मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण - 9764147483

गुंड्याभाऊंच्या आग्रहाने आम्ही सत्संगाला येण्याचे मान्य केले. सत्संगाची वेळ चारची होती. पण माझ्या सवयीप्रमाणे मी चार वाजता तयारीला सुरुवात केली. त्यामुळे जायला पावणे पाच वाजले. “तुमच्यामुळेच लेट झाला, नाहीतर मी किती लवकर आटोपून बसले होते” मैनेने वेळ होण्याचे खापर माझ्यावर फोडले, हे नेहमीचेच होते. वीरा आणि आदी मात्र वेळेपूर्वी आवरून बसले होते. “या गुरुजी बसा!” एकनाथ पोवारनी स्वागत केले. “आता आपण चहा घेऊनच सुरुवात करूया, आताच एकेकजण यायला लागलेत.” खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी प्रस्ताव ठेवला. त्यांच्या कपाळावर ओढलेला तांबड्या रंगाचा नाम नाकापासून सुरू होऊन कपाळ ओलांडून केसात घुसला होता.

चहा बिस्किटांचा कार्यक्रम उरकला आणि सत्संगाला पाच वाजता सुरुवात झाली. स्त्री-पुरुष आणि मुले मिळून पंचवीस जण वर्तुळाकार बसले. दाराजवळच्या भिंतीला लागून एका खुर्चीवर गुरुदेवांची तसबीर होती, त्याच्या शेजारी दुसर्‍या खुर्चीवर ते विराजमान झाले होते.

सुरुवातीला गुरुची महती गाणारी भजने झाली. एकजण पुढे सांगत त्यांच्या मागे इतर किंचाळ्या आवाजात साथ देत. गुरु आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, देव आहे, मार्गदर्शक आहे, उद्धारक आहे, वाटाड्या आहे, त्यांना शरण जात आहोत, त्यांनी हाताला धरून रस्ता दाखवावा अशा अर्थाचीही गीते होती. मग एकेकजण आपले अनुभव सांगू लागले.

“माझे नाव छबूताई! मी गेल्या महिन्यापासून सत्संगाला येते आहे. मला खूप चांगला अनुभव आला आहे. पूर्वी माझे मिस्टर नऊ वाजल्याशिवाय घरी येत नसत. आता ते सात वाजताच घरी येतात. माझ्यावर गुरुंची कृपा झाली आहे.”

अशा तर्‍हेने मुलगा अभ्यास करू लागला, डायबेटीसची गोळी बंद झाली, मुलीला स्थळ आले, मुलाला इंटरव्ह्यूचा कॉल आला, अशा गुरुकृपांचे अनुभव मांडले गेले. सासूबाई भांडल्या, मुलगा ऐकत नाही, मुलीचे लग्न जमेना इत्यादी अनुभव म्हणजे गुरू आपली परीक्षा घेताहेत, याचीही उदाहरणे ऐकायला मिळाली. “वहिनी तुम्हीही बोला” – गुंड्याभाऊने मैनेला आग्रह केला. पुढचा नंबर होता मैनेचाच. “मला मेलीला काय कळतंय? पण माझ्यावर सत्संगाला यायच्या आधीपासूनच गुरूकृपा आहे हो! तसे हे नेहमीच वेळेवर घरी येतात. माझ्या सासूबाई देवमाणूस. त्या माझ्याशी कधीच भांडत नाहीत. माझी मुले नियमित अभ्यास करतात. नाही म्हणायला आज सकाळीच गुरूंनी माझी परीक्षा घेतली, आमचा घरचा गॅस संपला, तेव्हा मी शेगडीवर जेवण केले, भाकरी करपली; पण हे काही बोलले नाहीत.” आयुष्यातल्या सगळ्या घटना गुरूकृपा आणि गुरूपरीक्षा, यामध्ये कशा बसवायच्या हे मैना एका सत्संगातच शिकली. गुरूकृपेची चर्चा एवढ्यावरच थांबली. त्यांनी व्याख्यान कम प्रवचनाला सुरुवात केली.

‘गुर्रू ब्रह्मा, गुर्रू विष्णू, गुर्रू देवो महेश्वरा, गुर्रू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरूवेनम:’ असे म्हणत त्यांनी हात जोडले. “आपल्या संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू, महेश एवढेच काय परब्रह्मसुद्धा गुरूचेच रूप मानले आहे. त्यांना आपण वंदन करूया.” म्हणत त्यांनी सर्वांना हात जोडण्याची विनंती केली.

गुरूवर आपली निष्ठा हवी. विश्वास हवा, श्रद्धा हवी. हे पटवून देताना त्यांनी गुरूनिष्ठेच्या कथा सांगितल्या. शिष्याला दारात बसवून गुरू वेश्येच्या घरात गेले असतील, तर गुरू काही वाईट कर्म करायला गेले आहेत, असे शिष्याने मनात आणता कामा नये, ते वेश्येचा उद्धार करायला गेले आहेत, असे समजले पाहिजे. सर्वांनी माना डोलावल्या. जय जय गुरूदेव जयघोष झाला.

तो शांत होतोय, तोच आवाज आला – “पण अशा गुरूला चांगलाच धडा शिकवला पाहिजे.” – आदी बोलला. “शिष्याला बरोबर घेऊन वेश्येकडे जातो म्हणजे काय? अशांच्याकडून आदर्श तरी काय घ्यायचा?”

“थांबा थांबा! गुरूंच्या बद्दल असे विचार मनात येणे पाप आहे. गुरूंच्या पायी आपली पूर्ण निष्ठा हवी. श्रद्धा असेल, तरच गुरू मार्ग दाखवतात.” गुंड्याभाऊंनी चर्चा थांबवायचा प्रयत्न केला. भरकटणारी चर्चा मूळ मुद्द्यावर आणली.

“मला मेलीला काय कळतंय? पण वेश्येकडे जाणार्‍या गृहस्थाला गुरू समजणारा शिष्य म्हणजे मूर्ख शिरोमणीच असेल.” – मैना शिष्यावर घसरली.

“हो ना! गुरू निवडतानाही चांगलाच निवडला पाहिजे. कुठल्याही लफंग्याला गुरू म्हटल्यावर शिष्य आपटीच खाणार.” शेजारच्या काकू नेहमीच मैनेच्या ‘हो’ला हो म्हणतात.

“आपण भौतिक सुखाच्या पलिकडे विचारच करत नाही आहोत. वहिनी ऐका! हे अध्यात्म आहे. भौतिक सुखे सोडल्याशिवाय मुक्ती नाही. स्वर्ग प्राप्ती नाही. पुण्यच मिळणार नाही. भौतिक सुखांच्या मागं लागलात, तर असेच होणार! गुरूंनी सर्वसंग परित्याग केलेला असतो. त्यांना याचे काही वाटत नाही. ‘तुम्ही अध्यात्माचा विचार करा!’ या जन्मात पुण्य कमवाल तर पुढच्या जन्मी बसून खाल. तुम्ही सर्वस्व गुरूंना अर्पण करा. तन, मन आणि धन अर्पण करा.”- तांबडा नाम

“तन अर्पण करायचे म्हणजे काय हो महाराज?” आदीचा प्रश्न.

“तन अर्पण करायचे म्हणजे सेवा करायची. आपल्या अंकाचा, पुस्तकाचा प्रचार करायचा. विक्री करायची. वर्गणीदार वाढवायचे!”

“मी तर गेल्या आठवड्यात सात वर्गणीदार नोंदवलेत हो” – गुंड्याभाऊ बोलला. आपले पुण्य नोंदवायचे राहील, अशी त्याला भीती असावी.

“मी गेल्या महिन्यात एकोणीस साबणवड्या विकल्यात.”

“मी दिडशे रुपयांचे अगरबत्तीचे पुडे विकलेत.”

प्रत्येकजण आपण केलेल्या सेवेची आठवण करू लागला. तांबडा नामवाला आपले पुण्य नोंदवून घेणार असावा, असाच त्यांचा समज झाला होता.

“पण तुम्ही तर अध्यात्माबद्दल बोलत होता ना? या सर्व तर भौतिक गोष्टी आहेत.” – वीराची शंका.

“रोजच्या धकाधकीच्या जीवनातच आपल्याला आनंद शोधायचा आहे, पुण्य मिळवायचे आहे. त्यालाच अध्यात्म म्हणतात.”

आणखी एका साधकाने ‘अध्यात्माची’ व्यावहारिक व्याख्या सांगितली.

“शाब्बास! आपल्या संस्थेचे साबण, अगरबत्त्या, वृत्तपत्र, लॉकेट, गुरूंचे फोटो, ग्रंथ विक्री करून तुम्हाला पुण्य मिळवता यावे, यासाठीच गुरूदेवांची धडपड सुरू असते.”

“हो! आम्ही पुण्य मिळवतो, तुम्ही नफा मिळवा” मी गुंड्याभाऊंच्या कानात पुटपुटलो.

“तुम्ही तन अर्पण करा, मन अर्पण करा. म्हणजे सतत नामस्मरण करा; गुरूसेवा कशी करावी, याचे सतत चिंतन करा. तुम्ही कोणतेही काम करत असला, तरी सतत गुरूंचाच विचार मनात हवा. हे झाले मन अर्पण. आणि धन अर्पण म्हणजे देणगी, दक्षिणा! गुरूदक्षिणा! पुढच्या महिन्यात गुरूपौर्णिमा आहे, या काळात एक रुपया अर्पण केला, तरी त्याचे पुण्य एक हजार पट मिळते.”

“हो! मग हे आपल्याला तपासता येईल की!” वीरा उत्साहाने बोलली, “या महिन्यात एक रुपया द्यायचा! त्याचे पुण्य मोजायचे.”

“पण पुण्य मिळालेच हे तपासणार कसे?” – आदिला शंका आली.

“आपल्याकडे नोटा दुप्पट करणारे लोक असतात; पण पुण्यही असे दुप्पट नव्हे, तर हजार पट करणारे लोक असतात, हे माहितच नव्हते.” वीरा म्हणाली.

“मला मेलीला काय कळतंय! पण नोटा दुप्पट करणार्‍यांना पकडून तुरुंगात घालतात ना?” मैनेचा प्रश्न!

“हो तर आई! पण तसा पुण्य दुप्पट करणार्‍यांसाठी काही कायदा आहे का?” आदीने विचारले.

“दुप्पट नव्हे, हजारपट म्हण.” – वीराने दुरुस्ती केली.

पुण्य तपासले कसे? या विचाराने तिला अस्वस्थ केले होते. ती तांबडा नामवाल्याकडे पाहून म्हणाली – “काका! पुण्य तपासता येईल का हो? म्हणजे एकपट की हजार पट ते कळेल ना?” आदीने अजून एक प्रयोग वाढवला.

पलिकडे बसलेल्या त्याच्या मित्रानेही री ओढली. “गुरूतत्त्व आणि पुण्य तपासायला आपण प्रयोग करू! मी यू-ट्युबवर सर्व करतो.” यू-ट्युबशी त्याची चांगली ओळख झाली होती.

पण तांबडा नामवाले हार मानणार्‍यातले नव्हते. “अध्यात्मातल्या गोष्टी भौतिक साधनांनी नाही तपासता येत बाळांनो! त्यासाठी आध्यात्मिक दृष्टी हवी. आध्यात्मिक साधन हवे.”

“पण ते आणणार कोठून?” वीराची शंका.

“ते साधन मिळते साधनेने! गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करा. त्यांना तन-मन-धन अर्पण करा. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. त्यांना उलट प्रश्न विचारू नका! शंका घेऊ नका! मग बघा! तुम्ही या विश्वातले सर्वांत महान साधक बनाल. मग गुरुतत्त्व, पुण्य, पाप, चांगल्या शक्ती, वाईट शक्ती सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू लागतात.” – तांबडा नामवाल्यांचे प्रवचन ऐकून सर्वजण मान डोलवू लागले. पण वीरा शांत होईना.

“पण महाराज आपले गुरूदेव ओळखू शकतात ना?”

“होय! गुरुदेव केवळ नजरेने ओळखतात. पुण्यवान कोण आणि पापी कोण?” गुंड्याभाऊंनी माहिती दिली.

“महाराज तुम्हालाही कळत असणार ना? तुमचीही साधना मोठी आहे!” स्वत:च्या घरी सत्संग आयोजित करणारे पाटीलदादा तरफदारी करू लागले.

“हो तर! मीही केवळ नजरेने पुण्याची पातळी ओळखू शकतो.”

“मग महाराज आपल्याला हे तपासता येईल!” वीराने वाट शोधली.

“हो! गुरुदक्षिणा दिली की, आपले पुण्य वाढणार आहे. आपण प्रत्येकाने दानपेटीजवळ जायचे. जो दान देईल, त्याचे पुण्य वाढणार! जो देणार नाही, त्याचे पुण्य तेवढेच राहील. दानपेटीजवळ थांबून आपण दान देणार्‍यांची नोंद करू. त्यांचेच पुण्य वाढेल. त्यावरून महाराज दान कोणी दिलेय ते ओळखतील.”- आदीने प्रयोगाचा तपशील सविस्तर सादर केला.

“पुण्य ही बाब तपासण्याची नाही. दान एका हाताने दिलेले दुसर्‍या हाताला कळू नये, असे गुप्त हवे. नाहीतर पुण्य मिळत नाही.” तांबडा नामवाले माघार घेऊ लागले.

“मला मेलीला काय कळतंय! पण मुलं म्हणतायेत, तर तपासायला काय हरकत आहे? आपल्यालाही कळेल किती अर्पण केल्यावर किती पुण्य मिळतंय ते!”- मैनाला हा प्रयोग भलताच आवडला होता. लगेच शेजारच्या काकूंनी तिची री ओढली.

“हो, हो! पुण्य कमी असेल, तर अर्पण वाढवता येईल! आणि भरपूर असेल, तर कशाला दान-धर्म करा फुकटचा.”

“गुंड्याकाका तुम्हीच सांगा ना त्यांना!” वीरा आणि आदीचा आग्रह सुरू झाला. गुंड्याभाऊलाही पटले. त्यांनी सोट्याला हात घातला. “महाराज ही मुले म्हणताहेत, तर आपण तपासूच! इथे अर्पण पेटी ठेवू! तुम्ही तिकडे बसा! साधक प्रथम तुम्हाला भेटेल. अर्पण पेटीजवळ जाऊन परत तुमच्याकडे येईल. पुण्याची पातळी पाहून तुम्ही अर्पण टाकलंय की नाही, ते ओळखायचं!”

“ठीक आहे! आपण पुढच्या वेळी तसा प्रयोग करूया! पुढचे चार महिने माझे दौरे आहेत. ते संपले की, मी तडक येईन! आता ज्यांना अर्पण करायचे आहे त्यांनी पेटीमध्ये गुरुदक्षिणा टाका!”

“मला मेलीला काय कळतंय! पण पुढच्या वेळीच आपण दक्षिणा देऊ! म्हणजे दोन्ही गोष्टी होतील!” मैनेने मत मांडले. सर्वांची त्याला मूक संमती मिळाली.

जय जय गुरूदेव असा जयजयकार करत सत्संगाची सांगता झाली.

लेखक संपर्क : 97641 47483


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]