ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

–ह.भ.प.देवदत्त परूळेकर
आश्रमव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही हिंदू धर्माची दोन वैशिष्ट्ये आहेत. हिंदूंची पारंपरिक समाजरचना म्हणजे वर्णाश्रमव्यवस्था असे म्हटले जाते. हिंदू धर्माला वर्णाश्रम धर्म असेही म्हटले जाते. वर्णव्यवस्थेत व्यक्तीची कर्तव्यकर्मे त्या व्यक्तीच्या वर्णाची द्योतक बनतात. आश्रमव्यवस्थेत वयानुसार व्यक्तीच्या आश्रमांची विभागणी होते व कर्तव्यकर्मे ठरतात.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषिऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रमव्यवस्थेस अधिष्ठान आहे. मनुष्य हा देव, पूर्वज किंवा पितर आणि ऋषी यांचे ऋण घेऊन जन्माला येतो आणि त्याने योग्य कर्माने म्हणजे ब्रह्मचर्याने ऋषिऋण, यज्ञकर्माने देवऋण व प्रजोत्पादनाने पितृऋण फेडले पाहिजे, अशी आश्रमव्यवस्थेची भूमिका आहे. आश्रम म्हणजे विशिष्ट ऋणे फेडण्यास आवश्यक व योग्य अशी कर्तव्यकर्मपद्धती व ती पार पाडण्याकरिता ठरविलेली वयोवस्था किंवा जीवनातील टप्पा किंवा अशा विशिष्ट कर्तव्यकर्मापद्धतीचा अंगीकार करण्याचे वसतिस्थान.
आश्रम चार आहेत : ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास. हे चार आश्रम चारही वर्णांना सारख्याच रितीने विहित नाहीत. आश्रमव्यवस्थेचा निर्देश प्रथम छांदोग्योपनिषदात केलेला दिसतो (२.२३.१). तेथे आश्रम हा शब्द मात्र आलेला नाही. धर्मरूपी वृक्षाचे तीन स्कंध म्हणजे खांद्या तेथे सांगितल्या आहेत. यज्ञ, अध्ययन व दान हा प्रथम स्कंध म्हणजे गृहस्थाश्रम. तम हा द्वितीय स्कंध म्हणजे वानप्रस्थाश्रम. आचार्यकुलात वास करणारा ब्रह्मचारी हा तृतीय स्कंध होय. प्रव्रज्या म्हणजे संन्यास बृहदारण्यकोपनिषदात प्रथम आढळतो. वेदकाळी अथवा बुद्धपूर्वकाळी ब्राह्मणांनीच क्रमाने चार आश्रम स्वीकारावेत, क्षत्रियांनी संन्यासाव्यतिरिक्त तीन आश्रमच स्वीकारावेत, वैश्याने पहिले दोन व शूद्राने केवळ गृहस्थाश्रमच स्वीकारावा असे निर्बंध नसावेत; कारण बुद्धाने सर्व वर्णातील लोकांना मोठ्या प्रमाणात भिक्षुदीक्षा म्हणजे संन्यास दिलेला दिसतो. महाभारतातील शांतिपर्वात (अध्याय ६३) क्षत्रिय राजाला राजपुत्र गादीवर बसवल्यानंतर वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दर्शविली आहे व राजाची अनुमती असल्यास वैश्य व शूद्र यांनाही वृद्धापकाळी वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दिलेली आहे. मनुस्मृती व याज्ञवल्क्य स्मृती ह्यांच्या काळी वर्णानुक्रमाने आश्रमग्रहणावर कडक निर्बंध पडले असे मानावे लागते. याज्ञवल्क्याच्या मते ब्राह्मण चारही आश्रम पाळू शकतो, तर क्षत्रिय पहिले तीन, वैश्य पहिले दोन व शूद्र केवळ गृहस्थाश्रमाचे पालन करू शकतो. स्त्रियांना फक्त गृहस्थाश्रमाचीच मुभा होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर ठरावीक वयानंतर गृहस्थाश्रमात जाण्याची सक्ती होती, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. परंतु स्मृतिपूर्वकाळी स्त्रियांनीही ब्रह्मचर्य व वानप्रस्थ हे आश्रम स्वीकारण्याची पद्धती होती, असे एका धर्मसूत्रात म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीस हे आश्रम क्रमश: पाळावयाचे असतात. अपवादात्मक एखादी विरक्त व्यक्ती ब्रह्मचर्याश्रमानंतर सरळ संन्यासश्रमात जाऊ शकते. परंतु मोक्षप्राप्तीच्या ध्येयाकरिता आधी तीनही ऋणे फेडलीच पाहिजेत आणि ती ऋणे फक्त ठरावीक आश्रमात ठरावीक पद्धतीनेच फेडली पाहिजेत, असा नियम असल्याने सामान्य माणसास चारही आश्रमांतून जाणे हे क्रमप्राप्त होते.
आद्य शंकराचार्यांनी मायावादाचा पुरस्कार करून मोक्ष हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानल्याने ज्ञानमार्गाचा व कर्म संन्यासाचा जोरदार पुरस्कार केला. जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष व मोक्ष प्राप्तीसाठी संन्यासाची आवश्यकता मानली गेल्याने गृहस्थाश्रमाला गौणत्व प्राप्त झाले. नित्य कर्तव्य कर्म सोडून कर्म संन्यासाकडे समाज धावू लागला.
ज्ञानेश्वर माउलींनी मात्र मोक्ष किंवा परमात्म प्राप्तीसाठी संन्यासाची काही आवश्यकता नाही असे स्पष्ट प्रतिपादन केले. अनुष्ठान करण्यास संन्यासापेक्षा कर्मयोग सोपा. फल मात्र कर्मयोगाचे यथायोग्य आचरण झाले तर संन्यासाच्या आचरणाने जे मिळावयाचे तेच मिळते. एवढेच नव्हे, तर
तरी गेलियाची से न करी । ।
न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरू जैसा ॥
आणि मी माझें ऐसी आठवण ।
विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥
जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला ।
म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥
आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।
जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणौनि ॥
देखैं अग्नि विझोनि जाये ।
मग जे राखोंडी केवळु होये।
तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥
म्हणौनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे ।
इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥
कर्मयोगी अंतरातून संन्यासीच असतो. जे गेले त्याची तो आठवण करत नाही. जे मिळाले नाही त्याची इच्छा करत नाही. मेरूपर्वत जसा निश्चल असतो तसा तो मनाने ह्या भूमिकेवर ठाम उभा असतो. मी आणि माझे याची त्याच्या मनाला आठवणही नसते. मनातूनच असा निर्लेप झाल्यामुळे आसक्तीच त्याला सोडून जाते आणि अखंडित सुखाने तो सुखात डोलत रहातो. मग तुला असे वाटेल की त्याने गृहप्रपंचाचा त्यागही बाह्यतः केलेला नाही, मग हा संन्यासी कसा म्हणायचा? अर्जुना, कापूस आणि अग्नी हे एकत्र नांदू शकतील का? पण अग्नी विझून गेल्यावर जी राख उरते ती चिमटीत घेऊन वात वळता येतेच की नाही? तसेच प्रपंच घेणारे मनच निःसंग झाल्याने त्याला बाह्य त्याग करण्याची जरुरीच उरत नाही. प्रपंच माझा म्हटला तर टाकायचा ना, ममत्वच संपल्यावर टाकायचे उरलेच काय? त्या कर्मयोग्याच्या मनात संकल्पच उठत नाही. त्यामुळे वरवर दिसणार्या उपाधीत तो अडकलाच जात नाही. कल्पनेचाच नाश झाल्यामुळे सहजच त्याच्या हातून संन्याशासारखेच आचरण घडते. संन्यासी आणि कर्मयोगी हे असे एकाच मार्गाने चाललेले असतात. मूर्खांना ह्या दोन्ही मार्गातील ऐक्य समजत नाही. बाह्यतः ज्याने प्रपंच टाकला तोच तेवढा संन्यासी अशी त्यांची कल्पना असते. प्रत्येक दिव्याला काय वेगवेगळ्या प्रकाशाची जात असते काय? दिव्याचा आकार वेगळा असला तरी प्रकाश जसा एकच, तसे सगळ्या अनुभवाअंती ज्यांनी या तत्त्वाचे चिंतन केले ते ज्ञानी पुरुष. हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात किंबहुना एकच आहेत हे निश्चयाने जाणतात.
गृहादिकाचा त्याग करून वनात जाण्याने, संन्यास घेण्याने परमात्म्याची प्राप्ती होईल असे मानणे फोल आहे, हे सांगताना ज्ञानेश्वर माउली एका अभंगात म्हणतात –
घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी शरीरा येवढें जाड । मायबाप वोखटी त्यजूं म्हणसी तरीअहंकार अविद्येचें कोड ॥
बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशातृष्णा माया अवघड रया॥
त्यजिलें तें काय कासया म्हणिजे सांग पा मजपांशीं ऐसें।
जया भेणें तूं जासी वनांतरातें तंव तुजचि सरिसें रया ॥
स्त्रीं वोखटी त्यजूं म्हणसी तरी कल्पने येवढी भोगती ।
पुत्र अपत्य त्यजूं म्हणसी तरी इंद्रियांसि नाहीं निवृत्ति ।
सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति ।
आवघेंचि त्यजूं पाहे म्हणसी तरी मना नाहीं निज शांति रया ॥
अवघींचि तुज जवळी दुमदुमित असतां वरीवरी मुंडिसी कां करिसी विटंबना ।
सहज संतोषें असोनि तैसा जैसापरि तो सदगुरु पाविजे खुणा। आपुले आश्रमीं स्वधर्मीं असतां सर्वत्र एकुचि जाणा। बापरखुमादेविवरुविठ्ठलु इतुकियासाठीं नेईल वैकुंठभुवना ॥
तुकाराम महाराज हाच विचार सांगताना म्हणतात –
ऐसा घेई कां रे संन्यास ।
करीं संकल्पाचा नाश ॥
मग तूं राहें भलते ठायीं ।
जनीं वनीं खाटे भोई ॥
अरे तू असा संन्यासी हो की, तुझ्या अहंतेचा, सर्व संकल्पाचा नाश होईल, मग तू कुठेही रहा अगदी जनात, वनात, खाटेवर, जमिनीवर कुठेही रहा काही हरकत नाही.
संतांनी मोक्ष नव्हे, तर भक्तीच जीवनाचे ध्येय मानले. तसेच केवळ भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते असे मानल्याने गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेण्याची काही आवश्यकताच राहिली नाही. घरादाराचा त्याग करून वनामध्ये जाऊन साधना करण्याचीही काही आवश्यकता राहिली नाही. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात –
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखी येतो घरा नारायण ॥
आपले नित्यनैमित्तिक कर्म करताना भगवंताचे नामस्मरण केले की अनायसे घरातच परमात्म्याची प्राप्ती होते. भक्तीच्या मार्गाने स्त्रीशूद्रादी सर्वांनाच ज्ञानप्राप्ती, मोक्षप्राप्ती म्हणजेच परमात्म प्राप्ती होऊ शकते असे स्पष्ट प्रतिपादन आपले संत करतात.