ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
वर्णाश्रम ही एक पुरातन वैशिष्ट्यपूर्ण समाजरचना आहे. वर्णाश्रमाबद्दल अनेक समज समज-गैरसमज, वादविवाद आजही होत असतात. संतांची याबाबत काय भूमिका आहे? माझे मित्र कमलाकर देसले यांनी याविषयी एक सुंदर लेख लिहिला होता. या लेखात ते म्हणतात –
प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गुणांचा आहे. प्रत्येकाची आवडनिवड, कर्म भिन्न आहे. एकाच गुणवत्तेच्या माणसांनी समाज बनत नाही. भिन्न गुणवत्ता योग्य आणि मानवीय पद्धतीने कामाला लावून संतुलित समाजव्यवस्था आकाराला येते. कॉम्प्युटरच्या भाषेत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन शब्द आहेत. सॉफ्टवेअरमध्ये ज्ञान आहे, तर हार्डवेअरमध्ये कर्मशीलता हे मिळून कॉम्प्युटरची व्यवस्था तयार झाली. व्यवस्थेसाठी आपल्याला सॉफ्टवेअर-हार्डवेअर हा भेद स्वीकारावाच लागतो. पैकी सॉफ्टवेअर श्रेष्ठ की हार्डवेअर असा श्रेष्ठ-कनिष्ठ वाद निर्माण करावा का? वर्णव्यवस्थेत ज्ञान सांगणारा श्रेष्ठ, सेवा करणारा कनिष्ठ असा सोयीचा अर्थ घेतला जातो. त्यातून शोषण सुरू होते. मी कृष्णाला विचारले, “तुलाही वर्णव्यवस्थेत भेद आणि शोषण अभिप्रेत आहे का? कारण इथल्या व्यवस्थेत तसाच अर्थ घेतला जातो.” कृष्ण म्हणाला, “चारी वर्णांपैकी कुणीच श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्व समान आहेत. आपापल्या गुण आणि स्वभावाप्रमाणे आचरण करून प्रत्येकजण मुक्त होऊ शकतो. ज्ञान, शक्ती, व्यापार, सेवा- ज्याचा जो स्वभाव त्याने तेच करावे. त्यातच दु:खमुक्तीचे रहस्य लपले आहे.”
आतापर्यंत आपण भूमितीच्या उभ्या रेषेवर वर्णव्यवस्था बसवित आलो. जो वर तो श्रेष्ठ. खालचे कनिष्ठ. किंवा आडव्या रेषेवर मांडत आलो वर्णव्यवस्था. जो पुढे तो श्रेष्ठ आणि मागे तो कनिष्ठ. वर, खाली, मागे आणि पुढे हे शब्दच भेदाचा आलेख मांडतात. मग कसे सिद्ध व्हावे की सर्व वर्ण समान आहेत? सर्वांचे कार्यात्मक आणि भावात्मक मूल्य एकच आहे?
खूप चिंतन केल्यावर काहीतरी लिक झाल्यासारखे वाटले. कृष्णाचे म्हणणे पटले. कुठलाच वर्ण एक-दुसर्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व वर्ण समान आहेत. कनिष्ठ कुणीच नाही. आपणच आपल्यालाच टाळी द्यावी असं समाधान माझं माझ्यापुरतं मला मिळालं. मी कागदावर एक वर्तुळ काढलं. घड्याळातल्या बारा, तीन, सहा आणि नऊच्या जागांवर खुणा केल्या. आणि त्यावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे शब्द लिहिले; आणि लक्षात आले या चारींपैकी मला कुणालाच मागे, पुढे, खाली, वर किंवा श्रेष्ठ, कनिष्ठ ठरविता येत नव्हते. वर्तुळावरच्या वर्णाश्रमात खरी समानता दिसली. बनेल बुद्धिवंतांनी वर्णाश्रम उभ्या-आडव्या रेषेवर आणला. भेद आणि शोषणाला खतपाणी मिळालं. जिज्ञासा म्हणून ज्ञानेश्वरी उघडली. चवथ्या अध्यायातला ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टम’ या श्लोकावरच्या ज्ञानोबारायांच्या ओवीने माझ्या विचाराला माउलीचा आधार मिळाला. माउली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चौघांच्या समान पात्रतेविषयी लिहितात
‘एथ एकचि हे धनुष्यपाणी ।
परी जाहले गा चहुं वर्णी ।
ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥’
अर्थ- अर्जुना, हे सर्व लोक एकच असून, गुण व कर्म यांच्या योगाने चार वर्णांची व्यवस्था सहज झाली. देसले यांनी म्हटल्याप्रमाणे संत अशी मांडणी करतात की वर्णाश्रम धर्म ही समाजव्यवस्था, समाजाची विभागणी प्रत्यक्ष भगवंताने केली आहे. ही विभागणी प्रत्येक व्यक्तीच्या गुण आणि कर्मानुसार केलेली असल्याने ती नैसर्गिक आहे. समाज व्यवस्थेसाठी अशी विभागणी आवश्यक आहे. वर्णाश्रमाच्या नावाखाली समाजाची उच्च-नीच अशी विभागणी करणे संतांना बिलकूल मान्य नाही.
संत तुकाराम महाराज म्हणतात –
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग ।
वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥
अवघी एकाचीच वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥
खरे तर हे सर्व जग विष्णुमय आहे आणि वर्ण आणि धर्म हे वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे. अहो, हे सर्व एका देवापासूनच निर्माण झाले आहे मग तेथे भिन्नतेचा प्रश्नच कोठे? हा निर्णय वेदपुरुष नारायण यानेच केला आहे.
तुकाराम महाराजांचा आणखी एक प्रसिद्ध अभंग असा –
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥
हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे. हे भक्तजनहो, तुम्ही भगवंताचे नाम व गुण यांचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वरभती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे.
परमेश्वराने गुणकर्म विभागानुसार वर्णाश्रम धर्माची स्थापना केली आहे. परमेश्वराला व संतांना देखील वर्णाश्रमाच्या आधारे केली गेलेली उच्च-नीचता मान्य नसली तरी समाजात मात्र वस्तुस्थिती वेगळीच दिसते. व्यक्तीचा वर्ण त्याच्या गुणकर्मानुसार न ठरता तो त्याच्या जन्मावरून ठरविला गेला. व्यक्ती कोणत्या वर्णाच्या आई-बापांच्या पोटी जन्माला आलेली आहे, यावरून त्याचा वर्ण ठरविला गेला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांचे समाजातील स्थान एकसारखे नाही. क्रमाने ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ तर शूद्र सर्वांत कनिष्ठ मानण्यात येत. सर्वच वर्णांतील स्त्रिया कनिष्ठ मानण्यात येत. याखालीही वर्णव्यवस्थेच्या बाहेरचा एक अतिशूद्रांचा वर्ग मानण्यात येतो. वर्ण जन्मानुसार ठरविण्यात येत असल्यामुळे काही व्यक्ती जन्मतः उच्च वर्णाच्या तर काही व्यक्ती जन्मतः नीच वर्णाच्या मानल्या गेल्या. शूद्रातिशूद्रांना घृणास्पद पद्धतीने अस्पृश्य मानण्यात आले. हे शोषण फार भयंकर होते.
माझा जन्म कोणत्या आईबापांच्या पोटी होणार हे माझ्या हातामध्ये नाही. अर्थात, मी कोणत्या वर्ण जन्माला येणार हे माझ्या हातात नाही. ज्ञानेश्वरादी भावंडांचा जन्म संन्याशाच्या पोटी झाला. त्यांच्या आई-वडिलांना अति शूद्र म्हणून अस्पृश्य ठरविण्यात आले होते. ज्ञानेश्वर माउली व त्यांच्या भावंडांना जन्मल्यापासूनच अस्पृश्यतेच्या वेदना प्रत्यक्ष सहन कराव्या लागल्या. संत चोखोबा अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्णात जन्माला आले, यात त्यांची काय चूक? चोखोबांबरोबरच त्यांची पत्नी, मुलगा, बहीण, भावोजी यांच्याही वाट्याला हे दुःख आले. कान्होपात्रा व जनाबाई यांच्या वाट्यालाही हे दुःख आले. अशी अनेक संतांची उदाहरणे आहेत.
कोणतेही दुःख आपल्या वाट्याला का येते? यावर सनातन धर्माचे उत्तर आहे की कोणतेही दुःख हे आपल्या पापकर्माचाच परिणाम आहे.
मी या जन्मात कोणतेही पाप केलेले नसताना माझ्या वाट्याला अस्पृश्याचे दुःखदायक जिणे का आले असा प्रश्न विचारला असता सनातन धर्म उत्तर देतो की, तुमच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे तुम्हाला हे दुःख प्राप्त झाले. हे उत्तर आपल्या समाजाने स्वीकारले.
संत चोखोबा देखील म्हणतात –
कृष्णनिंदा घडली होती ।म्हणोनि महार जन्मप्राप्ती ॥
चोखा म्हणे विटाळ ।आम्हां पूर्वीचें हें फळ ॥
पूर्वजन्मात माझ्याकडून श्रीकृष्णाची निंदा घडली होती. प्रत्यक्ष भगवंताची निंदा हे पाप माझ्याकडून घडल्यामुळे मला अस्पृश्याच्या घरी जन्म प्राप्त झाला. हे माझ्या पूर्वजन्माच्या पापकर्माचेच फळ आहे, असे चोखोबा मनोमन मानतात. ते त्या काळातील समाजातील दबलेल्या, पिचलेल्या मनोवृत्तीचे प्रातिनिधिक उदाहरण मानायला हरकत नाही. समाजाच्या सर्वांत खालच्या थरात जगत असलेल्या, अस्पृश्य मानल्या गेलेल्या दीनदुबळ्यांना संतांनी कोणता आधार दिला आणि सनातन धर्माने सांगितलेल्या या दुष्ट कार्यकारण भावातून बाहेर पडण्याचा संतांनी कोणता मार्ग शोधून काढला हे आपण पुढील लेखात पाहू.
ह.भ.प. देवदत्त परूळेकर
लेखक संपर्क : ९४२२०५५२२१