‘मॅग्नेट मॅन’: सत्य काय?

प्रा. प. रा. आर्डे -

काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिक येथे एका व्यक्तीमध्ये चुंबकीय गुणधर्म आलेत, अशी बातमी सोशल मीडिया, न्यूज मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकली. हा गुणधर्म शरीरात येण्यापूर्वी काही दिवस संबंधित व्यक्तीने कोविड लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यामुळेच आपल्यात चुंबकत्व आले आणि शरीरावर वेगवेगळ्या वस्तू तोलून धरण्याची ताकद आली, असा दावा संबंधित व्यक्तीने आणि मीडियानेही सर्वत्र पसरविला. काहींनी तर हा दैवी चमत्कार आहे, अशा वार्ता पसरविल्या. नाशिकच्या घटनेनंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवनवे ‘मॅग्नेट मॅन’ अवतरल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

‘मॅग्नेट मॅन’च्या सुरस कथा जगभर अनेक देशांत घडल्या आहेत. जगात याबाबत कोणत्याही प्रकारचे कुतूहल आढळत नाही. ‘मॅग्नेट मॅन’च्या तथाकथित घटना कोविडची लस येण्यापूर्वीही घडल्या आहेत. ही सर्व माहिती समजून न घेता नाशिकच्या ‘मॅग्नेट मॅन’ची प्रसिद्धी करणार्‍या समाजमाध्यमांना काय म्हणावे? आपल्या देशात सत्यशोधनापेक्षाही तथाकथित गूढ घटनांचा गाजावाजा करून त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली जाते, याचा अर्थ आपला समाज अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर आहे, हेच खरे.

1) ‘मॅग्नेट मॅन’मध्ये खरेच चुंबकीय गुणधर्म सिद्ध झालेत का?

2) हे गुणधर्म कोविड लसीमुळे आलेत का?

3) ‘मॅग्नेट मॅन’मध्ये चुंबकीय गुणधर्म नसतील, तर मग त्याच्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटतात कशा?

हे प्रश्न आपण विचारायला हवेत.

जगभर गाजलेले मॅग्नेट मॅन

विविध देशांत स्वत: चुंबकीय मॅन असलेले अनेकजण अवतरलेले आहेत आणि विस्मृतीतपण गेले आहेत. कारण त्यांच्यामधील चुंबकत्वाचा फोलपणा जागतिक चिकित्सकांनी उघड केला. भारतात अरुण रायकर हा मध्य प्रदेशातील गृहस्थ आपल्या शरीरावर दहा किलो वजनाचे धातू त्याच्यातील चुंबकीय गुणामुळे तोलून धरतो, असा दावा करीत होता. त्याचबरोबर रुमानियामधील ऑरेल, जॉर्जियामधील एटिबार, क्रोशियामधील आयव्हन नावाचा मुलगा, सर्बियातील डॉलीबॉर अशा विविध तथाकथित ‘मॅग्नेट मॅन’चा बोलबाला झाला होता. जॉन ग्रीनवूड याने तर त्याच्यामधील चुंबकत्वाच्या सामर्थ्याने स्टॉप वॉचेस थांबविण्याचाही दावा केला होता. सगळ्यात प्रख्यात ‘मॅग्नेट मॅन’ म्हणजे मलेशियातील ल्यू थो लिन. हा गृहस्थ अंगभर अनेक किलो वजनांच्या धातूच्या वस्तू शरीरावर तोलून धरत असे. एवढेच नव्हे, तर पोटाजवळ लोखंडी पट्टी प्रेस करून तिला साखळी बांधून तो कारही ओढून दाखवीत असे.

जगभराच्या विचारवंतांनी केलेली चिकित्सा

अमेरिकेतील प्रबोधन चळवळीचे मुखपत्र ‘स्केप्टिकल इन्क्वायरर’चे संपादक बेंजामिन रॅडफोर्ड हे अग्रगण्य चिकित्सक. त्यांनी सर्बियातील बॉग्डन नावाच्या सात वर्षांच्या ‘मॅग्नेट बॉय’ची तपासणी केली. या मुलाच्या चमत्काराचे मीडियात भरभरून कौतुक झाले. तो वेगवेगळ्या धातूंच्या वस्तू शरीरभर तोलून धरी. एवढेच नव्हे, तर रिमोट कंट्रोल, सपाट प्लेटा आणि सपाट तव्यासारख्या वस्तू आपल्या छातीवर तोलून धरत होता. लोकांना तर हा चमत्कार वाटत होताच; शिवाय या मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्यात चुंबकीय शक्ती आली आहे, असा दावा केला. मग काय (एस.एन.बी.सी.) या दूरचित्रवाहिनीच्या रिपोर्टरने त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली. बेंजामिन रॅडफोर्ड यांनी या मुलाची चिकित्सा केली. ज्यात धातू नाही असा रिमोट कंट्रोल; तसेच काचेच्या वस्तू या मुलाच्या छातीवर चिकटल्या. याचबरोबर गुळगुळीत लाकूडही त्याच्या छातीला चिकटले. कोणताही चुंबक लोखंडासारखे धातू सोडल्यास काच किंवा लाकूड यांसारख्या वस्तूंना आकर्षित करत नाही. मग बॉग्डनच्या छातीवर रिमोट किंवा काच कशी चिकटली? याचा अर्थ असा की, बॉग्डनच्या शरीरात चुंबकीय शक्ती नाही.

‘मॅग्नेट मॅन’ची चाचणी घेण्याचा आणखी एक अफलातून प्रयोग रॅडफोर्डने केला. चुंबकीय शक्तीचा दावा करणार्‍या व्यक्तीच्या छातीवर चुंबकसूची (कंपास निडल) धरायची. अशी सूची नेहमी उत्तर-दक्षिण दिशेला स्थिर राहते; पण चुंबकाजवळ ती नेल्यास गर्रकन वळते व नव्या दिशेला स्थिर राहते. चुंबकीय शक्तीचा दावा करणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत चुंबकसूची वळलीच नाही. निष्कर्ष असा की, अशा व्यक्तींमध्ये चुंबकीय शक्ती नाही. बेंजामिन रॅडफोर्ड यांनी बॉग्डन या मुलाप्रमाणेच आपण ‘मॅग्नेट मॅन’ असल्याचा दावा करणार्‍या इतर तथाकथित मंडळींच्या या चुंबकीय गुणांची अशा व इतर प्रयोगांनी चिकित्सा केली. त्या सर्व व्यक्ती फ्रॉड असल्याचे त्यांना आढळून आले.

अंगावर वस्तू चिकटण्याचे खरे कारण

चुंबकीय शक्तीमुळे जर वस्तू अंगावर चिकटत नसतील, तर मग याचे खरे कारण काय? अंगावर वस्तू तर चिकटलेल्या दिसतातच. याच्या कारणाचा अमेरिका आणि मलेशियातील विद्यापीठातील वैज्ञानिकांनी यशस्वीरित्या शोध घेतला आहे. ‘मॅग्नेट मॅन’सारख्या व्यक्तीच्या शरीराचा गुळगुळीतपणा तिच्या अंगावर केस नसणे; तसेच तिची त्वचा रबरासारखी लवचिक असणे, अशा कारणांचे निरीक्षण केले आहे. अशा व्यक्तींना चटकन घाम येतो, असेही त्यांचे निरीक्षण आहे. घामट त्वचा आणि त्वचेवर दाबलेले चमच्यासारखे गुळगुळीत पदार्थ एकमेकांना चिकटून बसतात, याचे कारण आहे चमच्यासारख्या वस्तू आणि गुळगुळीत त्वचा यांना चिकटवून ठेवणारे घर्षण. हे घर्षण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लागू होते. हे घर्षण कसे निर्माण होते?

कोणतेही दोन त्याच प्रकारचे रेणु अगदी जवळ असल्यास त्यांच्यामध्ये जे बल तयार होते, त्यास ‘समाकर्षण बल’ असे म्हणतात. पेल्यात ठेवलेल्या पाण्याचे रेणु किंवा कोणत्याही द्रवाचे रेणु अशा रीतीने बंधित राहतात. उलट दोन भिन्न प्रकारच्या रेणुंमधील आकर्षण म्हणजे ‘विषमाकर्षण बल.’ घामामध्ये असलेला ‘सिबम’ नावाचा रेणु व चमच्यासारख्या वस्तूच्या पृष्ठभागावरील रेणु यांच्यातील विषमाकर्षणामुळे चमचा त्वचेला चिकटून बसतो. जणू काही ‘सिबम’चे रेणु चमच्याच्या पृष्ठभागावरील रेणुंना घट्ट धरून ठेवतात. एखादी जड वस्तू जमिनीवरून ओढताना सुरुवातीला ओढली जात नाही. कारण विरुद्ध दिशेने घर्षण बल तयार होते. ती जागीच खिळून राहते. त्याचप्रमाणे चमच्यासारखा पदार्थ आणि ‘सिबम’ रेणु यांच्यातील घर्षण गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात त्या वस्तूला तोलून धरते. किती वजन तोलून धरले जाईल, हे त्वचेचा गुळगुळीतपणा, चिकटपणा आणि चिकटवल्या गेलेल्या वस्तूचा गुळगुळीतपणा यावर अवलंबून असते. मलेशियातील ल्यू थो लिन याला अशी वस्तू धरून ठेवणारी त्वचा अनुवंशिकरित्या लाभली होती. त्यामुळेच तो कित्येक किलो वजनांच्या वस्तू शरीरावर तोलत असे. निष्कर्ष असा की, घामेजलेल्या शरीराचा चिकटपणा व त्यामुळे निर्माण होणारे घर्षण हे ‘मॅग्नेट मॅन’ने वस्तू तोलून धरण्याचे कारण होय. नाशिकचा तथाकथित ‘मॅग्नेट मॅन’ हा ‘मॅग्नेट मॅन’आहे की नाही, याबाबतची वरील ज्ञानाच्या प्रकाशात चाचणी घेता येईल. काचेच्या वस्तू, रिमोट कंट्रोल किंवा चुंबकसूचीच्या सहाय्याने त्याचे चुंबकत्व तपासता येईल. घामातील ‘सिबम’चे रेणु आणि चिकटणार्‍या वस्तूच्या पृष्ठभागावरील रेणु यांच्यात तयार होणारे घर्षण बल हेच वस्तू शरीराला चिकटण्याचे कारण आहे हे प्रख्यात जादूगार, विवेकवादी जेम्स रँडी याने एका सोप्या पण अफलातून प्रयोगाने सिद्ध केले. आपण ‘मॅग्नेट मॅन’ असल्याचा दावा करणार्‍या व्यक्तीच्या शरीराला रँडी यांनी टाल्कम पावडर चोळली; परिणामी घामाचे रेणु आणि तोलून धरण्याच्या वस्तूचे रेणु यांच्यातील घर्षण शून्य आले; परिणामी वस्तू शरीराला चिकटू शकली नाही.

कोविड लस आणि चुंबकत्व

आता राहिला प्रश्न कोविड लस आणि चुंबकत्व यांच्यामधील संबंधाचा. नाशिक येथील ‘मॅग्नेट मॅन’च्या समर्थकांनी कोविड लसीमुळे त्याच्यात चुंबकत्व आले, असा दावा केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक डॉ. संग्राम पाटील यांच्या चिकित्सेनुसार कोविड लसीमुळे चुंबकीय गुणधर्म असलेला कोणताही पदार्थ नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे शरीर चुंबकीय बनणे शक्य नाही. निष्कर्ष असा की, नाशिक येथील ‘मॅग्नेट मॅन’चे चुंबकत्व हे छद्मविज्ञान होय. त्याची खात्री वर सांगितल्याप्रमाणे आपणास करता येईल. आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते आपल्या शरीरावर वस्तू तोलून धरण्याचा प्रयोग करू शकतील. त्यांच्यामध्ये कोविड लस टोचून न घेतलेले कार्यकर्ते जरूर असावेत. खरं तर डोकं चालविण्याची आणि ‘मॅग्नेट मॅन’च्या संदर्भात माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे चिकित्सा करण्याची तसदी खोट्या गोष्टी पसरवणार्‍या माध्यमांनी घेतली असती, तर हा छद्मविज्ञानाचा प्रकार वेळीच रोखता आला असता. कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रात्यक्षिके दाखवून तथाकथित ‘मॅग्नेट मॅन’चे बिंग उघड करावे, अशी अपेक्षा.

मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर ‘मॅग्नेट मॅन’संदर्भात विविध प्रकारचे दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्याचाही समाचार घ्यायला हवा.

काही कार्यकर्त्यांनी नाशिकच्या ‘मॅग्नेट मॅन’चे हात आणि छाती सातत्याने स्वच्छ करून व स्वच्छ पुसून वस्तू तोलून धरण्याचा प्रयोग करण्याचे आव्हान ‘मॅग्नेट मॅन’ला दिले. आश्चर्य म्हणजे त्याने वस्तू तोलून दाखविल्या. कार्यकर्त्यांना याचे कारण न कळाल्यामुळे ते परत फिरले. अंग पुसून आणि स्वच्छ करून वस्तू कशा चिकटतात, याचे कारण जगभरातील चिकित्सकांना सापडले आहे. त्याचा उल्लेख इंटरनेटवरील ‘मॅग्नेट मॅन’च्या संदर्भातील साईटवर उपलब्ध आहे. मानवी शरीराचा गुणधर्म असा की, घाम पुसला तरी घामाचे नवीन रेणु एका मिनिटात पुसलेल्या जागी तयार होतात. ही माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चाचणीला जाण्यापूर्वी समजून घेतली असती, तर त्यांना अपयश पदरी पडण्याचे काहीच कारण नव्हते.

स्टेनलेस स्टीलचे चमचे शरीराला चिकटत असतील, तर तो मॅग्नेट मॅन असल्याचे सिद्ध होईल, असे समजणे चूक आहे. स्टेनलेस स्टीलचे घटक, असे स्टील कोणत्या पद्धतीने तयार करतात या व इतर कारणांनी ते चुंबकीय गुणधर्म दाखविल की नाही हे ठरते. स्टेनलेस स्टीलची प्रत्येक वस्तू चुंबकाकडे आकर्षित होईलच असे नाही. त्यामुळे स्टेनलेस स्टीलचे चमचे तथाकथित मॅग्नेट मॅनच्या अंगाला चिकटतात, हा संबंधित व्यक्ती मॅग्नेट मॅन असल्याचा पुरावा ठरू शकत नाही. कोबाल्ट, निकेल आणि लोखंड या धातूंना फेरोमॅग्नेटिक धातू म्हणतात. ते चुंबकाकडे आकर्षित होतात. सोने, तांबे, अ‍ॅल्युमिनियम इत्यादी धातू नॉनमॅग्नेटिक आहेत. कोणताही धातू आपल्या शरीराला चिकटत असेल, तर तो घामातील रेणू आणि त्या वस्तूच्या पृष्ठभागावरील रेणू यांच्यामधील आकर्षणामुळे होय. मॅग्नेट मॅनच्या कसोटीसाठी स्टेनलेस स्टीलच्या चमच्याचा वापर विश्वसनीय नाही.

कोविड लसीमुळे शरीरामध्ये काय घडते, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे तथाकथित संशोधन सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. डॉ. जेन रूबी या औषध संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, कोविड लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती तयार होत आहे. कोविड लसीतील किंवा लसीने निर्माण केलेले घटक अतिसूक्ष्म कणांद्वारे (नॅनो पार्टीकल) शरीरात चुंबकीय प्रभाव निर्माण करतात, असा त्यांचा दावा आहे. हे शरीराला घातक असल्यामुळे लस घेऊ नका, असा दावा जेन रूबी करतात. तात्त्विक गृहितक अगडबंब, किचकट भाषेत मांडून कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही. गृहितक सिद्ध होण्यासाठी खात्रीशीर पुरावा लागतो. एखादे मानवी शरीर चुंबकीय आहे का? याबाबतच्या वैज्ञानिक कसोट्या जगभरचे वैज्ञानिक वापरतात. या कसोट्या कोविड लसीमुळे मानवी शरीरात चुंबक शक्ती येते या गृहितकाबाबत लावायला हव्यात. त्याच कसोट्या जेन रूबीच्या कसोट्यांना लावायला हव्यात. चुंबकसूचीची कसोटी किंवा अन्य सिद्ध झालेल्या कसोट्या हेच सांगतात की, लसीकरण झालेली व्यक्ती चुंबकीय गुणधर्म दाखवत नाही. त्यामुळे सूज्ञ नागरिकांनी लसीकरणाबाबत चुकीचे समज किंवा भ्रम बाळगू नयेत.

कोविडचा विषाणू हा जगभराचा चिंतेचा विषय आहे. या विषाणूला रोखण्यासाठी जवळपास वर्षभर जगातील अनेक प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालले होते. कोविड विषाणूला रोखणारी लस निर्माण करून तिचे प्रथम माणसांवर प्रयोग करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतरच ही लस बाजारात आली आहे. त्यामुळे अशा विविध लसींबद्दल अफवा किंवा चुकीचे समज, यावर विश्वास न ठेवता कोविड विषाणूला रोखण्यासाठी सामान्य माणसाने विधायक भूमिका घ्यायला हवी. कोविड लसीमुळे आपण चुंबकीय मॅन बनू ही भीती सोडून द्यायला हवी. लसीमुळे आपल्यात चुंबकत्व येते, असा प्रचार आणि प्रसार करणार्‍यांचे अंत:स्त हेतू शोधायला हवेत. त्यासाठी सुजाण नागरिकांनी अफवांचा पर्दाफाश करायला हवा.

प्रा. . रा. आर्डे

(छद्म विज्ञानाचे अभ्यासक)

संपर्क : 9822679546


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]