आता काश्मीरबद्दल बोला!

अनिल चव्हाण -

गंगूबाई नातवाला घेऊन घरात आली. आईसमोर बसून भाजी निवडू लागली. आईला वाटलं, तिला काही उसनं-पासनं हवं असावं. “आज कामाला गेली नाहीस वाटतं?” आईनं विचारल.

“गंप्याला कसली मुलाखत पाहिजे म्हणतोय. घे म्हटलं चिमणभाऊला भेटून. व्हय वो भाऊ, देशीला नव्हं मुलाखत आमच्या गंप्याला?” माझ्याकडे वळून ती म्हणाली.

मुलाखत द्यायची म्हटल्यावर मी हरखून गेलो. पण तोपर्यंत आवाज आला, “आजे, मोठ्या माणसाची घ्याला सांगितल्या मुलाखत!”

दिवसभर दारात आरडाओरडा करत उड्या मारणारा गंप्या, आता वही आणि पेन घेऊन आला होता. मुलाखत मोठ्या माणसाची घ्यायची होती. पण माझे मोठेपण त्याला मान्य नव्हते. एका फटक्यात त्याने मला लहान करून टाकले. वाटलं, एक थोबाडीत द्यावी; पण मी स्वतःला आवरले.

पण आईनेही त्याला दुजोरा दिला आणि म्हणाली, “आता गुंड्या येईल. त्याची घे मुलाखत.”

“नाहीतर मी सांगू काय? माम्याची घे मुलाखत.” आदिच्या दृष्टीने जगातला सर्वांत मोठा माणूस माम्या होता. पण मामानं वर्तमानपत्रातून तोंड वर काढलंच नाही.

तोपर्यंत गुंड्याभाऊ हजर झाला. त्याच्या मागोमाग एका हातानं धोतर सावरत गुरुजी आत आले.

“अरे मग गुरुजींची मुलाखत घे की.”

“गुरुजी, गंप्याला मुलाखत द्या,” आईनंही विनंती केली.

कपाळाला गंधाचा टिळा लावलेले, धोतर, कुर्ता आणि काळी टोपी अशा पेहरावातले किडमिडीत गुरुजी सगळ्यात मोठे ठरले.

गंप्या म्हणाला, “नाव सांगा पैल.”

सुरुवातीची माहिती भरून झाल्यावर पहिला प्रश्न आला, “तुम्हास्नी कंचा कलर आवडतोय?”

वीरानं उत्तर दिलं, “रक्तासारखा लाल.”

“छे, तो कामगारांचा रंग आहे.”

“मग गवतासारखा हिरवा?” आदि म्हणाला.

“नाही नाही, मी काय पाकिस्तानी आहे?”

“निळा, आकाशाचा रंग.” वीरा म्हणाली.

“ते कसे शक्य आहे? मला आवडतो भगवा.”

“म्हणजे वारकर्‍यांचा रंग म्हणा की…”

“वारकर्‍यांची पताका नव्हे, लढाऊ भगवा.”

“मला तर इंद्रधनुष्य आवडते,” स्वरानं निर्णय दिला.

“रंग किती सुंदर असतात; आणि त्यांना तुम्ही पक्ष, जात आणि धर्म चिकटवून टाकले.” आई सात्विक संतापाने बोलली.

“तुम्हास्नी देश कुठला आवडतोय?” पुढचा प्रश्न आला.

“मला होय? ..हिंदुस्थान.”

“गुरुजी, हिंदुस्थान नावाचा देश जगात अस्तित्वात नाही. आपल्या देशाचे नाव भारत आहे. आपल्या घटनेच्या प्रास्ताविकेत म्हटलेय, ‘वुई इंडियन्स, आम्ही भारतीय..’ तेव्हा, देशाचे नाव नेमके सांगा.” माम्यानं चिमटा काढला.

“मग एवढे मोठमोठे नेते ‘हिंदुस्तान, हिंदुस्तान,’ म्हणतात. त्यांना काही ठाऊक नाही ही गोष्ट?” गुंड्याभाऊ म्हणाला. “त्यांना ठाऊक नसेल, नाहीतर ते नाटक करत असतील,” माम्या म्हणाला, “एक तर ते भोळे असतील नाहीतर धूर्त.”

“होय. देशाचे नाव शाळेतल्या पोरांना माहिती असते. एवढ्या मोठ्या माणसाला माहिती नसेल तर त्याला भोळा म्हणावे लागेल आणि माहीत असूनही तो नाटक करत असेल तर त्याला धूर्त म्हणावा लागेल,” आई म्हणाली.

“मला मेलीला काय कळतंय; पण भोळा म्हणजे मूर्ख आणि धूर्त म्हणजे लबाड ना?” काऊने शेरा मारला.

“तुम्हास्नी राज्य कुठलं आवडते?”

“मला सगळी राज्ये आवडतात; त्यातल्या त्यात काश्मीर. परवाच काश्मीरमधला एक पंडित भेटला होता. त्याला काश्मीरमधून परागंदा व्हावं लागलंय.” गुरुजींनी जादा माहिती दिली.

“होय, अंगावरच्या कपड्यानिशी अनेक काश्मिरी पंडित बाहेर पडले आणि आज निर्वासितांचे जीवन जगत आहेत.” गुंड्याभाऊनं भर घातली.

“देशात हिंदूंच्यावर किती अन्याय होतो पाहा.” गुरुजी बोलले.

“होय हो गुरुजी, काश्मिरी पंडित आज वणवण भटकत आहेत. या ‘सेक्युलर’ लोकांच्या मुळे.” -गुंड्याभाऊ.

“गुंड्याकाका काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून परागंदा व्हावे लागले, तेव्हा भारतात राज्य कोणाचे होते हो?” वीराचा प्रश्न.

“यांचेच की ‘सेक्युलर’वाल्यांचे.” गुरुजी बोलले.

“गुरुजी 1990 साली भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले होते. पंडितांना गव्हर्नर जगमोहननी संरक्षण दिले नाही; उलट त्याच साली काश्मीरमधून बाहेर घेतले. पंडितांचा प्रश्न तयार केला. त्याबदल्यात पुढे जगमोहन भाजपचे मंत्री झाले.” माम्या बोलला.

“पण त्यांचं पुनर्वसन ‘सेक्युलर’वाल्यांनी अजून का केलं नाही?” गुंड्याभाऊचा सवाल.

“काका, इतरांवर खापर फोडण्यापूर्वी ऐका, सहा वर्षे अटलबिहारी आणि आठ वर्षे मोदी अशी 14 वर्षे सत्ता मिळूनही भाजपने पंडिताचं काश्मीरमध्ये पुनर्वसन केलं नाही.”

“तुम्ही अजून पुनर्वसन का केलं नाही?”

“पुनर्वसन झालं तर हिंदू-मुस्लिम भांडणं लावता येणार नाहीत. ‘सेक्युलर’वाल्यांच्या नावाने द्वेष निर्माण करता येणार नाही, असे त्यामागे राजकारण आहे.”

माम्या पुढे म्हणाला, “अतिरेक्यांनी पंडितांच्या दसपट मुस्लिमांना मारलं. पण मुस्लिमांचं नाव सुद्धा घेतले जात नाही.”

“तिथल्या बी.सी., ओ.बी.सीं.चं काय झालं, याची साधी चौकशी सुद्धा नाही.”

“मला मेलीला काय कळतंय; पण हे बहुजनाना फसविण्याचं षड्यंत्र आहे. असं म्हणायचं का तुला?” काऊचा प्रश्न.

“होय काऊताई, मुस्लिमद्वेष पसरवणं आणि मतं मिळवणं हा यांचा उद्देश आहे. राज्य मात्र ब्राह्मणवाद्यांचं आणायचं.”

“गुरुजी, माम्या म्हणतो त्यात तथ्य दिसते. आठ वर्षांत पंडिताचं पुनर्वसन काश्मीरमध्ये का केलं नाही?” गुंड्याभाऊनं सवाल केला.

“काका, यांना पंडित दिसत आहेत. पण हजारो वर्षे अन्याय सोसणारे दलित दिसत नाहीत, आत्महत्या करणारे शेतकरी दिसत नाहीत, हजारो मैल चालत जाणारे मजूर दिसत नाहीत.”

माम्या आता चिडला होता.

“आता काश्मीरबद्दल बोला.” गुंड्याभाऊ बोलला.

“ऐका तर… काश्मीरमध्ये आजपर्यंत 27 हजार लोक मारले गेले. त्यात 650 पंडित, तर 26 हजार काश्मिरी मुसलमान मारले गेले. मीडिया फक्त 650 बद्दल बोलतो; बाकीचे भारतीय नव्हते का?” माम्यानं उत्तर दिलं.

“मी म्हणत होतो की नाही, माम्याची मुलाखत घ्या.” आदिने आठवण करून दिली.

“अरे बाबांनो, तुमची भांडणं थांबवा आणि पैली मुलाखत द्या. माझं लेकरू खोळंबलंय नव्हं.” गंगूबाईने आठवण करून दिली. सर्वजण थांबले तसं

“तुम्हास्नी पेय कोणते आवडते?” गंप्याने पुढचा प्रश्न विचारला.

“गुरुजींना गोमूत्र आवडतं,” वीरा, स्वरा आणि आदि एकासुरात ओरडले.

वाद वाढेल म्हणून आईने सांगून टाकलं, “आवडू दे काहीतरी. तुम्ही आधी चहा प्या आणि मुलाखत थांबवा.”

लेखक संपर्क : 97641 47483


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]