प्रभाकर नानावटी -

जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद – होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व इत्यादीसारख्या कुठल्याही (अति) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले तरी शब्द वा वाक्य कुणाच्या भावना कसे दुखवतील, याचा नेम नाही. काही प्रमाणात समाजमाध्यमंसुद्धा याच पंक्तीत जाऊन बसत आहे की काय असे वाटत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वा ट्विटरसारख्या समाजमाध्यमांतून मत प्रदर्शित करण्यात काही चूक नाही; आलेले मेसेजेस न वाचता वेळ न दवडता त्यावर ताबडतोब ‘लाइक’ शिक्का मारणे वा ‘फॉर्वर्ड’ करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे; वेळी-अवेळी, रात्री-अपरात्री, घरात नाश्ता-जेवण (वा नैसर्गिक विधी) करत असताना, सार्वजनिक समारंभ-कार्यक्रमाच्या वेळी वा कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असताना (हॉस्पिटल-स्मशानाच्या ठिकाणीसुद्धा!) मोबाइलवरील मेसेजेस वाचण्यात (व ताबडतोब प्रतिसाद देण्यात) काही गैर नाही; अशा प्रकारच्या ‘टेकन फॉर ग्रँटेड’ मानसिकतेमुळे कुणालाही काहीही वाटेनासे झाले असून यात काहीतरी चुकत आहे, याची पुसटशी शंकासुद्धा कुणाला शिवत नाही. उठल्या-बसल्या, दिवस-रात्र ‘त्या’ निळ्या प्रकाशात आपले डोके खुपसून बसलेले असताना या नीलकिरणांचे आपल्या डोळ्यांवर काही दुष्परिणाम होऊ शकेल, याचे भानही नसल्यामुळे हा अव्यापारेषु-व्यापार अव्याहतपणे चालू आहे. नीटपणे स्वतःचे नाकही पुसता न येणार्या दोन-तीन वर्षांच्या अजाण मुला-मुलींपासून धूसर दृष्टी असलेल्या म्हातार्या-कोतार्यापर्यंतच्या सर्वांना आवडणार्या या स्मार्टफोनच्या वापराविषयी एक अवाक्षरही उच्चारले, तरीही तडीपार होण्याची तयारी हवी. समूहमाध्यमांचे हत्यार हाती असल्यामुळे बदनामीकारक मजकूर लिहून विरोधकांचा मानसिक छळ करणे, हा तर या समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांचा हातचा मळ झाला आहे.
समाजमाध्यमं व खिन्नमनस्कता यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हा प्रश्न नेहमीच विचारला जात आहे. काही मानसतज्ज्ञांच्या मते, समाजमाध्यमांच्या अतीव वापरामुळे खिन्नमनस्कता (depression) या मानसिक रोगाचे आपण शिकार होऊ शकतो. परंतु अशा प्रकारे घाईने, कुठलेही निष्कर्ष न काढता नेमके कुठे चुकत असावे, याचा शोध घेणे शहाणपणाचे ठरेल.
खरे पाहता ही समस्या वाटते तितकी सोपी नसून फार गुंतागुंतीची आहे. करोडपती अमिताभ बच्चन स्टाईलने ‘होय’ किंवा ‘नाही’ असे एका दमात उत्तर देणे शक्य नाही. व्हॉट्सअॅपवरील कोरोना महामारीच्या संदर्भातील मजकूर ‘स्क्रोल’ करत असताना मन विषण्ण होऊन जाते. प्रसंगाचे गांभीर्य न ओळखता केलेली मल्लिनाथी वाचताना मेसेज पाठविणार्यांची कीव कराविशी वाटते. अनेक वेळा मित्रांचा हेवा वाटू लागतो. आपण इतके तडफडत आहोत; ते मात्र किती ‘कूल’ आहेत हा विचार शिवून जातो. समाजमाध्यमांवर झळकणारे चित्र-विचित्र फोटो व/वा व्हिडिओ बघत असताना आपण कुठल्या जगात वावरत आहोत, असे वाटू लागते. समाजमाध्यमांवरील अफवांमुळे व या अफवांवर नको तितका विश्वास ठेवल्यामुळे आर्थिक व जीवित हानी होत असलेली पाहून मन विषण्ण होते.
परंतु त्याच वेळी एखाद्या लहान बाळाचा स्मितहास्याचा फोटो वा त्याच्या खोडकरपणाचा व्हिडिओ बघत असताना मनातला शीण भुर्रकन उडून जातो. कुत्र्या-मांजरांचा खेळ, जंगलातील क्रूर प्राण्यांचा अस्तित्वासाठीचा झगडा, दूरच्या कुठल्या तरी देशातील पर्यटन ठिकाणांचे धबधबे, सूर्योदय-सूर्यास्तासारखे दृश्य स्क्रीनवर पाहताना मन हरवून जाते. आवडलेले जुने चित्रपट, कार्टून्स पाहत असताना आपण पुन्हा भूतकाळात शिरतो. फक्त या एकमेव कारणासाठी तरी समाजमाध्यमांची ही सुविधा हवीहवीशी वाटू लागते. समाजमाध्यमांतून आलेल्या हास्यमय प्रसंगाच्या फोटो/व्हिडिओंना आपण मनस्वी दाद देतो, हसतो, ‘शेअर’ करू लागतो. त्यामुळे समाजमाध्यम तितके वाईट नाही, असे वाटू लागते.
समाजमाध्यमांविषयी अनेक प्रकारचे उलट-सुलट मतप्रवाह व्यक्त होत आहेत. ‘ट्रोलिंग’, ‘सायबर बुलिंग’, स्क्रीनची व्यसनाधीनता आदींमुळे समाजमाध्यमांबद्दल टोकाची विखारी मतं व्यक्त केली जात आहेत. अत्याधुनिक फोटोशॉपिंग व फिल्टरिंग तंत्रामुळे समाजमाध्यमांवरील माहितीच्या सत्यासत्यतेची शहानिशा करणे जमेनासे झाले आहे; शिवाय समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करणार्यांच्या मनावर, त्यांच्या कामावर होणारे परिणाम आदी गोष्टीसुद्धा ऐरणीवर आहेत.
अलिकडेच JAMA या वैद्यकीयविषयक अमेरिकन नियतकालिकात Association of Screen Time and Depression in Adolescence या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. नुसते शीर्षक वाचूनच तरुण – तरुणींमधील ‘स्क्रीन अॅडिक्शन’च्या वाढत्या सवयीविषयी समाजाची काळजी करणार्या अनेकांना समाजमाध्यमांचा धक्का बसत आहे. अनेकांच्या मनात स्क्रीनसाठी वेळ खर्ची घालणे धोकादायक असे वाटू लागले आहे. परंतु समाजमाध्यम व विषण्णता यांच्यात खरोखरच काही संबंध आहे का, याविषयी अभ्यास करताना संशोधकांनी काही सावधानतेचे इशारेही दिले आहेत.
मादक द्रव्य व मादक पदार्थांचे सेवन करणार्या सुमारे 3800 पौगंडावस्थेतल्यांचा अभ्यास करत असताना त्यांच्या ‘स्क्रीन अॅडिक्शन’विषयीसुद्धा अभ्यास केला गेला. हा अभ्यास सुमारे चार वर्षे चालला होता. अभ्यासकांच्या मते, या वयातील तरुण-तरुणींच्यात खिन्नमनस्कतेचे प्रमाण वाढण्यात ‘स्क्रीन अॅडिक्शन’चाही वाटा आहे. एक समूह म्हणून केलेले संशोधन व व्यक्ती म्हणून केलेले संशोधन या दोन्ही बाबतीतही हेच निष्कर्ष निघत असल्यामुळे हा चिंतेचा विषय होत आहे, असे लेखात नमूद केले आहे.
या निष्कर्षाप्रत येण्यास घाई तर होत नाही ना? समाजमाध्यम वाईटच आहे, असे म्हणत याविषयीची चर्चा थांबविण्यापूर्वी संशोधकानी ‘स्क्रीन अॅडिक्शन’ व खिन्नमनस्कता यांच्यातील संबंधाविषयी नमूद केलेल्या सावधानतेच्या इशार्यांकडेही लक्ष वेधणे तितकेच गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच.
JAMA च्या लेखात पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्यातील समाजमाध्यमांच्या वापरामुळे खिन्नमनस्कतेच्या निर्देशांकात वाढ होत असून स्क्रीनसमोरील वेळेत एक तास जरी वाढ केल्यास हा निर्देशांक 0.64 ने वाढत आहे, असे नमूद केले आहे. मुळात मानसतज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या निकषांनुसार खिन्नमनस्कता 0 ते 28 या निर्देशांकानुसार ठरविली जाते. गंमत म्हणजे या वयोगटातील मुलींच्या खिन्नमनस्कतेचा 2.79 निर्देशांक पोचण्यासाठी मुलींना दर दिवशी 4-5 तास स्क्रीनसमोर बसावे लागेल. त्या तुलनेने ही वाढ नगण्यच म्हणावे लागेल. समाजमाध्यमांच्या वापरामुळे हा वयोगट पूर्णपणे वाया जात आहे, असे समजण्यात हशील नाही.
समाजमाध्यमांत फक्त व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वा ट्विटर एवढेच प्रकार नसून टिक्टॉक् लिंकड्-इन, स्नॅपचॅट, यूट्यूब, क्वोरा, रेड्डिट् ,पिंटरेस्ट, फ्लिपबोर्ड असे अनेक प्रकार आहेत व यातील प्रत्येक प्रकाराला प्राथमिकता दर्शविणारे अनुयायी वेगवेगळ्या गटात विभागलेले असतात. एवढे वेगवेगळे प्रकार असले, तरी समाजमाध्यमांमुळे मानसिक संतुलन बिघडते व ही एक समस्या आहे, याबद्दल मात्र सर्वांचे एकमत असते.
समाजमाध्यमांच्या अतिवापराच्या समस्येचा अल्कोहॉलच्या समस्येशी करता येईल, असे जाणकारांना वाटत आहे. सीमित प्रमाणात अल्कोहॉल घेत असल्यास ती समस्या होत नाही; फक्त त्याचे अतिसेवन केल्यास ती समस्या होऊ शकते. हाच निकष समाजमाध्यमांच्या वापरालाही लावता येईल. दारू पिणे हे कुठले तरी दुःख (काल्पनिक!) विसरण्यासाठी सातत्याने होत असल्यास त्याचे अॅडिक्शनमध्ये रूपांतर झाल्यास ते एक मानसिक रोगाचे लक्षण ठरू शकेल. त्याचप्रमाणे फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांचा वापरसुद्धा काही विसरण्यासाठी होत असल्यास वा समोरच्या प्रश्नांचा विसर पडावा म्हणून सतत स्क्रीनसमोर बसण्याचा पर्याय निवडत असल्यास ती एक मानसिक समस्या ठरू शकेल. परंतु समाजमाध्यमांचा विवेकशील वापर आपले जीवन अधिक फुलवण्यासाठी होत असल्यास त्याचे स्वागतच करायला हवे.
पौगंडावस्थेतल्यांच्यातील खिन्नमनस्कतेला समाजमाध्यमच पूर्णपणे कारण आहे, असे निर्विवादपणे JAMAच्या लेखात वा इतर ठिकाणी सिद्ध झालेले नाही. कदाचित या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे त्यांच्यात परस्परसंबंध असावा, अशी अटकळ बांधली जात असावी. समाजमाध्यमांच्या (अतीव) वापरामुळे खिन्नमनस्कतेत वाढ होत आहे, हे मान्य केले तरी खिन्नमनस्कतेला तेच एकमेव कारण आहे, असे म्हणता येणार नाही.
याच लेखातील उदाहरण घेतल्यास पौगंडावस्थेतील खिन्न मनःस्थितीतील रुग्णांचे बालपण तितके सुखाचे गेले नसेल व त्यामुळे ते ‘स्क्रीन अॅडिक्शन’चे बळी ठरलेले असावेत. काही कारणामुळे ही मुलं बालपणी बळजबरी, हिंसा, अत्याचारासारख्या प्रसंगांना सामोरे गेलेली असल्यामुळे मोठेपणी ती अशा प्रकारच्या समाजमाध्यमांतून हरवलेले सुख शोधत असावीत. मानसतज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीतील खिन्नमनस्कतेचे एक कारण त्यांच्या बालपणातील कटु अनुभवात शोधता येते. खिन्नमनस्कतेची अनेक कारण असू शकतात व त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.
यावरून समाजमाध्यम तितकेसे वाईट नाही, असे आपल्याला वाटत असल्यास आपण योग्य दिशेने विचार करत आहात, असे म्हणता येईल. 2018 च्या एका अभ्यासानुसार 21 व्या शतकातील समाजसुद्धा बहिष्कृत करत असलेल्या समलिंगी व तृतीयपंथी (LGBTQ) व्यक्तींना समाजमाध्यमाचा फार मोठा आधार वाटत आहे. समाजमाध्यमांवरील त्यांच्याबद्दल घृणा व्यक्त करणारी जहरी टीका, टिंगल, टवाळी, कुटाळक्यांच्या बरोबरच त्यांच्याविषयी सहानुभूतीच्या ‘पोस्ट’सुद्धा त्यात असल्यामुळे त्यांचे जीवन सह्य होत आहे. समूहमाध्यमांतून त्यांना एकमेकाशी संवाद साधणे शक्य होत आहे. कदाचित या समाजमाध्यमांमुळेच अशा व्यक्ती संघटित होऊ शकते व अशा व्यक्तींबद्दलची विषम वर्तणुक गुन्हा समजला जावा, यासाठी कायदा करवून घेणे शक्य झाले आहे.
तरीसुद्धा समाजमाध्यमांचा अतिवापर करणार्यांनी खालील धोक्याच्या इशार्यांबद्दल जास्त जागरूक असणे गरजेचे आहेः
समाजमाध्यमांच्या वापरामुळे रोजच्या व्यवहारातील परस्परसंबंध बिघडणे, वास्तव जगातील सुखद प्रसंगांचे आनंद अनुभवताना समाजमाध्यमांवरील तुमच्या प्रोफाईलला धक्का पोचण्याच्या भीतीमुळे त्रस्त होणे, समाजमाध्यमांचा वापर कमी करण्यास अशक्यप्राय आहे, असे वाटणे.
मुळात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास पश्चात्तापाची पाळी नक्कीच येत असते. त्यामुळे समाजमाध्यमांच्या अतिवापराबरोबरच वरील पैकी एखादा जरी धोक्याचा इशारा तुम्हास लागू होत असल्यास समाजमाध्यमांपासून व/वा स्क्रीनपासून काही काळ दूर राहून कुणाशी तरी प्रत्यक्ष संवाद साधणे किंवा कुणाच्या तरी हास्यविनोदात सहभागी होणे, हाच (एकमेव) उपाय तुम्हाला समाजमाध्यमांच्या धोकादायक वापरापासून वाचवू शकेल.