्ध करून दिले. या सर्व बाबी कोल्हापुरात ‘वेदोक्त प्रकरण’ होण्यापूर्वीच्या आहेत; म्हणजेच शाहू महाराज ‘वेदोक्त प्रकरणा’मुळे सत्यशोधक बनले, असे नाही. त्यापूर्वीपासूनच या विचारांचे होते, म्हणूनच 125 वर्षांनंतरही शाहू महाराजांचे विचार आणि आचार जनतेला प्रेरणा देत आहेत, अनुकरणीय आहेत. आजच्या राजकर्त्यांनी त्याची दखल घेण्याची गरज आहे.

संदर्भ ग्रंथ..

1) राजर्षी शाहू गौरव ग्रंथ : संपादक पी. बी. साळुंखे 2) राजर्षी शाहू राजा व माणूस : कृ. गो सूर्यवंशी 3) शाहू महाराजांचे निवडक आदेश भाग 1 4) राजर्षी शाहू महाराज : धनंजय किर 5) करवीर गॅझेट. 6) छत्रपती शाहू महाराज याचे चरित्र : आ.बा. लठ्ठे 7) शाहू पेपर्स खंड – 2 डॉ. विलास संगवी, डॉ. बी. डी. खणे

(लेखक शाहू चरित्राचे जेष्ठ अभ्यासक आहेत)

लेखक संपर्क 9850928612

धर्मनिरपेक्षता शिकावी शाहू राजांच्या कडून.

प्लेगच्या साथीत त्यांनी काढलेले जाहीरनामे पाहा

गॅझेटमधील जाहीरनामे व त्यांचे क्रमांक

मक्केस जाणार्‍या यात्रेकरूस चालू साली मुंबई इलाख्यातील कोणत्याही बंदरास जाण्याच्या प्रतिबंधाबद्दल – नंबर 39

पंढरपूर येथील यात्रा बंद करण्याबद्दल जाहीरनामा – 152

मौजे शिराळे, पेठा शिराळे, ता. वाळवे, जि. सातारा या गावी श्री नाथ देवाची यात्रा बंद केल्याबद्दल – नं.81

श्री क्षेत्र उज्जयनी येथील सिंहस्थानिमित्त भरणार्‍या यात्रेची मनाई करण्याबद्दल – नं.85

अजमेर येथील दर्ग्याच्या यात्रेस न जाण्याबद्दल हुकूमनामा -नं. 27

तोरगल प्रांतातील गोडची यात्र बंद केलेबद्दल – नं. 28

सौंदत्ती येथील यल्लम्माची यात्रा बंद केलेबद्दल – 29

बेळगावपैकी मुरगूड येथील यात्रा बंद केलेबद्दल – 32

चिंचली येथील यात्रा बंद केलेबद्दल – 32

हरिद्वारास जाणे धोक्याचे होईल याविषयी इशारा – 31

अजमेर येथील उरुसास गेल्यास क्वारंटाईनचा त्रास सोसावा लागेल याबद्दल – 31

जोतिबाची यात्रा बंद केल्याबद्दल – 39

अहमदनगर येथील अश्वासंबंधीचे शेतकी प्रदर्शनात कोल्हापूरच्या शेतकर्‍यांनी जाण्यास बंदी करण्याबद्दल – 23

(प्लेगाच्या साथीत शाहू छत्रपतींनी काढलेला जाहीरनामा)

भाग 1 : जाहीरनामा

जनरल खाते, तारीख 2जानेवारी, सन 1900

नंबर 48-1 हिंदुस्थानात इतर ठिकाणी प्लेगमुळे जी प्राणहानी झाली आहे, त्या मानाने पाहिल्यास कोल्हापूर शहरात प्लेगचा उद्भव होऊन जरी आज जवळजवळ साडेतीन महिने होत आले, तरी मृत्यूचे प्रमाण बरेच कमी आहे, असे म्हणावयास हरकत नाही. याचे एक मुख्य कारण असे दिसते की, इतर ठिकाणच्या अनुभवांवरून प्लेग प्रतिबंध व शमनाचा सुलभ व बराच खात्रीचा उपाय – जो स्थानत्याग – त्याचा अवलंब आमच्या बहुतेक करवीरनगरवासी लोकांनी वेळीच केला, हा होय. हल्ली शहरात फार थोडी वस्ती राहिलेली असून प्लेगचे मानही अगदी कमी आहे. त्यामुळे अशा संधीस हे अवशिष्ट राहिलेले लोक जर स्थानत्याग करून बाहेर जातील, तर त्यामुळे या रोगाचा विशेष प्रसार होण्याची भीती राहणार नाही. एवढेच नव्हे, तर जे लोक बराच खर्च करून व त्रास सोसून आज बरेच दिवस बाहेर जाऊन राहिलेले आहेत, त्यांचे जाण्याचेही खरे सार्थक होईल आणि प्लेग निर्मूलन नाहीसा होण्यास विशेष अवधी लागणार नाही. गांव खुला झाल्यानंतर डिसइन्फेक्शनचे वगैरे सर्व काम पूर्ण होऊन पाऊस लागण्यापूर्वी सर्व लोकांना आपापले घरी येऊन सुखाने राहता येईल, असे श्रीमंत महाराज छत्रपती साहेब, सरकार करवीर यांचे ध्यानी आल्यावरून, शहर खुले करण्यासंबंधाने हुजूरची आज्ञा झाल्याअन्वये हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

2) हा जाहीरनामा प्रसिध्द झाल्या तारखेपासून आठ दिवसांचे आत शहरात वस्ती करून राहणार्‍या लोकांनी शहराबाहेर आपली राहण्याची सोय करून तेथे राहण्यास गेले पाहिजे.

3) शहरात दुकाने उघडी राहून व्यवहार सुरू ठेवू दिल्यास लोकांचा पुन:संबंध, प्रथम जागा ठरविली असल्याने लोकांस जिन्नस-पानस मिळण्याची सोय झालेली आहे. ती सध्या आहे तशीच राहण्याची आहे.

4) लोकांनी आपले घराचे वगैरे संरक्षणासाठी जे रखवालदार ठेविले असतील अगर ज्यांना पुढे ठेवावयाचे असतील, त्यांनी आमचेकडून त्यांची नावे दाखल करून पास न्यावेत. अशा पासावाचून सदर मुदतीनंतर कोणासही गावात वस्तीस राहू दिले जाणार नाही. सर्व शहर खुले झाल्यानंतर लोकांच्या मालमत्तेचे वगैरे संरक्षण चांगले प्रकारे व्हावे म्हणून सरकारातून जादा पोलीस नेमणेत आले आहेत.

5) अत्यंत गरिबीमुळे त्यांस झोपड्या बांधण्याची शक्ती नसेल त्यांना कामावर अगर एस्क्ट्रा अ. प्लेग कमिश्नर यांजकडील दाखल्याने झोपड्या बांधण्याबद्दल सामान हेडक्वार्टन ओव्हरसियार यांजकडून मोफत देवविणेची तजवीज करण्यांत आली आहे.

6) ज्या मजूरदार लोकांस उदरनिर्वाहासाठी रोज मजुरीच केली पाहिजे. त्यांच्याकरिता राहण्यास कळंबे तलावावर सरकारातून झोपड्या बांधण्यात येत आहेत. तेथे राहून तलावाच्या रिलीफ कामगिरीवर त्यांना मजुरी मिळेल, अशी तजवीज करण्यात आली आहे.

7) होता होईल तितके लवकर पुन:शहरात येऊन राहण्यास लोकांना परवानगी देणेची असल्याने शहर सर्व खुले होताच डिसइनफेक्शनचे कामास सुरुवात केली जाईल.

8) ज्या कोणास या नियमासंबंधाने अगर डिसइनफेक्शन संबंधाने माहिती घेण्याची असेल, त्यांनी आमच्या ऑफिसात येऊन माहिती मागितल्यास त्यासाठी देण्यास येईल.

-आर. व्ही. सबनीस दिवाण व प्लेग कमिशनर, कोल्हापूर

(राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स खंड 2 यामधून साभार)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]