राहूल विद्या माने -
“सध्या माथेफिरू वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले, त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली आहे. कोणत्याही कारणासाठी कलाकार, लेखक, पत्रकार यांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला राजकीय पक्षांचे बळ मिळालेले आहे. या वेळी डॉ. दाभोलकरांच्या स्मृती आणि विचारांचे जागरण करताना त्यांचे विवेकवादी विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविले पाहिजेत. डॉ. दाभोलकरांचे विचार संपलेले नाहीत. ज्यांना सत्याने, विवेकाने जगायचे आहे, त्यांच्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक प्रेरक आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या वार्ता संकलन प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रदर्शनातील वृत्तपत्रांच्या कात्रणांचा संग्रह करणारे श्रीपाल ललवाणी, ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारी समिती सदस्य मुक्ता दाभोलकर, माधवी ललवाणी, चित्रकार उदय देशमुख, ‘अंनिस’चे ट्रस्टी गणेश चिंचोले यावेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, “आजही डॉ. दाभोलकर हे सत्याच्या आणि विवेकाच्या रुपात सदैव जिवंत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला मुख्य नायक काळाच्या पडद्याआड जाऊनही प्रत्येक व्यक्ती अंशतः ‘आम्ही सारे दाभोलकर’ होऊन काम करत आहेत. डॉ. दाभोलकर हे जिवंतपणी महापुरुष झाले नाहीत; आता ते महापुरुषांच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. तेही महापुरुषांच्या तुलनेत कमी नाहीत. आपण सगळेच दाभोलकर आहात. दाभोलकर होणे, पचविणे साधी गोष्ट नाही. दाभोलकर हा एक अंगार आहे. अज्ञानाची बहीण असलेली जी अंधश्रद्धा आहे, तिच्या विरुद्ध उभे राहणे ही फार कठीण गोष्ट आहे. कारण श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, याबाबतली विवेकपूर्ण मांडणी अजूनही अपूर्ण आहे.”
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, “आपण जे महापुरुष मानतो, त्यांची वाटणी करणारे अनेक भक्त हे आंधळे किती आणि डोळस किती, याबाबतीत विवेक बाकी आहे. प्रत्येक घरात खोटेपणा आणि चमत्कार आहे. धर्माला काही बोलले तर धर्मांध लोक पेटून उठतात. खोट्या धर्माचा परचष्मा खर्या धर्मावर निर्माण होऊन खरा धर्म गुलामीत कुजतो आहे. सगळी धर्मांध माणसे धर्माचा झेंडा संस्कृतीच्या खड्ड्यात उभे करू पाहत आहेत. अशा परिस्थितीत विवेकशील भूमिका स्वीकारून सर्व धर्मांतील संचित एकत्र करण्याची भूमिका आज आवश्यक आहे. विश्वधर्म आपण स्वीकारला पाहिजे. आजच्या काळात विवेकाचा झेंडा रोवणे गरजेचे आहे. सत्याच्या विजयासाठी बलिदानाची जी परंपरा चालू होती, ती अशीच चालू ठेवणार आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवविश्व, नवा भारत आणि नवा विवेकवादी भारतीय समाज निर्माण करण्याची भूमिका घेतली पाहिजे, नवा विवेकवादी इतिहास लिहिला पाहिजे,” असं सबनीस पुढे म्हणाले.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “अंनिस’ने स्वत: चळवळ म्हणून आतापर्यंत केलेल्या कामाचे दस्ताऐवजीकरण केलेले नाही. हे काम समाजात राहणारे असल्याने त्याचे दस्ताऐवजीकरण झाले नाही. पण, आता ती गरज आहे. त्यामुळे सध्या ‘अंनिस’च्या सर्व कामांचे कोणत्या प्रकारे दस्ताऐवजीकरण करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. डॉ. दाभोलकरांच्या विचारांसाठी काम करणे आणि त्यांच्या विचारांची मांडणी काम करणार आहोत. आता एका टप्प्यापर्यंत डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास आलेला आहे. तो एका निश्चित टप्प्यापर्यंत आला आहे, महत्त्वाचे आहे.
ललवाणी यांनी प्रास्तविक करताना वृत्तपत्र कात्रणांची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सांगण्यावरून केली. यावेळी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. अरुण बुरांडे, ‘अंनिस’ पुणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, मिलिंद देशमुख, नंदिनी देशमुख, मनोहर शेवकरी, वसंत कदम, अनिल वेल्हाळ, नारायण करपे, मुकुंद बहाळकर, राजू जाधव हउपस्थित होते.
दीपक जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. दाभोलकर यांनी मानसिक आरोग्यावर काम करणार्या परिवर्तन संस्थेचा ‘मानसमित्र’ ललित देशमुख याने डॉ. दाभोलकर आणि मानवतेसाठी हुतात्मा झालेल्या शहिदांवर कविता सादर केली. श्रीपाल ललवाणी यांनी प्रास्ताविकामध्ये प्रदर्शनातील संग्रहाबद्दल माहिती दिली. राहुल माने यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा काळे यांनी आभारप्रदर्शन करताना स्वरचित कविता सादर केली.
– राहुल माने, पुणे