अंनिसच्या पाठबळामुळे कोरोनाशी लढायला बळ मिळते

मेघना हांडे - 9730625631

मी मेघना हांडे, ससून रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून काम करते. कोरोनाचे रुग्ण ज्यावेळी पुण्यात सापडायला लागले, त्यावेळी पहिल्यांदा खास संसर्गजन्य आजारांवर काम करणार्‍या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंट घेतले जात होते. लवकरच त्यांची क्षमता संपली, मात्र तोवर ‘ससून’च्या नव्या इमारतीमध्ये रुग्ण घ्यायची तयारी होत होती.

जसं ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंट घेणे सुरु झाले, तशी स्वतःची आणि घरच्यांची मनाची तयारी केली की, माझी ड्यूटी कोरोनाच्या पेशंटसाठी लागणार, तेव्हा काय आणि कसे करायच? पंधरा दिवसांच्या राहण्याच्या तयारीने घर सोडले. आमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाजवळच एका हॉटेलमध्ये केलेली होती.

‘ससून’मधील नवीन 11 मजली इमारतीमध्ये कोरोनाशी लढा देण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या बॅच तयार करण्यात आल्या. त्यामध्ये आमची बॅच तिसरी.. आधीच्या दोन बॅचचा अनुभव सहकार्‍यांनी आम्हाला सांगितला होता. त्यामुळे मनावरचे दडपण थोडे कमी झाले होते. सोमवारपासून आमची ड्यूटी चालू झाली. मला सस्पेक्टेड वॉर्डमध्ये ड्यूटी देण्यात आली.

पीपीई किट कसे घालायचे, कसे काढायचे, याचे आम्हाला ट्रेनिंग दिले होते. पहिल्या दिवशी किट घातले. पण थोड्या वेळाने नाक आणि कान दुखायला लागले, खूप गरम झाले, घामाने ड्रेस अगदी निथळत असल्याचे जाणवत होते; पण मी काही करू शकत नव्हते. तहान लागली तरी पाणी पिऊ शकत नव्हते. कारण एकदा का तुम्ही किट घातले की ते ड्यूटी संपल्यावरच काढायचे.

सुरुवातीला किट घातले की, दुपारी 12 पर्यंत असे वाटायचे बास झाले. आता हे किट काढून टाकावे. पण आमच्याकडे काही पर्याय नव्हता. आम्ही सकाळी 7.30 ला नाष्टा केलेला असायचा आणि पाणीही त्यावेळी प्यायलेलो असायचो. त्यावर डायरेक्ट दुपारी 4 नंतरच आम्ही पहिल्यांदा पाणी प्यायचो.

माझी मॉर्निंग ड्यूटी असायची, ड्यूटी संपवून रूमवर येऊन, अंघोळ करून आम्हाला दुपारचे 4 वाजायचे, ड्यूटी संपेपर्यंत पाणी नाही, घामाने ड्रेस चिक्क भिजायचा, डि-हायड्रेशन होत होते. खूप थकल्यासारखे वाटायचे. आधी पाणी पिऊन थोडी तरतरी आली की नंतर जाईल तेवढे जेवण करायचो, अर्थातच जेवायची वेळ आणि इच्छा कधीच निघून गेलेली असायची.

हे रूटीन आमचे 7 दिवस चालू होते. पुढचे सात दिवस कॉरेंटाईन कालावधी. या काळामध्ये सगळ्यांना मनामध्ये धास्ती.. आपल्याला संसर्ग झाला नसेल ना याची. पाचव्या दिवशी चाचणी झाली, ज्याचा सातव्या दिवशी रिपोर्ट आला. रिपोर्ट निगेटिव्ह आला तसा जीवात जीव आला.

मी ज्या वॉर्डमध्ये होते, तिथे संपूर्ण फॅमिली अ‍ॅडमिट असायची, काहीजण एकटे असायचे, पेशंट अ‍ॅडमिट असेल तर नातेवाईक त्याच्याजवळ थांबण्यास मनाई होती. वॉर्डमध्ये जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आला तर त्याला लगेच दुसर्‍या वॉर्डमध्ये शिफ्ट करायचे. त्यामध्ये लहान मुलेही होती. ज्यांना कोरोना झाला त्यांना धीर द्यायचा, ‘तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बरे होणार,’ असे सांगितले तरी त्यांना आधार वाटायचा, काही पेशंटजवळ कोणीच नातेवाईक नसायचे. त्यामुळे ते टेन्शन मध्ये असायचे.. मला शक्य झाले, तेवढा मानसिक आधार त्यांना दिला.

काम करताना हे जाणवले की, लढाई लढताना सैनिकांची मानसिकता कशी असेल? सभोवती प्रतिकूल परिस्थिती असताना स्वतःचे आणि टीमचे मनोधैर्य राखणे खूप अवघड. या लढाईत कुटुंबीयांसोबत मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा देखील मानसिक आधार मिळाला. रूमवर पोचले की मला कौतुक, आदर आणि काळजीमिश्रित फोन येत असत सगळ्यांचे. एवढंच नाही, तर तर मला मुलांच्या शाळेतून त्यांच्या टीचरनेही आपुलकीने फोन केले.

‘अंनिस’मधले आपले साथी तर अगदी भावूक होऊन फोन करायचे.. तेव्हा कॉलच्या दोन्ही बाजूला गळे आणि डोळे दाटून आलेले असायचे. हेच तर आहेत प्रेमाचे बंध. या सगळ्यांबरोबर एक छान नातं तयार झालं आहे, ‘अंनिस’मध्ये आल्यापासून कायम पाठबळ मिळते. खूप जवळची वाटतात ही प्रेमाची नाती.. या सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट पाहून मनाला सदैव उभारी येत होती.

दुर्दैवाने, मला आलेला आदर आणि कौतुकाचा अनुभव सगळ्यांना येत नाही. काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करतो म्हणून फार साशंकतेने पाहतात आम्हा आरोग्य कर्मचार्‍यांकडे. त्यांच्याशी दुजाभाव केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे लोक हा विचार करत नाही की, हे सर्व जण जोखीम उचलून, फॅमिली सोडून हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. जशी तुम्हाला फॅमिली आहे तशी आम्हालाही आहे. आम्ही सर्व या युद्धात मोठ्या धीराने लढत आहोत.. कोरोनाला हरवायचे आहेच.. आम्हाला पाठिंबा द्या, तो देणे जर जमत नसेल तर कृपया आमचे पाय मागे ओढू नका.

आमचे कोरोनाचे पंधरा दिवसांचे पोस्टिंग संपल्यावर आम्ही घरून येऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये नेहमीचे काम करतो. आता कोरोना वॉर्डमध्ये काम केलेले नसले तरी धोका हा सगळीकडे आहेच. त्यामुळे घरातच वेगळे राहणे भाग आहे. घरी आल्यावर मुलं विचारतात, आई तुला हात लावू का, तुझ्या जवळ येऊ का, तू आम्हाला कधी जवळ घेणार त्यावेळी अगदी मनात भावना दाटून येतात की यांना जवळ घ्यावं, पण त्या क्षणी त्यांना समजावून सांगावं लागतं, अजून थोड्या दिवसांनी तुम्हांला जवळ घेईल…बस्स काही दिवस अजून..


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]