बालदिनानिमित्त आयोजित आई-बाबांची शाळा

सचिन - 8424041159

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दहिसर शाखेतर्फे बालदिनानिमित्त आई-बाबांची शाळा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचा बालदिन फक्त मुलांसोबतच साजरा न करता त्यांच्या पालकांना सुद्धा यामध्ये सामावून घेण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम होता. आई-बाबा मुलांना नेहमीच शाळेत पाठवतात व तिथल्या शिस्तीत राहायला सांगतात. मग या एका दिवशी आई-बाबांना सुद्धा शाळेत जावं लागणार, हीसुद्धा मुलांसाठी एक गंमत होती. तशीच आई-बाबांसाठी सुद्धा ही एक छान संधी होती.

या शाळेचे उद्घाटन एकदम अभिनव पद्धतीने करण्यात आले. संवादशाळेसाठी आलेल्या सहभागींमधून एका आई-बाबा व मूल यांच्या हस्ते मुलांच्या अधिकाराची छत्री उघडून उद्घाटन झाले. मग सुरुवातीलाच ‘मूल समजून घेताना’ या विषयावर निशा फडतरे यांनी मांडणी केली, ज्यामध्ये मुलं व प्रौढ यांमध्ये असणार्‍या साम्य व फरक यावर बोललं गेलं व मुलांना समजून घेताना काय काळजी घ्यायला हवी, हे सांगितलं गेलं. पुढे मुलांकडून पालकांच्या असणार्‍या अपेक्षा, पालकांची स्वप्नं पूर्ण करण्याचे ओझे आणि यातून मुलांवर येणारा ताण, पालकांकडून व शिक्षकांकडून वेगवेगळ्या कारणांनी होणार्‍या शिक्षेचा मुलांच्या मनावर होणारा आघात याविषयी चर्चात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली. त्यापुढे मुलांचे अधिकार, बाल लैंगिक शोषण, त्यापासून वाचण्याचे उपाय, पालकांनी घ्यावयाची दक्षता व कायद्यातील तरतुदी आणि चाईल्डलाईन संस्थेचे यातील काम व मदत या सर्व मुद्द्यांवर चर्चा, सहभागींचे स्वानुभव, गाणी, व्हिडिओ, पोस्टर्स, खेळ व अ‍ॅक्टिव्हिटी या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. निशा फडतरे व सचिन थिटे यांनी यामध्ये संवादक म्हणून मार्गदर्शन केले. दहिसर शाखेचे वर्षा, मनोज, यश, प्रशांत, सीमा, तृप्ती, कृष्णा, भूमी, शीतल, रुपेश या कार्यकर्त्यांनी सर्व नियोजनात मेहनत घेतली. तृप्ती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व प्रशांत राड्ये यांनी सर्वांचे आभार मानले. याचवेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ’ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या दहिसर शाखेचे उद्घाटन वर्षा गव्हाणे व प्रशांत राड्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र अंनिस, दहिसर शाखा, मुंबई