वंदना माने -
तीन मांत्रिकांसह चौघांना अटक
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येचा तब्बल साडेतीन वर्षांनी उलगडा झाला आहे. गुप्तधनप्राप्ती व घराची भरभराट होण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून आजी व पित्याने युवतीचा नरबळी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन मांत्रिकांसह चौघांना अटक करण्यात आली असून, आणखी एकाचा शोध पोलिस घेत आहेत. विशेष म्हणजे गळा चिरताना स्वत: मुलीच्या आजीने युवतीचे पाय धरल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे.
गळा चिरणारा मांत्रिक फुलसिंग सेवू राठोड, मांत्रिक व चालक विकास ऊर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नर्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. मुळे तांडा, ता. दक्षिण सोलापूर) व मुलीची आजी (आईची आई) रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण) व स्थानिक देवऋषिण कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहे. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या पित्याला आधीच अटक करण्यात आली होती; परंतु तेव्हा सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्याला जामीन मंजूर झालेला आहे.
करपेवाडीच्या शिवारात 22 जानेवारी 2019 रोजी भाग्यश्री संतोष माने (वय 17) या मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता. भाग्यश्री ही तळमावले येथील महाविद्यालयात शिकत होती. त्या दिवशी सकाळी ‘कॉलेजमधून परीक्षेचे रिसिट आणायला जाते,’ असे सांगून ती घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार विविध पातळ्यांवर पोलिसांनी तपास केला. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. संशयाची सुई भाग्यश्रीच्या कुटुंबीयांभोवती फिरत असल्याने त्या वेळी तिच्या वडिलांना अटकही केली गेली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटकाही झाली.
दरम्यान, गुन्ह्यावर नेमकेपणाने प्रकाश पडावा, यासाठी पोलिसांनी वडिलांची ‘ब्रेनमॅपिंग’ चाचणीही केली होती. त्यामध्ये काही मुद्दे पोलिसांच्या हाताला लागले होते. त्यामुळे गेली तीन वर्षे पोलिसांनी या गुन्हाचा माग सोडला नव्हता. नंतरच्या काळात पोलिस ठाण्यात रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी या आव्हानात्मक प्रकरणाचा पुन्हा कसून तपास सुरू ठेवला होता. त्यातून गुन्ह्याच्या वेळी विक्रम व कमल हे परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाताला लागली. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चौकशीत मोठी भूमिका बजावली. त्यामुळे संशयितांनी गुप्तधनाच्या आमिषाने मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलीच्या आजीसोबत उसाच्या शेतात गुुंगीचे औषध देऊन गळा चिरून भाग्यश्रीचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. मुलीचे वडील जामिनावर असले, तरी तेही या गुन्ह्यात संशयित राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोर्हाडे, पाटणचे उपाधीक्षक विवेक लावंड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार साबीर मुल्ला, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संकेत निकम, दीपाली यादव, शकुंतला सणस, यशोमती काकडे, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर यांनी ही कारवाई केली. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाचा असणारा हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अधीक्षक बन्सल यांनी पथकातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
फौजदार संतोष पवार यांचे प्रयत्न फळाला
गुन्ह्याला तीन वर्षे होऊन गेली आहेत. तपासामध्ये अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी प्रयत्न करूनही काही महत्त्वाचे धागेदोरे मिळत नव्हते. पुरेसे पुरावे नसल्यामुळे अटक केलेल्या वडिलांनाही जामीन मिळाला होता. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाबाबत एक प्रकारची निराशा आली होती; परंतु सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी नेमणूक स्वीकारल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासात पुन्हा लक्ष घातले. त्यांचे अथक प्रयत्न व वरिष्ठ अधिकार्यांच्या साथीमुळेच पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणार्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड टाकण्यात पोलिस दलाला यश आले आहे.
…असा झाला उलगडा
म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या संपर्कात भाग्यश्रीच्या गुन्ह्यातील संशयितांचा गुन्ह्याच्या कालावधीत अनेकदा संपर्क आला होता. त्याची तांत्रिक माहिती मिळाल्यानेच पोलिसांना खर्या गुन्हेगारांपर्यंत पोचणे शक्य झाले. तत्पूर्वी या संशयितांना ताब्यात घेऊनही पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी झाले होते.
अंनिसकडून निषेध
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा जिल्ह्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच पोलीसांचे अभिनंदन करण्यात आले.
– वंदना माने, सातारा