राहुल थोरात -
कोकण किनारपट्टीवरील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ‘अंनिस’ने काम करावे
– लक्ष्मीकांत खोबरेकर
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व्यवसाय सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त लोकांनी अंधश्रद्धेचा सहारा घेतला आहे. येथील लोकांमधील अंधश्रद्धेचा पगडा कमी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न करावेत, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे सेक्रेटरी इंजि. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटक म्हणून बोलत होते. सेवागंण (मालवण) येथे दोन दिवस सुरू असणार्या अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीस राज्यातील २३ जिल्ह्यांतील २०० प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यकारिणीची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करून झाली.
यावेळी बोलताना अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे म्हणाले की, मालवण येथे १७ वर्षे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्य कार्यकारिणी बैठक घेतली होती. डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर ही चळवळ कार्यकर्त्यांनी जोमाने सुरू ठेवली. कार्यकर्त्यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू आहे. सामूहिक नेतृत्व या संकल्पनेला गेल्या दोन वर्षांत यश येत आहे. गौतम बुद्धांनी हा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग त्यांच्या भिक्खू संघात केला होता.
अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल थोरात प्रास्ताविकात म्हणाले की, या कार्यकारिणीमध्ये होणारे सर्व निर्णय हे सामुदायिक सहमतीने होतील. सर्वांना येथे आपली मते मांडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. सर्व सहमतीने आपण जे निर्णय घेऊ, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी काटेकोर प्रयत्न करूयात.
अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य फारुख गवंडी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर ‘आम्ही सारे दाभोलकर!’ म्हणत कार्यकर्तेजोमाने काम करत आहेत. या घोषणेची पुढची पायरी म्हणजे अंनिसमध्ये सध्या सुरू असलेली सामूहिक नेतृत्वाची कल्पना होय. गेल्या ३० वर्षांत आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपली सत्यशोधक भावकी निर्माण केली आहे.
अण्णा कडलास्कर यांनी आभार मांडले. विचार मंचावर अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते.
समाजातील विवेकी विचार नष्ट करणार्या संघटित शक्तींचा प्रतिकार करा!
– साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर
मनुष्यामध्ये अंधश्रद्धा ही जन्मजात नसून ती त्या व्यक्तीवर समाजामार्फत लादली गेलेली असते आणि म्हणूनच ती आपण दूर करू शकतो. सध्या विवेकाचं साम्राज्य नष्ट व्हावं, असे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून देशात हेतूपुरस्सरपणे केले जात आहेत. विवेकी विचार नष्ट करण्याचे संघटित प्रयत्न जोमात सुरू आहेत. हे कार्यकर्त्यांनी समजून घेऊन त्या शक्तीचा प्रतिकार केला पाहिजे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. मालवण येथील नाथ पै सेवांगणच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आधारस्तंभ व शतकवीर कार्यकर्ता’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
प्रा. प्रवीण बांदेकर म्हणाले, “समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम निर्माण करून विचार करण्याच्या शक्तीला संघटितपणे खीळ घातली जात आहे. त्यामुळे समाज संभ्रमीत झालेला आहे. त्यामुळे बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रतिगाम्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले वैचारिक अडथळे आधी दूर करावे लागणार आहेत. वर्तणुकीतील विसंगतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांवर आहे.”
सध्या देश एका कठीण कालखंडातून जात आहे. देशातील सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. याला पांढरपेशी लोकांची उदासीनता, थंड राहणं कारणीभूत असल्याची परखड टीकाही प्रा. बांदेकर यांनी केली.
धर्मांधता व अंधश्रद्धेला पूरक असे वातावरण शिक्षण संस्थांमध्ये अतिशय जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. विज्ञानावरती बोलत असतानाच एकाच वेळी परस्परविरोधी धार्मिक कृतींचा सर्रास वापर केला जातो आहे, ही चिंतेची बाब आहे. यामध्ये अनेकदा आपणही कळत-नकळतपणे हातभार लावतो. हे जाणीवपूर्वक टाळायला हवे. सामाजिक, विवेकवादी चळवळीतील कार्यकर्तेम्हणून ती आपली नैतिक जबाबदारी ठरते. वर्तणुकीतल्या अशा विरोधाभासी वातावरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. अंनिस कार्यकर्तेलोकांमध्ये थेट संवाद साधत असतात. लोकांचा या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असे मत शेवटी प्रा. बांदेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ अशा शब्दात सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे, यावर आपले सविस्तर मत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी याच परिस्थितीचा आवाका जाणून घेत, समजून घेत काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्तेम्हणून त्यांनी त्यांचे अनेक अनुभव उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडले. सध्याचे धर्मांध वातावरण पाहता, धर्माची कृतिशील चिकित्सा करताना परिस्थितीचे भान ठेवून त्या धर्माला समजून घेतच प्रबोधन केलं पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधक धर्मामध्ये घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे समाज प्रबोधन करताना, रुढी-परंपरांवर आघात करताना वारकरी परंपरेचा आधार घेऊन समाजात बदल घडवून आणावे लागतील.
राजीव देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता दाभोलकर यांनी पुरस्कारामागची भूमिका मांडली.
राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. अनिल चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाइटने एक लाख वाचक संख्या पार केलेल्या फलकाचे अनावरण प्रा. प्रवीण बांदेकर, दीपक गिरमे यांच्या हस्ते करून झाली.