मोहन भोईर -
“अरे भोईर, माझ्या मित्र परिवारातील एक व्यक्ती गंभीर आजारी आहे. मी तिच्या सोबतच दवाखान्यात आहे सध्या. आठवडाभरानंतर आपण जिल्हाभरात संघटना बांधण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी दोन-तीन दिवसीय दौरा करूया. तू तुझ्या रजेचे नियोजन कर.” २३ डिसेंबरला संध्याकाळी, ‘नीलेश घरत सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे अॅडमिट. जवळच्यांनी तेथे यावे,’ असा मित्राकडून आलेला मेसेज वाचल्यानंतर १९ डिसेंबरला माणगाव येथे एन. एस. एस. शिबिरात नियोजित कार्यक्रमासाठी जाण्यासाठी संपर्क केल्यावर नीलेश घरत यांच्याशी झालेले शेवटचे बोलणे आठवले. स्वतःजवळ अनेक कौशल्ये असूनही संघटना बांधणीसारख्या नॉन रिवॉर्डिंग म्हणजे कोणालाही न दिसणार्या कामात कार्यरत असणारे अंनिसचे रायगड जिल्ह्यातील ज्येेष्ठ कार्यकर्ते नीलेश घरत यांचे अलिबागजवळ एका कार अपघातात निधन झाले. संघटनेच्या स्थापनेपासून ते रायगड जिल्ह्यात क्रियाशील कार्यकर्तेम्हणून परिचित होते. राज्य कार्यवाह, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव अशा विविध पदांवर त्यांनी प्रभावीपणे कार्य केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या आपल्या मुखपत्रासाठी जाहिरातदार, देणगीदार व वर्गणीदार मिळवणे आणि संघटना बांधणी हे त्यांच्या आवडीचे काम. आपली चळवळ पुढे जावी, यासाठी नव्या कार्यकर्त्यांना मंच देऊन प्रोत्साहन देणे, हे आपले खरे काम आहे, असे ते मानत.
नीलेश घरत यांचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यापलीकडे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे नीलेश आणि त्यांची पत्नी शुभांगी घरत यांचे अलिबागमधील घर म्हणजे अलिबाग शाखेचे व जिल्हा अंनिस शाखेचे कार्यालय व सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हा मुख्यालयातील हक्काचे ठिकाण. ‘माणूस’ याशिवाय आपली इतर कोणतीही ओळख असू नये, अशी अपेक्षा ते सतत बोलून दाखवत. याच भावनेने त्यांच्या मित्र परिवारातील आजारी व्यक्तींना प्रत्यक्ष मदत करताना झालेल्या जागरणामुळे त्यांचे अपघाती निधन होणे, हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी तितकेच संघटनेसाठीही खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शुभांगी, मुलगी निधी, वडील व भाऊ असा परिवार आहे त्यांच्या दुःखात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी आहे. स्मृतिशेष नीलेश घरत यांना भावपूर्ण आदरांजली!
– मोहन भोईर, पेण